आधुनिक जगामध्ये दलाई लामा यांची प्रस्तुतता

आधुनिक काळातील दलाई लामांच्या भूमिकेची प्रस्तुतता पाहू. जर आधुनिक काळात त्यांची विशिष्ट भूमिका असेल, तर ती अर्थपूर्ण आणि अधिकाधिक लोकांसाठी उपयुक्त असायला हवी, ती दलाई लामा एखाद्या सुपरस्टारसारखे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे, याअर्थी मनोरंजन किंवा उत्सुकतेच्या अर्थाने प्रासंगिक असू नये. दलाई लामांची प्रासंगिकता केवळ एवढीच नाही. दलाई लामांच्या जीवनाचे एकमात्र उद्दिष्ट इतरांचे कल्याण करण्याशी संबंधित आहे.

परोपकारी भावनेतून सेवा 

जगात इतरही असे लोक आहेत, जे पूर्णतः इतरांच्या कल्याणाप्रति समर्पित असल्याचा दावा करतात. पण परमपूज्य (आपण त्यांना दिलेलं संबोधन) दलाई लामांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना इतरांच्या कल्याणाचा प्रामाणिक कळवळा आहे. लोक त्यांच्या सहवासात असतात, त्यांना ऐकतात, तेव्हा त्यांना हमखास त्यांच्या नितळपणाची अनुभूती येते. ते नेहमी तीन प्रमुख उद्दिष्टांबाबत बोलतात, जी त्यांच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहेत. पहिले उद्दिष्ट आहे धर्मनिरपेक्ष नैतिकता, दुसरे आहे धार्मिक सलोखा आणि तिसरे म्हणजे तिबेट आणि तिबेटी लोकांच्या कल्याणाची जबाबदारी, कारण त्यांना ती जबाबदारी बहाल करण्यात आली आहे. 

नैतिकता 

परमपूज्य नेहमी धर्मनिरपेक्ष नैतिकता आणि धार्मिक सलोख्याविषयीच्या संकल्पनांवर चर्चा करतात. यामागचे कारण म्हणजे आज जगाला त्या गोष्टींची खऱ्या अर्थाने सर्वाधिक गरज आहे. नैतिकतेच्या अभावामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, बेईमानी आणि परस्पर सामंजस्याचा अभाव दिसून येतो. 

दलाई लामांजवळ विश्वव्यापी दृष्टिकोन असणारे उदार मन आहे. ते सातत्याने या ग्रहावरील ७ अब्ज लोकांच्या भल्यासाठी काय आवश्यक आहे, या संदर्भात चिंतन आणि प्रवचन करतात. या जागतिक लोकसंख्येत काही लोक कोणत्या ना कोणत्या धर्मावर विश्वास असणारे सश्रद्ध आहेत, तर काही अधार्मिक आहेत. त्यामुळे इथे नैतिकतेवर आधारित विशिष्ट प्रकारच्या नीतिव्यवस्थेची आवश्यकता आहे, जी सर्वमान्य असेल. यालाच परमपूज्य ‘धर्मनिरपेक्ष नैतिकता’ संबोधतात, पण याचा अर्थ कोणताही धर्म किंवा व्यवस्थेचा विरोध करण्याशी संबंधित नाही, तर त्याचा संबंध सर्व धर्मांचा आणि अधार्मिक लोकांच्याही गरजांचा आदर राखण्याशी आहे. याची मांडणी ते ‘मूलभूत मानवी मूल्यांच्या’ आधारे करतात. आणि काही वेळा त्यांच्या संकल्पनेचा धर्मनिरपेक्ष नैतिकता असा उल्लेख करण्याऐवजी, ते आत्ताचा काळ मूलभूत मानवी मूल्यांच्या प्रसाराचा काळ असल्याचे सांगतात. जी मूल्ये जैवितेवर आधारित आहेत. आपल्या नवजात बालकाबाबतची आईची माया आणि काळजी ही मूलभूत आणि प्राथमिक भावना आहे, आणि फक्त माणसांमध्येच नाही, तर इतरांची काळजी घेण्याची भावना ती प्राण्यांमध्येही असते. स्वतः दलाई लामांच्या जीवनानुभवातूनही या प्रेमभावाचा प्रत्यय येतो, त्यामुळेच त्यांचे संदेश हृद्यस्पर्शी असतात. 

प्रवासाचे वेळापत्रक 

परमपूज्य दलाई लामा जगभर प्रवास करतात आणि त्यांचे प्रवासाचे नियोजन आश्चर्यकारक असते, विशेषतः जेव्हा आपण विचार करतो की ते ७८ वर्षांचे आहेत. ते दीर्घटप्प्याचा जागतिक प्रवास करतात आणि अनेकदा एके ठिकाणी फक्त एकच दिवस थांबतात. त्यांच्या प्रवासाचे वेळापत्रक फारच कठोर आणि थकवणारे असते. मी भाषांतरकार आणि संपर्क अधिकाऱ्याच्या भूमिकेतून परम पूज्यांसोबत प्रवास केला आहे. त्यामुळे मला माहिती आहे की त्यांचे वेळापत्रक कसे असते. प्रत्येक दिवशी अनेक व्याख्याने, पत्रकार परिषदा आणि वैयक्तिक भेटीगाठींनी त्यांचा दिवस व्यापलेला असतो. त्यांना खाण्यापिण्यासाठीही मुश्किलीने सवड मिळते. शिवाय यात्रेमुळे वेळोवेळी बदललेली कालक्षेत्रे असोत किंवा अन्य कोणतेही कारण असो, पण तरीही ते दररोज ३:३० वाजता उठतात आणि जवळपास चार तास गहन ध्यानधारणा करतात. त्यांच्याकडे तीव्र ऊर्जा आहे आणि उत्तम विनोदबुद्धी आहे. भेटणाऱ्या प्रत्येकाप्रति त्यांच्यात सद्भाव आणि काळजीची भावना असते. भेटणाऱ्या प्रत्येकाला ते ज्या प्रसन्नतेने भेटतात, ते पाहण फारच आश्चर्यकारक असतं, जणू ‘वाह आणखी एका माणसाची भेट किती सुखकारक आहे.’ अशीच त्यांची भावना असते. 

प्रेम

बौद्ध धर्मात आपण अशा प्रेमाविषयी चर्चा करतो, जे एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीनंतर आपल्या हृद्यात उत्पन्न होते, तुमचे हृद्य उबदार प्रेमभावनेने भरून जाते, तुम्हाला त्या व्यक्तीच्या भेटीने अपरिमित आनंद होतो आणि तुम्हाला त्याच्या भल्याची मनापासून काळजी असते. हेच वैशिष्ट्य तुम्ही दलाई लामा कोणाही व्यक्तीला भेटतात, तेव्हा त्यांच्यात पाहू शकता, जेव्हा ते लोकांच्या गर्दीतून जात असतात किंवा आणखी कोठून जात असतात, ते ज्या पद्धतीने लोकांकडे पाहतात, ते ज्या रीतीने त्यांच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे संपूर्ण ध्यान देतात, त्यातून त्यांचा प्रेमभाव प्रतीत होतो. वास्तविकतः त्यातून हा संदेश मिळतो की इतरांच्या कल्याणात त्यांना एकसमान रूची आहे. त्यामुळेच त्यांची धारणा आहे की मानवी मूल्ये आणि धर्मनिरपेक्ष नैतिकतेच्या प्रसाराचा हा विचार सर्वांच्या कल्याणासाठी सर्वाधिक उपयुक्त आहे. ते ‘फक्त बौद्ध लोकांसाठी’ असा संकुचित विचार करत नाहीत. त्यामुळेच ते यासाठी दक्ष असतात, की शैक्षणिक प्रणालीमध्ये धर्मनिरपेक्षतेच्या शिकवणीचा अंतर्भाव कसा करता येईल, जेणेकरून जगभरातील मुलांना प्रामाणिकपणा, दयाभाव आणि अशा इतर मानवी मूल्यांची शिकवण मिळेल, जी जगासाठी फार कल्याणकारी ठरू शकते.  

धार्मिक सलोखा 

धार्मिक गटांमधील तंट्यामुळे जगभर अनेक समस्या निर्माण होतात. इथे अविश्वास आहे, इथे भय आहे आणि त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. परमपूज्य धार्मिक सलोख्याच्या संदर्भात म्हणतात, की आपल्याला शिक्षणाची गरज आहे, फक्त धर्मनिरपेक्ष नैतिकतेच्या अनुषंगाने नाही, तर परस्परांना समजून घेण्याबाबतच्या शिक्षणाची गरज आहे. आपल्याला खरेतर अज्ञाताची भीती असते आणि अशा अज्ञात गटांबद्दल आणि धर्मांबद्दल आपल्या कपोलकल्पना असतात. ते सांगतात की, ते ज्या अंतरधर्मिय परिषदांमध्ये सहभागी होतात, ज्या बैठकांमध्ये भाग घेण्यासाठी जातात, तिथे विविध धर्मीय लोक एकत्र येतात, एकमेकाकडे पाहून स्मित करतात आणि एकमेकांसोबत खूप चांगले वागतात आणि तिथे सर्व जण मिळून काही प्रार्थना आणि ध्यानधारणाही करतात. हे सर्व फार छान आहे, पण विशेष लाभदायी नाही. फक्त एवढं म्हणणं पुरेसं नाही, की ‘आपण सर्व जण एकाच गोष्टीविषयी बोलत आहोत आणि आपण सर्व एक आहोत’ आणि कायम एकसमान दुवे शोधत राहण्यानेही एकमेकांबद्दल समजून घेण्यासाठी विशेष लाभ मिळत नाही. 

याच वर्षी जूनमध्ये परमपूज्य सुफी विद्वानांना भेटले आणि ते त्यांना म्हणाले की, त्यांना धार्मिक समानतेपेक्षा धार्मिक फरकांविषयी माहिती करून घ्यायची आहे. ते म्हणाले की आपल्याला आपल्या वेगळेपणाची लाज वाटता कामा नये, उलट त्यातून आपण अशी शिकवण घेऊ शकतो की ते आपल्यात सुधारणा घडविण्याच्या प्रयत्नांसाठी फायदेशीर ठरेल. परमपूज्य म्हणतात की, सर्व धर्मांचे उद्दिष्ट एक समान आहे, आणि ते उद्दिष्ट त्या धर्माचे पालन करणाऱ्या लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे आहे. अर्थात हे साध्य करण्यासाठी अनेक पद्धती आहेत, आणि लोक एकमेकांपासून फार भिन्न असल्याने त्या गरजेच्या आहेत. 

ते म्हणतात, “प्रेम, दयाभाव, इत्यादी विकसित करावं असं आपल्या अनुयायांना शिकवण्याचा प्रयत्न आपण सर्व करत असलो, तर तुम्ही कोणती पद्धत वापरता? आम्ही कोणती पद्धत वापरतो? भेदांकडे पाहावं आणि नवीन काहीतरी शिकण्याची संधी म्हणून त्यांचा आदर करावा, हे आम्ही तुमच्याकडून शिकू शकतो. प्रत्येक धर्मातील अतिशय गंभीर उपासकांनी एकत्र येऊन आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण करणं चांगलं राहील, मोठ्या संख्येच्या श्रोत्यांसमोर नव्हे, तर एकमेकांशी गंभीर उपासकाच्या पातळीवर बोलता येईल. हे अतिशय लाभदायक ठरेल.”

विज्ञान

प्रत्येकाचा लाभ करवून देणं ही परमपूज्य दलाई लामांची पहिली बांधिलकी आहे- तिबेटी लोकांबाबत त्यांची विशेष जबाबदारी आहे आणि त्यातही बौद्ध धर्मांच्या तिबेटी परंपरांशी विशेष बांधिलकी आहे, पण हे काही केवळ मर्यादित गटांपुरते आस्थाविषय नाहीत. लहान वयापासूनच परमपूज्य दलाई लामांनी विज्ञान, यंत्रकाम, आणि गोष्टी कशा कार्यरत असतात, या विषयांमध्ये तीव्र रूची दाखवली आहे. १९८०च्या दशकारंभापासून ते वैज्ञानिकांसोबत बैठका घेत आहेत आणि त्यांच्याकडून त्यांना खरोखरच शिकायचं आहे.

आपल्याला बौद्ध शिकवणुकींमध्ये सापडणाऱ्या गोष्टींना छेद देणारं काही वैज्ञानिकांनी वैधरित्या दाखवून दिलं, तर त्या गोष्टी बौद्ध शिकवणुकींमधून काढून टाकणं अगदी रास्त आहे, असं ते म्हणाले होते. उदाहरणार्थ, विश्वाचं वर्णन, विश्वाची सुरुवात कशी झाली, इत्यादी. मेंदूचं कार्य कसं चालतं याबद्दलचं पाश्चात्त्य वैज्ञानिक आकलन, विविध रासायनिक बाबी, इत्यादी बौद्ध आकलनाला अत्यंत पूरक ठरेल.

त्याचप्रमाणे वैज्ञानिकांशी वाटून घेण्यासारखं बरंच काही ज्ञान बौद्ध धर्मामध्ये आहे. बौद्ध विज्ञान, बौद्ध ज्ञान व बौद्ध तत्त्वज्ञान अशा प्रकारांमधून ते आलेलं आहे. उदाहरणार्थ, बौद्ध धर्मामध्ये भावनांचा अतिशय तपशीलवार नकाशा पुरवलेला आहे- भावनांचं आंतरिक जग कसं कार्यरत असतं, या भावना कशा हाताळाव्यात, इत्यादी. या संदर्भातील बौद्ध विश्लेषण अतिशय वैज्ञानिक संघटित आढावा देणारं आहे. पाश्चात्त्य वैज्ञानिकांनाही याचा खूप उपयोग होऊ शकतो. मठांमध्ये परमपूज्य दलाई लामांनी विज्ञानाच्या अभ्यासाची सुरुवात केली, भिक्खू व भिक्खुणींच्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश केला. विज्ञानाची विविध पाठ्यपुस्तकं इंग्रजीतून तिबेटीमध्ये भाषांतरित झाली आहेत. एका मोठ्या जागतिक धर्माचा नेता म्हणून त्यांनी अशा प्रकारे अविश्वसनीय मोकळ्या मनाने या गोष्टींचा स्वीकार केला आहे.

इतर परंपरांशी संवाद

परमपूज्य दलाई लामांना इस्लामी जगताशी संवाद साधायचा आहे, आणि त्यामुळे माझ्या बौद्ध अभिलेखागारामधील पायाभूत बौद्ध शिकवणुकींचं आणि पायाभूत मानवी मूल्यं, नैतिकता इत्यादींबद्दलचा सार्वत्रिक संदेशांचं अरबीमध्ये व इतर प्रमुख इस्लामी भाषांमध्ये भाषांतर करवून घ्यावं यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं. हे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये इस्लामचं बरंच खलचित्रण झालं आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना जगामध्ये समाविष्ट करून घेणं महत्त्वाचं आहे, त्यांना धोका मानून वगळून चालणार नाही. त्यांना बौद्ध धारणा स्पष्टपणे उलगडून सांगायला हव्यात, त्यांना धर्मांतरित करून घेण्यासाठी नव्हे तर केवळ प्राथमिक माहिती वाटून घेण्यासाठी आणि त्यांना आपल्या सोबत ठेवण्यासाठी हे करायला हवं. आकलन व मैत्री विकसित करण्यासाठी शिक्षण हाच मार्ग आहे.

बौद्ध धर्मातही महायान परंपरा आहे, तिची उपासना तिबेट, चीन, जपान, इत्यादी ठिकाणी केली जाते, आणि थेरवाद परंपरेची उपासना आग्नेय आशियात केली जाते. दुर्दैवाने आणि बहुधा अनेकांना याचं आश्चर्य वाटेल, पण या दोन्ही परंपरांना एकमेकांबद्दल अत्यल्प ज्ञान आहे. या परंपरांची अतिशय तपशीलवार तुलना करण्याचं काम दलाई लामांनी एका अमेरिकी बौद्ध भिक्खुणीकडे सोपवलं आहे आणि त्यासाठी आवश्यक पाठबळही पुरवलं आहे. प्रत्येक उपासनेसंबंधी महायान आवृत्ती कशी आहे आणि थेरवादी आवृत्ती कशी आहे? हे महत्त्वाचं ज्ञान वाटून घेण्यासाठी या सगळ्याचं भाषांतर आग्नेय आशियाई भाषांमध्ये केलं जाईल.

स्त्रियांना धर्माधिकारदीक्षा

तिबेटमध्ये पूर्ण धर्माधिकारदीक्षा मिळालेले भिक्खू अर्थातच आहेत, पण भिक्खुणींसाठी धर्माधिकारदीक्षेची वंशावळ भारतातील हिमालय ओलांडून येऊ शकली नाही. विविध कारणांमुळे- मुख्यत्वे भौगोलिक कारणांमुळे हे घडलं. प्राचीन काळी भारतीय भिक्खुणींच्या संपूर्ण गटाला पायी तिबेटपर्यंत येणं खूपच अवघड होतं. त्यामुळे ही वंशावळ तुटली, कारण ती पुढे येण्यासाठी दहा पूर्ण धर्माधिकारदीक्षा मिळालेल्या भिक्खुणींचा गट गरजेचा होता.

इथेही पुन्हा दलाई लामांनी अभ्यासांना व प्रकल्पांना पाठबळ पुरवलं आहे, जेणेकरून ही वंशावळ पुन्हा सुरू करणं शक्य आहे का आणि तिबेटी परंपरेमध्येही पूर्ण धर्माधिकारदीक्षा मिळालेल्या भिक्खुणी होऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांना तसं करता येईल का, या प्रश्नांचा उलगडा व्हावा.

“मी केवळ एक साधा भिक्खू आहे”

परमपूज्य दलाई लामा पूर्णतः नम्र व साधे आहेत, त्यांच्यात कोणताही नाटकीपणा वा अहंकार नाही, हा त्यांचा एक अतिशय विलोभनीय गुण आहे. आपण साधे भिक्खू आहोत, इतरांसारखाच सर्वसाधारण माणूस आहोत, असं ते कायम म्हणतात. “मी कोणालाही भेटतो तेव्हा त्यांना इतर कोणत्याही सर्वसाधारण माणसाप्रमाणे मानतो. आमच्यातील संवाद दोन मानवांमधील असतो, दलाई लामा आणि कोणी सर्वसामान्य व्यक्ती यांच्यातला नसतो. तिबेटी आणि कोणी परदेशी व्यक्ती यांच्यातला नसतो. या दुय्यम भेदांच्या अलाहिदा, प्राथमिक पातळीवर आपण सर्व मानव आहोत,” असं ते नमूद करतात.

ते कोणी देव, राजा आहेत किंवा त्यांच्याकडे काही विशेष ताकद आहे, अशा प्रकारची काही कल्पनारम्यता लोकांच्या डोक्यात असेल, तर ते ती तत्काळ पुसू पाहतात. महाप्रचंड संख्येच्या, लाखो लोकांच्या समोर ते आले, तरी ते पूर्णतः निवांत असतात, पूर्णतः शांत असतात. त्यांना खाज आली, तर इतर कोणत्याही सर्वसामान्य मानवाप्रमाणे तेही खाजवतात. ते अजिबात आत्ममग्न नाहीत आणि कोणासाठी प्रदर्शन करण्याचा प्रयत्न ते करत नाहीत. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाला भेटण्यासाठी ते जात असतील, आणि त्यांनी रबरांचे सँडल घातले असतील, तर तेच घालून ते भेटीसाठी जातात. त्यांना कोणालाही आकर्षित करायचं नसतं आणि तसा प्रयत्नही ते करत नाहीत.

विनोदबुद्धी

परमपूज्य ज्या विनोदी तऱ्हेने गोष्टी सांगू पाहतात ते खरोखरच विलक्षण आहे, हे इतरांना शक्य होतच असं नाही. एकदा ते व्याख्यान देत होते आणि ते अतिशय गैरसोयीच्या खुर्चीवर बसले होते. शेवटी त्यांनी संयोजकांना व श्रोत्यांनाही सांगितलं की, सगळी तजवीज उत्तम होती, पण पुढच्या वेळी चांगली बसायची सोय करावी, ही खुर्ची अगदीच गैरसोयीची होती! हे त्यांनी इतक्या हलक्याफुलक्या, प्रेमळ रितीने सांगितलं की, कोणीही त्या बोलण्यामुळे दुखावलं नाही, किंबहुना सर्व जण हसले. अशाच रितीने ते लोकांना ओरडूही शकतात.

वाक्लाव हॅवल यांना भेट

परमपूज्य दलाई लामांना चेक रिपब्लिकचे- तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया- पहिले राष्ट्राध्यक्ष वाक्लाव हॅवल यांनी निमंत्रित केलं, तेव्हा मी त्यांच्या सोबत होतो. रॉकस्टार फ्रँक झापा हे निमंत्रित केलेली पहिली व्यक्ती होते, पण दुसरी व्यक्ती परमपूज्य दलाई लामा होते. साधना कशी करावी हे आपल्याला व आपल्या मंत्रिमंडळाला दलाई लामांनी शिकवावं, अशी हॅवल यांची इच्छा होती. ते म्हणाले, “सरकार कसं चालवायचं याचा आम्हाला अनुभव नाही, त्याची काही कल्पनाही नाही. आम्ही तणावाखाली आहोत आणि आम्हाला झोपणं शक्य होत नाही. तुम्ही आम्हाला शांत कसं व्हायचं ते कृपया शिकवाल का? अन्यथा आम्हाला या नवीन देशाचं सरकार चालवणं झेपवणं कधीच शक्य होणार नाही.”

वाक्लाव हॅवल अतिशय नम्र होते आणि त्यांनी परमपूज्य दलाई लामा व सर्व मंत्र्यांना एका समर पॅलेसमध्ये निमंत्रित केलं- प्रागच्या बाहेरील हा एक मोठा किल्ला होता. ते स्वतः तिथे कधीच गेलेले नव्हते; हा किल्ला प्रचंड मोठा होता आणि प्रत्येक जण तिथल्या सभागृहांमधून चालताना हरवून गेलं. हॅवल दलाई लामांना सहज म्हणाले, “हा साम्यवादी नेत्यांचा जनानखाना होता.” दलाई लामांशी बोलताना अशा प्रकारची भाषा वापरली जात नाही, पण ते असेच सहज नम्रतेने बोलून गेले. मग दलाई लामांसह प्रत्येक जण एका मोठ्या खोलीत जमिनीवर बसले. हॅवल आणि त्यांच्या मंत्र्यांनी उन्हाळी पोशाख परिधान केला होता आणि दलाई लामांनी त्यांना शांत होण्यासाठी करायची प्राथमिक श्वासोच्छवास व ऊर्जाविषयक साधना शिकवली.

आता, सर्वसाधारणतः परमपूज्य दलाई लामा रात्री काही खात नाहीत, कारण भिक्खू म्हणून घेतलेल्या प्रतिज्ञांचं ते काटेकोरपणे पालन करतात. पण ते लवचिक धोरण ठेवतात. राष्ट्राध्यक्ष हॅवल यांनी किल्ल्यावर रात्रीच्या जेवणाची सोय केली होती. या वेळी चर्चा इंग्रजीमध्ये झाली आणि दलाई लामांनी हॅवल यांची सततच्या धूम्रपानाबद्दल ज्या तऱ्हेने खरडपट्टी काढली ते लक्षणीय होतं. दलाई लामांशेजारी बसून ते धूम्रपान करत होते; हे अगदीच निषिद्ध होतं. ते एका देशाचे राष्ट्राध्यक्ष असले, तरी परमपूज्य दलाई लामांनी अगदी सहजतेने त्यांना सांगितलं, “तुम्ही खूपच धूम्रपान करता. याने तुम्ही आजारी पडाल, तुम्हाला कर्करोग होईल, त्यामुळे तुम्ही हे खरोखरच कमी करायला हवं!” हे खरं म्हणजे परमपूज्य दलाई लामांनी अतिशय दयाळूपणे सांगितलं. हॅवल यांना नंतर खरोखरच कर्करोग झाला. दुसरी व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करते यापेक्षा त्या व्यक्तीच्या हिताचं काय आहे, ही परमपूज्य दलाई लामांची मुख्य आस्था असते, याचा हा केवळ एक दाखला आहे.

बुद्धिमत्ता व स्मरणशक्ती

परमपूज्य दलाई लामा हे अर्थातच मला भेटलेले सर्वांत बुद्धिमान व्यक्ती आहेत. त्यांची स्मरणशक्ती अगदी अचूक आहे. ते शिकवत असतात तेव्हा सर्व भिन्न परंपरांमधील कोणीही दिलेल्या बौद्ध शिकवणुकींच्या प्रचंड साठ्यावर त्यांचं प्रावीण्य असतं. ते कोणत्याही संहितेमधून अवतरण देऊ शकतात. तिबेटी भिक्खू त्यांच्या प्रशिक्षणावेळी अभ्यासातील विविध प्रमुख संहिता पाठ करतात, त्या एक हजारांच्या आसपास पानांच्या असू शकतात, पण दलाई लामांच्या लक्षात असलेल्या सर्व भाष्यांकडे पाहिलं की ते अविश्वसनीय वाटतं. ते शिकवत असतात तेव्हा ते एका संहितेमधून छोटा उतारा काढतात, मग दुसऱ्या संहितेमधला उतारा काढतात; हे अतिशय अवघड असतं. त्यांची स्मरणशक्ती अशा तऱ्हेने कार्यरत असते, आणि ही मोठ्या बुद्धिमत्तेची खूण आहे: गोष्टी एकत्र सांधण्याची व हे सगळं एकत्र कसं बसतं, त्यातील आकृतिबंध कसा आहे, ते पाहण्याची क्षमता असणं. आइनस्टाइनसारख्या लोकांना e=mc2 हे कसं लक्षात आलं? सर्व प्रकारच्या गोष्टी एकत्र करून आकृतिबंध शोधण्याच्या क्षमतेतून हे घडतं. तिबेटी वाङ्मयाविषयीच्या विस्तृत ज्ञानातून परमपूज्य दलाई लामांना हे करता येतं.

त्यांची अचूक स्मरणशक्ती केवळ संहितांपुरती मर्यादित नाही, तर लोकांच्या बाबतीतही त्यांना असंच लक्षात राहतं. माझ्या समोरही अनेकदा याची चुणूक दिसली आहे. तिबेटमधील एका अतिशय वृद्ध भिक्खूला एकदा धरमशाला इथे येणं शक्य झालं. तर, परमपूज्य दलाई लामांनी त्यांना पाहिलं व ते म्हणाले, “अरे! मी तुम्हाला ओळखतो. तीस वर्षांपूर्वी भारतात येत असताना आम्ही तुमच्या मठात थांबलो होतो, तिथे काहीतरी समारंभ होता. तुम्हाला प्रसादाचं ताट घेऊन उभं राहावं लागलं होतं, ते खूप जड होतं, ते मला आठवतंय. संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत ते तसं धरून ठेवणं तुम्हाला खूपच अवघड झालं असणार. आठवतंय का तुम्हाला?” हे अगदीच अविश्वसनीय होतं. माझे मुख्य शिक्षक, सरकाँग रिंपोछे हे परमपूज्य दलाई लामांचे एक प्रमुख शिक्षक होते, आणि लहान असताना दलाई लामांना कोणतीही गोष्ट एकदाच शिकवावी लागायची, ती त्यांना तत्काळ समजायची व लक्षात राहायची, असं रिंपोछेंनी सांगितलं होतं.

उपलब्धी

आपल्या काळातील सर्वांत विलक्षण लोकांपैकी एक अशी ही व्यक्ती आहे आणि त्यांची प्रस्तुतता काय आहे? त्यांची प्रस्तुतता ही आहे: मानव म्हणून कोणती उपलब्धी साधता येते ते पाहावं. स्वतःला विकसित करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट केले आहेत असं ते म्हणतात, पण आपण सर्वही हे करू शकतो. ते समस्या कशा हाताळतात ते पाहावं. पृथ्वीवरील एक अब्जांहून अधिक लोकांनी आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानल्यावर कसं वाटेल याची कल्पना करून पाहा. पण परमपूज्य दलाई लामा हे हसून सोडून देतात, कारण हे सत्य नसल्याचं ते जाणतात, त्यांनी डोक्यावर शिंगं लावलेली नाहीत. पण भिक्खूच्या कफनीमधील दानव, असा शिक्का मारला जात असताना त्याला कसं सामोरं जायचं? 

ते कधीही निराश होत नाहीत. त्यांनी कधीही निराशा अनुभवलेली नाही, असं ते म्हणतात आणि त्यांना समजून घेणं खूप अवघड आहे. कमी आत्मविश्वास असलेल्या किंवा स्वतःचा तिरस्कार वाटणाऱ्या लोकांची कल्पना कधीच त्यांच्या कानावर पडली नव्हती किंवा त्यांनी त्याचा विचारही केला नव्हता, असं त्यांनी कबूल केल्याचं मला आठवतं. त्यांनी स्वतः कधीही असा अनुभव घेतला नव्हता किंवा अशा भावनेला ते कधीच सामोरंही गेले नव्हते.

ते अतिशय आशावादी राहतात, पण परिस्थितीच्या वास्तवालाही त्याच वेळी सामोरं जातात. आपल्या समोरच्या सध्याच्या परिस्थितींबाबत ते म्हणतात, “जगातील समस्या मानवांनी तयार केलेल्या आहेत, आणि त्या नष्ट करणं मानवांना शक्य आहे.” पायाभूत मानवी मूल्यांना चालना देऊन, नैतिकतेला मुलांच्या शिक्षणामध्ये आणून आणि विविध संस्कृती व धर्म यांच्यात धार्मिक सौहार्द आणण्याचा प्रयत्न करून ते या समस्या नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अत्यंत नम्रता व साधेपणाची वृत्ती राखून ते संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी सक्रिय राहतात. हे अतिशय विलोभनीय आहे. यावर कळस म्हणजे त्यांची विनोदबुद्ध व अविश्वसनीय ऊर्जा.

त्यांनी आराम करायला हवा, जास्त प्रवास करायला नको, असं त्यांचे सचिव व सल्लागार त्यांना कायम सांगत सतात. ते प्रवास करतात तेव्हा दिवसाचं प्रत्येक मिनिट डझनावारी बैठकांनी भरलेलं असतं. पण ते कायम म्हणतात, “हे करण्याइतकी ऊर्जा माझ्यात आहे, तोवर मी असाच प्रवास करत राहणार, कारण हे इतरांसाठी लाभदायक आहे.”

ते आपल्याला आशा देतात, ही त्यांची प्रस्तुतता आहे. ते खूप प्रामाणिक आहेत आणि अत्यंत कष्ट करतात. मानवतेच्या सुधारणेबद्दल ते बोलतात तेव्हा ते अतिशय वास्तववादी व साध्यप्राय संदर्भात बोलत असतात: शिक्षण, परस्परांविषयी समजुतीची भावना, नैतिकता, असे त्यामागचे संदर्भ असतात. या काही चमत्कारी पद्धती नाहीत; या गोष्टी आपण प्रत्यक्षात करू शकतो. ते आपल्या देशात, किंवा आपल्या शहरात येतात, तेव्हा ते खरोखरच विलक्षण असतं आणि परमपूज्य दलाई लामांना व्यक्तीशः अनुभवण्याची ती मूल्यवान संधी असते.

प्रश्नोत्तरं

परमपूज्य दलाई लामांना त्यांची सर्व आध्यात्मिक कर्तव्यं पार पाडत असताना निर्वासितांच्या जीवनाला आधार देण्यासारख्या व्यावहारिक गोष्टी करणंही कसं शक्य होतं?

ते केवळ खूप अभ्यासामध्ये व साधनेमध्ये व्यग्र नसतात, तर निर्वासित तिबेटी समुदायाच्या केंद्रीय तिबेटी प्रशासनाचेही ते प्रमुख आहेत. धैर्याने व बुद्धिमत्तेद्वारे, अत्यंत दूरदर्शीपणाने त्यांनी ते पद सोडून दिलं आणि लोकशाही प्रक्रियेने प्रमुख निवडायचा पायंडा पाडून दिला, या प्रमुखाला आता सिक्योंग असं संबोधलं जातं. पण तत्पूर्वी अनेक वर्षं ते निर्वासित समुदायाचे प्रमुख होते आणि त्यांना स्थायिक करण्याच्या सर्व प्रयत्नांवर लक्ष देण्याचं काम ते करत होते. निर्वासितावस्थेमध्ये विविध संस्था पुन्हा सुरू करणं, इत्यादी कामंही त्यांनी केली. अत्यंत वास्तववादी राहणं ही त्यांची मुख्य व्यूहरचना होती. “अरे, हे खूप आहे. मला हे करता येणार नाही, हे अशक्य आहे” असा विचार त्यांनी कधी केला नाही, पण अतिशय सुसंघटित रितीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या अविश्वसनीय बुद्धिमत्तेद्वारे व स्मरणशक्तीद्वारे त्यांच्या देखरेखीखालील विविध प्रकल्पांचा पाठपुरावा केला आणि गोष्टी कशा नेमून द्यायच्या हे त्यांना कळत असे. आवश्यक असेल तेच ते करतात: त्यांच्यासाठी हे अवघड नसतं.

प्रचंड भिन्न प्रकारच्या गोष्टी करण्यासाठीच्या प्रशिक्षणामध्ये कालचक्र व्यवस्था अत्यंत मदतीची कशी ठरू शकते, याबद्दल मी बरेचदा विनोदी टिप्पणी करतो. कालचक्र मंडलामध्ये आपल्याला ७२२ प्रतिमांची कल्पना करावी लागते आणि असं करणं शक्य होणाऱ्या अत्यंत मोजक्या व्यक्तींपैकी एक परमपूज्य दलाई लामा असावेत. या उपासनापद्धतीद्वारे इतक्या मोठ्या व्यामिश्र रितीने स्वतःचा विचार केला, की मग नवीन कार्य किंवा प्रश्न समोर आल्यावर ते सहजतेने पाहता येणं शक्य होतं. कशाचीही भीती वाटत नाही, कशाचाही भपका केला जात नाही.

जीवन व्यामिश्र असतं आणि काही लोक इतरांपेक्षा जास्त व्यामिश्र जगतात. पण त्याची भीती वाटून घेण्यापेक्षा ते कवटाळू का नये? जितकं अधिक तितकं चांगलं! माझं संकेतस्थळ २१ भाषांमध्ये सुरू आहे- यात काही मोठं नाही, हे आपण करू शकतो. गरज पडल्यास आपण आणखी भरही घालू शकतो, नाही का? दलाई लामा हाताळतात त्या इतर गोष्टींशी तुलना करता हा एक लहानसा प्रकल्प आहे. पण त्यात आणखी शक्यता दिसतात. यात काही तक्रार नाही, किंवा “मी बिचारा” असं दाखवायचा प्रयत्नही नाही. माझी आई म्हणाली असती, “आहे हे असं आहे.” ते करून टाकायचं!

आपण साधा मानव आहोत, असं दलाई लामा स्वतः म्हणत असताना त्यांना हिज् होलीनेस (परमपूज्य) असं का संबोधलं जातं, याचं स्पष्टीकरण आपण देऊ शकाल का?

दलाई लामा स्वतःला हिज् होलीनेस असं संबोधत नाहीत. याची सुरुवात कशी झाली ते मला माहीत नाही; कदाचित एखाद्या ख्रिस्ती उपाधीवरून हे घेतलं गेलं असेल- हिज् होलीनेस, असं आणि मग ते इंग्रजीत राहून गेलं असेल. राजाला ‘हिज् हायनेस’ असं संबोधतात, तसंच हे आदराचं संबोधन आहे. तिबेटी भाषेमध्ये आपल्या अध्यात्मिक शिक्षकासाठी विविध आदरार्थी शब्दप्रयोग आहेत आणि काही केवळ दलाई लामांसाठी राखून ठेवलेले आहेत, पण कशाचंच भाषांतर ‘हिज् होलीनेस’ असं होत नाही. लोकांनी स्वीकारलेला हा एक साधा संकेत झाला आहे आणि आपल्याला असं संबोधण्यापासून लोकांना थांबवणं दलाई लामांना शक्य नाही. परंतु, लोकांनी आपल्याला देव समजून भक्तिभाव दाखवावा, हे अर्थातच त्यांना कधीच नको असतं.

तुम्हाला तिबेटी भाषा येत असल्यामुळे कदाचित तुम्ही इंग्रजीत काही अधिक उचित पर्याय सुचवू शकाल का?

त्यांच्यासाठी वापरली जाणारी मुख्य उपाधी “कुंदुन” अशी आहे, त्याचा अर्थ “द सुप्रीम प्रेझेन्स” (“सर्वोच्च उपस्थिती”) असा होतो. त्याचं भाषांतर करणं अवघड आहे, पण त्याचा अर्थ असा होतो की, सर्वाधिक विकसित जीवांमधील सर्व उत्तम गुणांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांचा पुनर्जन्म होतो. खरोखरच उच्च साक्षात्कार झालेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात आपण आहोत. हे सांगायचा प्रयत्न मी केला होता, पण कोणाला त्यात रस नव्हता!

सारांश

काही लोक त्यांना आध्यात्मिक गुरू मानतात, काही जण त्यांना सुपरस्टार मानतात. काही जण त्यांना “मेंढीच्या वेशातील कोल्हाही” मानतात. वास्तव एवढंच आहे की, दलाई लामा इतरांच्या लाभासाठी व जागतिक शांततेसाठी अथकपणे कार्य करतात, त्यासाठी ते इहवादी नीतिमूल्यांना व धार्मिक सौहार्दाला चालना देतात. प्रेम, करुणा व प्रज्ञानाचं मूर्त रूप असलेले दलाई लामा आपल्याला प्रेरित करतात, मानवाला काय साध्य करणं शक्य आहे ते आपल्याला दाखवून देतात

Top