आश्रय काय आहे?

What ias refuge%20article

आपण सर्वच जण जीवनात अर्थाचा शोध घेत असतो. काही लोक आपल्या उज्ज्वल भवितव्यात किंवा करियरमध्ये जीवनाचा अर्थ शोधतात, काही लोक फॅशन किंवा राहणीमानात शोधतात, तर काही लोक दूरदूरच्या स्थळांच्या भेटीतून, पर्यटनातून शोधतात. पण अंतिमतः करियर निवृत्ती आली की संपून जाते. फॅशन सातत्याने बदलत जाते आणि सुट्ट्या तर पापणी लवते न् लवते तोच संपून जातात. त्यामुळे यातल्या एकाही गोष्टीतून आपल्याला शाश्वत समाधान वा आनंद मिळत नाही. आजच्या आधुनिक युगात लक्षावधी पर्याय - भौतिक आणि आध्यात्मिक - उपलब्ध असताना आपल्या जीवनाचे काय करायचे याबाबत प्रचंड गोंधळ माजलेला दिसतो.

बौद्ध धर्मात ‘आश्रयाला येणे’ किंवा ‘शरणागत’ होण्याचा संबंध जीवनाला अर्थपूर्ण दिशा देण्याशी आहे. ही दिशा म्हणजे आपल्या कमतरतांवर मात करून स्वतःतील क्षमता ओळखून स्वतःसोबत इतरांच्याही मदतीला उतरण्यासाठी स्वतःवर काम करणे. बौद्ध धर्मातील आश्रयाची संज्ञा क्षणिक कंटाळा, भूक आणि तणाव यासारख्या गोष्टींपेक्षा वरच्या पातळीवरील आहे. ती फक्त बाह्य बदलांशी संबंधित नाहीः आपल्याला काही विशिष्ट वेषभूषा किंवा विशिष्ट केशरचना करण्याची आवश्यकता नाही. बौद्ध धर्मातील आश्रयाचा संबंध आपली मनोवस्था बदलण्याशी आहे. कोणत्या गोष्टी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात आणि कोणत्या गोष्टी वर्तमानात आणि भविष्यात समाधान देतात, याबाबतची आपली जाणीव अधिक समृद्ध, सखोल करण्यात याचा अर्थ दडलेला आहे. थोडक्यात बौद्ध आश्रय आपले वेदनेपासून संरक्षण करतो.

बौद्धधर्मीय सामान्यतः ‘आश्रयाला जाणे’ किंवा ‘आश्रय घेणे’ या संज्ञांचा वापर करतात कारण आश्रय ही कृतीशील प्रक्रिया आहे. हा बौद्धधर्माकडे मार्गक्रमण करण्याच्या पायरीवरील मूलभूत टप्पा आहे. पण आपण हे का करायला हवे? जेव्हा आपल्याला मानवी स्वभावाची - जसे आपण सर्व सुख आणि समाधानाच्या शोधात असून कोणालाही दुःख नको आहे - जाणीव असते, तेव्हा आपल्याला उपयुक्त ठरतील, अशा गोष्टींचा शोध घ्यायला हवा. म्हणूनच बौद्ध धर्मात आपण तीन रत्नांचा आश्रय घेतो. 

ही तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धम्मं आणि संघ.

आपण बुद्धाच्या आश्रयाला जातो कारण ज्ञानप्राप्ती झालेल्या गुरूच्या नात्याने तो केवळ अर्थहीन अस्तित्वातून मुक्तीचा मार्गच दाखवत नाही, तर दुःखाचे समूळ उच्चाटनही करतो. तो मनाच्या पावित्र्याची शिकवण देतो. करुणा आणि ज्ञानाच्या आधारे, आपल्या मनात माजलेले गोंधळ आणि नकारात्मक भावनांचे, त्या पुन्हा उत्पन्न होणार नाहीत, अशा पद्धतीने उच्चाटन करण्याची शिकवण देतो. हे साध्य कसे करायचे याची बौद्ध शिकवण म्हणजे धम्मं होय, त्यामुळे जेव्हा आपण आश्रयाला जातो, तेव्हा आपण जीवनातील दुःखांशी लढण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक बौद्ध पद्धतींचा अंगीकार करतो. संघ संज्ञेचा संबंध बौद्ध भिक्खू, भिक्खुणी आणि बौद्धधर्मीयांशी आहे. यात बौद्ध शिकवणींचा खऱ्या अर्थाने अंगीकार करणाऱ्या आदर्शांचा समावेश आहे, जे बौद्ध धर्माच्या मार्गक्रमणासाठी आपल्याला प्रेरित करतात. या वचनबद्धतेचा अर्थ आपण स्वतःला आपल्या मित्रपरिवारापासून आणि समाजापासून दूर, अलिप्त ठेवावे असा होत नाही. उलट जेव्हा आपण त्रिरत्नांचा आश्रय घेतो, तेव्हा आपण फक्त अर्थपूर्ण जीवनाचीच निर्मिती करत नाही, तर इतरांप्रति आत्मीयता ठेवून आपला भोवताल आणि समग्र विश्वाच्या हिताचा विचार करू लागतो. जेव्हा आपण बुद्ध, धम्मं आणि संघाचा आश्रय घेतो, तेव्हा गोंधळाची परिस्थिती राहत नाही.

आध्यात्मिकतेच्या शोधात उपभोक्तावादाच्या चक्रात अडकावे लागत नाहीत आणि जरी आपल्याला थोड्या भैतिक सुखवस्तुंची गरज भासली तरी त्या शाश्वत समाधान देतील, अशा भ्रमात आपण राहत नाही. बौद्ध तत्त्वांची बांधिलकी खरेतर आपल्याला तणावातून मुक्त करते आणि खऱ्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी वेळ मिळवून देतेः जसे स्वतःला मानसिकदृष्ट्या अधिक सुखी आणि आरोग्यदायी बनवणे.

म्हणूनच आश्रय ही सातत्यपूर्ण कृतीशील प्रक्रिया आहे. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यावर आपण सातत्याने काम करणे अभिप्रेत आहे. हे बुद्धाला देव मानून केवळ त्याची आराधना करण्यासारखे नाही, किंवा आपल्यावतीने आपले बौद्ध मित्र काम करतील, असेही नाही. यासाठीच बुद्धाच्या धम्मं शिकवणीला उच्चतम आश्रय म्हटले जाते. जरी आपली बुद्धावर अगाध श्रद्धा असली आणि आपल्याला भरपूर करुणादायी बौद्ध मित्र असले तरी आपण स्वतः धम्मं शिकवणीचा अंगीकार केल्याशिवाय आश्रयाचे लाभ मिळणार नाहीत. जेव्हा आपण इतरांना नुकसान न पोहचवण्याच्या आणि उपकारक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मन प्रशिक्षित करण्याच्या मुख्य सल्ल्याचा अंगीकार करू, तेव्हा आपले जीवन खरे अर्थपूर्ण होईल.

तरी बौद्ध मार्गावर मार्गक्रमण सुरू करण्यासाठी काही विशेष विधी आहेत, पण खरी बांधिलकी हृदयातून येणे आवश्यक आहे. जेव्हा आपण स्वतःवर खऱ्या अर्थाने काम सुरू करू, त्याच क्षणी आपण खऱ्या अर्थाने आश्रय घेतलेला असतो.


Top