ईर्ष्या : अस्वस्थकारक भावना हाताळताना

13:24
ईर्ष्येचे अनेक प्रकार आहेत. इतरांची उपलब्धी सहन न होणं असा हा सरळ प्रकार असू शकतो, किंवा आपल्यालाच ही उपलब्धी मिळायला हवी होती ही इच्छाही त्यात समाविष्ट असू शकते. दुसऱ्याकडे काय आहे याचा लोभ आपल्याला वाटू शकतो आणि ती गोष्ट आपल्याकडे हवी अशी इच्छाही होऊ शकते, आणि त्या व्यक्तीकडे ती गोष्ट नसावी अशीही इच्छा निर्माण होण्याची शक्यता असते. यात स्पर्धात्मकतेचाही समावेश असू शकतो, त्याचप्रमाणे आपण पूर्णतः “पराभूत” आणि इतर पूर्णपणे “विजयी” झालेले, अशा द्वैती विचाराचाही यात समावेश असणं शक्य असतं. या सगळ्यात आपला आत्मकेंद्रीपणा असतो. अशा सर्व घटकांचं विश्लेषण करून बौद्ध धर्माने आपल्या अस्वस्थकारक भावनांची विरचना करण्याच्या व त्यांपासून आपल्याला मुक्त करण्याच्या प्रगत पद्धती सांगितल्या आहेत.

अस्वस्थकारक भावना

आपण सर्वच अस्वस्थकारक भावना (न्योंग-मोंग, संस्कृत- क्लेश, क्लेशकारक भावना) अनुभवतो. आपली मनःशांती संपुष्टात येईल आणि आपला आत्मसंयम ढासळेल इतकं आपल्याला अशक्त करून टाकणारी ही मनस्थिती असते. हाव, आसक्ती, वैरभाव, संताप, ईर्ष्या व मत्सर ही याची काही सर्वसामान्य उदाहरणं आहेत. यातून विविध मानसिक इच्छा (कर्म) उद्भवतात, सर्वसाधारणतः विध्वंसक वर्तनाकडे नेणाऱ्या या इच्छा असतात. इतरांबाबत विध्वंसकपणे कृती करण्याची किंवा आत्मघातकी कृती करण्याची ही इच्छा असू शकते. परिणामी, आपण इतरांसाठी आणि अपरिहार्यपणे स्वतःसाठीसुद्धा समस्या व दुःख निर्माण करतो.

अनेक प्रकारच्या अस्वस्थकारक भावना असतात. प्रत्येक संस्कृती मानसिकदृष्ट्या विशिष्ट सामायिक भावनिक अनुभवांच्या संचाभोवती एखादी यादृच्छिक रेषा आखते, समाजातील बहुतांश लोकांना हे अनुभव आलेले असतात, आणि त्यानुसार तिला एक कोटी (कॅटेगरी) मानलं जातं, आणि या कोटीला एखादं नाव दिलं जातं. प्रत्येक संस्कृती अर्थातच सामायिक भावनिक अनुभवांचा वेगवेगळा संच निवडते, त्यांच्या वर्णनासाठी वेगवेगळी वैशिष्ट्यं वापरते, आणि अशा प्रकारे अस्वस्थकारक भावनांच्या वेगवेगळ्या कोटी तयार होतात.

वेगवेगळ्या संस्कृतींनी निश्चित केलेल्या अस्वस्थकारक भावनांच्या कोटी सर्वसाधारणतः अचूकपणे परस्परांसारख्या नसतात, कारण भावनांच्या व्याख्या किंचित भिन्न असतात. उदाहरणार्थ, “जेलसी” असं इंग्रजी भाषांतर करता येईल असे संस्कृत व तिबेटी वेगवेगळे शब्द आहेत (संस्कृत- ईर्ष्या, तिबेटी- फ्राग-दोग), तर पाश्चात्त्य भाषांमध्ये असे दोन शब्द आढळतात. इंग्रजीत “जेलसी” व “एन्व्ही” असे शब्द आहेत, तर जर्मनमध्ये “Eifersucht” व “Neid” असे शब्द आहेत. या दोन इंग्रजी शब्दांमधला भेद हा संबंधित दोन जर्मन शब्दांमधील भेदांसारखा नाही, आणि संस्कृत व तिबेटीमधील संज्ञाही इंग्रजी व जर्मन शब्दांशी अचूकरित्या जुळणाऱ्या नाहीत. पाश्चात्त्य लोक म्हणून आपण या सर्वसाधारण कोटीमधील भावनिक समस्या अनुभवतो तेव्हा या कोटी आपल्या संस्कृतीने व भाषांनी तयार केलेल्या असतात, आणि त्यावर मात करण्याच्या बौद्ध पद्धती शिकण्याची आपल्याला इच्छा असेल, तर आपण स्वतःच्या भावनांचं विश्लेषण व विरेचना करणं गरजेचं आहे. बौद्ध धर्मात केलेल्या व्याख्यांनुसार विविध अस्वस्थकारक भावनांचा संयोग कसा होतो, याची कल्पना आपण करायला हवी.

इथे आपण “ईर्ष्या” (एन्व्ही) या अर्थाच्या बौद्ध संज्ञेवर लक्ष केंद्रित करणार आहोत, कारण ही संज्ञा तिच्या पारंपरिक व्याख्येच्या जवळची आहे. आपण, उदाहरणार्थ- नातेसंबंधांमधील- मत्सराची (जेलसी) चर्चा “आवश्यक तत्त्वं” या विभागात स्वतंत्रपणे केली आहे (पाहा: नात्यांमधील मत्सर कसा हाताळावा).

Top