थेरवाद, महायान व तंत्र या तिन्हींतील बुद्ध सारखाच आहे का?

बुद्धाच्या जीवनाविषयीच्या विविध आवृत्त्या किंवा मांडण्या केवळ काटेकोर ऐतिहासिक संदर्भातील निव्वळ तथ्यांच्या संदर्भात पाहता येत नाहीत, किंवा त्या परस्परविरोधीही मानता येत नाहीत. उलट, आपण समजून घ्यायला हवं की, प्रत्येक मांडणी एका विशिष्ट संदर्भामध्ये लिहिली गेली आहे व तशीच ती वाचली जाणार आहे. हे विभिन्न संदर्भ आपल्याला विशिष्ट शिकवणुकी कशा रितीने पुरवतात, हे पाहिलं तर आपल्याला एकंदरित बुद्धाच्या शिकवणुकींचा सखोल आस्वाद घेता येईल, शिवाय या शिकवणुकींचं आपल्या जीवनामध्ये कसं उपयोजन करायचं हेही या विविध मांडण्यांद्वारे शिकता येतं. अशा रितीने शिकवणुकींचं उपयोजन करत आपण बुद्धाच्या जीवनातील टप्पे अनुसरले, तर बुद्धाला सत्याचा साक्षात्कार झाला त्याप्रमाणे आपल्यालाही होऊ शकतो आणि इतरांना करुणेने मदत करायचा उद्देशही साध्य होऊ शकतो.

प्रास्ताविक

बौद्ध धर्माचे संस्थापक शाक्यमुनी कोण होते, हे शोधायची आपली इच्छा असते, तेव्हा बुद्धाच्या जीवनकहाणीच्या अनेक भिन्न आवृत्त्या आपल्याला सापडतात. असं असल्यावर आपण विचारू शकतो की: हे सर्व एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहेत का? या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं नाही.

बुद्धाच्या जीवनाची एक आवृत्ती पाली वाङ्मयातून आलेली आहे, थेरवाद परंपरेतील धर्मग्रंथांमध्ये ती आढळते. त्यात एकाच ठिकाणी त्याच्या जीवनाचा संपूर्ण वृत्तान्त नाही, पण विविध संहितांमधून छोटे-छोटे भाग निवडून आपण एकत्र गुंफू शकतो. त्यानंतर बौद्ध वाङ्मयाने या मोकळ्या सांगाड्यात अनेक तपशिलांची भर घातली.

बुद्धाच्या ओळखीचा बराच विस्तार करून महायान परंपरेमध्ये बुद्धाच्या जीवनाची आणखी एक आवृत्ती मांडलेली आहे. ही आवृत्ती थेरवादापासून भिन्न आहे. थेरवादातील आवृत्तीमध्ये बुद्ध हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे, तो इसवीसनपूर्व ५६६ ते ४८५ या कालावधीमध्ये राहून गेल्याचं सर्वमान्य झालं आहे. त्याला त्याच्या जीवनकाळामध्ये साक्षात्कार झाला आणि त्याच्या मृत्यूचं सातत्य समाप्त झालं. पाली वाङ्मयामध्ये मांडण्यात आलेल्या कहाणीचा आणखी उलगडा महायान परंपरेतील आवृत्तीमध्ये केलेला आहे, आणि अगणित जीवनकाळांपूर्वी बुद्ध साक्षात्कारी कसा झाला होता आणि शाक्यमुनीच्या रूपात पृथ्वीवर कसा अवतरला होता याचं वर्णन त्यात आहे. पृथ्वीवर त्याने साक्षात्कारी असल्याचं इतरांना दाखवण्यासाठी बारा कृती केल्या आणि मृत्यूनंतर त्याचं सातत्य कायम राहिलं, जेणेकरून इतर अनेक प्रांतांमध्ये, शिकवणुकींमध्ये त्याचा आविष्कार होऊन सर्व जीवांना लाभ व्हावा.

बुद्धाच्या जीवनकहाणीची आणखी एक आवृत्ती आपल्याला तंत्र परंपरेमध्ये सापडते. या आवृत्तीमध्ये बुद्ध विभिन्न रूपांमध्ये एकाच वेळी अवतरतो. या रूपांना “साधना देवता” असं संबोधलं आहे, त्यांचे विविध रंग आहे, अगणित हात, चेहरे व पाय आहेत, आणि त्यातून बुद्धाच्या साक्षात्कारांच्या विविध पैलूंचं प्रतिनिधित्व होतं. बुद्ध या विभिन्न रूपांमध्ये अवतरतो, पण त्याच वेळी मानवी रूपामध्ये शिकवतो, उदाहरणार्थ भारतातील व्हल्चर्स पार्क इथे त्याने सूत्रंही शिकवली.

Top