Study buddhism shantideva

शांतिदेव

शांतिदेव (८वे शतक) तिबेटमधील सर्व परंपरांमध्ये आढळणाऱ्या बोधिसत्वाच्या शिकवणीचा विशेषतः सहा पारमिता पद्धतींचा भारतीय स्रोत होते.

आठव्या शतकात पूर्व भारतातील बंगाल प्रांतामध्ये एका प्रदेशातील राजाचा मुलगा म्हणून शांतिदेव यांचा जन्म झाला. ते सिंहासनाधिष्ठित होणार होते तेव्हाच त्यांना मंजुश्रीचं स्वप्न पडलं, ती त्यांना म्हणाली, “सिंहासन तुझ्यासाठी नाही.” मंजुश्रीचा सल्ला ऐकून त्यांनी सिंहासनाचा त्याग केला आणि वनामध्ये एकांतवासात निघून गेले. तिथे त्यांना अनेक बौद्धेतर गुरू भेटले व त्यांच्या सोबत त्यांनी अभ्यास केला, उत्कटपणे साधना केली आणि प्रगत एकाग्रचित्त अवस्था गाठली. पण शाक्यमुनींप्रमाणे त्यांच्याही असं लक्षात आलं की, सखोल एकाग्रचित्त करूनही दुःखाची मुळं नष्ट होत नाहीत. मंजुश्रीची त्यांच्यावर आस्था असल्यामुळे त्यांना अखेरीस सर्व बुद्धांच्या प्रज्ञानाचं मूर्तिरूप कल्पनेत दिसलं आणि त्यांनी त्या रूपाकडून शिकवणुकी घेतल्या.

त्यानंतर शांतिदेव वनात निघून गेले आणि नालंदा विद्यापीठातील मठामध्ये गेले. तिथे मठाधिपतींनी त्यांना भिक्खू होण्याची दीक्षा दिली. तिथे त्यांनी महासूत्रांचं व तंत्रांचं अध्ययन केलं आणि त्यांची उत्कट उपासना केली, पण त्यांनी स्वतःच्या या सर्व उपासना लपवून ठेवल्या. ते केवळ खाणं, झोपणं आणि संडासला जाणं, एवढंच करत आहेत, असं सर्वांना वाटत होतं. पण वास्तविक ते निर्मळ प्रकाशाच्या साधनावस्थेत राहत असत.

शेवटी, मठातील भिक्खूंनी त्यांना निलंबित करायचं ठरवलं, कारण ते निरुपयोगी आहेत असा भिक्खूंचा समज होता. या कारवाईसाठी सबब म्हणून भिक्खूंनी त्यांना कोणत्याही मूळ संहितेवर उपदेश करायला सांगितलं आणि यात शांतिदेव मूर्ख ठरतील असं भिक्खूंना वाटत होतं. त्यांनी पायऱ्या नसलेलं एक अतिशय उंच सिंहासन तयार केलं, आणि तिथे शांतिदेव पोचू शकणार नाहीत असं त्यांना वाटत होतं. पण शेवटी ते सिंहासन शांतिदेवांच्या पातळीपर्यंत खाली होतं, जेणेकरून त्यांना सहज त्यावर चढता येईल.

त्यांनंतर त्यांनी बोधिचर्यावतार शिकवायला सुरुवात केली. भावशून्यतेविषयीच्या नवव्या प्रकरणामधील एका विशिष्ट कडव्यापाशी पोचल्यावर त्यांचं शरीर संथपणे आकाशाच्या दिशेने गेलं. ते कडवं असं:

(९.३४) एखादं (खरोखर अस्तित्वात असलेलं) सक्रिय घटित किंवा (खरोखर अस्तित्वात असलेलं) निष्क्रिय घटित (त्याची भावशून्यता) द्वैती मनासमोर राहत नाही, तेव्हा इतर पर्याय उरलेला नसल्यामुळे (अशक्यतेचं) मानसिक उद्दिष्ट नसलेल्या अवस्थेपर्यंतची परिपूर्ण शांतता निर्माण होते.

त्यानंतर केवळ त्यांचा आवाजच येत होता आणि त्या आवाजात उर्वरित संहितेचं पठण सुरू होतं. ते स्वतः अदृश्य झाले. त्यानंतर भिक्खूंनी आठवणीतून ती संहिता लिहून काढली. 

शांतिदेवांनी त्यांच्या शिकवणीमध्ये नालंदेत लिहिलेल्या इतर संहितांचाही उल्लेख केला होता: १) शिक्षासमुच्चय, आणि २) सूत्रसमुच्चय, पण या संहिता कुठे सापडतील हे कोणालाही माहीत नव्हतं. एका विशिष्ट भिक्खूच्या खोलीच्या छतावर लावलेल्या सांध्यांमध्ये या संहिता लपवल्या असल्याचं शांतिदेव आपल्याला सांगत आहेत, असं स्वप्न एकाला पडलं. आपण स्वतः परतणार नसल्याचं शांतिदेवांनी स्वप्नात सांगितलं.

सूत्रसमुच्चयामध्ये सूत्रांमधील मुख्य मुद्द्यांचा सारांश दिला आहे, तर शिक्षासमुच्चयामध्ये सूत्रांच्या उपासनेचा सारांश दिला आहे. दुसऱ्या संहितेचं, त्याचप्रमाणे बोधिचर्यावतार या संहितेचंही, तिबेटी भाषांतर तेंग्यूर या बुद्धवचनांवरील भारतीय भाष्यांच्या तिबेटी संकलनामध्ये सापडतं. कुनू लामा रिंपोछे यांच्या मते सूत्रसमुच्चय तिबेटीमध्ये भाषांतरित झालं आहे पण ते तेंग्यूरमध्ये सापडत नाही.

बोधिचर्यावतारावर, विशेषतः नवव्या प्रकरणावर अनेक भाष्यं लिहिली गेली आहेत. तिबेटी भाष्य सर्व परंपरांमधून आलेलं आहे, कारण ही संहिता तिबेटमधील बौद्ध धर्माच्या सर्व पंथांसाठी मध्यवर्ती आहे. गेलुग परंपरेमध्ये त्सोंगखापा यांची श्रेणिबद्ध मार्गाची महामांडणी (लाम-रिम चेन-मो) ही संहिता शिक्षासमुच्चयावर आणि बोधिचर्यावतारावर बरीच आधारलेली आहे. विशेषतः स्व आणि इतर यांच्या आदानप्रदानावरील शिकवणुकींमध्ये हे दिसून येतं. बोधिचर्यावतारावर त्सोंगखापा यांनी स्वतंत्र भाष्य लिहिलेलं नव्हतं, पण त्यांच्या श्रेणिबद्ध मार्गाची महामांडणी या संहितेमध्ये बोधिचर्यावतारामध्ये हाताळलेले अनेक मुद्दे आले आहेत. त्यांच्या अर्थनिर्णयनक्षम व निश्चित अर्थांच्या उत्तम स्पष्टीकरणाचा सारांश (द्रांग-न्गेस लेग्स-ब्शाद-स्निंग-पो) या संहितेमध्ये नवव्या प्रकरणातील अनेक मुद्दे हाताळले आहेत. मध्यम मार्गावर उद्देशांचं पूर्ण स्पष्टीकरण (नागार्जुनाच्या [मूळ कडव्यांवरील] चंद्रकीर्तीचं परिशिष्ट) (द्बू-मा द्गोंग्स-पा रब-ग्साल) ही त्यांची संहिताही बोधिचर्यावतारावर बरीच आधारित आहे.

परम पूजनीय चौदाव्या दलाई लामांनी बोधगया, भारत, इथे जानेवारी १९७८मध्ये बोधिचर्यावतारावर केलेल्या उपदेशातील सारांशाचं डॉ. अलेक्झांडर बर्झिन यांनी केलेलं संपादित भाषांतर
Image source: himalayanart.org
Top