बौद्ध धर्माचे प्रकार

03:07
जस-जसा बौद्ध शिकवणीचा विभिन्न आशियाई देश आणि संस्कृतींमध्ये प्रसार होत गेला, तिथल्या लोकांनी स्थानिक धारणांना अनुरूप असणाऱ्या बौद्ध शिकवणीतील तत्त्वांचा स्वीकार केला. अशा रीतीने बौद्ध धर्माची अनेक रूपे विकसित झाली. आणि यातील प्रत्येक रूप स्वतःची स्वतंत्र शैली आणि दृष्टिकोन असणारे होते. पण सर्वांनी बौद्ध धर्मातील मूलभूत शिकवण संरक्षित ठेवली होती. ही बाब बुद्धांच्या शिकवणीला अनुरूपच होती, ज्यात बुद्ध प्रत्येक शिष्याच्या मनोवृत्तीनुसार प्रत्येकाला स्वतंत्र शिकवण देत असत.

आज प्रचलित असणाऱ्या बौद्ध धर्मातील प्रमुख रूपांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या थेरवाद, अर्थात चिनी आणि तिबेटी बौद्ध धर्माच्या काही प्रमुख वैशिष्ट्यांवर एक नजर टाकू.

थेरवाद

दक्षिणपूर्व आशियात प्रचलित असणाऱ्या थेरवादात सचेतन ध्यानधारणेवर भर देण्यात येतो. आसनस्थ होत श्वास, शारीरिक संवेदना आणि संथ गतीने चालताना आपल्या गतीच्या उद्देशांवर लक्ष केंद्रित करत हे ध्यान करता येते. प्रत्येक क्षणाच्या उदय आणि अस्ताच्या सचेतन जाणिवेमुळे साधकाला नश्वरतेचा अनुभवजन्य बोध होतो. हा बोध आपल्या समग्र अनुभवांच्या विश्लेषणास लागू केल्यास साधकाला जाणीव होते की असा कोणताही स्थायी, अपरिवर्तनशील स्व अस्तित्वात नाही, जो सर्व जीवमात्रांहून स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. सर्व काही क्षणभंगुर आहे. अशा प्रकारे साधकाला वास्तवाचे ज्ञान होते, जे त्याला आत्मकेंद्री चिंता आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या दुःखातून मुक्त करते. 

थेरवादात अमर्याद प्रेम, करुणा, समभाव आणि आनंद या सारख्या विषयांवरील ध्यानधारणेसंबंधीही शिकवण दिली गेली आहे. पण गेल्या काही दशकात थायलंडमध्ये ‘संबंधकारी बौद्ध धर्म’ चळवळ सुरू झाली आहे, ज्यात बौद्ध समुदायाला सामाजिक आणि पर्यावरणीय उपक्रमांमध्ये सामील करून घेतले जात आहे. 

थेरवादाचे अनुयायी भिक्षु जनसामान्यांसाठी बौद्ध धर्मग्रंथांचे पठण आणि धार्मिक सोहळ्यांचे आयोजन करतात. भिक्षु दररोज भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात आणि गृहस्थ लोक त्यांना उदारतेने अन्नदान करतात. 

पूर्व आशियाई महायान

चीनमध्ये जन्मलेल्या पूर्व आशियाई महायान परंपरेचे दोन महत्त्वाचे घटक आहेतः पवित्र भूमि आणि दुसरी परंपरा ज्याला जपानमध्ये झेन संबोधले जाते. 

  • पवित्र भूमि परंपरेत अनंत प्रकाशाचे प्रतीक असणाऱ्या बुद्ध अमिताभ यांच्या नामस्मरणावर भर दिला जातो. ज्याद्वारे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी सर्वस्वी अनुकूल असणाऱ्या आनंदाच्या पवित्र भूमिच्या स्वर्गापर्यंत पोहचता येईल. 
  • झेन परंपरेत कठोर ध्यानधारणेच्या माध्यमातून चित्त शांत करण्यावर भर दिला जातो, जेणेकरून मनाचे करुणामय आणि प्रज्ञामय स्वरूप प्रज्वलित व्हावे. 

दोनही परंपरेतील भिक्षु आणि भिक्षुणी धर्मग्रंथांचे वाचन करतात आणि कन्फ्युशियन संस्कृतीनुसार जनसामान्यांसाठी पितृ अनुष्ठानाच्या विधींचे आयोजन करतात. 

तिबेटी महायान

संपूर्ण मध्य आशियात आढळणाऱ्या तिबेटी महायान बौद्ध स्वरूपात भारतीय बौद्ध धर्माचा ऐतिहासिक विकासक्रम, विशेषतः नालंदासारख्या महान मठीय विश्वविद्यालयाच्या परंपरेचे जतन केले गेले आहे. या अध्यापनात ध्यानधारणेसोबत तर्क आणि वादविवादाच्या माध्यमातून चित्तवृत्ती, भावभावना आणि वास्तव या विषयांच्या अभ्यासावर भर दिला जातो. 

तिबेटमध्ये या अध्यापन पद्धतीला भारतीय बौद्ध परंपरेतील तंत्र पद्धतीसोबत जोडले जाते, ज्यात साधक आपल्या कल्पनाशक्तींचा वापर आणि सूक्ष्म कायिक ऊर्जेचा प्रयोग करून स्वतःला बुद्धत्वाच्या पातळीपर्यंत नेतो. यासाठी शून्यता आणि करुणेच्या भावनेवर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्या स्थितीत आपल्याला जे बौद्ध स्वरूप धारण करायचे आहे, त्याची कल्पना केली जाते. जरी अशा स्वरूपाच्या ध्यानधारणेला काही वेळा ‘ध्यान देवता’ संबोधले जाते. पण ते अर्थ किंवा भुमिकेच्या दृष्टिकोनातून परमेश्वरासमान नसतात आणि बौद्ध धर्म हा कोणत्याही दृष्टीने बहुदेववादी नाही. प्रत्येक बुद्ध-स्वरूप बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीच्या ज्ञान व करुणेच्या घटकाचे प्रतिकात्मक रूप असते. स्वतःची त्या रूपात कल्पना करून आणि त्या संबंधित मंत्रोच्चार करून साधकाला आपल्या भ्रामक आणि नकारात्मक प्रतिमेवर विजय मिळवण्यासाठी आणि ‘ध्यान देवता’ प्रतिमेतील गुण स्वतःमध्ये विकसित करण्यासाठी मदत होते. या फार उच्चस्तरीय साधना पद्धती आहेत आणि प्रशिक्षित गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच त्या करायला हव्या. 

तिबेटी बौद्ध धर्मात मंत्रोच्चार आणि कर्मकांडांवर फार भर दिला जातो. त्याचा उद्देश मुख्यतः दुष्ट आत्म्यांच्या रूपातील नकारात्मक शक्तींना संपवण्याचा असतो. अशा स्वरूपाच्या साधना करताना साधक कठीण परिस्थितीवर विजय मिळवण्याच्या उद्देशाने शक्ती आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी स्वतःला अत्यंत बलशाली आकृतीच्या रूपात कल्पित करतात. या पद्धतींमध्ये प्रेम आणि करुणेच्या तत्त्वांच्या मशागतीसाठी कल्पनाशक्तीसोबतच ध्यानधारणेच्या तंत्रांवर विशेष भर दिला जातो.

सारांश

थेरवादातील सचेतन साधनापद्धती असो, चीनमधील अमिताभ बुद्धांच्या नामस्मरणाची पद्धत असो वा तिबेटातील वादविवाद आणि मानसदर्शनाच्या पद्धती असो, बौद्ध धर्माची ही सर्व रूपे एका समान संदर्भात योग्य बसतात. यातील प्रत्येक रूप दुःखातून मुक्तीसाठी आणि फक्त एकाच्याच भल्यासाठी नाही, तर इतरांच्याही भल्यासाठी परिणामकारक पद्धती उपलब्ध करतात.

Top