बौद्ध शिकवणीच्या अभ्यासाचे महत्त्व काय आहे?

बौद्ध संदर्भातून आपण ध्यानधारणेविषयी चर्चा करतो, तेव्हा आपण विशिष्ट अभ्यासाविषयी बोलत असतो. हल्ली अनेकदा ‘ध्यानधारणा’ हा शब्द आपल्या कानावर पडतो, कारण ध्यानधारणेला चांगली प्रतिष्ठा आहे आणि अनेक लोक तणावमुक्तीचे साधन म्हणून याचा वापर करतात. त्यामुळे जेव्हा प्रत्यक्ष ध्यानधारणेच्या अभ्यासाचा मुद्दा येतो, तेव्हा बहुतांशी लोकांना नक्की काय करायचे आहे, याचीच कल्पना नसते. सर्वसाधारण एक अशी कल्पना असते की आपल्याला केवळ शांत बसायचे आहे आणि ध्यान लावायचे आहेः पण त्यानंतर काय? केवळ श्वासांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आणि सद्विचारांवर लक्ष पुरवण्यापेक्षा ध्यानधारणेत काही अधिक असते का? 

संस्कृतमधील ‘मेडिटेशन’ शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट यथार्थ करण्याशी संबंधित आहे. तर तिबेटी भाषेतील यासाठीचा प्रतिशब्द एखादी सवय विकसित करण्याच्या अर्थाने वापरला जातो. जेव्हा आपण एखादी सवय अंगी बाणवतो, तेव्हा ती गोष्ट आपल्या अस्तित्वाचा हिस्सा होते आणि आपण ध्यानधारणेत नेमके हेच करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःत हितकारक बदल करू इच्छितो. सर्वात आधी आपण स्वतःला हे विचारायला हवे की आपल्याला बदल का हवा आहे? साधारणतः या मागचे कारण म्हणजे आपण ज्या पद्धतीचे जीवन जगत असतो, आपण जे अनुभवत असतो किंवा इतरांसोबतचा आपला व्यवहार, याबाबत आपण पुरेसे समाधानी नसतो. ही यादी आणखी मोठी होऊ शकते, पण आपल्या सर्वांचेच उद्दिष्ट हे स्वतःत सुधारणा घडविण्याचे असते. 

समस्यांपासून पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करणे

हा महत्त्वाचा मुद्दा आहेः की आपल्याला स्वतःत बदल घडवायचा असतो आणि सुधारणा घडवायची असते. असे नाही की आपण ध्यानधारणेच्या माध्यमातून एखाद्या कल्पनारम्य जागी पळ काढू इच्छितो; त्यासाठी इतर अनेक पद्धती आहेत, जसे अमली पदार्थांचे सेवन किंवा मद्यपान करूनही आपण ते साध्य करू शकतो. आपल्याला काहीच विचार करावा लागू नये, यासाठी आपण दिवसभर संगीत ऐकत बसू शकतो. अनेकदा आपण अशा गोष्टींच्या प्रभावाखाली असलो की आपल्याला आपल्या समस्या फार तीव्र किंवा यथार्थ वाटत नाहीत. पण आपण समस्यांचा सामना करायला शिकलो नसल्याने समस्या नेहमी परत येतात. अनेक लोक ध्यानधारणेचा एखाद्या औषधासारखा वापर करतात, पण ते फार दीर्घ काळ उपयुक्त ठरत नाही. आपण ढोल बडवत राहू शकतो - एखाद्या बौद्ध डिज्नीलॅंण्डसारखे- पण त्याने आपल्यात विशेष बदल होणार नाहीः ती फक्त पळवाट असेल. 

पण आपण बौद्ध परंपरेनुसार ध्यानधारणेचा अभ्यास केल्यास आपण आपल्या समस्यांपासून पळ काढणार नाही, तर त्यांचा सामना करून त्यांच्यावर मात करू. हे फारच साहसाचे काम आहे आणि ते सहजसाध्य नसल्याने त्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते.  आणि ती साधना काही फार आनंददायी अनुभव नसेल, याचीही आपण मानसिक तयारी ठेवायला हवी. त्याची तुलना आपण शारीरिक व्यायामाशी करू शकतो, जो फार कठीण असतो आणि त्यामुळे स्नायुंना सूजही येऊ शकते. पण स्वतःला आरोग्यदायी आणि कणखर बनवण्यासाठी आपण तो त्रास सहन करायला तयार असतो. 

ध्यानधारणेतही असेच असते, फक्त तिथे आपण मनावर काम करत असतो, शरीरावर नाही. 

बौद्ध धर्मातील काही स्वरूपांमध्ये मात्र ध्यानधारणेसोबतच शरीरावरही काम करावे लागते, जसे मार्शल आर्ट. पण तिबेटी परंपरेत असे नसते. शारीरिक व्यायामात काहीच गैर नाही, उलट ते उपयुक्तच असते. अर्थात इथे मुख्य लक्ष मनावर, फक्त बुद्धी नव्हे, तर भावना आणि हृदयावरही असते. महान बौद्ध गुरू या गोष्टीवर भर देतात की बौद्ध साधना सुरू करण्यासाठीची सर्वात मूलभूत गोष्ट  चित्त प्रशिक्षण आहे कारण आपण ज्या रीतीने वागतो, बोलतो किंवा इतरांशी संवाद साधतो, या सर्व कृती आपल्या मानसिक स्थितीद्वारे नियंत्रित केल्या जातात. 

प्रामाणिक आत्मपरीक्षण

आपल्याला जाणीव होते की जीवनात समस्या आहेत आणि आपण हे ही पाहू शकतो की त्या समस्यांचा स्रोत मनाच्या असमाधानकारक स्थितीत आहे. आपण खरेच प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण केले, तर आपण पाहू शकतो की आपल्यात क्रोध, लोभ, स्वार्थ, मत्सर, आसक्ती, अहंभाव आणि भोळसटपणासारख्या अनेक तणावदायी भावना असतात. जर आपण आणखी खोलात जाऊन विचार केला तर आपल्यात असुरक्षिततेच्या भावनेसोबतच जीवन म्हणजे नक्की काय, याबाबतही संभ्रमाची अवस्था असते. असे अनेकदा आढळून येते की तणावदायी भावना आपल्या मनस्थितीला नियंत्रित करतात आणि आपण स्वतःसोबत इतरांसाठीही समस्या निर्माण करू, अशा बंधनकारक वर्तन आणि बोलण्यास कारणीभूत असतात. आपण एकटे असलो तरी अनेकदा निरनिराळ्या तणावदायी भावनांमुळे आपले मन असमाधानची स्थिती अनुभवते. सोप्या शब्दात सांगायचे तर आपण खरंच सुखी नसतो. 

ध्यानधारणेत ही स्थिती सुधारण्यासाठी साहाय्यक ठरण्याचे उद्दिष्ट असते. हे एखादे औषध घेतल्यासारखे नाही की जेणेकरून आपण कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही. तो काही उपाय नाही. काही लोक ध्यानधारणेकडे त्या दृष्टिकोनातून पाहतात. ते विचार करतात की फक्त खाली बसून, डोळे बंद करून सर्व विसरल्यास त्यांच्या सर्व समस्या अदृष्य होतील. असा विचार उपयुक्त नाही. उलट आपण आपल्या समस्यांवर कृतीशीलपणे प्रहार करायला हवा.  

खऱ्या शत्रूचा शोध

आपण नेहमी पाहतो की बौद्ध साहित्यात तणावदायी भावनांना अतिशय तीव्र शब्दात आपला खरा शत्रू सांगितले गेले आहे. याचा उद्देश त्या भावनांना एखाद्या दैत्याच्या रुपात सादर करून आपल्याला घाबरवण्याचा नसतो, तर उलट आपल्याला जाणीव होते की या भावनांना नियंत्रित करण्यासाठी आपल्याला स्वतःवर काम करायचे आहे. काही महान बौद्ध ग्रंथही आहेत, ज्यात या समस्यादायी भावनांबाबत अशा स्वरूपाचे विवेचन आहे, ‘मी तुला खूप सहन केलं, तू माझ्यापुढे इतक्या समस्या आणि संकटं निर्माण केलीस. आता तुझी वेळ भरली आहे.’ असे म्हणून आपण आपल्या बाह्या सरसावून बसतो आणि आपले मन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. ध्यानधारणेचा संबंध याच साऱ्या गोष्टींशी आहे. 

सोप्या शब्दात सांगायचं तर ध्यानधारणा अशी पद्धत आहे, ज्यात आपण लाभकारक सवयी विकसित करण्यासाठी आणि वाईट सवयी बदलण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करतो. या सवयी आपण कशा रीतीने विचार करतो, काय अनुभव करतो आणि आपला भावनिक प्रतिसाद कसा असतो, याच्याशी निगडीत असतात. त्यासाठी प्रशिक्षण आणि सातत्य आवश्यक असते - ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. जसे आपण क्रीडा प्रकारांमध्ये , वाद्य वाजवण्यासाठी किंवा नृत्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करतो, सुरुवातीला ते फार कृत्रिम वाटते. पण आपण सरावलो की ते सहजसाध्य वाटू लागते. आपले मन, भावना आणि मनस्थितीला हेच लागू होते. 

बदल शक्य आहे का?

आता एक असा मोठा प्रश्न समोर येतो की, आपण खरंच बदल घडवू शकतो का? स्वतःत सुधारणा घडविताना आपल्याला सर्व प्रथम स्वतःला पटवून द्यावे लागते की हे वास्तवात  शक्य आहे. आपण अनेकदा लोकांना असे बोलताना पाहतो की, ‘मी असाच आहे आणि असाच राहीन; मी हे बदलण्यासाठी काहीच करू शकत नाही, त्यामुळे मला असेच राहावे लागेल.’ किंवा ‘मी रागीट आहे, माझ्या रागाचा पारा चढतो आणि मी असाच आहे.’ आपण अशा एखाद्या ओळखीशी चिकटून राहिलो तर बदल घडविणे खरेच कठीण ठरेल. 

आपण  प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करायला हवे. आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीशी स्वतःला का जोडतो? जर आपण रागीट व्यक्ती असतो, तर आपण पूर्ण वेळ रागावलेलेच नसतो का? अशीही शक्यता आहे की आपण दुसऱ्याला दोष द्यायला लागूः माझे आईवडील असे वागले म्हणून मी रागावलो आहे. अशा विचाराने काहीच फायदा होत नाही. आपण खोलात जाऊन पाहिल्यास, आपण हे शोधायचा प्रयत्न करतो की या भावना नक्की कोठून निर्माण होतात. जर आपण दररोज स्वतःला हे सांगत राहिलो की, ‘क्रोधित होऊ नको, लोभी होऊ नको, स्वार्थी होऊ नको,’ पण ते थांबवणे फारच कठीण असते, हो ना? त्यामुळे आपल्याला अशी पद्धत शोधायला हवी, जी आपली भावनात्मक अनुभूती बदलायला साहाय्यक ठरेल. 

आपला दृष्टिकोन सर्व गोष्टींवर परिणाम करतो

बौद्ध धर्म सांगतो की आपला दृष्टिकोन आपली मनस्थिती अधोरेखित करतो. अर्थात आपण गोष्टींकडे कोणत्या दृष्टीने पाहतो. कल्पना करा, आपण आपली नोकरी गमावली आहे. याकडे आपण एखादी मोठी आपत्ती म्हणून पाहतो आणि आपण क्रोधित आणि निराश होतो. का? कारण त्या वेळी आपण विचार करतो की नोकरी गमावणे या जगातली सर्वात वाईट गोष्ट आहे आणि त्याहून वाईट काहीच असू शकत नाही. 

आपण नोकरी गमावली आहे- हे एक सत्य आहे. आपण ते बदलू शकत नाही.  पण आपण काय बदलू शकतो, तर नोकरी जाण्याने जे नुकसान होणार आहे, त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. ज्यामुळे आपण त्या गोष्टीकडे भिन्न दृष्टिकोनातून पाहू शकतो - कदाचित आपण आता आपल्या मुलांसोबत अधिक वेळ घालवू शकतो किंवा आपला पेशा बदलायचा विचार करू शकतो. कदाचित ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरणार नाही, पण किमान आपल्याला फार वाईट तरी वाटणार नाही. तर ध्यानधारणेत आपल्याला यावरच लक्ष केंद्रित करायचे असते - की आपण गोष्टींकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो कारण आपल्या भावनात्मक अनुभूतीवर तीच गोष्ट परिणाम करत असते. 

मागील आठवड्यात माझ्या जीवलग मित्राचा मृत्यू झाला. ही फारच दुःखद बाब आहे. मला याचे खरेच दुःख झाले - तसे वाटणे निकोप आहे; ते अजिबातच चुकीचे नाही. अर्थात त्याचा मृत्यू झाला याचा मला आनंद होऊ शकत नाही. पण इथे मी माझी मनस्थिती बदलण्यासाठी काय करू शकतो? त्याच्या मृत्युच्या एक आठवड्यापूर्वी मला त्याला फोन करायची इच्छा होती, पण मी ते केले नाही. तो एकदम ठणठणीत होता, अंघोळीसाठी गेला, तिथेच त्याला हृद्यविकाराचा झटका आला आणि तो शाॅवर खालीच मृत होऊन कोसळला. हे फारच अनपेक्षित आणि दुःखद होते. अर्थात मला फारच पश्चाताप होऊ शकला असता की त्याला फोन करायचा विचार आला होता, तेव्हाच मी त्याच्याशी बोललो का नाही, किंवा त्याच्या मृत्युची जाणीव होऊन मला त्याला जे सांगायचे होते, त्याविषयी विचार करून मी स्वतःवर फार रागावलोही असतो. अशा पद्धतीच्या विचारांनी माझे दुःख फारच वाढले असते. 

त्याऐवजी मी आनंदाच्या त्या क्षणांच्या स्मृती जागवल्या जेव्हा आम्ही एकत्र होतो आणि आम्ही किती छान छान गोष्टी एकत्रित अनुभवल्या होत्या - आमची मैत्री ३५ वर्षं जुनी होती - आणि अशा छान व्यक्तीसोबत इतकी गाढ मैत्री होणं, माझ्यासाठी किती सन्मानाची बाब होती. मला ज्ञात असलेल्या पाश्चिमात्त्य धर्मसाधकांपैकी तो सर्वात खरा आणि इमानदार साधक होता. त्यामुळे मी त्याला माझा प्रेरणास्रोत मानतो की ज्यामुळे माझी साधना अधिक तीव्रतेने कायम ठेवू शकतो. 

हा ध्यानधारणेचा परिणाम असतो. त्यामुळे तुम्हाला एखादी दैवी शक्ती किंवा असाधारण सिद्धी लाभत नाही. तुम्हाला जे साध्य होते, ते म्हणजे तुम्ही जेव्हा कठीण परिस्थितीला सामोरे जाता आणि तुम्हाला जाणीव होते की तुम्ही एखाद्या नकारात्मक, दुःखदायी परिस्थितीत अडकत आहात, तर सर्वात आधी तुम्हाला याची पुरेशी जाणीव असते की ती परिस्थिती कायम राहिल्यास फारच वाईट होईल. आपल्याला अशा कठीण परिस्थितीच्या योग्य आकलनाची समज प्राप्त होते आणि पुरेशा प्रशिक्षणामुळे आपण त्या गोष्टींकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णतः बदलू शकतो. कदाचित तरीही आपल्याला दुःखाची भावना जाणवू शकते, जशी मी माझा मित्र गमावल्याने अनुभवली होती, पण आपण त्या अनुभवाला काही सुखकारक अनुभवांसोबत जोडून दुःखाची तीव्रता हलकी करू शकतो. 


स्वतःच्या क्षमतांबाबत विश्वास बाळगणं 

म्हणूनच आपण स्वतःच स्वतःला हा प्रश्न विचारतो की आपल्यात आपला दृष्टिकोन बदलण्याची क्षमता आहे का? आणि त्याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. आपण पाहिले असेल की आपल्याला लहान असताना ज्या गोष्टी आवडत होत्या, त्या आता मूर्खासारख्या किंवा कंटाळवाण्या वाटतात. आपले वय वाढेल तसा आपला दृष्टिकोन फार बदलत गेला आहे. एकदा आपल्यात विश्वास आला की आपल्यात आणखी बदल करणे शक्य आहे, तेव्हा आपल्याला ते साध्य करण्यासाठीच्या पद्धती आत्मसात करण्याची गरज असते. यात तीन टप्पे असतातः

  • योग्य ज्ञान लाभ - आपल्याला हे शिकण्याची आवश्यकता असते की कोणत्या सवयी अधिक लाभकारक आहेत, आणि त्या अभ्यासासंदर्भातील श्रवण, वाचन आणि शिक्षणातून त्याबाबतचे ज्ञान साध्य होईल. या पातळीचा अर्थ असा नाही की आपल्याला त्याची जाणीव होईलच, पण आपल्याला बौद्ध पद्धतींचे आकलन नक्कीच होईल. 
  • त्याच्या अर्थाचा विचार करणे - आपल्याला जे ज्ञान झाले आहे, त्याचा विचार करायला हवा, विविध दृष्टिकोनातून त्याची पारख करायला हवी, जेणेकरून आपल्याला त्याचे आकलन होईल. आपल्याला ही जाणीव व्हायला हवी की आपल्याला यथार्थाचा शोध आहे, एखाद्या निष्क्रिय गोष्टीचा नाही. आपण याबाबत आश्वस्त असायला हवे की ते आपल्यासाठी उपयुक्त असेल आणि त्याचा जीवनात अंगीकार करता येईल. 
  • ध्यानधारणा - आता आपण जे ज्ञान प्राप्त केले आहे, ते उपकारक सवयीमध्ये विकसित करण्यासाठी ध्यानधारणेसाठी सज्ज व्हायला हवे. 

योग्य माहिती आणि चिंतन

योग्य माहिती मिळवणे आपल्याला वाटते तितके सोपे नसते. असे अनेक लोक असतात,जे प्रमाण बौद्ध पद्धती शिकवण्याचा दावा करतात; पण एखादा पुस्तक लिहितो आणि ते प्रकाशित करतो, याचा अर्थ पुस्तकाचा मजकूर योग्य असेलच असे नाही. आणि केवळ शिक्षक लोकप्रिय आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा आहे, म्हणून त्याची शिकवण योग्यच असेल असेही नाही. हिटलर फार प्रसिद्ध होता आणि त्याचे व्यक्तिमत्त्वही आकर्षक होते, पण त्याने जी शिकवण दिली ती अर्थातच योग्य नव्हती.

अशा प्रकारे बौद्ध धर्मात बुद्धीच्या विवेकी वापरावर भर दिला गेला आहे. कोणती गोष्ट आपल्याला प्राण्यांपासून वेगळं ठरवते? प्राण्याला अनेक गोष्टींचे प्रशिक्षण देणे शक्य आहे, पण त्याहून अतिरिक्त एक गोष्ट आपल्याकडे आहे, ती म्हणजे बुद्धी. आपल्यात हानिकारक आणि उपयुक्त गोष्टींमधील फरक ओळखण्याची क्षमता आहे. जरी आपल्याला काही गोष्टी प्रथमदर्शनी नाही समजल्या तरी त्याबाबत समज वाढवण्यासाठी आपण आपली बुद्धी वापरू शकतो आणि आपण जेव्हा एखादी शिकवण ऐकतो किंवा वाचतो, तेव्हा आपल्याला नेमके तेच करायचे आहे. 

बुद्धाच्या प्रत्येक शिकवणीमागे इतरांच्या कल्याणाचे उद्दिष्ट आहे. पण आपण स्वतः याची पडताळणी करू शकतो की बुद्धाने शिकवलेल्या गोष्टी खरेच उपयुक्त आहेत की नाहीत. यासाठी आपल्याला दीर्घकालीन परिणामांकडे पाहायला हवे कारण अल्पकालीन परिणाम कदाचित तितके सुखकारक असणार नाहीत. हे एखाद्या वैद्यकीय उपचारासारखे आहे, जे करून घेताना जराही सुखकारक वाटत नाहीत, पण त्याचे दीर्घकालीन फायदे असतात, जसे कर्करोगाच्या उपचारातील केमोथेरपी. 

शिकवणींचे परीक्षण आणि त्यांचा आपल्या जीवनातील व अनुभवाशी असलेला संबंध आपण तपासून पाहिला नाही, तर आपण त्याविषयी ध्यानधारणा कशी करू शकू? हे एखादी गोष्ट आपल्याला नक्की हवी आहे की नाही किंवा आपल्यासाठी उपयुक्त आहे की नाही, याचा विचार न करता ती खरेदी केल्यासारखे आहे. 

विधीवत ध्यानधारणा

शिकवणींबाबत विचार करणे अर्थातच उपयुक्त असते, आणि काही लोक कदाचित याला ध्यानधारणेचे रुपच समजत असतील. पण ज्याला आपण औपचारिक ध्यानधारणा म्हणतो, त्यात एक प्रक्रिया अंतर्भूत आहे, ज्या माध्यमातून आपण ही अधिक उपयुक्त मनोवस्था आपल्या जगण्याशी जोडू शकतो. हे दोन पातळ्यांवर करता येते

  • सविवेक ध्यानधारणा - या पहिल्या पातळीला ‘विश्लेषणात्मक ध्यानधारणा’ म्हणतात, ज्यात आपण सुधारित दृष्टिकोनातून सकारात्मक गोष्टींबाबत विस्तारपूर्वक सविवेकी भेद करून एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो.
  • स्थिरता प्रदान करणारी ध्यानधारणा - दुसरी पातळी ती असते, जिथे आपण सर्व तपशीलांविषयी सूक्ष्मभेद करण्याऐवजी आपल्या विश्लेषणाच्या निष्कर्षाला आपला दृष्टिकोन समजून आपली ध्यानधारणा अधिक सघन करण्यावर भर देतो.

अनेक लोक ध्यानधारणेची सुरुवात करतेवेळी श्वासांवर लक्ष केंद्रित करण्यास शिकतात. आपण सर्वप्रथम आपले चित्त स्थिर करतो आणि आत-बाहेर होणाऱ्या श्वासांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करतो. ही वरवर सोपी कृती वाटत असली तरी प्रत्यक्षात कठीण आहे. आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करत असतो तेव्हा आपण नक्की काय करतो? सर्वप्रथम आपण आपल्या मेंदूतील तणावदायी भावना निर्माण करणारा गोंगाट शांत करण्याचा प्रयत्न करतो.  हे पार्श्वसंगीतातील अनावश्यक आवाज बंद करण्यासारखे आहे. सोबतच आपण ध्यानधारणेबाबत जे ऐकले आहे आणि त्याबाबतचे आपले आकलन यांच्या आधारावर आपल्या श्वासांवर ध्यान केंद्रित करू शकतो. इथेच सविवेकी आणि स्थिरता प्रदान करणाऱ्या ध्यानधारणेचा संबंध येतो. उदाहरणार्थ, आपण आपला श्वास हा नश्वरतेचे प्रतिक समजू शकतोः तो सतत बदलत असतो. किंवा आपण या वस्तुस्थितीकडे पाहू शकतो की आपल्या श्वासापेक्षा स्वतंत्र ‘मी’ अस्तित्वात नाही - अखेर श्वास कोण घेत आहे? पण असे विश्लेषण नवसाधकांना गोंधळात टाकणारे ठरू शकतात. 

त्यामुळे इथे प्रथम स्वतःपासून विचारास सुरुवात करणे योग्य आहे. आपण कायम अनेक प्रकारांच्या तणावाखाली दबलेले असतो, कामाचा ताण, कौटुंबिक आणि सामाजिक ताण असतो - आणि अशा प्रकारे आपले मन सतत चिंतातुर विचारांनी व्यापलेले असते. ते तणावमुक्त असणे कठीण असते. त्यामुळे आपल्यासाठी फक्त तणावमुक्त होऊन स्थिरता अनुभवणे आवश्यक असते. अर्थात त्यामुळे आपल्या समस्या संपणार नाहीत, पण हे पहिले सकारात्मक पाऊल आहे. श्वासांवर लक्ष केंद्रित केल्याने आपण आपल्या शरीरासंबंधीच्या वास्तवाशी परिचित होतो -  जसे ‘मी जिवंत आहे.’ श्वासोच्छवास हे त्याचे चांगले लक्षण आहे कारण आपण मरत नाही तोपर्यंत तो निरंतर सुरू असतो. जीवन कितीही समस्यांनी भरलेले असू दे, श्वास कायम असतो. जर आपण त्याबाबत अधिक सजग झालो, तर जीवनाची निरंतरता समजण्यासाठी ते उपयुक्त ठरेल की काहीही होवो, जीवन चालूच राहणार आहे.  अगदी माझ्या मित्राच्या मृत्युसमयीही , जीवन निरंतर आहे, ही जाणीव मला उपयुक्त ठरली. 

तर अशा प्रकारे आपल्याकडे ही माहिती आहे, आपण या विषयी चिंतन केले आहे आणि समजून घेतले आहे आणि आपण आश्वस्त झालो आहोत की यात काहीतरी तथ्य आहे. आपण जीवनाची निरंतरता समजून घेऊ शकलो आणि भीतीदायी व तणावदायी भावनांमध्ये वाहवत जाण्याऐवजी शरीराशी अधिक जोडले गेलो, तर ते उपयुक्त आहे का? हो, ते उपयुक्त आहे. मी श्वासांवर लक्ष केंद्रित करण्यात आणि त्याबाबत सचेतन असण्यास सक्षम आहे का? हो, आपण एक किंवा दोन सेकंद आपल्या इतर हालचाली थांबवल्या, तरी आपण आपल्या श्वासांवर लक्ष पुरवू शकतोः तो कायम तिथे असतोच. अशा रीतीने आपल्याला अगदी सखोल किंवा शास्त्रशुद्ध समज असण्याचीही गरज नसते.  अर्थात जाणीव जितकी सखोल असेल, तितकी ती चांगलीच असते, पण आरंभासाठी त्याचे ज्ञान असणेही पुरेसे आहे. 

ध्यानधारणेची प्रक्रिया 

आपल्याकडे जेव्हा दोन मानसिक घटक असतील तेव्हा आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करण्याच्या जाणिवेपर्यंत पोहचू शकतो, या दोन मनोवस्था आहेत, ज्या आपले लक्ष केंद्रित होण्याशी जोडलेल्या असतात. 

  • स्थूल निरीक्षण  - स्थूल पातळीवरील गोष्टींची नोंद करणे
  • सूक्ष्म विवेक - एखादा विषय सविस्तर समजून घेणे

या दोन मनोवस्थांमधील फरक ओळखण्याचे पारंपरिक उदाहरण म्हणजे एखाद्या चित्राचे निरीक्षण करणे. स्थूल निरीक्षणात आपण ते चित्र असल्याचे ओळखू, कदाचित काही लोकांचे चित्र असल्याचे ओळखू. या आकलनात हे मनातून स्पष्ट व्हायची गरजही नसते, ते फक्त नजरेनेच ओळखता येईल. सर्वसाधारण भाषेत याला आपण आकलन किंवा जाणीव म्हणतो. सूक्ष्म विवेकात आपण चित्राचे सखोल निरीक्षण करू आणि समजून घेऊ की हे विशिष्ट चित्र आहे किंवा त्या विशिष्ट व्यक्तीची वैशिष्ट्ये ओळखू. 

आपण श्वासांवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रक्रियेत हेच करतो. आपण प्राथमिक निरीक्षण नोंदवतो आणि आपल्याला जाणीव होते की श्वास ही अशी गोष्ट आहे, जी निरंतर सुरू असते, आणि त्याबाबत सविस्तर समजून घेतो की श्वासोच्छवासाची प्रक्रिया आपल्या नासिकांद्वारे चालते. काहीही घडले तरी आपण जोपर्यंत जिवंत आहोत, ती निरंतर असणार आहे, त्या अर्थाने ती स्थिर, सुरक्षित आणि अवलंबून राहण्याजोगी आहे. त्यासाठी तिला आपण ‘सविवेक ध्यानधारणा’ संबोधतो कारण त्याबाबत आपल्याला त्याची सक्रिय जाणीव होते. आपण त्याचे विश्लेषण करत नाही, तर आपण त्याचे निरीक्षण करून विशिष्ट दृष्टिकोनातून ते समजून घेतो.

स्थिरता प्रदान करणाऱ्या ध्यानधारणेची दुसरी पातळी म्हणजे जिथे आपल्याला निरीक्षण करावे लागत नाही, तर आपोआपच आपल्याला त्याची जाणीव होते. ही एखादी गोष्ट सक्रियपणे समजून घेणे आणि ती आपसूक माहिती होणे, यातील खूपच भिन्न मनोवस्था असते. आपण ध्यानधारणा करतो, आणि परिणामी आपण अधिक संतुलित होतो, अधिक सुरक्षित आणि स्थिर होतो. हे दैनंदिन सरावातून शक्य होते. 

आपल्या साधनेला दैनंदिन व्यवहारात लागू करणे

आपण निराश असू तेव्हा विशेषत्वाने आपल्याला साधनेची आठवण होते. अर्थात, ती कठीण आहे आणि सुरुवातीला आपण यासाठी शारीरिक प्रशिक्षणाचे उदाहरण पाहिले होते, पण कालांतराने त्या जाणिवेची आपल्यात इतकी सखोल पेरणी होते की आपल्याला ती निरंतर उपलब्ध असते. आपल्याला कायम जाणीव असते की जीवन प्रवाही आहे आणि अगदी सखोल पातळीवर आपण अनुभवतो की जीवनात काहीही घडले तरी विशेष समस्या जाणवणार नाही. आपल्याला याची इतकी खोल जाणीव असते की ती अशा सवयीत रुपांतरित होते, जिथे आपण जीवनाकडे सुधारित दृष्टिकोनातून पाहू लागतो. हा ध्यानधारणेचा परिणाम असतो. याचे विस्मरण झाले तरी आपण पुन्हा आपल्या श्वासावर वारंवार लक्ष केंद्रित करुन त्याचा नव्याने अवलंब करू शकतो. या दृष्टिकोनातून आपण आपल्या मनोवस्थेत वास्तविक बदल घडवतो की आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसा व्यवहार करतो. हे काही आपल्या समस्यांपासून पळ काढून  एखाद्या काल्पनिक जगात जाण्यासारखे नाही, तर ही एक सक्रिय कृती आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपली मानसिक आणि भावनिक स्थिती सुधारण्यासाठी सक्षम होते आणि अंतिमतः आपल्या समोरील परिस्थिती सुधारण्यासाठी आपण ही कृती करतो. 

आत्ता आपण जी गोष्ट अभ्यासली त्याकडे अद्ययावत मानसशास्त्रातील पद्धत म्हणूनही पाहिले जाऊ शकते. तसे पाहणे योग्य असेल, पण आपण असाही विचार करणार नाही ना, याची काळजी घ्यायला हवी की हाच बौद्ध धर्म आहे - जणू मानसशास्त्राचे एखादे स्वरूप. बौद्ध तत्त्वज्ञान याहून खूप खूप प्रगल्भ आहे. बौद्ध धर्मात आपण यापेक्षा उच्चतम उद्दिष्ट बाळगतो - जसे ज्ञानप्राप्ती , इतरांची मदत - पण त्यासाठी आपल्याला ही प्राथमिक पातळी पार करणे आवश्यक आहे. 

सारांश

संपूर्ण दिवस संगीत ऐकत राहून, स्वतःला दिवसभर व्यस्त ठेऊन आणि सर्व विसरून जाण्यासाठी मद्यपान किंवा अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आपल्या समस्यांपासून पळ काढणे फार सोपे आहे.  पण हे तात्पुरते उपाय फार उपयुक्त नसतात. आणि समस्या पुन्हा उद्भवतेच. धर्माबाबत प्रामाणिक चिंतन केल्याने आणि ध्यानधारणेमुळे आपली स्वतःकडे, इतरांकडे आणि आपल्या अनुभवांकडे पाहण्याची दृष्टी अंर्तबाह्य बदलते.  अर्थात यामुळे आपल्या सर्व समस्या एका क्षणात अदृष्य होतील असे नाही, तर त्यातून आपल्याला समस्यांना खंबीरपणे तोंड देण्याची क्षमता प्राप्त होते आणि त्या ज्ञानातून आपण समस्यांचा सामना करण्यायोग्य बनतो. 

Top