आपल्या सर्व अस्वस्थकारक भावना व मनोवृत्तींच्या खोल मुलाशी अजाणपणा असतो. हा अजाणपणा कार्यकारणसंबंधांविषयीचा- आपल्या वर्तानाचे परिणाम काय या विषयीचा- असेल किंवा वास्तवाविषयीचा अजाणपणा असेल. वर्तणुकीमधील कार्यकारणसंबंधांविषयी अजाणपणा विध्वंसक कृतींना व चुकीच्या कृतींना जबाबदार ठरतो, असं सर्वसाधारणतः म्हटलं जातं. परंतु, वास्तवाविषयी अजाण असणं, परिस्थितींविषयी अजाण असणं, हे रचनात्मक किंवा विध्वंसक अशा कोणत्याही प्रकारच्या सांसारिक वर्तनामध्ये अंतर्भूत असू शकतं. तर, आपल्या अस्वस्थकारक भावनांमध्ये व अस्वस्थकारक मनोवृत्तींमध्ये असलेला अजाणपणा आपल्याला पाहायचा असेल, तर आपण परिस्थितींबाबतचा अजाणपणा, वास्तवाविषयीचा अजाणपणा अशा संदर्भात त्याकडे पाहणं गरजेचं आहे.
“वास्तव” हा एक गंमतीशीर शब्द आहे. याचे अनेक विभिन्न अर्थ होऊ शकतात. सर्वसाधारणतः “सत्य” हा शब्द वापरला जातो, कशाबद्दलचं तरी सत्य, इत्यादी. कोणत्याही गोष्टीबाबत दोन सत्यं असतात. जे काही दिसतंय त्याबद्दलचं सापेक्ष, प्रचलित किंवा वरवरचं सत्य आणि एखादी गोष्टी कशी अस्तित्वात आहे त्याबद्दलचं खोलवरचं सत्य. सत्याच्या “पातळ्या”, असा शब्दप्रयोग केल्यामुळे एखादं सत्य दुसऱ्यापेक्षा जास्त खरं असतं, असं ध्वनित होत असेल, तरी तसं काही नसतं. ही दोन्ही सत्यं खरीच असतात. या दोन सत्यांपैकी दुसऱ्या सत्याबाबत “परिपूर्ण” अशी संज्ञा वापरायला मला आवडत नाही, कारण परिपूर्ण असं म्हटल्यामुळे पहिल्यापेक्षा दुसऱ्या प्रकारचं सत्य जास्त खरं असल्यासारखं वाटतं. म्हणून मी “खोलवरचं” असा शब्द वापरणं पसंत करतो. तर, एखादी गोष्ट कशी दिसते याबद्दलचं वरपांगी सत्य आणि ती वस्तू कशी अस्तित्वात आहे याबद्दलचं खोलवरचं सत्य, अशा रूपांमध्ये दोन सत्यं उपस्थित असतात.
आसक्ती म्हणजे काय?
अस्वस्थकारक भावनांसंदर्भात या दोन सत्यांकडे पाहू, म्हणजे कदाचित हे थोडं आणखी स्पष्ट होईल. आसक्ती किंवा अभिलाषा म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या गुणांची अतिशयोक्ती करणारी ही अस्वस्थकारक मनोवस्था आहे आणि तीन दोन प्रमुख प्रकारांमध्ये आविष्कृत होते. आपल्याकडे नसलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल अभिलाषा वाटते आणि “मी ते मिळवायला हवं, मी ते मिळवायलाच हवं!” अशी त्यातली भावना असते. आपल्याकडे आधीपासूनच असलेल्या गोष्टीबद्दल वाटते ती आसक्ती आणि “मी हे सोडता कामा नये!” अशी त्यातली भावना असते. एखाद्या गोष्टीच्या गुणांच्या अतिशयोक्तीवरच किंवा आपल्याला जे गुण वाटतात त्यावरच या दोन्ही मनोवस्था आधारलेल्या आहेत. तिसरा प्रकार हाव हा आहे- तोदेखील आपल्याकडे असलेल्या गोष्टीच्या संदर्भातील आहे- आपल्याला कधीच समाधानी वाटत नाही आणि सतत अधिक काही हवं असतं.
या सर्व प्रकारांमध्ये प्रत्यक्षातील वास्तवाबाबत, एखादी गोष्ट काय आहे यातील सत्याबाबत आपण अजाण असतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, एखाद्या गोष्टीचे गुण दिसतात, एवढ्यापुरतंच हे राहत नाही, तर आपण त्या गुणांची अतिशयोक्ती करतो किंवा नसलेल्या गुणांची भर घालतो. यात सर्वसाधारणपणे असं घडतं की, आपण कमतरता किंवा नकारात्मक पैलू कमी लेखतो किंवा त्यांकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. त्यामुळे खरोखरच्या चांगल्या बाबी कोणत्या आणि प्रत्यक्षातील कोणत्या तरी गोष्टीच्या दुबळ्या बाबी कोणत्या, याबद्दल आपण अजाण राहतो. उदाहरणार्थ, ही “कोणती तरी गोष्ट” म्हणजे एखादी आपल्या ओळखीची, आपल्याला आकर्षक व विलक्षण वाटणारी व्यक्ती असेल किंवा आइसक्रीमसारखी एखादी वस्तू असेल.
एखाद्या व्यक्तीबाबत आपल्याला अभिलाषा व आसक्ती वाटत असेल, तर त्या दाखल्याचा विचार करा. ती व्यक्ती किती सुंदर दिसते आणि आपल्याला आकर्षक दिसणारा कोणता गुण तिच्यात आहे, याबद्दल आपण अतिशयोक्ती करत असतो. आपण पाहिलेली ती सर्वांत आकर्षक व्यक्ती आहे, इत्यादी अतिशयोक्ती आपण करतो. त्या व्यक्तीमधील कमतरतांकडे आपण दुर्लक्ष करतो, त्या कमतरतांबद्दल आपल्याला फारसा विचारच करायचा नसतो. उदाहरणार्थ, ती व्यक्ती भुणभुण करणारी असू शकते किंवा ती विचित्र पद्धतीने खात असू शकते किंवा ती घोरत असू शकते. बरं, ती व्यक्ती खरोखरच तुलनेने चांगली दिसणारी असणं शक्य आहे आणि आपल्याला ती अतिशय चांगली दिसणारी वाटणंही शक्य आहे. हे आपण नाकारत नाही आहोत, पण हे एक वैशिष्ट्य अतिशयोक्तीने पाहिल्यामुळे अभिलाषा व आसक्ती निर्माण होते आणि आपण त्या व्यक्तीच्या कमतरतांकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या कमी लेखतो. अशा प्रकारची मनोवस्था अखेरीस आपल्याला संकटात पाडते, कारण ही ओढ कधीतरी रोडावते. मग त्या व्यक्तीच्या कमतरता बाहेर येऊ लागल्यावर आपलं प्रेम, आपली आसक्ती सहजपणे त्रस्ततेमध्ये व संतापामध्ये रूपांतरित होतं.
संताप किंवा त्रस्तता हे याच्या अगदी उलटं आहे. आपण एखाद्या गोष्टीच्या अवगुणांची, तिच्या कमतरतांची अतिशयोक्ती करतो आणि गुणांकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ, कोणी व्यक्ती स्वतःची खोली नीटनेटकी ठेवत नाही, ती अजागळ आहे, किंवा भांडी घासण्यात ती पुरेशी मदत करत नाही किंवा इतर काहीही वस्तुस्थितीआधारित बाबी आपण अवाजवी मोठ्या मानू लागतो. या बाबींची आपण प्रमाणाबाहेर अतिशयोक्ती करतो आणि संतापतो व नाराज होतो. त्याच वेळी संबंधित व्यक्तीच्या गुणांकडे आपलं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, म्हणजे ही व्यक्ती दयाळू आहे, जबाबदारी आहे, स्थिर आहे, इत्यादी चांगल्या बाबी आपण पाहत नाही. “ही व्यक्ती स्वतःचे घाणेरडे मोजे फरशीवर तसेच ठेवते हे मला सहन होत नाही”, एवढाच यातला ठळक भाग असतो. त्यामुळे आपण संतापतो.
खोलवरचं सत्य
या दाखल्यांप्रमाणेच, कोणाबद्दलच्या तरी सापेक्ष, वरपांगी सत्याबाबत- त्या व्यक्तीमधील सकारात्मक व नकारात्मक किंवा सक्षम व दुबळ्याबाबींसंदर्भात- आपण अजाण असतो, त्यातूनच आपली आसक्ती व आपला संताप निपजतात. आपल्याला त्यांच्यातले गुणावगुण माहीत नसतात किंवा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा आपण त्यांची अतिशयोक्ती करतो किंवा आपण त्याबद्दल चुकीचा समज करून घेतो. पण आपल्या आसक्तीमध्ये व संतापामध्ये खोलवरच्या पातळीवर, अशा गुणावगुणांसंदर्भातील व ते कसे अस्तित्वात आहेत यातील सत्याबद्दलचा आपला अजाणपणाही अंतर्भूत असतो.
हे आपण अतिशय व्यामिश्र, सूक्ष्म पातळीवर चर्चेला घेऊ शकतो, पण याची सोप्या पातळीवर चर्चा करणं हा आपला आजचा उद्देश आहे. ही एक व्यक्ती विशिष्ट प्रकारचं स्वतंत्र अस्तित्व म्हणून हजर असते, तिच्याभोवती एक घनरूप, मोठी रेषा आहे, असं आपल्याला वाटत असतं. प्लास्टिकच्या आच्छादनामध्ये किंवा तत्सम कशात तरी त्या व्यक्तीला गुंडाळलेलं आहे आणि असा रूपात ती आपल्या समोर आहे, दिसतेय तशीच अस्तित्वात आहे, एखाद्या छायाचित्रात असल्यासारखी गोठलेली आहे, असा आपला समज असतो. आपण त्या व्यक्तीबद्दल ठोस अस्तित्वरूप म्हणून विचार करतो, ती स्वतःमुळेच अस्तित्वात आहे, इतर कार्यकारणसंबंधांच्या अलाहिदा व प्रभावांपासून मुक्त स्वरूपात अस्तित्वात आहे, ती कधीही बदलत नाही आणि चिरस्थायी राहते, अशी आपली गैरसमजूत याच्या मुळाशी असते. हे अतिशय गोंधळवणारं आहे; त्या व्यक्तीची मनस्थिती सतत बदलती असते, त्या व्यक्तीचं शरीर सतत बदलणारं असतं, त्या व्यक्तीची भावनिक अवस्था सतत बदलती असते, यामुळे आपला समज चुकीचा ठरतो. इथे प्लास्टिकमध्ये कायमस्वरूपी गुंडाळलेल्या घनरूपासारखं काहीच नसतं.
“तू” ही काही ठोस, कायमस्वरूपी स्वतंत्र अस्तित्वरूप गोष्ट आहे, या गैरसमजुतीच्या आधारे आपण असाही विचार करू लागतो की, “तू कायम असाच होतास; तू कायम तुझे मोजे फरशीवर टाकून ठेवायचास!” ही गैरसमजूत व आपला अजाणपणा वास्तवाशी जुळणारे नसतात, त्यामुळे पलंगाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या व आपल्या त्रस्त करणाऱ्या त्या “गोष्टी”च्या अवगुणांची आपण अतिशयोक्ती करतो. ती व्यक्ती कशी अस्तित्वात आहे याबद्दलच्या आपल्या अजाणपणामुळे आपण त्या व्यक्तीच्या गुणांची अतिशयोक्ती करतो आणि तिच्याकडे वरकरणी घनरूप विलक्षण “गोष्टी”सारखं पाहतो. आपल्या या गोंधळामुळे आपण अनिवार्यपणे त्या व्यक्तीला स्पर्श करतो. आपल्याला आपले हात दूर ठेवता येत नाहीत, कारण ती व्यक्ती तितकी आकर्षक असते. आपल्याला इतकी आसक्ती वाटत असते की आपल्याला त्या व्यक्तीला दूर जाऊ द्यायचं नसतं, त्या व्यक्तीला झोपीही जाऊ द्यायचं नसतं.
तर, कोणीतरी ठोस व कायमस्वरूपी आहे, हा विचार आपण ज्या अजाणपणाद्वारे करतो त्याच्या या दोन पैलूंपासून आपण मुक्त झालो, तर अस्वस्थकारक भावना उद्भवणार नाहीत. ती व्यक्ती सतत बदलती आहे, बदलासाठी खुली आहे, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या ठोस गोष्टीसारखी नाही, हे आपल्या लक्षात येईल. हे समजून घेतल्यावर मग आपण त्या व्यक्तीमध्ये काही गुणांचा कायमस्वरूपी संच असल्याचा विचार करणार नाही, त्या गुणांची अतिशयोक्तीही कदाचित करणार नाही. त्या व्यक्तीच्या गुणवगुणांकडे पाहताना आपण खुले राहू आणि प्रत्येकामध्येच काही सकारात्मक व काही नकारात्मक बाबी असतात हे आपण समजून घेऊ. त्याची आपण अतिशयोक्तीही करणार नाही किंवा ते नाकारणारही नाही. या आधारे आपण अधिक प्रगल्भ, दयाळू व प्रेमळ मार्गाने, आणि सहिष्णूतेने, संयमाने, समजुतीने संबंध जोडू शकतो. या प्रक्रियेत आपण संबंधित वस्तूला वा व्यक्तीला कवटाळणारही नाही किंवा त्रस्तही होणार नाही.
यंत्रांविषयीची आसक्ती व संताप
टेप-रेकॉर्डरच्याबाबतीतही अगदी असंच असतं, अगदी असंच. टेप-रेकॉर्डरबद्दल आसक्ती वाटते किंवा संताप येतो, त्यामध्ये कशाचा अंतर्भाव असतो. एक, आपण त्याला मोठी घनरूप गोष्ट मानून अवाजवी महत्त्व देतो. “मी यावर बराच पैसा खर्च केला” असा विचार आपण करतो आणि ही तिथे मोठी, घनरूप रेषेमधली गोष्ट आहे, असा समज करवून घेतो. मग आपण त्या गोष्टीच्या गुणांची अतिशयोक्ती करतो, “शिकवणुकींचं रेकॉर्डिंग करण्यासाठी हा टेप-रेकॉर्डर अगदी पूर्णतः विश्वसनीय आहे” असं म्हणतो आणि त्याच्यावर अवलंबून राहू लागतो. आपण प्रत्यक्षातल्या व्याख्यानाकडे लक्ष देत नाही किंवा टिपणं काढत नाही, कारण टेप-रेकॉर्डर गफल करणार नाही व कायमस्वरूपी राहील आणि कायम सुरू राहील असं आपल्याला वाटत असतं. हे तो चालला नाही, तर आपण खूपच संतापतो.
पण शेवटी ते एक यंत्र आहे. त्याचे विविध भाग झिजतात; काहीच चिरकाल टिकत नाही. तो चांगल्या तऱ्हेने रेकॉर्डिंग करतो हे खरं, पण काही वेळा तो बंद पडतो. ते केवळ एक यंत्र आहे- त्यातील बॅटऱ्या संपतात, इत्यादी. हे आपण समजून घेतलं, तर आपण बॅटऱ्या संपल्यावर त्याला अवाजवी महत्त्व देणार नाही. उलट, रेकॉर्डर आपण जबाबदारीने वापरू आणि ते वापरण्यापूर्वी योग्यरित्या चालतंय का, बॅटऱ्या चार्ज्ड आहेत का याची खात्री करून घेऊ. पण कोणत्याही कारणाने टेप-रेकॉर्डर बंद पडला, तरी आपण नाराज होणार नाही. शिवाय, आपण टिपणंही घेत राहू: जेणेकरून या रेकॉर्डिंग यंत्रावर आपण पूर्णतः अवलंबून राहणार नाही.
टेप-रेकॉर्डसारख्या यंत्राबाबत आणि विशेषतः आजच्या युगात संगणकासारख्या यंत्रांबाबत आपल्या भावना इतक्या अस्वस्थकारक कशा असतात, ही एक विस्मयकारक बाब आहे. ती गोष्ट आपल्याला हवंय त्या रितीने काम करत नाही, याने आपण संतापतो. “या गोष्टीला स्वतःचेच विचार असावेत,” असं आपल्याला वाटतं. पण हे अर्थातच हास्यास्पद आहे. “हां, आता हे चालायला पाहिजे”, असाही विचार आपण करतो. शेवटी या वस्तू परिपूर्ण असणं अभिप्रेत आहे. पण हे केवळ यंत्र आहे आणि ते विविध भागांनी बनलेलं आहे; आणि चुका होऊ शकतील अशा लोकांनी ते बनवलेलं आहे आणि गोष्टी परिपूर्ण रितीने कशा करायच्या हे त्यांना माहीत नसतं. याचा अर्थ आपण संगणक किंवा टेप-रेकॉर्डर वापरायचा नाही, असा नव्हे. आपण त्याचा वापर करावा, कारण ही यंत्र खूप सहाय्य करतात, पण ती धड चालत असतील तर आपल्याला त्यांची आसक्ती वाटू नये, ती बंद पडल्यावर आपण संतापू नये. अशा प्रकारे आपण या यंत्रांबाबत समतोल, सुदृढ मनोवृत्ती ठेवतो. हे सोपं नाही, विशेषतः यंत्र महागडं असेल तर अजिबातच सोपं नाही.
कोणाबद्दल तरी वाटणारी अभिलाषा व आसक्ती हाताळण्याची तात्कालिक पद्धत
आपल्या अस्वस्थकारक भावना हाताळण्यासाठी दोन पातळ्यांवरच्या पद्धती बौद्ध धर्मात वापरल्या जातात. काही तात्पुरत्या, तात्कालिक पद्धती आहेत. गोष्टींबाबतचं सापेक्ष सत्य अचूकरित्या पाहण्यासाठी आपल्याला मदत करणाऱ्या या पद्धती असतात. शिवाय काही अंतिम किंवा खोलवरच्या पद्धती आहेत. अस्वस्थकारक भावना कोणत्या वस्तूच्या संदर्भात आहे, त्या वस्तूबाबतचं खोलवरचं सत्य समजून घेण्यासाठी या दुसऱ्या प्रकारच्या पद्धती मदतीला येतात. खोलवरच्या पद्धतींसाठी बराच अभ्यास व विचार करावा लागतो, पण तात्कालिक पद्धती समजून घेणं व अंमलात आणणं त्या तुलनेत सोपं असल्यामुळे, पहिल्यांदा आपण त्याचं प्रशिक्षण घेतो व अंमलबजावणी करतो. अशा तात्कालिक पद्धतींची काही उदाहरणं पाहू.
शरीरामध्ये काय आहे याचा विचार करणं
कोणाबद्दल आपल्याला आसक्ती किंवा अभिलाषा वाटत असेल आणि विशेषतः त्या व्यक्तीच्या शारीर सौंदर्याची अत्यंत भुरळ आपल्याला पडली असेल आणि तिच्या सौंदर्यगुणांची आपण अतिशयोक्ती करत असू, तर या संदर्भात “शरीराची कुरूपता” यांवरील साधना केली जाते. मुळात हा “कुरूप” असा शब्द वापरल्यावरच आपलं थोडं बिनसतं. हा सुखदायक शब्द नाही. त्यामुळे इथे आपण “कुरूपता” हा शब्द वापरला नाही तरी चालेल, अगदी बरेचदा वापरला जाणआरा “घाण” हा शब्दही वापरायला नको, असं मला वाटतं. आत्मविश्वास खच्ची झालेल्या आपल्या विद्यमान समाजांमध्ये या दोन्ही शब्दांचे अनेक रोगट अर्थ निघतात. त्याऐवजी आपण या चर्चाविषयाच्या दृष्टिकोनातून केवळ मानवी शरीराकडे पाहू, इतर कोणाच्या किंवा स्वतःच्या शरीराकडे पाहू, आणि संबंधित गोष्ट काय आहे या सापेक्ष सत्याचा विचार करू.
इथे आपण एखाद्या पुडक्याचं उदाहरण वापरू शकतो. पुडक्याला आवरण असतं. समजा, चांगलं आवरण केलेली एखादी भेटवस्तू त्यात आहे. शिवाय, त्यात काही आशयसामग्री असते. त्याच प्रमाणे आपलं शरीर किंवा इतर कोणाचं शरीर बाहेरच्या त्वचेमध्ये गुंडाळलेलं असतं, आणि आपण सर्वसाधारणतः त्वचा पाहतो. त्यामुळे त्वचा ही अतिशय सुंदर आवरणासारखी असते. भेटवस्तूचं आवरण झगमगीत, महागड्या कागदाचं व रिबिनींचं असतं, तसंच आपलं शरीरही सुंदर, महागड्या कपड्यांच्या आवरणामधून अधिक आकर्षक वाटेल असं करता येतं. पण कपडे हे शेवटी आवरणच आहे. दुकानातल्या उत्पादनाकडे आणखी लक्ष वेधून घेण्यासाठी उत्पादक लोक आवरणाच्या डिझाइनवर बरेच कष्ट घेतात आणि लक्षवेधक जाहिरातीदेखील करतात. त्याच प्रमाणे अनेक लोक त्यांचं त्वचारूपी आवरण अधिक आकर्षक वाटावं यासाठी मेक-अप, झकपकीत केशभूषा व पर्फ्युम किंवा लक्ष वेधून घेणारी नक्षीदार गोंदचित्रं आणि शरीराला टोचून काही ठिकाणी छिद्रं करून घेणं, इत्यादी गोष्टी करतात.
पण पुडक्यामध्ये केवळ आवरण नसतं, त्यात इतरही आशयसामग्री असते. शरीराच्या पुडक्यामध्ये सांगाडा, स्नायू, अवयव, इत्यादी असतं. पोटातील आशयसामग्री बाहेर आली, तर ती ओकारीतून बाहेर पडेल. आतड्यांच्या आत विष्ठा असते आणि मूत्राशयाच्या आत लघवी असते, आणि धमन्या व शिरांमधून रक्त वाहत असतं. हे काही आपल्याला नाकारता येत नाही. आणि पोटातून आपण सगळी ओकारी बाहेर काढली व तोंडाद्वारे थुंकून टाकली, सगळा शेंबूड नाकातून बाहेर काढला, आतड्यांमधील सर्व विष्ठा काढली, मूत्राशयातून लघवी काढली, धमन्यांमधून व शिरांमधून रक्त काढून टाकलं, तर केवळ त्वचा सुटी उरेल, ती काही आपली प्रिय व्यक्ती नसेल, हो ना? आपली प्रिय व्यक्ती म्हणजे एक अख्ख पुडकं असतं, हे वास्तव आहे. आपल्याला केवळ कापसाने किंवा इतर कशाने तरी भरलेली आपल्या प्रिय व्यक्तीची त्वचा नको असते. हे काही निसर्गेतिहासाचं संग्रहालय नव्हे. आपल्याला ती जिवंत व्यक्ती हवी असते, तर आपल्याला आवडो किंवा न आवडो, पण या पुडक्याच्या आतलं वास्तव असं असतं.
आता हे अतिशय रोचक म्हणता येईल. आपल्याला काय सुंदर वाटतं आणि काय कुरूप वाटतं? आपल्याला काय स्वच्छ वाटतं आणि काय घाण वाटतं? काही लोकांना त्वचा अतिशय सुंदर वाटेल आणि सांगाडा कुरूप वाटेल, पण सांगाड्यामध्ये कुरूप काय आहे? तो तर निव्वळ एक सांगाडा आहे. आणि रुग्णालयात आपण एखादी शस्त्रक्रिया पाहत असू, तर शरीरातील सर्व काही आपल्याला दिसतं, त्यात कुरूप किंवा तिटकारा वाटण्यासारखं काय असतं? ही आपली मनोवृत्तीच असते, नाही का? शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना अर्थातच हे कुरूप व तिटकारा आणणारं वाटत नाही. तो केवळ शरीराच्या आतील ऐवज असतो.
सौंदर्यासारख्या गुणांची अतिशयोक्ती टाळणं
गुणांची अतिशयोक्ती करू नये, कारण गुणसुद्धा सापेक्षा व व्यक्तिनिष्ठ असतात. उदाहरणार्थ, मला अतिशय सुंदर वाटणारं कोणीतरी तुम्हाला अजिबातच सुंदर न वाटणं शक्य आहे. किंवा मला कुरूप वाटणारं कोणीतरी तुम्हाला अतिशय सुंदर वाटणं शक्य आहे. हे पूर्णतः व्यक्तिनिष्ठ असतं. एखाद्या व्यक्तीची त्वचा आणि शरीराची ठेवण आपल्याला आकर्षक वाटली, तरी ठीक आहे, आपल्याला ती सुंदर वाटली यात काही गैर नाही. त्याची अतिशयोक्ती करू नये, हा मुद्दा आहे. संबंधित व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्याला आनंद वाटतो, या वस्तुस्थितीमध्ये काही गैर नाही. ती व्यक्ती कशी दिसते ते आपल्याला आवडतं; तिला पाहून आपल्याला आनंद वाटतो. याची आपण अतिशयोक्ती करतो तेव्हा अडचण होते आणि आपल्याला वाटतं की, “मला सदासर्वकाळ तिच्या शरीराला स्पर्श करता यायला हवा; ती प्रत्येक वेळी दिसेल तेव्हा मिठी मारता यायला हवी; सदासर्वकाळ ती माझ्या जवळ असायला हवी.” ही समस्या आहे. इतर कोणी या व्यक्तीकडे अभिलाषेन पाहिलं, तर आपण अतिशय नाराज होतो: “ही व्यक्ती आणि तिचं शरीर माझं आहे.” रस्त्यावर आपल्याला अनेक अतिशय सुंदर लोक दिसतात. “मला या व्यक्तीला मला हात लावता यायला हवा होता किंवा या व्यक्तीशी अमुक-तमुक करता यायला हवं होतं,” अशी अनिवार्य इच्छा निर्माण होते, हे अस्वस्थकारक असतं. याने आपण भावनिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ होतो.
आपण आवरणाबद्दलच- संबंधित व्यक्ती कशी दिसते याबद्दल- अतिशयोक्ती सुरू केली असेल, तर अशा वेळी क्ष-किरणांसारखी दृष्टी विकसित करणं आणि त्या व्यक्तीच्या सांगाड्याची कल्पना करणं अतिशय मदतीचं ठरतं. हे करणं फारसं अवघड नाही, विशेषतः सांगाडा कसा दिसतो हे आपल्याला माहीत असेल तर अजिबातच अवघड नाही. हा काही शरीरशास्त्राचा धडा नव्हे; त्यामुळे ही कल्पना परिपूर्ण असायला हवी असं नाही. चेहरा व डोकं यांच्या त्वचेखाली असलेल्या कवटीची काहीशी कल्पना आपल्याला करता यायला हवी. त्याने आपल्याला शांत व्हायला मदत होते. किंवा आपण कोणाचं उदर प्रेमाने कुरवाळत असलो आणि “हे किती मस्त वाटतंय” असा विचार आपल्या मनात असेल, तर त्या त्वचेच्या तीन ते चार सेंटिमीटर आत गेल्यावर कुरवाळताना आपल्याला कसं वाटेल याबद्दल थोडं सजग राहावं. तेव्हा आपल्याला तिटकाराच वाटायला हवा, असा याचा अर्थ नाही. कोणाचंही शरीर कुरवाळताना त्यातून मिळणाऱ्या आनंदाला आपण अवाजवी महत्त्व देऊ नये, एवढाच याचा अर्थ आहे. या पद्धतींचा अवलंब केल्यास आपल्याला अधिक भावनिक समतोल गवसतो.
या आधीच्या पद्धती केवळ तात्कालिक आहेत; त्यातून आपण अभिलाषा व आसक्ती यांपासून मुक्त होत नाही. पण, विशिष्ट परिस्थितीतून उद्भवलेल्या आपल्या या अस्वस्थकारक भावना तात्पुरत्या शमतात. या भावनांपासून स्वतःला प्रत्यक्षात मुक्त करण्यासाठी आमि एखादी व्यक्ती प्रत्यक्षात कशी अस्तित्वात असते हे समजून घ्यायला हवं आणि त्या व्यक्तीला एखादी “गोष्ट” (थिंग) मानून चालू नये. पण हे खूप अवघड आणि प्रगत साधनेचा भाग हे. त्यामुळे, सुरुवातीला आपण वर नोंदवलेल्या तात्पुरत्या, तात्कालिक पद्धती वापराव्या. ते करण्यासाठी ऐकणं, विचार करणं व साधना करणं अशी तीन टप्प्यांची प्रक्रिया आवश्यक आहे.
पद्धतीबद्दल ऐकणं आणि त्यावर विचार करणं
एक, ही पद्धत काय असेल, याबद्दल आपण पहिल्यांदा ऐकून घ्यायला हवं. एखाद्या व्यक्तीचं शरीर व दिसणं यांमुळे आपल्याला तिच्याबद्दल आसक्ती वाटत असेल, तर तिच्या त्वचेखाली सांगाडा इत्यादीसारखं काय आहे आणि तिच्या पोटात काय आहे याबद्दल जागरूक राहणं, अशी ही पद्धत आहे. या पद्धतीबद्दल ऐकू घेतल्यानंतर आपण ती समजून घेण्यासाठी त्यावर विचार करायला हवा आणि केवळ आवरणाबद्दल नव्हे, तर आवरणाच्या आत काय आहे याबद्दलही आपण जागरूक राहायला हवं, याबद्दल आपली खात्री पटली, तर आपण अभिलाषेबद्दल आणि त्या व्यक्तीला कवटाळून बसण्याबाबत इतके अस्वस्थ होणार नाही. त्या व्यक्तीसंदर्भातील आपल्या समस्या कमी होतील आणि आपल्या स्वतःच्या भावनिक रचनेमधील समस्याही कमी होतील.
चार स्वयंसिद्ध तत्त्वांचं उपयोजन
आपण ऐकून घेतलेल्या या मुद्द्यांवर विचार करण्यासाठी आपण तथाकथित “चार स्वयंसिद्ध तत्त्वां”च्या परिप्रेक्ष्यातून त्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल खात्री वाटण्यासाठी हे चार मार्ग चोखाळता येतात.
विवेकाच्या आधारे गोष्टी प्रस्थापित करण्याचं तत्त्व
या पहिल्या तत्त्वाद्वारे आपण शिकवणूक विवेकी व तर्कशुद्ध आहे का ते तपासतो. लोक म्हणजे केवळ त्यांची त्वचा नव्हे, हे उघड आहे. हे सिद्ध करण्याची खरं तर गरज नाही. पण हा मुद्दा तर्काद्वारे तपासण्याची आपली इच्छा असेल, तर त्वचेची ही रिकामी पोतडी सांगाड्याविना टिकू शकत नाही, असं त्यावरचं स्पष्ट उत्तर आहे. आपण काही खातो याचा अर्थ आपल्या पोटामध्ये व आपल्या आतड्यांमध्ये काहीतरी असतंच. त्वचेआत काहीतरी असतंच, त्यामुळे व्यक्तीचं शरीर म्हणजे केवळ त्याची त्वचा नव्हे, हे पूर्णतः तर्कशुद्ध ठरतं.
कार्यशीलतेचं तत्त्व
विशिष्ट शिकवणूक वांछित परिणाम साधण्यासाठी कशा प्रकारे कार्य करेल, याचा तपास आपण करू. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या बाहेर व आत काय आहे, याची आपल्याला समसमान जाणीव असेल, तर आपण यातील एका पैलूची अतिशयोक्ती करून दुसऱ्या पैलूकडे दुर्लक्ष करणार नाही.
कोणी इतकं सुंदर व आकर्षक असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीची केवळ त्वचाच सुंदर का वाटते, याचंही विश्लेषण आपल्याला करता येईल. त्या व्यक्तीच्या पोटातून बाहेर पडणारी ओकारीही आपल्याला सुंदर का वाटत नाही? अर्थातच अशी गोष्ट सुंदर वाटत नाही. त्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या शरीरातील दोन पैलूंबाबत जागरूक असायला हवं- शरीराबाहेरचा भाग आणि शरीराच्या आतला भाग, असे हे दोन पैलू आहेत. या जागरूकतेमुळे आपल्याला ती व्यक्ती सुंदर वाटणंच थांबावं किंवा तिच्या सौंदर्यातून आपल्याला वाटणारा आनंद नष्ट व्हावा असं नाही. या जागरूकतेमुळे केवळ आपल्या आनंदाचा विशिष्ट परिप्रेक्ष्य लाभतं. या व्यक्तीचं शरीर बाहेरून सुंदर असेलही, पण आतलाही भाग आहे आणि प्रत्येक जण असाच असतो.
आपण या मुद्द्यांवर काम करतो, त्यांबद्दल विचार करतो आणि त्या संदर्भात आपली खातरजमा करू पाहतो, हे खूप रोचक आहे. कारण, अनेकदा काय होतं की, आपल्याला या मुद्द्यांवर विश्वासच ठेवायचा नसतो. एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये व आतड्यांमध्ये काय आहे, याबद्दलच्या विचाराला आपण प्रतिकार करत असतो. हे पाहणं अतिशय रोचक असतं. मुळा हे वास्तव असतं, हे सत्य असतं, हा मुद्दा आहे. तिबेटी लोकांना अतिशय भडक व बिभत्स प्रतिमा आवडतात. विष्ठेचा मोठा ढिगारा असेल आणि त्यातून नग्न शरीराचा विलक्षण पुतळा तयार केला व त्याला त्वचेसारखा रंग दिला, तर तो कितीही सुंदर वाटला तरी शेवटी विष्ठेचीच वस्तू राहणार आहे, असं ते म्हणतील.
मला कोणाच्या शरीराचा बाहेरचा व आतला असे दोन्ही भाग माहीत असतील, तर मला त्या शरीराविषयी अभिलाषा व आसक्ती वाटू नये यासाठी ही समजूत कार्यशील असते. कारण, मी एखादा पैलू नाकारून दुसऱ्या पैलूची अतिशयोक्ती करत नाही. त्यामुळे ही समजूत भुरळ पडण्याशी न जुळणारी आहे. संबंधित व्यक्तीशी स्थिर, दीर्घकालीन बांधिलकी असणं, तिच्या शरीराचं कालानुक्रमे काहीही होवो, पण तिच्याबद्दल प्रामाणिक प्रेम व संयमाची वृत्ती असणं, याच्याशी सुसंगत अशी ही समजूत आहे. त्या व्यक्तीच्या वर्तमान सौंदर्याची आपण अतिशयोक्ती केली, तर ती व्यक्ती वृद्ध होऊ लागल्यावर किंवा आजारी पडल्यावर आणि ते सौंदर्य गमावल्यानंतर, आपण दुसऱ्या कोणत्या तरी अधिक आकर्षक व्यक्तीसाठी इतस्ततः पाहत राहू. पण शरीराचा बाह्य भाग व आतला भाग हे दोन्ही बदलत जाणार आहे हे वास्तव आपण समजून घेतलं व स्वीकारलं, तर त्या व्यक्तीशी स्थिर, प्रेममय संबंध ठेवण्या ठेवण्याशी सुसंगत अशी ही मर्मदृष्टी ठरते.
गोष्टींच्या स्वरूपाविषयीचं तत्त्व
काही लोक बाहेरून सुंदर असतात, पण त्यांच्या आत सांगाडा, विष्ठा व ओकारी का असते? गोष्टींचं स्वरूप असंच असतं; आपण जिवंत प्राणी आहोत आणि आपलं शरीर असंच बनलेलं असतं. हे वास्तव स्वीकारण्यावाचून आपल्यापुढे पर्याय नाही. शरीराचं काम असंच चालतं.
अवलंबित्वाचं तत्त्व
अखेरीस, ही मनोवस्था विकसित करण्याची प्रक्रिया, ही समजूत कशावर अवलंबून असतात, हे आपण समजून घेऊ, जेणेकरून ही समजूत आपल्याला आत्मसात करता येईल. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे काही आत्मसंयम असणं गरजेचं आहे. आपण एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा तिच्या सर्व शरीराला आपल्या हातांनी स्पर्श करण्याची अनिवार्य इच्छा ताब्यात ठेवता यायला हवी. क्षणभर मागे सरून विश्लेषण व आत्मचिंतन करण्यासाठी आपल्याला आत्मसंयम गरजेचं असतो. या आत्मसंयमामुळे आपल्याला अधिक स्पष्टपणे व सखोलपणे पाहणं शक्य होतं.
शिवाय, हे करण्याची इच्छा व खुलेपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. या व्यक्तीचा आपल्याला इतका तिटकारा वाटेल की आपण तिला सामोरं जाऊ शकणार नाही, अशी भीती वाटता कामा नये. ही पद्धत योग्यरित्या उपयोगात आणणं या सर्व घटकांवर अवलंबून असतं. हे आपल्याला आधीच समजलं, तर कशाची तयारी करायला हवी, हे आपल्याला समजू शकतं.
साधना
समजूत व शिकवण यांच्या या प्रक्रियेतून आपण पार पडलो आणि ही मनोवस्था प्राप्त करणं मदतीचं आहे अशी आपली खात्री पटली की, आपण प्रत्यक्षात त्यासाठीची “साधना” करू शकतो. आपण समजून घेतलेली शिकवण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं आणि त्याबद्दल स्वतःची खात्री करवून घेणं, याची पद्धत म्हणजे साधना. या शिकवणुकीतून आपल्याला कोणत्या सूचना केल्या जात आहेत, यावर वारंवार विचार करून व त्यानुसार कृती करून आपण साधनेची लाभदायक सवय स्वतःला लावून घेतो.
ही दुहेरी प्रक्रिया आहे. एक, आपण सूक्ष्मदर्शी साधना (तिलाच काही वेळा “विश्लेषणात्मक साधना” असंही म्हणतात) करू शकतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, नियंत्रित परिस्थितीमध्ये, एकट्यात बसून, आपल्या समोरच्या व्यक्तीसोबत नव्हे, तर आपल्याला ओढ वाटत असलेल्या व्यक्तीसोबत करायची ही साधना आहे. त्या व्यक्तीचं एखादं छायाचित्र आपण घेतो किंवा त्या व्यक्तीबद्दल विचार करतो आणि स्वतःलाच प्रश्न विचारतो, “होय, या व्यक्तीमध्ये सांगाडा आहे. होय, या व्यक्तीच्या पोटात काहीतरी आहे.” आपण त्या व्यक्तीचं शरीर पारदर्शक असल्याची कल्पना करतो, तिच्या सांगाड्याची, पोटातील आशयसामग्रीची, आणि त्वचेखालच्या विविध घटकांची कल्पना करतो आणि हे सर्व असलेल्या तिच्या शरीराचं सूक्ष्म विश्लेषण करायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे ही दृष्टी खरी आहे, अशी छाप आपल्या मनावर उमटते. ही क्ष-किरणासारखी दृष्टी आहे, पण तसं करताना ती संबंधित व्यक्तीच्या बाह्य दिसण्यापासूनचं लक्ष विचलित करत नाही, आणि ते बाहेरचं दिसणं सुंदरही असेल. शरीराच्या आतला भाग पाहिल्याने त्या व्यक्तीच्या बाहेरच्या प्रचलित सौंदर्याला बाधा पोचत नाही.
या सूक्ष्मदर्शी साधनेमध्ये काही काळ गेल्यानंतर, आपण स्थिरीकरणाच्या साधनेकडे वळतो. सूक्ष्मदर्शी साधनेमध्ये आपली मानसिक ऊर्जा आपण लक्ष केंद्रित केलेल्या वस्तूच्या दिशेने बाहेर पडत असते. आता या दुसऱ्या टप्प्यात आपली मानसिक ऊर्जा आतल्या बाजूला वळलेली असते. आपण सक्रिय सूक्ष्म विश्लेषण करत आत जात राहतो. “होय, हे वास्तव आहे; या व्यक्तीचं शरीर कसं आहे याबाबतचं हे सत्य आहे, बाहेरून आत जाणारं. होय, हे सत्य आहे,” असं जाणवून घ्यायचा प्रयत्न आपण करतो. आणि त्या व्यक्तीची ओळख आपण केवळ तिच्या शरीरावरून करत असू, तर त्या व्यक्तीला मन, भावना इत्यादीही आहे याची आठवण आपण स्वतःला करून द्यावी. पण हा साधनेतील पुढील विषय आहे.
या पद्धतीचं दैनंदिन जीवनामध्ये उपयोजन
अभिलाषा व आसक्ती यांना हाताळण्याच्या या मार्गाशी आपला परिचय झाला, ही पद्धत आपल्या सवयीमध्ये रुजायला लागली की आपण या पद्धती प्रत्यक्षातील, वास्तवातील जीवनपरिस्थितींमध्येही उपयोगात आणायला सुरुवात करू शकतो. आपल्याला गरज असेल तेव्हा आपण त्यांचं उपयोजन करावं. आपल्याला आसक्तीची तीव्र भावना जाणवत असेल, संबंधित व्यक्तीला कुरवाळण्याची अभिलाषा जाणवत असेल, तेव्हा ही पद्धत वापरावी. आपल्या हेतूंची तपासणी केल्यावर आपल्या लक्षात येतं की, त्या व्यक्तीला काही शांतपणा हवाय किंवा मसाज करून हवाय किंवा इतर काही हवंय म्हणून आपण तिच्या अंगावरून हात फिरवत नसतो, तर आपल्याला तिला कवटाळण्याची उत्कट ओढ असते म्हणून तिला हात लावावा अशी इच्छा आपल्याला होते. साधनेमध्ये आपण जशी उपासना करतो, तशाच सूक्ष्मदर्शी पद्धतीने आपण याचं उपयोजन करावं. या व्यक्तीला पोट आहे आणि त्यात ओकारी आहे, ती प्रत्यक्षात अशीच आहे, ही वस्तुस्थिती जाणवून घ्यायचा प्रयत्न आपण करावा.
परिणामी, या परिस्थिती काय योग्य आहे व काय अयोग्य आहे, हे पाहण्याइतकी मनाची सुस्पष्टता आपल्याला आल्याचं आपल्या अनुभवाला येतं. अर्थात, इथे आपण केवळ तात्पुरत्या, तात्कालिक पद्धतीवर काम करतो आहोत. त्यामुळे हे करूनही त्या व्यक्तीला स्पर्श करावा, तिचा हात पकडावा असं किंवा इतर काही आपल्याला वाटलं, तर ते आपल्याला चांगलं वाटण्यासाठीच आपण करतो आहोत, हे आपल्या लक्षात येतं. त्या व्यक्तीला याची गरज प्रत्यक्षात असतेच असं नाही. पण या साधनेची उपासना करून आपण आपल्या कृतीची अतिशयोक्ती करणार नाही. शिवाय, आपल्या कृतीने संबंधित व्यक्तीला आराम मिळणार आहे का, हे तिला योग्य वाटणार आहे का, असाही विचार आपण करावा. आपलं वागणं तिला योग्य वाटत नसेल, तर तिला स्पर्श करण्याबाबत आपण आत्मसंयम पाळणं जास्त चांगलं.
शेवटी, अशा समतोल, विचारपूर्वक पद्धतीने कृती करणं आपल्यासाठी स्वाभाविक व उत्स्फूर्त होऊन जातं: आपण अतिशयोक्ती करत नाही, कवटाळून राहत नाही, इत्यादी. परिणामी, समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याबद्दल काही संवेदनशीलता असेल, तर तिलाही हे जाणवतं. आपण कायम तिचा हात धरून ठेवतो कारण आपल्याला असुरक्षित व एकाकी वाटत असतं आणि तिचा हात धरून ठेवल्याने आपल्याला बरं वाटेल, त्याने आपल्या समस्या सुटतील, असं काहीसं आपल्याला वाटतं असतं. आपल्या कवटाळण्यातून ही अस्वस्थकारक कंपनं जाणवत असतात. हे त्या व्यक्तीला सहज वाटत नाही. त्या व्यक्तीमध्ये थोडीफार जरी संवेदनशीलता असेल, तरी तिला हे लक्षात येऊ शकतं. आपण सुखाची व शारीरिक संपर्काची अतिशयोक्ती केली नाही, तर आपल्याला असं वाटतं की, “बरं, कोणाचा हात हातात घेणं ही चांगली भावना देणारी संपर्काची कृती आहे; त्या हाताच्या आत हाडं आहे ते सगळं मला माहीत आहे.” म्हणजेच “ओहो! हे किती भारी आहे!” अशी अतिशयोक्तीची भावना आपल्या मनात निर्माण होत नाही. उलट, “हे चांगलं आहे, याने मला जरा बरं वाटतंय, पण याने जगातील माझ्या सर्व समस्या सुटणार नाहीत” हे आपल्या लक्षात येतं. मग आपण त्याबद्दल निवांत होतो. हे उत्स्फूर्तपणे, स्वाभाविकपणे होतं आणि समोरच्या व्यक्तीला ते कृत्रिम वाटत नाही; त्यांनाही हे सहज वाटतं. आपलं उद्दिष्ट तेच असतं. “कोणालाही स्पर्श करू नका, प्रत्येक जण म्हणजे विष्ठेची पोतडी आहे”, असं काही आपलं उद्दिष्ट नाही. आपण इथे समतोल साधण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे, त्यामुळे आपण खरोखरच इतरांना लाभ होईल असं काम करू शकतो.
शांतिदेव यांचं बोधिसत्वचर्यावतार यांसारख्या काही महान बौद्ध संहितांमध्ये आपण या पद्धतींबद्दल वाचतो, तेव्हा शांतिदेव कोणत्या संदर्भात या विषयाची चर्चा करत आहेत हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मानसिक स्थैर्य व एकाग्रता प्राप्त करण्याच्या संदर्भात ही चर्चा असते. आपल्याला अभिलाषा व आसक्ती वाटत असलेल्या व्यक्तीबद्दल सातत्याने विचार करणं, ही साधना विचलित करणारी सर्वांत मोठी गोष्ट आहे. अगदी मोठा अडथळा आहे. त्यामुळे मनाचं स्थैर्य व एकाग्रता प्राप्त करण्यासाठी, कोणत्याही साधनेच्या उपासनेत आपण या पद्धतीचं उपयोजन करणं गरजेचं आहे, आपल्याला आकर्षक वाटणाऱ्या व्यक्तीसोबत आपण नसू तेव्हाही हे लक्षात ठेवायला हवं.
आपण साधना करण्याचा व एकाग्रता कमावण्याचा प्रयत्न करतो, या परिस्थितींबाहेरही या पद्धतींचं मोठं उपयोजन होत असतंच. इतरांसोबतच्या आपल्या सर्वसाधारण संबंधांबाबतही त्याचं उपयोजन करता येतं. त्यामुळे अभिलाषा व आसक्ती हाताळण्याच्या या पद्धतींबाबत आपण संहितांमधून वाचतो, तेव्हा आपण या पद्धती वापरण्याच्या व्यापक संदर्भाचा विचार करणं गरजेचं आहे. एकाग्रतेच्या साधनेमध्ये विचलित करणाऱ्या गोष्टींवर मात करण्यापुरताच त्यांचा विचार मर्यादित राहू नये.
संताप, ईर्षा, इत्यादींसारख्या इतर अस्वस्थकारक भावनांवर मात करण्यासाठीच्या विविध पद्धतींचं विश्लेषण व मांडणीही बौद्ध संहितांमध्ये केलेली आहे. पण आत्ता त्याबद्दल चर्चा करण्याइतका वेळ आपल्याकडे नाही. पण एखादी व्यक्ती कशी दिसते यानुसार तिच्याबद्दल आसक्ती व अभिलाषा वाटली, तर ती कशी हाताळावी याबद्दलचा इथे नमूद केलेला दाखला संबंधित पद्धतीची चांगली कल्पना देतो, असं वाटतं.
असुरक्षितता हाताळणं
आपण अधिक खोलवर पाहिलं, तर आपल्याला आसक्ती व अभिलाषा यांच्या आतमध्ये असुरक्षितता असल्याचं दिसतं. सुरक्षिततेची ओढ वाटत असताना या व्यक्तीसोबतच्या नात्यात आपल्याला सुरक्षितता सापडते. खोलवरच्या अस्वस्थकारक भावनांपैकी एक असलेली असुरक्षितता भय, एकाकीपणा इत्यादींमधून उद्भवते. त्यापासून मुक्त कसं व्हायचं?
यासाठी आपल्याला “मी”विषयीचं खोलवरचं सत्य, खोलवरचं वास्तव समजून घ्यावं लागेल. प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळलेला, प्रत्येक गोष्टीपासून व प्रत्येकापासून तुटलेला असा वेगळा “मी” नाही, हे समजून घेतल्यास आपल्याला सुरक्षित वाटेल. आपण काहीतरी अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो, हीच मुळात आपल्या प्रत्यक्षातील अस्तित्वाची अतिशयोक्ती असते. आपण सतत बदलत असतो, हे वास्तव आहे: आपली मनस्थिती सतत बदलत असते, आपलं शरीर सतत बदलत असतं, आपल्या भावना सतत बदलत असतात. प्रचलित दृष्टिकोनानुसार, या सगळ्यावर “मी” असा शिक्का मारला जातो, पण त्यात घनरूप असा कोणी “मी” नसतो, इतर गोष्टींच्या अलाहिदा अस्तित्वात असलेला आणि सुरक्षिततेची गरज असलेला असा कोणीच “मी” नसतो. हे सदासर्वकाळ बदलत असतं.
“मी” असा शिक्का मारलेलं सर्व काही सदासर्वकाळ बदलत असेल, तर आपण केवळ स्वच्छ दिशेने जाण्याचा, सुरक्षित दिशेने जाण्याचा प्रयत्न करू शकतो- यालाच आश्रय म्हणतात. ही सुरक्षित दिशा म्हणजे अधिक सकारात्क मनोवृत्ती प्राप्त करणं, स्वतःमध्ये सुधारणा घडवणं, इत्यादी. पण सुरक्षेत ठेवण्यासारखं काही नाही; बचाव करावा असं काही नाही. इतर गोष्टींपासून तुटलेलं व त्यांच्या अलाहिदा असं काहीच नसतं. हे आपल्याला खोलवर समजलं असेल व आपली त्याबद्दल खात्री पटली असेल, तर असुरक्षिततेच्या व एकाकीपणाच्या समस्या हळूहळू विरून जातात व संपुष्टात येतात. एका अर्थी, भीती वाटण्यासारखं काहीच नसतं. पण घनरूप, कायमस्वरूपी “मी”ची विरचना करताना आपण अस्तित्वातच नाही आणि आपल्या कृतींची जबाबदारीही आपण घ्यायची गरज नाही अशा शून्यवादी टोकापर्यंत जाऊ नये. आपल्या कृतींच्या परिणामांबद्दल आपल्याला खात्री वाटत नसेल, तरी आपण कृती करू शकतो, सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो.
हे अर्थातच मुख्यत्वे भावनिक असुरक्षितता हाताळण्यासंदर्भात आहे, पण असुरक्षिततेचे इतरही पैलू आहेत- आर्थिक असुरक्षितता, इत्यादी. या क्षेत्रामध्ये आपण “मी”विषयीचं व माझ्या जबाबदाऱ्यांविषयीचं सापेक्ष सत्य समजून घ्यावं. आर्थिक बाजूची काळजी घेणं रिंवा आपल्याला प्रचलित दृष्टीने सुरक्षितता देतील अशा इतर पैलूंचीही काळजी घेणं अर्थातच गरजेचं आहे. पण असं करताना आपण, भावनिक अवकाशाप्रमाणे, परिस्थितीमधील वास्तवाची अतिशयोक्ती करू नये. आपली आर्थिक परिस्थिती पूर्णतः आपल्या हातात नसते. संपूर्ण जगाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम आपल्या आर्थिक सुरक्षिततेवर होत असतो, समाजव्यवस्थेवरही होत असतो. उदाहरणार्थ, साम्यवादाचा पाडाव झाला तर नवीन रूपातील शासन व सामाजिक व्यवस्था येतात, गोष्टी बदलतात. त्यामुळे आपण ज्या दिशेने जात आहोत ती सुरक्षित असावी आणि जे काही समोर येईल, जे काही घडेल ते हाताळण्यासाठीची अधिकाधिक साधनं आपल्याकडे असावीत, यातूनच आपल्याला स्थैर्य व सुरक्षितता मिळेल. जीवन पूर्णतः कुंठित असेल आणि कधीच बदलत नसेल, तर आपल्याला सुरक्षित वाटेल, कारण काय घडणार आहे हे आपल्याला माहीत असेल. पण हे अशक्य असतं.
शिवाय, आपण कधी गोष्टी पुरेशा आहेत, हे समजून घेऊन आपण समाधानीही असायला हवं. लाखो डॉलर असूनही असुरक्षित वाटणारे लोक मला माहीत आहेत. ते म्हणतात, “माझ्याकडे एक कोटी डॉलर नाहीत. माझ्याकडे एक कोटी डॉलर असते, तर मला सुरक्षित वाटलं असतं.” असं वाटू नये, यासाठी प्रयत्न करा. ही अतिशय दुःखी मनोवस्था आहे.
अजाणतेपणातून स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न विफलच असतो का?
यावर आक्षेप घेऊन कोणी म्हणेल की, “आपल्या मर्यादा असतात; आपण काही बुद्ध नाही, त्यामुळे आपल्या कृतींचे सर्व परिणाम आपल्या दिसत नाहीत किंवा माहीत होत नाहीत. आपल्याविषयीचं व इतरांविषयीचं वास्तव आपल्याला दिसत नाही. मग आपण दुःखी होऊन सत्यानाश होणं हेच विधिलिखित आहे का? आपण आपल्या अजाणतेपणातून व गोंधळातून कधीतरी मुक्त होऊ शकतो का?”
नाही, आपला सत्यानाश निश्चितपणे होणार नाही, कारण अजाणतेपणापासून मुक्त होणं शक्य आहे. हे सोपं नाही, आणि ही प्रक्रिया दीर्घकालीन असते, पण गोष्टी समजून घेण्याची क्षमता आपल्या मनामध्ये असते आणि प्रत्येक गोष्ट एकत्र करून पाहणंही शक्य असतं. त्यामुळे आपण आपली समजूत विस्तारायचा प्रयत्न करावा. अधिकाधिक मर्मदृष्टी प्राप्त करून घ्यावी आणि अधिकाधिक गोष्टी समजून घ्याव्यात, जेणेकरून आपल्या वर्तनाचा परिणाम काय होतो हे अचूक समजणार नसेल, तरी त्यात सहभागी असलेले सर्व अचल घटक आपल्याला कळतील, आणि अधिकाधिक कळत जाईल. त्या आधारे आपण कोणतीही परिस्थिती कशी हाताळायची याबद्दल सजग अंदाज बांधू शकतो, त्यासाठी शक्यतांचा व अनुभवाचा उपयोग करू शकतो, आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवण्याचं काम सुरू ठेवू शकतो.
इतरांना सामोरं जातानाच्या आपल्या क्षमता सुधारण्यासाठी आपण त्या व्यक्तीबद्दल, परिस्थितीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवायचा प्रयत्न करावा. सर्वसाधारणतः काय घडतं यातील आकृतिबंध पाहायचा प्रयत्न करावा: ही व्यक्ती कशी प्रतिक्रिया देते, इत्यादींमधील आकृतिबंध पाहावा आणि परिस्थितीची व त्या व्यक्तीची व्यक्तिगतताही समजून घ्यावी. याच्या आधारे आपल्याला या व्यक्तीच्या संदर्भात कसं वागायचं आणि काय करायचं याची काही कल्पना करता येते.
आपल्या सर्वांमध्ये या सर्व क्षमता असतात, कारण मन असंच कार्यरत असतं. आपल्या भोवतीची सर्व माहिती आपण स्वाभाविकपणे ज्ञानेंद्रियांद्वारे स्वीकारत असतो. त्याकडे आपण कदाचित अजिबात लक्ष देत नसू, त्यात आपल्याला कदाचित रसही नसेल, पण ज्ञानेंद्रियांद्वारे मिळवायची ही सर्व माहिती तिथे अस्तित्वात असते, ती आत येत असते. आणि आकृतिबंध पाहण्याची पूर्ण क्षमता आपल्यात असते. उदाहरणार्थ, या तीन व्यक्ती सर्व स्त्रिया आहेत हे आपल्याला दिसतं आणि गोष्टी एकत्र कशा येतात यातील आकृतिबंध आपल्याला दिसू शकतो. मिळालेल्या माहितीतून आपण आकृतिबंध समजून घेऊ शकतो आणि त्यांचा बोध करून घेऊ शकतो. माझा उजवा हात हा माझा डावा हात नाही हे आपल्याला लक्षात घेता येतं, त्यामुळे त्या-त्या व्यस्तूच्या व्यक्तिगततेबद्दल आपण जागरूक राहू शकतो. भिन्न गोष्टींशी भिन्न तऱ्हेने जोडून घेण्याचीही क्षमता आपल्यात असते. एखाद्या बाळाशी कसं बोलायचं व एखाद्या प्रौढाशी कसं बोलायचं हे आपल्याला समजतं, दोघांशीही आपण सारख्याच रितीने बोलत नाही. आपण अगदीच असंवेदनशील नसलो, तर आपल्यात लवचिकता असतेच. त्यामुळे सर्व प्राथमिक सामग्री अस्तित्वात असते.
आपलं मन ज्या विविध मार्गांनी कार्यरत असतं, त्यातील काही वैशिष्ट्यांना “बौद्ध-स्वरूप” असं म्हणतात. आपल्या सर्वांमध्येच हे बौद्ध-स्वरूप गुण असतात, त्यातून आपण साक्षात्कारी बुद्ध होऊ शकतो. फक्त हे समजून घेऊन प्रशिक्षण व्हायला हवं.
सारांश
थोडक्यात, अस्वस्थकारक भावना आपण अशा हाताळतो. कुशल पद्धतींचं उपयोजन करण्यासाठी प्रशिक्षण घेतो. प्रत्येक प्रकारची अस्वस्थकारक भावना हाताळण्यासाठी अनेक पद्धती आहेत आणि त्या शिकून घेणं, त्यांची उपासना करणं आणि त्यातील विविध पद्धतींचं उपयोजन करण्याची क्षमता मिळवणं, अतिशय मदतीचं ठरतं. काही परिस्थितींमध्ये कदाचित आपली पद्धत परिणामकारक नसेल, किंवा आपल्याला तिचं उपयोजन चांगल्या रितीने करणं शक्य झालं नसेल, असंही होतं. पण आपल्याकडे पर्यायी पद्धती असतील, तर त्या विशिष्ट परिस्थितीत दुसरे काही पर्याय कदाचित अधिक परिणामकारक ठरण्याची शक्यता असते. किंवा काही वेळा आजारी पडल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे आपल्याला औषधं एकत्रितरित्या घ्यावी लागतात, त्याचप्रमाणे विशिष्ट तीव्र भावना हाताळताना उपरोक्त पद्धतीही एकत्रितरित्या वापरणं गरजेचं ठरू शकतं. आपण जितकं अधिक शिकून घेऊ आणि स्वतःला जितकं अधिक प्रशिक्षित करू, तितकं आपण समस्याग्रस्त, अवघड परिस्थिती हाताळू शकतो व टाळू शकतो.
यासाठी शांतिदेव यांची बोधिचर्यावतार ही संहिता वाचणं व तिचा अभ्यास करणं अतिशय मदतीचं ठरतं. “या अस्वस्थकारक भावनांना मी स्वतःवर राज्य का करू देतो आहे? त्यांना मी माझ्या मनात इतकं निवांतपणे का राहू देतो आहे? हा खरा शत्रू आहे आणि त्यांच्यात काहीच ताकद नाही. मी त्यांच्यापासून मुक्त झालो, त्यांना मनातून काढून टाकलं की, त्या कुठे जातील? त्या बाहेर कुठेतरी नुसत्या उभ्या राहणं तर शक्य नाही, त्यामुळे सर्वसामान्य शत्रूसारख्या त्या पुन्हा हल्ला करणार नाही; त्यांच्या घनरूप असं काहीच नाही”, अशी तपासणी करणारी मांडणी या संहितेमध्ये आहे. अस्वस्थकारक भावनांपासून मुक्त होण्यासाठी काम कसं करायचं, यासाठीचा ठोस आधार यातून आपल्याला मिळतो. अस्वस्थकारक भावनांच्या नियंत्रणाखाली न आल्यामुळे आपल्याला स्वतःच्या जीवनातील गुणवत्तेची जबाबदारी अधिक चांगल्या तऱ्हेने घेता येते.