बौद्ध मार्गावर मार्गस्थ होण्यापूर्वी सल्ला

दैनंदिन जीवनातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक संरक्षणात्मक उपायांची शिकवण बौद्ध धर्मात दिली गेली आहे. बौद्ध धर्म आपले वैचारिक भ्रम आणि भावनिक तणाव आणि बंधनकारक वर्तनाला कारणीभूत असणाऱ्या अवास्तव दृष्टिकोनात समस्यांच्या स्रोताचा शोध घेतो. ध्यानधारणेच्या माध्यमातून अकार्यक्षम विचार आणि कृतींवर मात करता येते, तर अधिक प्रेमळ आणि सकारात्मक व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन, आपले जीवनमान सुधारण्यासोबतच मानसिक परिवर्तनही शक्य आहे.

जर आपण बौद्ध धर्म आणि दैनंदिन जीवनातील त्याच्या उपयुक्ततेच्या परिपूर्ण ज्ञानाच्या आकलनासाठी उत्सुक असू, तर बौद्ध शिकवण आणि पद्धतींसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘धर्म’ संकल्पनेकडे पाहायला हवे. ‘धर्म’ या संस्कृत शब्दाचा अर्थ ‘निवारणात्मक उपाय’ हा आहे. समस्या दूर ठेवण्यासाठी आपण याचा अवलंब करतो. एकदा आपण ही संकल्पना समजून घेतली की बुद्धाच्या सर्व शिकवणीमागील उद्दिष्टांचेही ज्ञान होते. 

निवारणात्मक उपायांमध्ये रूची उत्पन्न होण्यासाठी आपल्याला जीवनातील समस्यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी मोठे धैर्य लागते. अनेक लोक स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे गांभीर्याने पाहत नाहीत. ते दिवसभर काबाड कष्ट करतात आणि थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी विरंगुळा म्हणून मनोरंजनाकडे वळतात. ते त्यांच्या जीवनातील समस्यांकडे अंतर्मुख होऊन खरेच पाहत नाहीत. जरी त्यांनी आपल्या समस्यांकडे पाहिले आणि ते असमाधानकारक असल्याचे जाणवले तरी त्यांना निराशा येण्याच्या भीतीने ती जाणीव नकोशी असते. आपल्या जीवनाचा दर्जा तपासण्यासाठी आणि जीवन असमाधानकारक असल्याचे प्रामाणिकपणे मान्य करण्यासाठी खरंच धैर्य लागते.  

असमाधानकारक स्थिती आणि त्याची कारणे

आपल्या जीवनात असमाधानाचे स्तर असतात. आपण म्हणू शकतो की, ‘कधीकधी माझी मनोवस्था खराब असते, तर काही वेळा गोष्टी सुरळीत पार पडतात, पण काही हरकत नाही. तेच जीवन आहे.’ जर त्या स्थितीत आपण समाधानी असू, तर ते ठीकच आहे. जर आपल्याला आशा असेल की आपण गोष्टी आणखी चांगल्या पद्धतीने करणे शक्य आहे, तर त्यातून आपल्याला तसे करण्याचा मार्गही गवसू शकतो. आपले जीवनमान सुधारणाऱ्या पद्धती शोधायच्या असतील, तर प्रथम आपल्याला आपल्या समस्यांचे मूळ शोधावे लागेल. अनेक लोक आपल्या समस्यांचे मूळ बाह्य स्रोतांमध्ये शोधतात. ‘आपल्या नात्यांमध्ये समस्या निर्माण होत आहेत. त्याचे कारण तूच आहेस. तू माझ्या इच्छेप्रमाणे वागत नाहीस.’ आपण आपल्या समस्यांसाठी राजकीय किंवा आर्थिक परिस्थितीलाही दोषी धरू शकतो. आपल्या दुःखांचा इतरांवर दोष थोपवणे फार सोपे असते. पण इतरांवर किंवा सामाजिक व आर्थिक स्थितीला दोष देण्याने समस्यांवर उत्तर गवसत नाही.  जर आपला असा समज असेल की आपण क्षमाशीलतेने वागल्यास आपल्याला थोडा लाभ होईल. पण अनेक लोक अनुभवतात की फक्त तसे वागल्याने त्यांच्या मानसिक समस्या आणि असमाधानातून त्यांची मुक्तता होत नाही. 

बौद्ध धर्म सांगतो की इतर लोक, समाज आणि इतर गोष्टी आपल्या जीवनातील समस्यांना कारणीभूत असल्या तरी त्या गोष्टी आपल्या समस्यांचा खरा स्रोत नसतात. आपल्या समस्यांचा स्रोत शोधण्यासाठी आपल्या अंतर्मनातच शोध घ्यावा लागतो. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतात. आपण थोडेसे स्वतःत डोकावले तरी आपण पाहू शकतो की आपण एकाच परिस्थितीबाबच निरनिराळ्या दिवशी निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त होतो. जर समस्यांचा स्रोत बाहेर असता, तर आपण सर्वकाळ एकसारखेच व्यक्त झालो असतो, पण तसे होत नाही. काही असे घटक असतात, जे आपण कसे व्यक्त होऊ यावर परिणाम करतात. जसे कामाच्या ठिकाणी दिवस चांगला गेला की नाही, पण हे सर्व वरवरचे घटक असतात. ते फार सखोल नसतात. 

सखोल निरीक्षण केल्यास, आपण पाहू शकतो की आपला जीवनाप्रति, स्वतःप्रति आणि आपल्या परिस्थितीप्रति दृष्टिकोन आपल्या भावनांवर फार परिणामकारक असतो. उदाहरणार्थ, आपला दिवस चांगला व्यतीत होत असेल तर आपल्याला स्वतःबाबत फार दुःखी वाटत नाही; पण तेच आपला दिवस खराब गेला तर ती स्व-सहानुभूतीची भावना पुन्हा पुन्हा उत्पन्न होत राहते. आपला जीवनाप्रति असलेला मूलभूत दृष्टिकोन आपल्या जीवनातील अनुभवांना आकार देत असतो. जर आपण आणखी सखोल निरीक्षण केले तर, आपल्याला जाणवू शकते की आपला दृष्टिकोन भ्रमावर आधारलेला असतो.  

भ्रम, समस्यांचे मूळ कारण

भ्रमाचे विवेचन केल्यास, आपण पाहू शकतो की आपल्या स्वभावविषयक कार्य-कारणभावाविषयीचा भ्रम हाही एक घटक असतो. आपण काय करावे किंवा बोलावे आणि त्याचा परिणाम काय होईल, याबाबत संभ्रमित असतो. आपण कोणती नोकरी करावी, लग्न करावे की नाही, संतती जन्माला घालावी की नाही, अशा गोष्टींबाबतही आपल्याला फार भ्रम असू शकतात. आपण एखाद्या नातेसंबंधात बांधले जाऊ, तर त्याचा परिणाम काय होईल? आपल्याला माहीत नसते. आपल्या निर्णयांचे काय परिणाम होतील, याबाबतचे आपले विचार निव्वळ कल्पना असतात, ज्या आपल्या इच्छा किंवा भीती किंवा मानसिक विकृतीवर आधारलेल्या असतात. कदाचित आपण विचार करू की एखाद्या विशिष्ट व्यक्तीसोबत आपलं दृढ नातं जुळलं तर उर्वरित आयुष्य आपण एखाद्या परिकथेसारखं छान घालवू. किंवा कदाचित आपल्याला भीतीही वाटेल की ती व्यक्ती आपल्याला धोका देईल आणि म्हणून आपण त्यांच्यापासून भावनिक अंतर ठेवून वागतो. आपण एखाद्या परिस्थितीत निराश असू तर आपल्याला वाटते की दुसऱ्यावर आरडाओरड केल्याने आपल्याला बरे वाटेल. आपल्या वागण्याबोलण्यावर दुसरी व्यक्ती कशी व्यक्त होईल, याबाबत आपल्याला फार भ्रम असतात. आपल्याला वाटते की आपण आरडाओरड केली , स्वतःच्या मनातले सगळे बोललो, तर आपल्याला बरे वाटेल आणि सगळं सुरळित होईल. पण सर्व सुरळित होणार नाही. नक्की काय होईल, हे आपल्याला जाणून घेण्याची गरज वाटते. म्हणून आपण उत्सुकतेने ज्योतिषशास्त्राकडे किंवा ‘द बुक ऑफ चेंजेस, द आय चिंग’ सारख्या पुस्तकांकडे वळतो. आपण अशा गोष्टी का करतो? कारण जे काही घडेल त्यावर आपल्याला नियंत्रण हवं असतं.     

बौद्ध धर्म सांगतो की सर्वात गहन भ्रम हा आपले अस्तित्व, इतरांचे अस्तित्व आणि जगाचे अस्तित्व याबाबतचा भ्रम असतो. आपण नियंत्रणासंबंधी संपूर्ण विषयाबाबत भ्रमित अवस्थेत असतो. आपल्याला वाटते की आपल्या बाबतीत जे काही घडते, त्याचे पूर्ण नियंत्रण आपल्याकडे ठेवणे शक्य आहे. उदाहरणार्थ, आपल्याला वाटू शकते की आपण आपला संगणक इतर कुणाला वापरायला दिला नाही तर तो कधीच खराब होणार नाही. त्यामुळे गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत, तेव्हा आपण वैतागतो. प्रत्येक गोष्टीवर आपले कायमस्वरूपी नियंत्रण शक्य नसते. ते वास्तव नसते. वास्तव गुंतागुंतीचे असते. एखाद्या घटनेला अनेक गोष्टी जबाबदार असतात, फक्त आपलीच कृती जबाबदार नसते. आपण बाह्य शक्तींच्या पूर्णपणे नियंत्रणात आहोत किंवा बाह्य शक्तींच्या बिलकूल नियंत्रणात नाही, असे काही नसते. घडणाऱ्या गोष्टींमध्ये आपले योगदान निश्चितच असते, पण जे घडते त्यासाठी जबाबदार असणारा आपण एकमात्र घटक नसतो. 

आपल्या भ्रमित अवस्थेमुळे आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे आपण अनेकदा विनाशकारी पद्धतीने वागत असतो, आणि ते वागणे विनाशकारी असल्याची आपल्याला जाणीवही नसते. असे घडण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या तणावदायी भावना, तणावदायी दृष्टिकोन आणि बंधनकारक वर्तनाच्या प्रभावाखाली वागत असतो. आपण फक्त इतरांसाठीच विनाशकारी ठरेल असे वागत नाही, तर प्राथमिकतः आपण आत्मघातकी मार्गाने वागत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास आपण स्वतःसाठी अधिक समस्या निर्माण करतो. जर आपल्याला समस्या कमी करायच्या असतील किंवा समस्यांतून मुक्ती मिळवायची असेल आणि त्याही पुढे जाऊन इतरांना मदत करण्याची क्षमता विकसित करायची असल्यास, आपण आपल्या कमतरतांचा स्रोत शोधायला हवा. 

भ्रमापासून मुक्ती

मान्य करू की आपण आपल्या समस्यांचे मूळ कारण आपला भ्रम असल्याचे ओळखले आहे. ते तसे फार कठीणही नाही. अनेक लोक हे सांगण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचतात की, ‘मी फारच गोंधळलेलो आहे. सगळी गडबड होऊन बसलीय.’ मग पुढे काय? यातून मुक्ती मिळवण्यासाठी एखाद्या कोर्सला प्रवेश मिळवण्यापूर्वी किंवा एखाद्या एकांतवासाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्याला गांभीर्याने विचार करायला हवा की आपण खरेच आपल्या भ्रमातून मुक्ती मिळवण्याबाबत आश्वस्त आहोत की नाही. त्यासाठी आपण कोणते प्रयत्न करत आहोत? आपण फक्त या आशेवर हे म्हणत असू की आपल्याला भ्रमातून मुक्ती मिळवणे शक्य आहे, तर ती भावना फार स्थिर नसते, ती फक्त आपली मनोकामना असते. 

कदाचित आपण असाही विचार करू की मुक्ती अनेक मार्गांनी मिळवणे शक्य आहे. कुणीतरी आपला तारणहार ठरेल, असेही आपल्याला वाटू शकते. ती देवासारखी एखादी सर्वोच्च दैवी शक्ती असू शकते आणि या प्रकारे एका आस्तिकाच्या रूपात आपला पुनर्जन्म होतो. पर्यायाने आपण एखाद्या आध्यात्मिक गुरूचा शोध घेऊ किंवा एखाद्या अशा सहकाऱ्याचा शोध घेऊ, जो आपला भ्रमापासून बचाव करेल. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहणे सहजसोपे वाटू शकते, जेणेकरून आपण बाळबोध वागलो तरी चालेल. आपण कायमच अशा व्यक्तीच्या शोधात आतुरलेले असतो, जी आपला बचाव करेल, पण अशा वेळी आपला विवेक जागृत नसतो की आपण कशा प्रकारच्या व्यक्तीची निवड करत आहोत. आपण कदाचित अशा व्यक्तीची निवड करू शकतो, जो स्वतःच भ्रमातून मुक्त झालेला नाही.  आणि तो त्याच्या स्वतःच्या तणावदायी भावना आणि दृष्टिकोनामुळे आपल्या त्याच्यावर अवलंबून असण्याचा गैरफायदा घेत आहे.  हा मार्गक्रमणाचा योग्य मार्ग नाही.  भ्रमातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण असा आध्यात्मिक गुरू किंवा सोबत शोधून फायदा नाही.  आपण स्वतःच स्वतःचा भ्रम दूर करायला हवा. 

आध्यात्मिक गुरू किंवा एखाद्या सोबतीची सोबत तेव्हाच पूरक वातावरण निर्माण करू शकते, जेव्हा ते नाते आरोग्यदायी असते. जेव्हा ते नाते अहितकारी असते, तेव्हा परिस्थिती आणखी बिकट होते. ती आणखी भ्रम निर्माण करते. सुरुवातीला आपला आध्यात्मिक गुरू किंवा सोबती योग्य असल्याचे समजून आपण हे बिलकूल स्वीकार करायला तयार होणार नाही, पण कालांतराने हा भोळेपणाचा पडदा निसटू लागतो. जेव्हा आपण समोरच्या माणसामध्ये कमतरता पाहू लागतो,  आणि ही व्यक्ती आपला बचाव करू शकत नाही, याची जाणीव होते, तेव्हा आपण उध्वस्त होतो. आपण फसवले गेल्याची भावना येते. आपली श्रद्धा आणि विश्वासाला तडा जातो. ती फारच भयंकर गोष्ट असते. त्यामुळे सुरुवातीपासूनच ते टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्याला बचावात्मक पर्यायांचा विचार करण्याची गरज असते. आपल्याला याची जाणीव असायला हवी की काय शक्य आहे किंवा काय नाही. आध्यात्मिक गुरू काय करू शकतो किंवा काय नाही? आपण उध्वस्त होऊ नये यासाठी बचावात्मक उपायांची गरज असते. 

आपण भ्रमापासून मुक्त असणारी मनोवस्था विकसित करायला हवी. भ्रमितावस्थेच्या विरुद्ध ज्ञानाची अवस्था असते, जी भ्रमाला थोपवते. बौद्ध धर्मविषयक आकलन करत असताना आपण आत्मविश्लेषण करणे आवश्यक असते आणि आपला दृष्टिकोन, आपल्या तणावदायी भावना, आपले बंधनकारक, आवेगपूर्ण आणि विक्षिप्त वर्तन याबाबत लक्ष केंद्रित करायला हवे. याचा अर्थ आपल्यातील ज्या गोष्टी फारशा चांगल्या नाहीत, त्यांना नाकारण्यापेक्षा त्यांच्याकडे डोळसपणे पाहायला हवे. जेव्हा आपण आपल्या समस्यांचे मूळ कारण असणाऱ्या प्रवृत्ती समजून घेऊ, तेव्हा त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचा प्रतिकार करू शकणाऱ्या मनोभावना लागू करून पाहायला हव्यात. हे सर्व अध्ययन आणि ध्यानधारणेच्या आधारे करणे शक्य आहे. आपण तणावदायी भावना आणि दृष्टिकोनांसोबतच ते कोठून उत्पन्न होतात, हे समजून घेणे आवश्यक आहे.   

ध्यानधारणा

ध्यानधारणा म्हणजे आपण नियंत्रित मनोवस्थेत प्रतिकारक घटकांना लागू करण्याचा सराव करतो जेणेकरून प्रत्यक्ष जीवनात आपण ते लागू करू शकू. उदाहरणार्थ, जसे इतरांनी आपल्या मनासारखे वर्तन न केल्यास आपण त्यांच्यावर रागवतो, ध्यानधारणेच्या अवस्थेत आपण या स्थितीचा विचार करतो आणि अनेक दृष्टिकोनातून आणि अनेक अंगांनी त्याचा आढावा घेतो. समोरची व्यक्ती अनेक न पटण्याजोग्या कारणांमुळे तशी वागलेली असू शकते. त्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम नाही म्हणूनच ती तशी वागली असण्याची गरज नाही. ध्यानधारणेत आपण अशा प्रकारच्या दृष्टिकोनांमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतो की जसे: ‘माझा मित्र किंवा मैत्रीण माझ्यावर आता प्रेम करत नाही कारण त्याने किंवा तिने मला फोनच केलेला नाही.’

आपण जर अशी स्थिती अधिक तणावरहित मनोवस्थेत, सजगपणे आणि संयमीपणाने हाताळण्याचा सराव केला तर समोरच्या व्यक्तीने आठवडाभर फोन नाही केला तरी आपण निराश होत नाही. जेव्हा आपण निराश होऊ लागतो, तेव्हाही आपल्या मनात असाही विचार येईल की ती व्यक्ती किती व्यग्र असते आणि आपणच त्या व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वपूर्ण व्यक्ती असायला हवे, असा विचार अहंभावी ठरेल. असे वागणे  आपल्याला भावनिक निराशा दूर करण्यासाठी मदतगार ठरेल.  

बौद्ध साधना पूर्णवेळ व्यवहार आहे

बौद्ध साधना हा काही छंद नाही. हे काही एखाद्या खेळासारखं किंवा तणावमुक्तीच्या साधनांसारखं नाही. बौद्ध साधना पूर्णवेळ काम आहे. इथे आपली जबाबदारी असते की आपण आपल्या प्रत्येक जीवनविषयक घटकाबाबतच्या दृष्टिकोनावर काम करावे. जर आपण सर्व प्राणिमात्रांप्रति प्रेम विकसित करण्याच्या प्रयत्नात असू तर ते आधी आपल्या कुटुंबाबाबत अमलात आणायला हवे. अनेक लोक आपल्या खोलीत बसून प्रेमासंबंधीची ध्यानधारणा करतात, पण त्यांचे आपल्या पालकांसोबत किंवा आपल्या सहचरासोबत पटत नाही. हे फारच दुःखदायक गोष्ट आहे. 

अतिरेक टाळणे

बौद्ध शिकवणीला आपल्या जीवनात अर्थात आपल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी लागू करताना अतिरेक टाळण्याची गरज असते. अतिरेकाचं एक टोक म्हणजे सर्व दोष दुसऱ्यावर टाकणे. आणि दुसरं टोक म्हणजे सर्व दोष स्वतःवर घेणे. आयुष्यात जे घडते फारच गुंतागुंतीचे असते. यात दोन्ही पक्ष जबाबदार असतात: इतरही जबाबदार असतात; आपणही जबाबदार असतो. आपण दुसऱ्यांचे वर्तन आणि त्यांचा दृष्टिकोन बदलावा यासाठी प्रयत्न करतो, पण आपल्याला स्वतःच्या अनुभवातून माहीत असते की हे तितके सोपे नसते, विशेषतः जेव्हा आपण स्वतःला नीतिमान समजून इतरांना दोषी ठरवत असतो. स्वतःला बदलणे फार सोपे असते. अर्थात समोरची व्यक्ती स्वागतशील असेल आणि आपल्या सल्ल्याने ती अधिक आक्रमक होणार नसेल तर आपण त्याला सल्ला देऊ शकतो, पण तरीही मुख्य काम हे स्वतःत सुधारणा घडवण्याचेच असते. 

स्वतःत सुधारणा घडवत असताना अतिरेकाच्या आणखी दोन पैलूंवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते: आपण सतत आपल्या भावनांनी व्यापलेले असू नये किंवा आपल्या भावनांविषयी अगदी अनभिज्ञही राहू नये. पहिली स्थिती आत्मप्रौढीने व्यापलेल्या मनोवस्थेची आहे. आपण केवळ आपल्या भावनांची काळजी करतो. इतरांना काय वाटते याकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटत राहते की आपल्या भावना इतरांच्या भावनांहून फार महत्त्वाच्या आहेत.   दुसऱ्या बाजूस असेही असू शकते की आपल्याला आपल्या भावनांची अजिबातच जाणीव नसेल आणि आपल्यात कसलीच जाणीव शिल्लक नसेल, जणू आपल्या भावनांना नोवाकेन औषधाने चेतनाशून्य केले असावे. अशा रीतीने अतिरेक टाळण्यासाठी मानसिक संतुलनाची आवश्यकता असते. हे काही सोपे काम नसते. 

इतरांसोबत असताना आपण कायम स्वतःच्या वागण्याकडे लक्ष देत राहिलो तर त्यातून एक काल्पनिक द्विधावस्था निर्माण होते - आपण स्वतः आणि आपल्या भावना- आणि त्यातून आपण इतरांशी जोडले जाऊ शकत नाही आणि इतरांसोबतही असत नाही. आपले लक्ष आपल्या प्रेरणा आणि दृष्टिकोनावर केंद्रित करत असतानाच नैसर्गिक आणि प्रामाणिक मार्गाने वर्तन करणे ही खरी कला आहे. आपल्याला असे वागण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा नाहीतर इतरांना वाटेल की आपण त्यांच्यासोबत असलो तरी मनाने तिथे नाही. जर इतरांसोबत असतानाही आपण आपल्या प्रेरणा आणि दृष्टिकोनांवर लक्ष केंद्रित करत असू तर काही वेळा समोरच्या व्यक्तीला त्याबाबत सांगणेही फायदेशीर ठरू शकते. पण त्याला हे सांगताना आपल्याला आपण आत्मप्रौढीने बोलत आहोत, असेही वाटू शकते. अनेकदा आपल्या भावनांशी इतरांना काही घेणेदेणे नसते. आपल्याला काय वाटते ते जाणून घ्यायची त्यांना इच्छा असेल, अशी भावना असणेही स्वतःला अति महत्त्व दिल्यासारखे वाटू शकते. जेव्हा आपल्या लक्षात येते की आपण स्वार्थीपणे वागत आहोत, तेव्हा स्वतःला तात्काळ थांबवायला हवे. आणि त्याची घोषणाबाजी करायची गरज नसते. 

अतिरेकी विचारांची आणखी दोन टोके म्हणजे आपण सर्वच फार वाईट आहोत किंवा आपण सर्वच चांगले आहोत, अशी भावना. आपल्या समस्या, प्रश्न आणि तणावदायी भावनांवर अति भर दिल्यास आपल्याला आपण फार वाईट व्यक्ती आहोत, असे वाटू शकते. ते फार सहजगत्या अपराधी वाटण्यात रुपांतरित होऊ शकते. ‘मी साधना करायला हवी. मी केली नाही, तर मी फारच वाईट व्यक्ती आहे.’ अशा धाटणीचा अपराधी विचार साधनेसाठीचा  फारच कमकुवत आधार ठरेल.  

आपल्याला इतर अतिरेकही टाळण्याची गरज असते, अर्थात सकारात्मक बाजुंवर अतिरिक्त भर देणे. ‘आपण सर्व जण परिपूर्ण आहोत. आपण सर्व बुद्ध आहोत. सर्व छान आहे.’ हे घातक असते, कारण अशा विचारामुळे आपल्याला कशाचाच त्याग करायची गरज नाही, असे वाटू शकते. आपल्यातील नकारात्मक गोष्टी थांबवण्याची गरज नाही असे वाटू शकते कारण आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी पाहायच्या असतात. ‘मी छान आहे. मी परिपूर्ण आहे. मी माझे नकारात्मक वर्तन थांबवण्याची गरज नाही. मी आधीपासूनच बुद्ध आहे.’ आपल्याला संतुलनाची गरज असते. आपल्याला स्वतःबद्दल विश्वास वाटत नसेल तर स्वतःला आठवण करून द्यायला हवी की आपल्या कमतरतांवर मात करून बुद्ध होण्याची आपल्यात क्षमता आहे. आपल्याला फार कंटाळवाणे वाटत असेल तर आपल्यातील नकारात्मक गोष्टींची स्वतःला जाणीव करून देण्याची आवश्यकता असते.  

जबाबदारी घेणे

मूलतः आपल्या विकासाची आणि समस्यांपासून मुक्ती मिळवण्याची आपण स्वतः जबाबदारी घ्यायला हवी. आपल्याला मदतीची अर्थातच गरज भासते. स्वतःच्या बळावर हे साध्य करणे तसे सोपे नाही. एखाद्या आध्यात्मिक गुरूंकडून मदत मिळू शकते, किंवा आपल्यासारखेच लोक, जे स्वतःत सुधारणा घडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि स्वतःच्या समस्यांसाठी इतरांना दोषी धरत नाहीत, अशा लोकांच्या समुदायाकडून मदत मिळू शकते. म्हणूनच साहचर्यामध्ये कोणतीही समस्या उद्भवली की एकमेकांवर दोषारोप न करण्याचा दोघांमध्ये एक सारखा दृष्टिकोन असणे महत्त्वाचे असते.  दोन्ही जोडीदार एकमेकांवर दोषारोप करत असतील तर ते नाते टिकणार नाही. जर एखादा जोडीदार स्वतःत सुधारणा घडवण्यासाठी स्वतःवर काम करत असेल आणि दुसरा फक्त दोष देत असेल तर ते ही फायद्याचे नाही. जर आपण आधीपासूनच अशा नातेसंबंधात गुंतलेले असू, जिथे आपला जोडीदार दोष देत राहतो, पण आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असू, तर त्याचा अर्थ असा नाही की आपण नाते तोडून टाकावे. असे नातेसंबंध टिकवणे फारच कठीण असते. अशा नात्यात आपण शहीद होण्याचेही टाळायला हवे. ‘मी हे नाते जपण्याचा प्रयत्न करत आहे. हे फारच कठीण आहे.’ असे करणेही वेडसरपणाचे ठरेल.  

प्रेरणा मिळवणे

बौद्ध मार्ग फार सोपा नाही. या मार्गावर जीवनातील कुरूपतेचा सामना करावा लागतो. आपणास पुढे जात राहण्यासाठी एक प्रकारच्या शक्तीची गरज असते. प्रेरणेचा स्थिर स्रोत आवश्यक असतो. जर स्वतःविषयी किंवा बौद्ध इतिहासातील महापुरुषांविषयी चमत्कारिक, कल्पनारम्य गोष्टी सांगणारे प्रशिक्षिक आपला प्रेरणास्रोत असतील, तर तो काही फार स्थिर प्रेरणास्रोत नाही. ते औत्सुक्यपूर्ण असू शकते, पण त्याचा आपल्यावर नक्की काय परिणाम होत आहे, ते तपासून घ्यायला हवे. अशा काल्पनिक कथांमुळे अनेक लोकांच्या मनात अशा एखाद्या कल्पनाविश्वाची निर्मिती होते, ज्यात चमत्कारांच्या माध्यमातून आपण मुक्तीची अपेक्षा करतो. एखादा महान जादूगार त्याच्या जादुई शक्तीने आपलं रक्षण करणार आहे, किंवा आपण स्वतःचं अचानक तशा जादुई गोष्टी आत्मसात करू शकतो, अशी आपण कल्पना करायला लागतो. आपण अशा अति काल्पनिक गोष्टींविषयी सावध राहणे आवश्यक असते. त्यांच्यामुळे आपल्या विश्वासाला प्रेरणा मिळू शकते आणि ते फायदेशीर असू शकते, पण हा प्रेरणेचा चिरस्थायी स्रोत नाही. आपल्याला स्थायी स्रोताची गरज आहे. 

बुद्धाचे स्वतःचे उदाहरण परिपूर्ण उदाहरण आहे. बुद्धाने कधीही कल्पनारम्य गोष्टी सांगून लोकांना ‘प्रेरित’ किंवा प्रभावित केले नाही. त्यांनी लोकांमध्ये हिंडून फिरून आशीर्वाद देत स्वतःतल्या क्षमता सिद्ध केल्या नाहीत. बुद्धाच्या शिकवणीमध्ये एक समानता होती, बौद्ध शिकवणीत  ज्याची वारंवार पुनरावृत्ती करण्यात आली, ती म्हणजे बुद्धत्व प्राप्त व्यक्ती सूर्यासारखी असते. सूर्य लोकांना उब द्यायचा प्रयत्न करत नाही. आपल्या प्रकृतीनुसार तो स्वाभाविकरीत्या प्रत्येकाला ऊर्जा बहाल करतो. अर्थात अद्भुत गोष्टी ऐकून किंवा पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन किंवा गळ्याभोवती गुंडाळायला लाल धागा मिळाल्याने आपल्याला उत्साही वाटू शकते, पण ते वाटणे स्थायी नसते. प्रेरणेचा चिरस्थायी स्रोत तो आहे, ज्यात गुरू आपल्या सहज स्वाभाविक रूपात कसा आहे- त्याचे चरित्र कसे आहे, बौद्ध अभ्यासातून घडलेले त्याचे रूप कसे आहे, हे महत्त्वाचे असते. तेच प्रेरणादायी असते, आपले मनोरंजन करण्यासाठी चमत्कारिक गोष्टी करण्यामध्ये प्रेरणा नसते. अर्थात अद्भुत कल्पनारम्य गोष्टीसारखे ते रोचक नसेल, पण ते प्रेरणेचा चिरस्थायी स्रोत असते.  

आपली प्रगती होईल, तसे आपल्याला आपल्या प्रगतीतूनही प्रेरणा मिळेल. एखाद्या अद्भुत शक्तीच्या रूपात नव्हे तर आपल्या व्यक्तिमत्त्वात घडलेल्या बदलांमधून आपल्याला प्रेरणा मिळू शकते. शिकवणींमध्ये नेहमी आपल्या सकारात्मक कार्यांकडे पाहून आनंदित होण्यावर भर दिला जातो. हे समजणे फार महत्त्वाचे असते की प्रगती कधीच एकरेषीय नसते. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तिच्यात आपोआप सुधारणा होत नाही. जीवनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे वारंवार उत्पन्न होणाऱ्या अनियंत्रित समस्यांपासून जोवर आपण कायमचे मुक्त होत नाही, जी एक अद्ययावत अविश्वसनीय स्थिती असते,  तोपर्यंत आपल्या मनोवस्थेत सतत चढउतार होत असतात. आपल्याला हे मान्य करायला हवे की कधी आपली मनोवस्था चांगली असेल तर कधी वाईट असेल. आपण कधीकधी सकारात्मक मार्गांनी कार्य करण्यास सक्षम असू तर इतर वेळी आपल्या वेडसर सवयी आपल्यावर हावी होतील.  त्यामुळे चढउतार कायम असतीलच, सामान्यतः चमत्कार होत नसतात.  

जीवनातील आठ क्षणभंगुर गोष्टींमुळे निर्माण होणाऱ्या तणावापासून दूर राहण्यासाठी दिलेल्या शिकवणीत या गोष्टीवर भर दिलेला आहे की गोष्टी मनासारख्या घडत गेल्या तर गर्वाने फुगून जाऊ नये आणि गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत तर निराशही होऊ नये. यालाच जीवन म्हणतात.  आपल्याला दीर्घकालीन परिणामांकडे पाहायचे आहे, अल्पकालीन परिणामांकडे नाही. उदाहरणार्थ जर आपण पाच वर्षे साधना करत असू तर आपल्या लक्षात येईल की पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत आपण अधिक प्रगती केली आहे.  आपण कधीकधी निराश झालोच तर आपल्या लक्षात येईल की आपण मन आणि मेंदू शांत ठेवून परिस्थिती हाताळू शकतो, हे आपल्या प्रगतीचे लक्षण असेल. हे प्रेरणादायी आहे. हे नाटकी नाही, जरी ते नाटकीय रूपाने उत्पन्न व्हावे असे आपल्याला वाटत असले तरी. ही चिरस्थायी प्रेरणा आहे. 

व्यावहारिक दृष्टिकोन 

आपण व्यावहारिक आणि वास्तववादी दृष्टिकोन बाळगण्याची गरज असते. उदाहरणार्थ जर आपण शुद्धिकरण प्रक्रिया करत असू, तर आपण असा विचार करू नये की एखादी बाह्य व्यक्ती, महान संत आपल्याला आपल्या पापांबद्दल क्षमा करत आहे. बौद्ध धर्मात अशा महान संतांची संज्ञा नाही, जे आपले रक्षण करतील आणि आपल्याला शुद्धिकरणाचा आशीर्वाद देतील. ही अशी प्रक्रिया नक्कीच नाही.  आपल्याला नक्की कोणती गोष्ट शुद्ध करत असेल तर ती म्हणजे ‘आपले मन निसर्गतः शुद्ध आहे’ ही जाणीव. आपले मन स्वभावतः शुद्ध आहे, ते स्वभावतः भ्रमाने बाधलेले नाही आणि भ्रम दूर करणे शक्य आहे. आपल्या मनाचे शुद्धत्व ओळखून आपण दोष आणि नकारात्मक शक्तींपासून प्रयत्नपूर्वक मुक्त होऊ शकतो. अशा रीतीने आपण शुद्धिकरणाची प्रक्रिया प्रभावशील करू शकतो. 

पुढे जाऊन या सर्व साधना आत्मसात करून, बौद्ध शिकवणीचा दैनंदिन जीवनात समावेश करत असताना आपल्याला जाणीव असायला हवी की आपण बौद्ध शिकवणीच्या नक्की कोणत्या टप्प्यात आहोत. आपण उच्च पातळीवर असल्याचा भ्रम बाळगून वर्तमान अवस्थेहून उच्च पातळीवर असायला हवे होते, अशी अपेक्षा बाळगू नये, हे महत्त्वाचे आहे. 

ख्रिश्चन पार्श्वभूमीतून बौद्ध धर्माचे आकलन 

बौद्ध धर्मात रस असणारे काही लोक ख्रिश्चन पार्श्वभूमीचेही असू शकतात. तसे असेल तर, जेव्हा आपण बौद्ध धर्माचा अभ्यास सुरू करतो तेव्हा असा विचार करायची गरज नाही की आपल्याला ख्रिश्चन धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारावा लागेल. पण या दोन्ही धर्मांच्या साधना पद्धतींची सरमिसळ करू नये. चर्चमध्ये बसण्यापूर्वी आपण अल्ताराला तीन वेळा नमस्कार करून बसत नाही. तसेच जेव्हा आपण बौद्ध साधना करतो तेव्हा आपण व्हर्जिन मेरीचे स्मरण करत नाही, तर भगवान बुद्धाचे स्मरण करतो. आपण दोन्ही साधना वेगवेगळ्या ढंगात करत असतो. जेव्हा आपण चर्चमध्ये जातो, तेव्हा चर्चमध्येत जातो; जेव्हा आपण बौद्ध साधना करतो, तेव्हा आपण बौद्ध साधनाच करतो. 

दोन्ही धर्मसाधनात प्रेम, इतरांना मदत असे अनेक समान दुवे आहेत. मूलभूत पातळीवर दोन्हीत तफावत नाही. जर आपण प्रेम, धर्मादाय आणि इतरांना मदतीचे तत्त्व पाळत असू तर याचा अर्थ आपण चांगले ख्रिश्चनही आहोत आणि चांगले बौद्धही आहोत. पण कालांतराने आपल्याला निर्णय घ्यावा लागतो, पण ते ही तेव्हा, जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी आपले सर्वस्व वेचण्यास सज्ज असतो. जर आपल्याला इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पोहचायचे असेल तर आपल्याला एकाच वेळी दोन जिन्यांवरून जाता येणार नाही. ही एक चांगली प्रतिमा आहे. जर आपण फक्त मूलभूत पातळीवर खालच्या मजल्यावर लाॅबीमध्येच कार्यरत आहोत, तर आपल्याला काळजी करायची गरज नाही. आपल्याला दोन्हीचा फायदा होईल. 

अनुचित निष्ठेपासून बचाव

बौद्ध धर्माचा अंगीकार करताना आपल्या मूळ धर्माला तुच्छ किंवा वाईट समजून त्याची उपेक्षा केली जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज असते. तसे झाल्यास ती गंभीर चूक ठरेल. तसे झाल्यास आपण कट्टरपंथी बौद्ध किंवा कट्टर ख्रिश्चनविरोधी होऊ शकतो. उदाहरणार्थ, लोक साम्यवाद आणि लोकशाहीबाबत तसे वागताना आढळतात. अशा स्थितीत अनुचित निष्ठेसारखी मनोवैज्ञानिक प्रक्रिया आपल्यावर ताबा मिळवते. आपल्या कुटुंबाप्रति, पार्श्वभूमीविषयी निष्ठा व्यक्त करण्याची एक प्रवृत्ती असते, तशाच रीतीने आपण ख्रिश्चन धर्माचा अस्वीकार केला तरी त्याबाबत निष्ठा बाळगू लागतो. आपल्या धार्मिक पार्श्वभूमीबद्दल अप्रामाणिकता दाखवल्यास आणि त्यांना वाईट समजून नाकारल्यास, आपल्याला आपणच वाईट असल्यासारखे वाटत राहते. कारण ही स्थिती पूर्णतः असमाधानकारक असते, आपल्याला अजाणतेपणी एखाद्या पार्श्वूभूमीची गरज असते, ज्यावर आपल्याला निष्ठा ठेवता येईल. 

आपल्यात अशी प्रवृत्ती असते की अजाणतेपणी आपण आपल्या पार्श्वभूमीतील एखाद्या कमी लाभकारक घटकाप्रति निष्ठावान राहतो. उदाहरणार्थ, आपण ख्रिश्चन धर्माचा अस्वीकार करू, पण आपण नरकाची तीव्र भीती बौद्ध धर्मात घेऊन येऊ शकतो. माझी एक मैत्रीण कट्टर ख्रिश्चन होती, ती नंतर कट्टर बौद्ध झाली, पण नंतर तिला अस्तित्वाचे प्रश्न जाणवू लागले, ‘मी ख्रिश्चन धर्माचा त्याग केला त्यामुळे मी आता ख्रिश्चन नरकात जाणार, पण मी बौद्ध धर्माचा त्याग करून पुन्हा ख्रिश्चन धर्मात गेले, तर मला बौद्ध नरकात जावे लागेल.’ हे जरी गमतीशीर वाटत असले तरी तिच्यासाठी ती गंभीर समस्या होती. 

आपण अजाणतेपणी आपले काही ख्रिश्चन दृष्टिकोन बौद्ध साधनेत घेऊन येतो. यात अपराधभाव, चमत्कारांची अपेक्षा आणि तारणहाराची अपेक्षा अशा घटकांचा समावेश असतो. आपण साधना करत नसू, तर आपल्याला साधना करायला हवी असे सतत वाटत राहील आणि आपण साधना केली नाही, तर अपराधी वाटू लागेल. अशा कल्पना उपयुक्त नसतात. आपण असे वागत असताना आपल्याला त्याची त्याच क्षणी जाणीव व्हायला हवी. आपण आपली पार्श्वभूमी तपासून त्यातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे, जेणेकरून आपण नकारात्मक गोष्टींऐवजी  सकारात्मक गोष्टींप्रति निष्ठा बाळगू. त्यामुळे ‘अपराधभाव आणि चमत्कारांची अपेक्षा मला परंपरेने मिळाली आहे’ असा विचार करण्याऐवजी आपण ‘मला ख्रिश्चन धर्मातील प्रेम, धर्मादाय वृत्ती आणि कमनशिबी लोकांच्या मदतीची परंपरा लाभली आहे.’ असा विचार करू शकतो. 

आपण आपल्या कुटुंबाप्रतिही असेच वागू शकतो. आपण कदाचित कुटुंबाचा त्याग करू, पण त्यांच्या सकारात्मक गोष्टींशी निष्ठावान राहण्याऐवजी अजाणतेपणी त्यांच्या नकारात्मक परंपरांशी निष्ठावान राहू. आपण काही धारणा मान्य केल्यास, जसे आपल्याला मिळालेल्या ख्रिश्चन परंपरेसाठी आपल्या पूर्वजांविषयी आदर ठेवल्यास आपण भूतकाळाविषयी किंवा आपल्या प्रगतीविषयी गैरसमजाच्या नकारात्मक भावना न ठेवता कोणत्याही तणावाविना आपण निवडलेल्या मार्गावर मार्गस्थ होऊ. 

मनोवैज्ञानिक स्तरावर या तर्काची उपयुक्ततात पडताळून पाहणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या भुतकाळाबद्दल ,  जसे आपले कुटुंब, आपला धर्म किंवा इतर गोष्टींबाबत नकारात्मकता जाणवत राहिली, तर आपल्यात स्वतःबद्दलच नकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. तर दुसरीकडे आपण आपला भूतकाळ आणि आपल्या पार्श्वभूमीतील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले, तर सकारात्मक दृष्टिकोनाकडे आपला कल वाढेल. आध्यात्मिक मार्गावर अधिक स्थिरतेच्या दिशेने प्रवास करण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. 

सारांश

आपल्याला पायरी दर पायरी हळूवार प्रगती करण्याची गरज असते. जरी पूर्वीच्या महान गुरूंनी ‘तुमच्या कानावर उपदेश पडताच, तात्काळ साधना सुरू करा’ असे सांगितले असले तरी जेव्हा तुम्ही अद्ययावत शिकवणीविषयी ऐकाल किंवा वाचाल तेव्हा ती शिकवण आपल्यासाठी अगदीच पुढील पातळीवरील तर नाही ना, याची शहानिशा करा. जर ती खरोखरच खूप अद्ययावत पातळीवरील असेल, तर आपल्याला आधी तिथेपर्यंत पोहचण्यायोग्य बनवणाऱ्या पातळ्या पारखता यायला हव्या आणि नंतर त्यांचा उपयोग करायला हवा. थोडक्यात सांगायचे तर माझे एक गुरू गेशे ग्वांग धारग्ये सांगतात, ‘आपण काल्पनिक साधना केल्यास आपल्याला अवास्तविक परिणाम अनुभवास येतील; आपण वास्तव पद्धती अवलंबल्यास आपल्याला वास्तव परिणाम अनुभवास येईल.’

Top