मृत्यू आणि मरणाविषयी बौद्ध सल्ला

आपण सर्वजण आज ना उद्या मरण पावणार आहोत त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण आपल्या मृत्युसंदर्भात वास्तववादी दृष्टिकोन ठेवल्यास अधिक परिपूर्ण, अर्थपूर्ण असे आयुष्य जगू शकतो. कायम भीतीच्या गडद छायेखाली राहून मरण्यापेक्षा आपण आनंदाने मृत्यूला जवळ करू शकतो कारण आपण आपले बहुतांश आयुष्य आनंदाने व्यतित केलेले असते.

अर्थपूर्ण आयुष्याच्या दिशेने 

अनेक वर्षांपासून आपले शरीर बदलत आलेले असते. सर्वसाधारणपणे सांगायचे झाले तर, अध्यात्म किंवा ध्यानधारणेनेसुद्धा ते बदल होण्यापासून रोखता येत नाहीत. आपण अशाश्वत आहोत. आपण सातत्याने बदलत असतो. अगदी क्षणाक्षणाला बदल होत असतात आणि हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. वेळ सातत्याने पुढे पुढे जात असते. कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. त्यामुळे आपण वेळेचा सदुपयोग करत आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे. 

इतरांसाठी अधिक समस्या निर्माण करण्यात आपण आपला वेळ घालवतो आहोत का आणि त्यामुळे अंतिमत: आपण आतून अधिक निराश होत आहोत अशी मनःस्थिती निर्माण होत आहे का? माझ्या मते, वेळेचा उपयोग करण्याची ही चुकीची पद्धत आहे.  

एका चांगल्या प्रेरणेने आपल्या मनाला आकार देऊन प्रत्येक दिवसाची सुरुवात करणे केव्हाही चांगले असते आणि उर्वरित दिवसातही त्या दिवसाची ती प्रेरणा आपल्या सोबत राहणे गरजेचे असते. याचा अर्थ, जिथे जिथे शक्य असेल तिथे दुस-यांची मदत करावी आणि ते जर शक्य नसेल तर आपण किमान दुस-यांचे नुकसान होणार असेल अशा गोष्टींपासून स्वत:ला परावृत्त करावे. या अनुषंगाने विचार करायचा झाला तर तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता याने काहीही फरक पडण्याचे कारण नाही. तुम्हाला सकारात्मक प्रेरणा महत्त्वाची ठरू शकते. जर आपल्या हातातील वेळ केवळ पाच वर्षांसाठी नव्हते तर दिवसांमागून दिवस, आठवडे, महिने, वर्षे, दशके अशा कालावधीत सुयोग्य पद्धतीने वापरत गेल्यास आपले आयुष्य खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण झाले असे म्हणता येईल. व्यक्तिगत पातळीवर आपले मन शांत आणि स्थिर राहावे यादृष्टीने आपण आपल्या बाजूने काही ना काही स्वरूपात केलेले हे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. आत्ता किंवा नंतर आपला शेवट होणारच आहे. आणि त्या दिवशी आपल्याला कुठल्याही गोष्टीची खंत राहणार नाही. कारण आपल्याला माहीत असेल की आपण आपल्या वेळेचा योग्य रीतीने वापर केलेला आहे. 

मृत्यूविषयी वास्तववादी दृष्टिकोन बाळगणे 

आपले आत्ताचे वर्तमानातील आयुष्य हे कायमस्वरूपी टिकणारे नाही. परंतु ‘मृत्यू म्हणजे शत्रू’ अशा पद्धतीने विचार करणे सर्वस्वी अयोग्य आहे. आपल्या जगण्याचा एक भाग म्हणजे मृत्यू आहे. बौद्ध दृष्टिकोनातून पाहायचे झाले तर, आपल्यामध्ये मुक्तीची जाणीव निर्माण होण्याच्या संदर्भात आपले शरीर हेच काही अंशी आपले शत्रू आहे. मग आपल्याला त्या स्वरूपाचा दृष्टिकोन आवश्यक ठरतो. हा बदलणारा जन्म, हे बदलणारे शरीर आणि हा बदलणारा निसर्ग हेच दु:ख आहे आणि त्यामुळे आपल्याला त्यापासून मुक्त व्हायचे आहे. परंतु या दृष्टिकोनामुळे अनेक नव्या समस्या जन्माला येतात. जर तुम्ही मृत्यूला शत्रू मानायचे ठरवले, तर मग हे शरीरसुद्धा तुमचे शत्रूच ठरते आणि संपूर्ण आयुष्यसुद्धा आपले शत्रुच ठरते. मग ही अधिकच आवाक्याबाहेर जाणारी गोष्ट होऊन बसते. 

मृत्यू म्हणजे आता अस्तित्व नाही अशी स्थिती. किमान शरीराच्या संदर्भात आपण हे म्हणूच शकतो. आपल्या आयुष्याच्या कालावधीत आपला ज्या ज्या गोष्टींशी जवळून संबंध आलेला आहे , ज्या आपण विकसित केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगळ्या कराव्या लागतात. प्राण्यांना मृत्यू आवडत नाही, त्यामुळे साहजिकच आहे माणसालाही मृत्यू आवडत नसणार. परंतु आपण निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत आणि त्यामुळे मृत्यू हा आपल्या संपूर्ण आयुष्याचाच एक भाग आहे. तर्कशुद्धदृष्टीने विचार केला तर, आयुष्याला एक सुरुवात आहे आणि एक शेवटसुद्धा. त्यामुळे त्यात असामान्य असे काहीच नाही. परंतु मला वाटते की मृत्युविषयीच्या आपल्या अवास्तव अशा कल्पना आणि मते यामुळे आपण अधिक चिंता करतो आणि अस्वस्थ होत राहतो. 

त्यामुळे बौद्ध विचारधारेनुसार, आपण स्वत:ला दररोज मृत्यू आणि अशाश्वततेविषयी जाणीव करून देत राहणे उपयुक्त असते. अशाश्वततेच्या दोन पायऱ्या असतात. एक असते व्यापक (यामध्ये जे जे अस्तित्वात आले आहे ते एके दिवशी संपणार आहे.) आणि दुसरे सूक्ष्म पातळीवर (क्षणाक्षणानुसार बदलणारी परिस्थिती आणि कारणे यांचा होणारा परिणाम) सूक्ष्म पातळीवरची ही अशाश्वततेची जाणीव हीच बौद्ध धर्माची खरी शिकवण आहे. परंतु सरावासाठी अशाश्वततेचे व्यापक स्वरूपही लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते. कारण त्यामुळे आपण कायम इथेच राहणार आहोत या विचारांवर आधारित असणारे आपले अनेक विध्वंसक विचार  कमी व्हायला मदत होते. 

पश्चिमेकडे होऊन गेलेले मोठमोठे राजा, अधिपती पाहा. त्यांच्याकडे मोठमोठे गड किल्ले होते. हे महायोद्धे स्वत:ला अमर मानत असत. परंतु आपण जेव्हा त्या इतिहासाकडे पाहतो तेव्हा असे समजणे किती मूर्खपणाचे होते हे लक्षात येते. चीनमधील ग्रेट वॉल पाहा. ज्यांनी ती बांधली त्यांच्यासाठी तो सारा अतिशय वेदनेचा काळ होता. परंतु ते सारे काम एकाच भावनिक विचाराच्या आधारवर करण्यात आले होते ते म्हणजे, ‘माझे सामर्थ्य आणि माझे साम्राज्य कायम राहणार आहे.’  आणि ‘माझा राजाही कायम जिवंत असणार आहे.’ जर्मनीतील बर्लिनची भिंत पुढे हजारो वर्षांपर्यंत अबाधित राहणार आहे असे कम्युनिस्ट नेते म्हणत असत. या सगळ्या कल्पना त्यांच्या स्वत:च्या आकलनानुसार, त्यांच्या पक्षाच्या विचारधारेनुसार, त्यांच्या श्रद्धेनुसार आणि त्यांच्या विचारानुसार होत्या. आपण कायम जिवंत राहणार आहोत अशी त्यांची भ्रामक कल्पना असते. 

आता ही गोष्ट खरी की आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी एखादी सकारात्मक इच्छा आवश्यक असते. त्यामुळे अशा इच्छाशक्तीशिवाय कोणत्याही गोष्टी होऊ शकत नाहीत. परंतु अज्ञानावर आधारित इच्छा कायमच अधिक धोकादायक असते. ‘मी कायम राहणार आहे.’ अशा स्वरूपाचा शाश्वततेबाबतचा भ्रम अनेकांमध्ये दिसून येतो. परंतु त्याला वास्तवाचा आधार नाही. जेव्हा तुम्ही त्याला इच्छेची जोड देता, तेव्हा तुम्हाला अधिकाधिक हवे असते. त्यातून उलट अधिक समस्या आणि संकटे निर्माण होत असतात. परंतु सुजाण इच्छा ही अतिशय सकारात्मक असते. त्यामुळे आपल्याला त्याची अधिक गरज असते. 

अशाश्वततेचे भान आपल्याला सदैव राहावे म्हणून तांत्रिक सरावामध्ये अनेक जागरूकतेचे संकेत आहेत. अनेक सांगाडे आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. काही प्रकारच्या पद्धतींमध्ये आपण स्मशानभूमी डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक  आणत असतो. ही सारी प्रतिके आपल्याला अशाश्वततेची कायम जाणीव करून देत राहतात. एके दिवशी माझी कार अशाच एका स्मशानभूमीच्या जवळून जात होती. त्यामुळे लोकांसमोर प्रवचन देत असताना ही बाब माझ्या मनामध्ये अगदी ताजी होती. ‘‘मी एका स्मशानभूमीजवळूनच आत्ता आलो आहे. आपले अंतिम ठिकाण तेच आहे. आपल्याला तिथे जावेच लागणार आहे.’’ येशू ख्रिस्ताने क्रूसावर मरण पत्करून त्याच्या सगळ्या अनुयायांना हाच संदेश दिलेला आहे की मृत्यू अटळ आहे. बुद्धानेही तेच केले. अल्ला विषयी सांगता येणार नाही कारण ती अमूर्त अशी संकल्पना आहे. परंतु मोहम्मदाने त्याचे विश्लेषण प्रात्यक्षिकाद्वारेच केलेले आहे. त्यामुळे आत्ता किंवा नंतर मृत्यू आपल्याला गाठणारच आहे या वास्तवाची जाणीव आपल्या मनाशी असणे गरजेचे आहे. मृत्यू येणारच आहे ही मनोभूमिका आपण सुरुवातीपासूनच विकसित केलेली असेल तर जेव्हा खरोखर मृत्यू येईल तेव्हा तुम्ही कमीत कमी अस्वस्थ असाल. त्यामुळे बौद्ध विचारधारेचा सराव करणा-या साधकांनी या वास्तवाची जाणीव सातत्याने स्वत:ला दररोज करून देणे आवश्यक आहे. 


मृत्यूसमयी नेमके करायचे काय?

जेव्हा आपला अंतिम दिवस येईल तेव्हा आपण त्याचा स्वीकार करायला हवा आणि हे काहीतरी वेगळेच आहे असे त्याच्याकडे पाहून चालणार नाही. कारण दुसरा कोणताही मार्ग नाही. अशा वेळी ज्या व्यक्तीचा आपल्या धर्मावर विश्वास आहे त्याने विचार करायला हवा, ‘‘हे वैविध्यपूर्ण आयुष्य ईश्वराने तयार केलेले आहे आणि एकेदिवशी त्याचा शेवटसुद्धा ईश्वराच्या योजनेनेच होणार आहे. हे खरंय की मला मृत्यू आलेला आवडणार नाही, परंतु जर ईश्वरानेच त्याची निर्मिती केलेली असेल तर त्याला निश्चितपणे काही तरी अर्थ असणार.” जे लोक खरोखर विश्वनिर्मात्या ईश्वरावर श्रद्धा ठेवून असतात ते असाच विचार करतात. 

जे लोक भारतीय परंपरांचे परंपरेचे पालन करतात आणि ज्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे,

त्यांनी भविष्यातील आयुष्याचा विचार करावा आणि उगीचच चिंता, चिंता आणि चिंता करीत बसण्यापेक्षा भविष्यातील आयुष्य अधिक चांगले कसे असेल यासाठी चांगल्या कारणांची निर्मिती करण्यावर भर द्यावा. उदाहरणार्थ, मृत्युसमयी तुम्ही तुमचे सारे सद्गुण पुढच्या आयुष्यासाठी अर्पण करू शकता, त्यामुळे पुढचे आयुष्य निश्चितपणे चांगले होऊ शकते. त्यामुळे नंतर, मरण समीप येत असताना आपल्या मनाची स्थिती निश्चितपणे शांत असायला हवी. राग येणे किंवा खूप भावनाशील असणे हे चांगले लक्षण नाही. 

त्यामुळे शक्य असल्यास बौद्ध साधकांनी त्यांच्या उपलब्ध वेळेचा आत्तापासून सदुपयोग करायला हवा आणि आपल्या पुढच्या आयुष्याकडे पाहायला हवे. बोधीचित्त सराव आणि इतर काही तांत्रिक सराव या दृष्टीने खूप चांगले आहेत. तांत्रिक शिकवणुकीनुसार, मृत्यूसमयी आठ पातळ्यांवरचे विसर्जन होत असते. व्यापक पातळीवर प्रामुख्याने शरीराचे विसर्जन होत असते आणि त्यानंतर सूक्ष्म पातळीवरचेही विसर्जन होत जाते. तांत्रिक पद्धतींचा सराव करणा-या साधकांनी त्यांच्या दररोजच्या ध्यानधारणेमध्ये याचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. 

दररोज मी मृत्यूविषयी ध्यानधारणा करतो. विविध प्रकारच्या मंडळ सरावांमध्ये किमान पाच वेळा हे करावे लागते. त्यामुळे अजूनही मी जिवंत आहे! अगोदरच आज सकाळी मी तीन मृत्यूंमधून गेलेलो आहे. त्यामुळे भविष्यातील एका चांगल्या आयुष्याची हमी मिळू शकेल अशा पद्धती निश्चितपणे अस्तित्वात आहेत. मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे, ज्यांचा यावर विश्वास नाही अशा लोकांनी  अशाश्वतता हे वास्तव समजून घेणे गरजेचे आहे. 

मृत्युपंथावरील जीवांना कशी मदत करावी?

ज्यांचा खरोखर मृत्यू होतो आहे अशा लोकांच्या आसपास असणा-या लोकांना काही ज्ञान असेल तर अधिक चांगले ठरते. (मृत्यू पंथावर असणाऱ्यांना मदत कशी करावी याचे.) मी पूर्वी नमूद केले त्याप्रमाणे, जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनी अशा मृत्यूच्या वेळी ईश्वराचे स्मरण करावे. बौद्ध भूमिकेतून विचार केला तर, एकमात्र ईश्वरावर श्रद्धा असेल तर त्याचा काहीप्रमाणात फायदा निश्चितपणे होतो. ज्या लोकांची कुणावरही श्रद्धा नसते अगर त्यांचा कोणताही धर्म नसतो त्यांच्यासाठी, मी पूर्वी नमूद केल्याप्रमाणे त्यांनी वास्तववादी राहायला हवे. त्यांचे मन स्थिर राहील असा प्रयत्न करणे तेव्हा महत्त्वाचे ठरते. व्यक्ती मृत्युपंथावर असताना त्यांच्या आजूबाजूच्या व्यक्ती जर रडत असतील तर, अशा वेळी आपले मन स्थिरचित्त ठेवण्याचा त्याचा निर्धार डळमळीत होऊ शकतो. त्याच्या नातेवाईकांशी त्याची खूप जास्त भावनिक गुंतवणूक असेल तर अशावेळी क्रोध निर्माण होण्याची शक्यता असते आणि त्यावेळी मृत्यूदेखील शत्रू भासू शकतो. त्यामुळे अशा वेळी त्यांचे मन अधिकाधिक स्थिर कसे राहील हे पाहणे महत्त्वाचे ठरते. अनेक प्रसंगांना मी बौद्ध धर्मशाळांमध्ये जाण्याची विनंती केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये स्त्रियांच्या एका मठामध्ये अनेक साध्वी अशा मृत्यूपंथाला लागलेल्या आणि गंभीर स्वरूपात आजारी असणा-या लोकांची पूर्ण काळजी घेतात. आपल्या करुणेला दररोजच्या व्यवहारात आणण्याचा हा प्रयास खरोखर एक चांगला मार्ग आहे. हे खूप महत्त्वाचेही आहे. 

सारांश 

मृत्यू ही काही विचित्र किंवा अकल्पित गोष्ट नाही. जगभरात दररोज कितीतरी मृत्यू होत असतात. त्यामुळे आपलाही मृत्यू निश्चितपणे होणारच आहे ही समज विकसित केल्याने आपल्याला एका अर्थपूर्ण आयुष्याच्या दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. जेव्हा आपल्याला समजते की मृत्यू कोणत्याही वेळी येऊ शकतो, तेव्हा आपण किरकोळ गोष्टींवरून भांडण करणे आणि वाद घालणे सोडून देतो. त्याउलट, शक्य तितक्या प्रमाणामध्ये इतरांना मदत होईल अशा गोष्टी जीवनभर करीत राहण्याची प्रेरणा आयुष्यात महत्त्वाची ठरते. 

Top