चिकाटी/धैर्य पारमिताः वीर्यपारमिता

तिबेटी लोक म्हणतात की सदाचारी होणं हे एखाद्या हट्टी गाढवाला डोंगर चढायला लावण्यासारखं कठीण आहे, तर विनाशकारी गोष्टी करणं डोंगरावरून दगड खाली टाकण्यासारखं सोपं आहे. आपण कितीही संयमी, उदार आणि शहाणे असू, पण आपण आपल्या आळशीपणावर मात केली नाही, तर आपण कधीच कुणाचं भलं करू शकणार नाही. एखाद्या नायकासारखे धैर्य आणि चिकाटी बाळगल्यास आपण एखाद्या योद्ध्यासारखे होतो, जो आपल्या ज्ञानप्राप्तीच्या आणि इतरांचे भले करण्याच्या मार्गात येणाऱ्या सर्व अंतर्बाह्य अडथळ्यांचा सामना करण्यास सज्ज असतो.

प्रस्तावना 

सहा पारमितांमधील चौथी पारमिता म्हणजे वीर्यपारमिता. ही अशी मनोवस्था असते, जी सकारात्मक वर्तनात आणि त्यात सातत्य ठेवण्यात उत्साहपूर्वकपणे गुंतलेली असते. पण ती निव्वळ सकारात्मक कार्यात अडकून पडण्यापेक्षाही फार अधिक आवश्यक आहे, यात काही सकारात्मक कार्य करत असताना मिळणारा आनंद उपभोगण्यापासून आणि ते कार्य करण्यापासून मागे न हटण्याचे नायकासारखे धैर्यही समाविष्ट असते. 

हे एखाद्या कष्टसाध्य दृष्टिकोनासारखे नाही, ज्यात आपल्याला कामाचा तिटकारा आला तरी अपराधी, बंधनकारक किंवा अन्य अशा स्वरूपाच्या भावनेतून ते करत राहतो. किंवा हे यांत्रिकपणे स्वतःला कामाशी बांधून घेण्यासारखेही नाही. हे ज्याला आपण ‘अल्पकालीन उत्साह’ म्हणतो, तसेही नाही, ज्यात आपण एखादी गोष्ट करण्यासाठी खरोखरच उत्साही असतो आणि त्यात प्रचंड ऊर्जा गुंतवतो. परंतु आठवड्याभरातच थकून ती गोष्ट सोडून देतो. इथे आपण सातत्यपूर्ण प्रयत्न आणि उत्साहाविषयी बोलत आहोत. याच कारणास्तव त्याला धैर्य किंवा चिकाटी संबोधले जाते. ते सातत्यपूर्ण असते कारण ते सर्व सकारात्मक काम जे आपण करत असतो, त्यातून आपल्याला आनंदाची प्राप्त होतो. चिकाटीला धैर्याची साथ लाभल्यास तो आळशीपणा आणि चालढकल करण्याच्या वृत्तीविरोधातील सर्वोत्तम शत्रू ठरतो.

चिलखतासारखे धैर्य 

धैर्ये तीन प्रकारची असतात. पहिले धैर्य हे चिलखतासारखे असते. हे धैर्य म्हणजे कितीही समस्या येवोत, सतत प्रयत्न करत राहण्याची इच्छा होय. काहीही झाले तरी आपण आळसावर नाही किंवा निराश होत नाही. जर आपल्याला माहीत असेल की धर्माचरणाचा मार्ग फार, फार खरेच प्रदीर्घ असणार आहे आणि इतरांची मदत करण्यासाठी आपली नरकात जायचीही तयारी असेल, तर या मार्गात येणाऱ्या छोट्याछोट्या अडथळ्यांनी आपण निराश होणे किंवा आळसावणे अशक्य आहे. आपल्याकडे चिलखतासारखा कणखर दृष्टिकोन असतो, की ‘काहीही, काहीही मला माझ्या यज्ञापासून परावृत्त करू शकणार नाही!’ अशा पद्धतीचे एखाद्या नायकासारखे धैर्य आपल्या समोर येणाऱ्या कोणत्याही संकटापासून आपले संरक्षण करते. कारण गोष्टी कितीही त्रासदायक झाल्या आणि कितीही वेळ लागला, तरी ते साध्य करण्याचा आपला निश्चय पक्का असतो. 

एका रीतीने आपण ज्ञानप्राप्तीसाठी अवकाश असल्याची अपेक्षा करू आणि ती लवकर प्राप्त होईल. तर दुसरीकडे ती लवकर आणि सहजसाध्य असावी, अशी आपण अपेक्षा केली, तर ती कधीच प्राप्त होणार नाही. अनेक ग्रंथात आणि गुरूंनीही हे नमूद केले आहे की आपण तत्काळ आणि सहजसाध्य ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगत असू, तर ते आपल्या स्वार्थीपणाचे आणि आळशीपणाचे लक्षण आहे. आपल्याला तत्काळ परिणाम हवा असतो, पण इतरांची मदत करण्यात वेळ खर्च करायचा नसतो. आपल्याला फक्त ज्ञानप्राप्तीच्या मिष्टान्नाची इच्छा असते. अर्थातच, आपण आळशी असतो. अपेक्षित कष्ट उचलायची आपली इच्छा नसते. आपल्याला सवलतीत ज्ञानप्राप्ती हवी असते आणि शक्य तितक्या स्वस्तात ती हवी असते. पण अशा पद्धतीची घासाघीस कधीच उपयोगी पडत नाही. 

‘मी तीन झिलियन युगांपर्यंत इतरांना मदत करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा विकसित करत राहणार आहे.’ अशा पद्धतीच्या दृष्टिकोनाला करुणेची साथ लाभल्यास, धैर्याची अमर्याद व्याप्ती ज्ञानप्राप्ती लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी साहाय्यक ठरते. 

सकारात्मक कृतींना धैर्याची जोड देणे 

धैर्याचा दुसरा प्रकार सकारात्मक, विधायक कृतींसाठी प्रचंड परिश्रम घेण्याशी संबधित आहे, जेणेकरून ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक सकारात्मक ऊर्जा विकसित करता येईल. याचा अर्थ आपण आपल्या प्रारंभिक साधना – प्रणाम आणि इतर - करतेवेळी आळशीपणा करत नाही किंवा ध्यानधारणेचे अध्ययन आणि साधना करतेवेळी आळस करत नाही. आपण या सर्व गोष्टी करणे आवश्यक असते आणि त्या करण्यात आपल्याला आनंद वाटायला हवा. 

मर्यादित जीवांच्या भल्यासाठी काम करण्यासाठीची वीर्यपारमिता 

तिसऱ्या प्रकारची वीर्यपारमिता इतरांची मदत करण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी कार्यरत राहण्याच्या सक्षम प्रयत्नांशी संबंधित असते. यात ते चार मार्ग सांगितले गेले आहेत, ज्याद्वारे आपण अन्य लोकांना आपल्या छत्रछायेत आणू शकू आणि नैतिक स्वयंशिस्तीसंदर्भात चर्चिले गेलेल्या ११ प्रकारच्या लोकांसोबत काम करू शकू. जरी ते एकमेकासारखे नसले तरी. मूलतः इथे तात्पर्य हे आहे की या पारमिताच्या संदर्भातून या लोकांना ज्या-ज्या मार्गांनी मदत करणे शक्य आहे, तशी सक्रिय मदत करावी. आपण हे काम प्रसन्न भावनेने करतो. इतरांना मदत करण्यास आपण उपयुक्त ठरल्याने आपल्याला खरोखरच फार आनंद होतो. याशिवाय आपल्या मार्गात जे काही अडथळे येतील, ते आपण संयमाने पार करतो आणि नैतिक स्वयंशिस्तीच्या साहाय्याने आपण त्या सर्व तणावदायी भावनांपासून स्वतःचा बचाव करतो, ज्या इतरांची मदत करताना अडथळा ठरू शकतात. विभिन्न दृष्टिकोन कशा रीतीने परस्पर पूरक असतात, हे स्पष्टच आहे. 

आळशीपणाचे तीन प्रकार 

आपल्या धैर्याच्या आड येणारे आळशीपणाचे तीन प्रकार आहेत. वीर्यपारमिता विकसित करण्यासाठी आणि तिच्या साधनेसाठी आपल्याला आळशीपणावर नियंत्रण मिळवायला हवे. 

१. आळस आणि टाळाटाळ करण्याची वृत्ती 

आपल्यापैकी अनेक लोक अशा प्रकारच्या आळशीपणाच्या अनुभवाशी परिचित असतात, ज्यात आपण प्रत्येक काम उद्यावर ढकलू इच्छितो. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला मृत्यू आणि नश्वरतेसंदर्भातील ध्यानधारणा करायला हवी. आपल्याला समजून घ्यायला हवे की एक दिवस आपण निश्चितपणे मरणार आहोत आणि आपल्याकडे कोणताही संकेत नाही की आपला मृत्यू केव्हा होईल, आणि आपल्याला असंख्य गोष्टी करण्याची संधी देणारे हे अनमोल मानवी जीवन पुन्हा मिळणार नाही. 

माझी आवडती झेन उक्ती आहे, “मृत्यू केव्हाही येऊ शकतो. निश्चिंत राहा.” या वाक्यावर विचार करणे योग्य ठरेल. हे बरोबर आहे की मृत्यू केव्हाही वार करू शकतो, पण आपण त्याच्यामुळे इतके चिंतीत, घाबरलेले आणि तणावग्रस्त राहिल्यास, आपण कधीच काहीच साध्य करू शकणार नाही. आपल्याला वाटते की, , “मला सर्वकाही आजच करायला हवे!” आणि आपण हटवादी होतो, जे फार उपयोगाचे नसते. आपला मृत्यू निश्चित आहे आणि तो कोणत्याही क्षणी येऊ शकतो, पण आपल्याला या जीवनाचा लाभ घ्यायचा असेल तर, आपण या दोन तथ्यांबाबत निश्चिंत व्हायला हवे. जर आपण प्रत्येक क्षणी मृत्यूचे भय बाळगून बसलो तर, आपल्याला कायम असे वाटत राहील की आपल्याला पुरेसा वेळच मिळाला नाही. 

२. क्षुद्रपणाला चिकटून राहण्याचा आळस 

दुसऱ्या प्रकारचा आळस क्षुल्लक गोष्टींना चिकटून राहण्याशी संबंधित आहे, आणि हाही आपल्यापैकी अनेक जण सहज समजू शकतील. आपण टीव्ही पाहण्यात, गप्पा मारण्यात, मित्रांसोबत खेळ आणि इतर फालतू गोष्टींवर बोलत बसण्यात प्रचंड वेळ वाया घालवत असतो. या सगळ्याला वेळ वाया घालविणे समजले जाते आणि तो एक प्रकारचा आळशीपणाच आहे. अगदी सोपी गोष्ट तर आहेः ध्यानधारणा करण्यापेक्षा निव्वळ टीव्हीसमोर बसून कार्यक्रम पाहत बसणे कितीतरी सोपे आहे. हो ना?! आपण आपल्या आळशीपणामुळे अशा निरर्थक संसारी गोष्टींप्रति आसक्त होतो आणि काही कठीण गोष्टी करण्याचा प्रयत्नही करू इच्छित नाही, ज्या कितीतरी अधिक अर्थपूर्ण असतील. 

याचा अर्थ असा नाही की आपल्याला आपल्या मनोरंजनाला आणि विश्रांतीला विराम द्यायचा नसतो, पण कधीकधी थकवा घालवण्यासाठीही याची आवश्यकता असते. इथे मुद्दा हा आहे की त्याच्या प्रति आसक्त होऊन आळशीपणामुळे त्याचा गरजेपेक्षा अधिक अनुभव घेणे. आपण नेहमीच कामातून थोडी विश्रांती घेऊन चालायला जाऊ शकतो, टीव्ही पाहू शकतो- पण आपल्याला त्याच्याप्रति आसक्त होता कामा नये. आपली पुरेशी विश्रांती झाली की आपण ज्या सकारात्मक गोष्टी करत होतो, त्याकडे परतायला हवे. 

क्षुद्र गोष्टीत अडकून पडण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे असा विचार करणे की सांसारिक भोगविलास आणि त्यातून मिळणारे सुख कधीच स्थायी सुख प्रदान करत नाही. आपण कितीही सिनेमे पाहिले, मोठ्या लोकांबद्दल कितीही गप्पा मारल्या, कितीही जागांवर प्रवास केला, यातली कोणतीही गोष्ट आपल्याला कणभरही चिरस्थायी सुख देणार नाही. चिरस्थायी सुखप्राप्तीचा एकमेव मार्ग म्हणजे या सुखाच्या दिशेने नेणारी धर्मोपासना करणे. आपण आपले संपूर्ण जीवन चेंडू जाळीत टाकण्याचे प्रशिक्षण घेत राहू, पण त्यामुळे आपल्याला चांगला पुनर्जन्म लाभणार नाही. 

त्यामुळे समजून घेण्याजोगा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आसक्तीपासून दूर राहणे. आपण विश्रांतीसाठी एखादी गोष्ट करूही, ते ठीक आहे. पण आपण दुसरी एखादी सकारात्मक गोष्ट करण्याबाबत आळशी असल्याने विश्रांतीसाठी केलेल्या गोष्टीबाबत आसक्त होऊन आपले सर्व श्रम त्यावर खर्च करणे वेळेचा अपव्यय आहे. अशा प्रकारचा आळशीपणा सकारात्मक गोष्टीतून लाभणारा आनंद मिळवण्यातील मोठा अडथळा आहे. 

३. निराश होण्यासंदर्भातील आळशीपणा 

तिसऱ्या प्रकारचा आळशीपणा आपल्या अकार्यक्षण असण्याच्या भ्रमाशी संबंधित आहे- जसे आपल्यासाठी सर्व गोष्टी फारच कठीण आहेत आणि आपण त्या करू शकणार नाही- अशा विचारांनी आपण निराश होतो. आपण कितीतरी वेळा असा विचार करतो की, “मी तर ते करायचा प्रयत्नही करणार नाही- माझ्यासारख्या कुणी ते कदाचितच केले असेल?” ज्ञानप्राप्तीसारखे उत्तुंग ध्येय भयकारक वाटू शकते, पण त्यासाठी प्रयत्नच न करणे आळशीपणाचा प्रकार आहे. 

यावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला बुद्ध स्वरूपाचा विचार करायला हवा. या तथ्याचा विचार करायला हवा की आपल्यापैकी प्रत्येकात असामान्य गुण व क्षमता आहेत, ज्यांचा आपण पुरेपूर उपयोग करू शकतो. जर इतके सारे लोक थोडासा नफा कमावण्यासाठी सकाळ ते रात्रीपर्यंत च्युइंग गम किंवा अन्य कोणकोणत्या गोष्टी विकत असतात, तर निश्चितपणे आपल्यात इतकी क्षमता आहे की आपण अधिक अर्थपूर्ण गोष्टींसाठी वेळ खर्च करू शकू. जर आपण ९० मिनिटांच्या मैफिलीची तिकीटे मिळवण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहू शकतो तर आपण कधीच असा विचार करू नये की ज्ञानप्राप्तीच्या चिरस्थायी लक्ष्याकडे घेऊन जाणाऱ्या सकारात्मक गोष्टी करण्यासाठी आपण असमर्थ आहोत. 

वीर्यपारमिता विकसित करण्यासाठीचे चार आधार 

शांतिदेव यांनी वीर्यपारमिता विकसित करण्यासाठी चार आधार नमूद केले आहेतः 

१. दृढ निश्चय 

धर्माची सकारात्मक वैशिष्ट्ये आणि त्यांचे लाभ यावरील अचल विश्वासातून दृढ प्रेरणा प्राप्त होते, जेणेकरून आपण शिकवणींचा अभ्यास सुरू करू शकू. 

२. स्थितप्रज्ञता आणि स्वाभिमान

आपल्याला आत्मविश्वास आणि बुद्धस्वरूपाच्या आकलनावर आधारित स्थितप्रज्ञता आणि स्थिरता आवश्यक असते. जेव्हा आपण बुद्धस्वरूपाबाबत आश्वस्त असतो- अर्थात आपल्यातील मूलभूत क्षमतांची जाणीव- तेव्हा आपल्यात निसर्गतः अद्वैत असा आत्मविश्वास असतो, ज्याला शांतिदेव ‘अभिमान’ किंवा ‘स्वाभिमान’ संबोधतात. जर आपल्यात असा आत्मविश्वास असेल, तर आपले प्रयत्न संयत आणि स्थिर असतील. कितीही चढउतार आले तरी आपले वीरोचित धैर्य कायम राहील. 

३. आनंद 

तिसरा आधार आपण जे काही करत असू त्यातून आनंदाची अनुभूती घेण्यासंबंधी आहे. ही आपण जीवनात जे काही करत असू, त्याबाबत तृप्तीची आणि समाधानाची भावना असते. ही आत्मविकास आणि परोपकार करताना अत्यंत समाधान आणि परिपूर्णतेचा अनुभव घेण्यासाठी साहाय्यक ठरते. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपले मन स्वाभाविक आनंदाने तृप्त झालेले असते. 

४. जाऊ देणे किंवा काही काळासाठीचा विश्राम

अंतिम आधार असतो आपल्याला केव्हा विश्रांतीची गरज आहे हे ओळखण्याचा. आपण स्वतःवर इतकं ओझं टाकू नये की आपण एखाद्या क्षणी ते सोडून देऊ आणि आपल्यात पुन्हा त्याकडे वळण्याची ऊर्जाच नसेल. यासाठी आपल्याला अशा मध्यम मार्गाची गरज असते, जिथे केव्हा स्वतःवर ओझं टाकायचं आणि केव्हा स्वतःला बाळाप्रमाणे गोंजारायचं हे ठरवता येईल. पण याचा अर्थ असा नाही की आपण थोडे जरी थकलो तर लगेच थांबून विश्रांती घ्यावी. 

परम पूज्य दलाई लामा यांचे कनिष्ठ गुरू त्रिजांग रिंपोछे सांगतात की जेव्हा आपण खरोखरच प्रचंड वाईट मनोवस्थेत, खिन्न आणि नकारात्मक अवस्थेत असू, जिथे कोणताच धार्मिक विधी आपल्याला उपयोगी पडत नाहीत, तेव्हा एक डुलकी काढणे केव्हाही चांगले आहे. एक डुलकी काढून जेव्हा आपण जागे होऊ, तेव्हा आपली मनोवस्था वेगळी असेल. हा अतिशय व्यावहारिक सल्ला आहे. 

विरोचित धैर्य विकसित करण्यासाठीचे आणखी दोन घटक 

शांतिदेव यांनी आणखी दोन साहाय्यक घटक सांगितले आहेतः 

१. तत्पर स्वीकृती 

पहिला घटक आहे, आपल्याला ज्याची साधना करायची आहे त्याचा स्वीकार करणे आणि जे सोडायचे आहे ते सोडणे. याशिवाय आपल्याला त्या कार्यात येणाऱ्या अडथळ्यांचा, त्रासाचा स्वीकार करावा लागेल. हे सर्व वास्तववादी दृष्टिकोनातून प्रत्येक मुद्दा तपासण्यावर आणि ते करण्याच्या आपल्या क्षमता पडताळण्यावर आधारलेले आहे. त्यानंतर आपल्याला स्वीकार करायला हवा की इतरांच्या भल्यासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी आपल्याला या सकारात्मक कार्याची वास्तवात आवश्यकता आहे. आपण स्वीकार करतो की काही कृत्ये आपल्याला सोडायला हवीत आणि त्या मार्गात अनेक अवघड प्रसंग असतील. 

आपण स्वीकार करतो आणि आपल्या क्षमतांची जाणीव ठेवून वास्तववादी दृष्टिकोनातून जबाबदारी स्वीकारतो. जर आपण एक लाख दंडवत घालण्याची योजना करत असू, तर आपल्याला हे माहीत असायला हवे की ते सोपे काम नाही. आपल्या पायांना दुखापत होऊ शकते, आपले तळवे सुजू शकतात आणि आपल्याला निश्चितच थकवा येईल. तेव्हा आपण स्वतःला त्यातून मिळणाऱ्या लाभांचीही आठवण करून देतो. 

आपल्याला कोणती कृत्ये थांबवायला हवीत? सुरुवातीला, हे करण्यासाठी आपल्याला वेळ काढायला हवा आणि तेच कठीण असू शकते- जसे वेळ काढण्यासाठी अनावश्यक गोष्टी कमी करणे. आपण प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करायला हवे की, “मी हे करू शकतो का?” आपण त्याच्याशी संलग्न गोष्टींचा स्वीकार करतो आणि हर्षोल्हासासहित तनमनाने त्यात स्वतःला झोकून देतो. 

२. नियंत्रण मिळविणे 

धैर्य विकसित करण्यासंदर्भातील शांतिदेव यांचा दुसरा मुद्दा आहे, की एकदा का आपल्यात ते स्वीकारण्याचा वास्तववादी दृष्टिकोन आला की आपण ते लागू करण्यासाठी स्वतःवर नियंत्रण मिळवतो. आपल्या इच्छाशक्तीने आपण आळशीपणासारख्या जुन्या सवयी सोडून देतो. आपण नियंत्रण प्राप्त करतो आणि आपल्या इच्छित सकारात्मक कार्यात गुंतून जातो. जणू आपण प्राणपणाने त्या कामात स्वतःला गुंतवून टाकतो. 

सारांश 

जेव्हा आपण वास्तवात धर्माभ्यासाबाबत आश्वस्त होतो आणि पाहू लागतो की त्यातून मिळणारे सुख अतुल्य आहे, तेव्हा आपली त्या प्रति दृढता वाढत जाते. भलेही आपल्या जीवनात काहीही घडत असो, जर आपल्यात धैर्याची जोड असलेली तीव्र प्रेरणा असेल, तर आपण एखाद्या शूरवीराप्रमाणे आपले लक्ष्य प्राप्त करतो. 

आपल्या उद्दिष्टप्राप्तीमध्ये आपल्यापैकी अनेक जण अनुभवत असलेला आळशीपणाचा सर्वात मोठा अडथळा दूर करण्यासाठी धैर्य आपल्याला साहाय्यक ठरते. इथे वर्णन केलेल्या पद्धती केवळ आपल्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गावर प्रगती करतानाच उपयुक्त ठरणार नाहीत, तर आपल्या संपूर्ण जीवनात सासांरिक ध्येयांच्या प्राप्तीसाठीही उपयुक्त ठरतील. 

Top