“अनुभवी वृद्ध माणसाने दिलेल्या सल्ल्या”चा भावानुवाद

बहुमोल गुरू गन्गतांग रिंपोछे (गुंग-थांग-त्शांग द्कोन-म्चोग ब्स्तान-पइ स्ग्रोन-मे) (१७६२-१८२३) यांच्या अनुभवी वृद्ध माणसाने दिलेला सल्ला या कथनातील दुःखाविषयीची ही शिकवण आहे. अनेक रूपककथा असणाऱ्या या शिकवणुकी धर्मग्रंथांवर आधारित गद्य रूपातील कथेप्रमाणे प्रवाही आहेत. आपल्याला सर्वसंगपरित्याग प्राप्त करता यावा आणि मुक्त व्हायचा निर्धार करता यावा, हा या शिकवणुकींचा मुख्य मुद्दा आहे आणि प्रत्येकाच्या लाभासाठी बोधिचित्ताला साक्षात्कार साधता येण्याकरिता पार्श्वभूमी तयार करणं हा सर्वसाधारण उद्देश आहे.

कर्म व अस्वस्थकारक भावना यांच्या शक्तीने अनियंत्रितरित्या पुनरावृत्ती होत राहणाऱ्या पुनर्जन्माची बिजं ज्या निष्कलंक बुद्धाने सोडून दिली, आणि पर्यायाने ज्याला वृद्धत्वाचं दुःख, आजार व मृत्यू अनुभवावे लागत नाहीत त्याला आदरांजली.
या विशाल, एकाकी, रानवट संसारप्रदेशामध्ये एक वृद्ध माणूस राहत असतो, त्याला एक तरुण भेटायला येतो. तरुणाला स्वतःच्या तारुण्याचा व तब्येतीचा अभिमान वाटत होता. त्यांच्यात अशी चर्चा झाली.
“अरे वृद्ध माणसा, तू इतरांहून वेगळा का वागतोस, वेगळा का दिसतोस आणि वेगळा का बोलतोस?”
त्यावर वृद्ध माणूस उत्तरला, “मी वेगळ्या रितीने वागतो, चालतो व बोलतो असं तू म्हणत असशील, तर तू आकाशातून उडतोयंस असं मानू नकोस. माझ्यासारखाच या धरतीवर उतर आणि मी काय बोलतोय ते ऐकून घे.”

वृद्धत्व केवळ वृद्धांपुरतंच आहे, आणि आपण कधीच वृद्ध होणार नाही, असं काही तरुणांना वाटतं. ते अतिशय अहंकारी असतात आणि त्यांना वृद्धांबाबत संयमाने विचार करता येत नाही.

वृद्ध माणूस पुढे म्हणतो, “काही वर्षांपूर्वी मी तुझ्याहून जास्त सामर्थ्यवान होतो, अधिक देखणा होतो आणि अधिक जोम होता. मी आत्ता आहे तसा जन्मतः नव्हतो. आधी मी वाऱ्याच्या वेगात धावणाऱ्या घोड्यांचीही बरोबर करू शकत होतो.”

बहुतांश वृद्ध लोक असं बोलतात. वर्तमान कधीही जुन्या काळाइतकं चांगलं नसतं.

“मी काहीही पकडू शकायचो. भटकताना साध्या हातांनी मी याकही पकडत होतो. माझं शरीर इतकं लवचिक होतं की मी आकाशातल्या पक्ष्याप्रमाणे हालचाल करायचो. माझं शरीर इतकं तंदुरुस्त होतं की मी तरुण ईश्वरासारखा दिसायचो. मी अतिशय भडक रंगाचे कपडे घालायचो, सोन्या-चांदीचे बरेच दागिने घालायचो आणि टनावारी रुचकर अन्नपदार्थ व मिठाया खायचो, आणि उमद्या घोड्यांवरून रपेट मारायचो. मी क्वचितच एकट्यात खेळत, हसत व मजा करत बसायचो. सर्व सुखांचा अनुभव मी घेतला होता.
“त्या वेळी मी स्वतःच्या आयुष्याच्या अशाश्वततेचा किंवा माझ्या मृत्यूचा विचार केला नव्हता. किंवा आत्ता मी वृद्धत्व भोगतोय तसंही काही मला अपेक्षित नव्हतं.”

मी राहत होतो त्या प्रदेशात एक तरुण माणूस होता. तो विलासी आयुष्य जगायचा आणि सतत सुखात रममाण झालेला होता. हळूहळू तो वृद्ध झाला, त्याचं शरीर वाकलं, उत्पन्न कमी झालं. तो त्याच्या मित्रांना म्हणाला, “इतक्या लवकर मी म्हातारा होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं.”

“मित्र, पार्ट्या व मौजमजा यांमध्ये सहभागी होऊन विचलित अवस्थेत जगत असताना वृद्धापकाळ दबकत येतो आणि तुम्ही हसत असताना अचानक तुमच्यावर झडप घालतो.”

गेशे कामपा म्हणाले, “वृद्धावस्था हळूहळू येते याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवं. ती अचानक आली असती, तर ते असहनीय झालं असतं. आपण तीस वर्षांचे असताना झोपी गेलो आणि उठल्यावर ऐंशी वर्षांचे दिसू लागलो, तर आपण स्वतःकडे पाहूदेखील शकणार नाही. आपल्याला स्वतःचं वृद्ध होणं समजतही नाही. आपण वृद्ध कसे झालो, हे आपल्यासाठी पूर्णतः गूढ राहतं. अचानकपणे आपल्याला आपण वृद्ध झाल्याचं कळतं, आणि ते स्वीकारायला काही काळ जावा लागतो. पण तोवर उशीर झालेला असतो. मृत्यूपूर्वी काही तास धर्माचरण केलं तर ते उपकारक ठरतं, असं म्हटलं जात असलं, तरी तंत्रोपासना करण्यासाठी आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवं. त्यामुळे तरुण असतानाच तंत्रोपासना सुरू करणं महत्त्वाचं असतं.”

“आपण अतिशय वृद्ध होतो, तेव्हा आरशात पाहिल्यावर आपण स्वतःलाच आवडेनासे होतो. अशा वेळी आपली शरीरं व मनं दुर्बल होतात. डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत शरीराचा ऱ्हास होऊ लागतो. कायम दीक्षा घेत असल्यासारखं आपलं डोकं खाली झुकतं.
“माझ्या डोक्यावर पांढरे केस आहेत, काळे केस उरलेले नाहीत, हे काही शुद्धीकरणाचं चिन्ह नव्हे. मृत्युदेवाच्या मुखातून बाहेर पडलेला हा फेसाचा बाण आहे, तो माझ्या मस्तकावर येऊन बसलाय. माझ्या कपाळावरच्या रेषा म्हणजे काही आईचं दूध पिणाऱ्या बाळाच्या दुमडीवरच्या रेषा नव्हेत. मी आधीच किती वर्षं जगलोय याची गणना मृत्युदेवाच्या दूताने केलेय, त्याच्या या खुणा आहेत. मी कधी डोळे मिटतो तेव्हा माझ्या डोळ्यांत धूर गेलेला नसतो. स्वतःच्या संवेदनाशक्तीच्या ऱ्हासाने मी असहाय झालेला असतो, याची ती खूण असते. मी कानापाशी हात नेऊन ऐकण्याची खटपट करतो, तेव्हा मी गोपनीय संवाद साधत नसतो. माझ्या ऐकण्याचा ऱ्हास झालाय, याची ती खूण असते.
“मी शिंकतो तेव्हा माझ्या नाकातून शेंबूड बाहेर येतो, ते काही माझ्या चेहऱ्यावरचे मोत्यालंकार नसतात. तारुण्यातील जोमाचा बर्फ वृद्धावस्थेतील सूर्यप्रकाशाने वितळत असल्याची ती खूण असते. माझे हलणारे दात म्हणजे काही लहान बालकाला नवीन दात येतात तसा प्रकार नसतो. तर, मृत्युदेवाने बाजूला सारलेल्या सामग्रीचा क्षय होत असल्याची ती खूण असते. मी बोलतो तेव्हा तोंडातून थुंकी बाहेर पडते, तेव्हा ते काही जमीन स्वच्छ करण्यासाठीचं कारंजं नसतं. तर, मी बोलत असलेल्या शब्दांचा शेवट झाल्याची ती खूण असते. मी असंबद्धपणे बोलतो आणि शब्द उच्चारताना अडखळतो, तेव्हा मी एखादी अनोळखी परकी भाषा बोलत नसतो. आयुष्यभर निरर्थक बडबड केल्यामुळे माझी जीभ वळल्याची ती खूण असते.
“मी कुरूप दिसायला लागतो, तेव्हा मी माकडाच्या मुखवट्यामागे लपत नसतो. तर, मला उधार मिळालेल्या शरीराचा पूर्ण ऱ्हास होत असल्याची ती खूण असते. माझं डोकं जास्त हलायला लागतं, तेव्हा मी तुमच्याशी असहमती दाखवत नसतो. तर, माझ्या मस्तकावर प्रहार केलेल्या मृत्युदेवाच्या काठीच्या प्रचंड ताकदीची ही खूण आहे. मी वाकून चालतो, तेव्हा मी कुठे पडलेली सुई शोधत नसतो. तर, माझ्या शरीरातली भूमी तत्त्वाचा ऱ्हास होत असल्याचा हा स्पष्ट संकेत असतो.
“मी माझे हात नि गुडघे टेकून उठतो, तेव्हा मी काही चार पायांच्या प्राण्यांचं अनुकरण करत नसतो. तर, मला पायांचा जोर पुरत नाही, म्हणून ते घडत असतं. मी खाली बसतो, तेव्हा कुठेतरी पिशवी पडल्यासारखं वाटतं. याचा अर्थ, मी माझ्या मित्रांवर रागावलोय, असा होत नाही. तर, माझं स्वतःच्या शरीरावरचं नियंत्रण कमी झाल्याची ही खूण असते.
“मी संथपणे चालतो, तेव्हा मी मोठ्या मुत्सद्द्यासारखं चालायचा प्रयत्न करत नसतो. तर, माझ्या शरीराचा पूर्ण समतोल बिघडलेला असल्याची ही खूण असते. माझे हात हलतात, याचा अर्थ मृत्युदेवाने सर्व काही माझ्यापासून हिरावून नेलं आहे, याची भीती मला वाटत असल्याची ही खूण आहे. मी थोडंच खाऊ व पिऊ शकतो, यात काही दयनीयता किंवा कंजूशपणा नाही. तर, माझ्या बेंबीतील पचनऊर्जेचा ऱ्हास झाल्याची ती खूण आहे. मी पातळ कपडे घालतो, तेव्हा त्यात कसरतपटूंचं अनुकरण करण्याचा प्रयत्न नसतो. तर, शरीराच्या कमकुवतपणामुळे मला कोणतेही कपडे घालणं ओझ्यासारखं वाटू लागलेलं असतं.
“श्वासोच्छवास अवघड होतो आणि मला श्वास कमी पडू लागतो, तेव्हा मी मंत्रपठण करून कोणावर उपचार करत नसतो. तर, माझ्या शरीरातील ऊर्जा संपत चालल्याची व कमकुवतपणाची ती खूण असते. मी अतिशय कमी हालचाली करतो, तेव्हा मी सहेतूकपणे माझ्या हालचालींवर नियंत्रण ठेवत नसतो. तर, वृद्ध माणसाच्या हालचाली मर्यादितच झालेल्या असतात. मी खूप विसरतो, तेव्हा मी इतरांना बिनमहत्त्वाचं मानतो किंवा तुच्छ लेखतो, असं नाही. तर, माझ्या स्मृतीमधील जाणीवेचा ऱ्हास होत असल्याची ती खूण असते.
“अरे तरुणा, मला चिडवू नकोस आणि माझी थट्टा करू नकोस. मी आत्ता जे काही अनुभवतोय ते काही केवळ माझ्याचपुरतं आहे असं नाही. प्रत्येक जण हे अनुभवतो. जरा थांब- तीन वर्षांनी वृद्धापकाळाचे सुरुवातीचे संकेत तुलाही मिळायला लागतील. मी जे काही बोलतोय हे तुला आवडणार नाही किंवा तुझा त्यावर विश्वास बसणार नाही, पण तू अनुभवातून शिकशील. या पाच ऱ्हासांच्या काळात माझ्याइतका वृद्ध होईपर्यंत जगण्याचं भाग्य तुला लाभेल. तू माझ्याइतका दीर्घ काळ जगलास, तरी मी बोलतोय इतकं तुला तेव्हा बोलता येणार नाही.”
यावर तो तरुण उत्तर देतो, “तुमच्याइतकं जगता येण्यापेक्षा आणि असं कुरूप होऊन दुर्लक्षित राहण्यापेक्षा, स्वतःला कुत्र्याच्या पातळीपर्यंत खाली आणण्यापेक्षा मेलेलं चांगलं.”
वृद्ध हसतो. “तरुणा, तू खूपच अडाणी आणि मूर्ख आहेस, त्यामुळे दीर्घ व सुखी जगण्याची इच्छा तुला होणार नाही, पण वृद्धावस्था मात्र नक्की येईल. मृत्यू साधा वाटत असेल, तरी तो इतका सोपा नसतो. शांतपणे व सुखाने मरण्यासाठी तू चुकीच्या पद्धतीने दान स्वीकारायला नको किंवा दहा सकारात्मक कृतींची नैतिकता मोडायला नको आणि धर्म, चिंतन व ध्यानधारणा यांविषयी बहुश्रुत असायला हवं. मृत्यू साधा असतो.
“परंतु, मला असं वाटत नाही. मी रचनात्मक काही केलं, असा आत्मविश्वास मला नाही. मला मृत्यूची भीती वाटते आणि जिवंत असतानाच्या प्रत्येक दिवसाविषयी मी ऋणी आहे. प्रत्येक दिवशी मी जिवंत राहावं एवढीच माझी तीव्र इच्छा आहे.”

मग तरुण माणसाचा विचार बदलतो आणि तो म्हणतो, “अरे वृद्धा, तू म्हणतोस ते सर्व बरोबर आहे. इतरांनी मला वृद्धत्वाच्या दुःखाविषयी जे काही सांगितलं ते मला तुझ्या रूपात दिसतं आहे. वृद्धत्वाचं तुझ्या रूपात माझ्या समोर सादरीकरण झालं, हे माझ्या मनासाठी अतिशय उपकारक ठरलं आहे. वृद्धत्वाच्या दुःखाने मी चकित झालो आहे. अरे ज्ञानी वृद्धा, वृद्धत्वापासून पळ काढायच्या काही पद्धती तुला माहीत असतील, तर त्या गुपित ठेवू नकोस; मला सांग आणि सत्य असेल ते सांग.”
वृद्ध माणूस संतोषाने म्हणतो, “याची एक पद्धत निश्चितपणे आहे. तुला ती माहीत असेल तर अनुसरणं सोपं जाईल. थोडासा प्रयत्न केला तर आपण दुःखापासून लगेच मुक्त होऊ शकतो. जन्माला आलेला प्रत्येक जण मरण पावतो, हे खरं असलं तरी, मोजकेच लोक वृद्ध होऊन मरण पावतात. अनेक जण वृद्धत्वापर्यंत पोचण्याची संधी न मिळताच तरुणपणी मरण पावतात. या संबंधीच्या पद्धती बुद्धाच्या शिकवणुकींमध्ये आहेत. मुक्ती व साक्षात्कार साध्य करण्याच्या अनेक पद्धती त्यात आहेत. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, पुनर्जन्म नको असणं, वृद्धत्व, आजारपण व मृत्यू नको असणं यांपासूनची मुक्ती त्यात आहे; पण आपण त्याचं आचरण केलेलं नाही.”

एका मठामध्ये एक स्वकष्टाने पुढे आलेला लामा होता. मठश्रेणीमध्ये तो कनिष्ठ होता, आणि बहुतांश भिक्खू त्याच्याकडे लक्ष देत नसत. मठगृहाच्या भविष्याविषयी चर्चा करण्यासाठी त्यांची एकदा बैठक झाली. प्रेतं बांधण्यासाठी दोऱ्या व कापडं हवी असल्याचं त्याने सांगितलं. सगळ्यांना हा अशुभ संकेत वाटला आणि ते त्याच्यावर चिडले. मग मठाच्या मदतीसाठी प्रत्येकाने काय करायचं, यावर त्यांनी चर्चा केली. त्याने अनित्यतेसंबंधी ध्यानधारणा करायची सूचना केली. असं करताना त्याने त्यांना मोठी शिकवण दिली. नंतरच्या अनेक दलाई लामांनी त्याची प्रशंसा केली आहे. भविष्यासाठी तयारी करताना आपण मृत्यूसाठीही तयार असावं लागतं.

“प्रत्येकाला अमरत्व हवं असतं आणि ते साधण्यासाठीच्या पद्धती हव्या असतात. पण जन्माला आल्यावर न मरणं अशक्य असतं. हजारो पूर्णतः साक्षात्कार झालेले जीवदेखील मरण पावले- यात शाक्यमुनी बुद्धाचाही समावेश होतो. आणि गतकाळातील बोधिसत्त्व व महान गुरूंच्याबाबतीत केवळ नावं मागे उरतात जगाच्या इतिहासामध्येदेखील हे दिसतं. सर्व महान ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वं मरण पावली आहेत आणि त्यांचे केवळ अवशेष मागे उरतात. तर, आपल्या येऊ घातलेल्या मृत्यूचं वास्तव आपण विसरता कामा नये. वर्तमानातील महान गुरूदेखील मरण पावणार आहेत. आज जन्माला आलेली बालकंही शंभर वर्षांनी मरण पावणार आहेत. मग तरुण माणसा, तू एकटा कायम जिवंत राहण्याची अपेक्षा कशी ठेवतोस? त्यामुळे, मृत्यूसाठी स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या सज्ज करणं इष्ट असतं.
“दीर्घायुष्य पैसे देऊन विकत घेता येत नाही किंवा शारीरिक आरामाद्वारे प्राप्त करता येत नाही. तुमच्यात आध्यात्मिक आत्मविश्वास असेल आणि जीवनातून आपल्याला काय हवंय हे आपल्याला माहीत असेल, तर आपण शारीरिकदृष्ट्या वृद्ध होतो, तितकंच आपलं सुख आणि मनाचं तारुण्य वाढतं. तुम्हाला प्रचंड शारीरिक आराम मिळत असेल, पण तुम्ही पोकळ आयुष्य जगला असाल, तर तुम्ही वृद्ध होता तितके अधिक दुःखी होता. मन मृत्यूबद्दल चिंता करून विचलित होऊ नये यासाठी पर्यटक होऊन तुम्हाला प्रवास करावा लागतो. दुसऱ्या बाजूला, तुमच्याकडे थोडासाच आध्यात्मिक आत्मविश्वास असेल, तरी तुम्ही जितके मृत्यूच्या नजीक जाता, तितकं तुम्हाला सुखी घराकडे परतणाऱ्या मुलासारखं वाटायला लागतं. तुम्हाला मृत्यूचा तिटकारा वाटत नाही, तर सुखी जीवन सुरू ठेवण्याची वाट तुम्ही पाहता.

एकदा एक महान आध्यात्मिक गुरू म्हणाले, “भविष्यातील जन्मांविषयी मला पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला काही चिंता नाही. कोणत्याही क्षणी मृत्यू आला तरी मी त्याचं स्वागत करेन.”

“मृत्यूचं दुःख अनिवार्य असतं, त्यामुळे त्याबद्दल आपण काहीतरी करायला हवं. आपण केवळ बसून राहून निराश होऊ शकत नाही. माणूस म्हणून आपल्याकडे अनेक पद्धती उपयोगात आणण्याची शहाणीव असते. बुद्ध याहून उघड शिकवणूक देऊ शकत नाही, तरुणा. मी माझ्या काळजापासून बोलतो आहे. मला मनापासून हा सल्ला द्यावा वाटत असला, तरी केवळ माझ्या शब्दांवर विसंबून राहू नकोस. तू स्वतः त्यांचं विश्लेषण कर. अनित्यतेशी संबंधित उपासना स्वतः कर. एक म्हण आहे, ‘ऐकावे जनांचे, करावे मनाचे’. इतरांनी तुझ्यासाठी निर्णय घ्यावेत अशी मोकळीक तू ठेवलीस, तर तुला अनेक जणं वेगवेगळा सल्ला देतील.”
यावर तरुण माणूस म्हणतो, “तुम्ही म्हणताय ते सगळंच खरं आहे व लाभदायक आहे. पण पुढील काही वर्षं मी या गोष्टी करू शकणार नाही. मला इतर कामं करायची आहेत. माझी मोठी मालमत्ता आहे, संपत्ती आहे, काय काय आहे. मला माझा व्यवसाय करावाच लागेल आणि माझ्या मालमत्तेची देखभाल करावीच लागेल. काही वर्षांनी मी तुम्हाला पुन्हा भेटेन आणि मग या उपासना करेन.”
वृद्ध माणूस खूप व्यथित होतो आणि म्हणतो, “तू मला आत्ता जे काही सांगितलंस ते सगळं पोकळ शब्दांनी भरलेलं आहे आणि निरर्थक आहे. माझं असंच झालं होतं, काही वर्षांनी काहीतरी अर्थपूर्ण करू अशी इच्छा होती; पण मी कधीच काही केलं नाही आणि आता मी वृद्ध झालो आहे. तू बोलतोयंस ते किती निरर्थक आहे हे मला माहीत आहे. काही वर्षांनी करायच्या गोष्टी कधीही संपत नाहीत. त्या कायम मागेच ठेवल्या जातात. काही वर्षांनी करायच्या गोष्टी म्हणजे वृद्ध माणसाच्या दाढीसारख्या असतात; आज दाढी केली की उद्या ती वाढते. उद्या-उद्या करत काम पुढे ढकलत राहिलं, तर अचानक एखाद्या दिवशी आयुष्य संपल्याचं लक्षात येतं. धर्माचं आचरण पुढे ढकलण्याची वृत्ती अनेकांना मूर्ख ठरवून गेली आहे. तू कधीही धर्माचरण करशील, यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे आपण बोलणं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. तू तुझ्या घरी जा आणि तुला हवंय ते कर, मी थोडे मंत्र म्हणतो.”
तरुणाला आश्चर्य वाटतं आणि तो थोडा दुखावतो. तो म्हणतो, “तुम्ही माझ्याशी असं कसं बोलू शकता? सांगा बरं, या जीवनात भौतिक गोष्टी चटकन कशा साध्य करता येतील?”
वृद्ध माणूस हसतो, “तू मला असे प्रश्न विचारतोयंस, म्हणजे काहीही साध्य करायला किती वेळ लागतो, याचं उत्तर मी द्यायचं असावं. दक्षिण दिशेला मृत्युदेव राहतो. तू काम पूर्ण केलं आहेस अथवा नाही, याची त्याला काही फिकीर नसते. तो त्याला हवं ते करतो. तू त्याच्याशी मैत्रीचे संबंध ठेवू शकतोस आणि आयुष्यात काही साध्य करण्यासाठी त्याची परवानगी घेऊ शकतोस, मग तू निवांत राहू शकशील. अन्यथा, तुला कधीच निवांत राहता येणार नाही. चहा पिता-पिता, जेवताना, चालत असताना, किंवा तपकीर ओढताना लोक मरण पावतात. 
“हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं, अगदी महान गुरूंच्या बाबतीतही होतं. त्यांच्या अनेक शिकवणुकी अपुऱ्या राहतात, कारण शिकवणूक लिहून काढण्यापूर्वीच ते मरण पावलेले असतात. त्यामुळे मृत्युदेव येतो, तेव्हा, ‘माझ्याकडे मोठी मालमत्ता आहे आणि बरंच काम करायचं बाकी आहे’, असं म्हणता येत नाही. त्याच्या समोर तुम्ही काही बढाई मारू शकत नाही. सगळं सोडून जावं लागतं. या अर्थी आपण पूर्णतः शक्तिहीन असतो. आपण स्वतःची आयुर्मर्यादा ठरवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला काही करणं शक्य असेल, तर आत्तापासून ते सुरू करणं चांगलं. तरच ते अर्थपूर्ण ठरेल. अन्यथा, नुसत्या तुझ्या मालमत्ता निरर्थक ठरतील. परंतु, आजकाल आपल्या हिताचं काय आहे, याबद्दल सत्य सांगणारे मोजकेच लोक आहेत. प्रामाणिक सल्ला ऐकणारे आणखीनच दुर्मिळ झालेले आहेत.”
तरुण हेलावून गेला आणि त्या वृद्धाबद्दल प्रचंड आदराने त्याचं मन भरून आलं, तो लीन होऊन म्हणाला, “सोनेरी पताका, गेशे किंवा योगी यांचा वावर अवतीभवती असणाऱ्या इतर कोणा लामांकडे तुमच्याइतकी मूलगामी शिकवण नाही. तुम्ही साधे दिसत आहात, पण प्रत्यक्षात तुम्ही महान आध्यात्मिक मित्र आहात. तुम्ही जे काही बोललात ते आचरणात आणेन, असा मी आपल्याला आदरपूर्वक शब्द देतो, माझी क्षमता असेल तितका मी प्रयत्न करेन, आणि भविष्यात कृपया मला आणखी शिकवण द्या.”
वृद्ध माणूस सहमती दर्शवतो. तो म्हणतो, “मला फारसं काही माहीत नाही, पण मी बराच अनुभव घेतलेला आहे. त्यावरून मी तुला शिकवू शकतो. सुरुवात करून स्वतःला धर्मामध्ये प्रस्थापित करणं ही सर्वांत अवघड गोष्ट असते. त्यामुळे तरुणपणी सुरुवात करणं महत्त्वाचं.
“तरुण असताना तुझी स्मरणशक्ती ताजी असते; तुझी बुद्धिमत्ता चैतन्यशील असते आणि शारीरिक सामर्थ्य सकारात्मक शक्ती निर्माण करत असतं. तंत्राच्या संदर्भात तुझ्या ऊर्जेचं सामर्थ्य व जोम, या तरुणपणातील अतिशय चांगल्या वाहक वाटा आहेत. तरुण वयातच तू भौतिक संपत्तीविषयीची अभिलाषा व ओढ यांच्या अडथळ्यावर मात करू शकलास आणि आध्यात्मिक कृत्यांमध्ये सहभागी झालास, तर ते खूप मूल्यवान ठरेल. एकदा का तू धर्माचा स्वीकार केलास, त्यातील अत्यावश्यक मुद्दे समजून घेतलेस आणि त्याची प्रेरणा स्वीकारलीस, की तू जे काही बोलतोस व विचार करतोस, तेच धर्म असेल.”

मिलरेपा व रा लोत्सावा यांनीही हेच सांगितलं होतं, “मी खातो, चालतो, बसतो वा झोपतो, तेव्हा मी धर्माचरण करत असतो.”

“धर्मामध्ये कोणतेही कठोर नियम नाहीत. त्यामुळे खूप जास्त विचार करून मन डळमळीत होऊ देऊ नकोस. आत्ताच सुरुवात कर आणि धर्मामधील तुझा रस टिकवून ठेव. मिनिटागणिक विचार बदलू नकोस. या क्षणापासून तुझं जीवन- तुझं शरीर, वाचा व मन- धर्माचरणाला समर्पित कर.”
धर्म म्हणजे काय हे वृद्धाने आता तरुणाला सांगितलं, “एक योग्य आध्यात्मिक गुरू शोध आणि तुझे विचार व कृती यांद्वारे स्वतःला त्याच्यापाशी समर्पित कर. तुमच्यामुळे इतरांचं किती हित होईल हे योग्य आध्यात्मिक गुरू शोधण्यावर आणि त्याच्यासोबतच्या तुझ्या मनःपूर्वक कटिबद्धतेवर अवलंबून असतं.”

अतिषाने या मुद्द्यावर भर दिला आहे. आपल्या सर्व १५५ गुरूंशी आपली समान मनःपूर्वक कटिबद्धता राहिली असल्याचं त्यांनी अनेकदा म्हटलं आहे.

“तर, तू दिलेला शब्द पाळणं गरजेचं आहे आणि दहा रचनात्मक कृतींचं आचरण करण्याची प्रतिज्ञा घ्यायला हवी. तुझ्या डोळ्यांप्रमाणे त्यांची काळजी घे. या जीवनाशी असलेले बंध तोडून टाक, साखळी तोडणाऱ्या रानटी हत्तीप्रमाणे कृती कर. मग ऐकून घे, चिंतन कर, व ध्यानधारणा कर, आणि हे दोन्ही एकत्रितरित्या कर. या सगळ्याला सात-अंगांच्या उपासनेने पूरकता येऊ दे. यातून सकारात्मक शक्ती प्राप्त होईल, पुण्यसंचय होईल. हे केल्यानंतर बुद्धत्व तुझ्या हाताच्या बोटांवर येऊन उभं ठाकलेलं असेल.”

पाचवे दलाई लामा म्हणाले होते की, योग्य गुरू योग्य शिष्याला मार्गदर्शन करत असेल, तर बुद्धत्व आपल्या हातावर साकारतं. मिलरेपाही म्हणाले होते की, योग्य गुरू असेल आणि त्याच्या योग्य शिकवणींचं आचरण करणारा योग्य शिष्य असेल, तर बुद्धत्व तुमच्यापासून दूर राहत नाही, ते तुमच्या आतच असतं. त्यामुळे गुरू योग्य पात्रतेचा असायला हवा, ही महत्त्वाची बाब आहे.

“हे सुख आहे; हा आनंद आहे. माझ्या मुला, तू या रितीने आचरण केलंस, तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील.”

या शिकवणुकी मन शांत करण्यासाठी अतिशय हितकारक आहेत. त्यातून आपलं कठोर मन मृदू होतं. एक म्हण आहे, “लोणी चामड्याच्या बॅगेत ठेवू नका. जलप्रवाहातल्या खड्यासारखं होऊ नका.” कितीही लोणी ठेवलं तरी चामड्याची बॅग मऊ होत नाही. प्रवाहात दगड कितीही काळ ठेवला, तरी तो मृदू होत नाही.

त्या दिवसापासून सदर तरुणाने आठ ऐहिक, बालिश भावनांची सरमिसळ न करता निखळ धर्माचरण सुरू केलं.

तूही असाच प्रयत्न करायला हवा. आपण जितक्या शिकवणुकी समजून घेऊ, जितकी अधिक उपासना करू आणि त्यातून स्वतःला विकसित करू, तितके आपण प्रवाहातल्या कधीच मृदू न होणाऱ्या दगडासारखे उरत नाही.

वृद्ध म्हणतो, “मी माझ्या आध्यात्मिक गुरूंकडून या शिकवणुकी ऐकल्या आहेत आणि त्या माझ्या स्वतःच्या अनुभवांवरदेखील आधारलेल्या आहेत. हे इतर संज्ञाशील जीवांना त्यांच्या सुखासाठी अमर्याद हितकारक आहे.”

इथे लेखकाचं कथन समाप्त होतं:

मी धर्माचा अत्यल्प अनुभव घेतला आहे, त्याचा माझ्यात अभाव आहे, पण संज्ञाशील जीवांच्या मनस्थितीमध्ये वैविध्य असल्यामुळे या शिकवणुकी काहींना हितकारक ठरतील. मर्यादित जीवांच्या मनांना हितकारक होईल या आशेने मी प्रामाणिकपणे व निखळ प्रेरणेने हे लिहिलं आहे. अनित्यतेसंबंधीच्या या शिकवणुकी म्हणजे केवळ एखाद्या रोचक कथेपुरत्या माझ्या मनात आलेल्या नाही, तर आर्यदेवाच्या ‘द फोर हंड्रेड स्टान्झाज्’वर त्या आधारलेल्या आहेत.
Top