दुसरे आर्य सत्य: दुःखाची खरी कारणं

पहिलं आर्य सत्य आपल्या सर्वांना अनुभवायला येणाऱ्या खऱ्या दुःखाची रूपरेषा स्पष्ट करतं. या सर्व दुःखाचा शेवट करण्याची प्रेरणा आपल्याला झाली असेल, तर आपण दुःखाची खरी कारणं योग्यरित्या ओळखणं गरजेचं आहे. आपल्याला दुःख व असमाधन अनुभवायला मिळतं, सतत अनपेक्षितरित्या अल्पकालीन सुख अनुभवायला मिळतं आणि हेच आपण टिकवून ठेवतो, ही खरी समस्या नाही. त्याहून भयंकर म्हणजे हे अनियंत्रित चढ-उतार आपण ज्या मर्यादित प्रकारच्या शरीरांद्वारे व मनांद्वारे अनुभवतो ती शरीरं व मनं आपण टिकवून ठेवत असतो. “तुम्हाला डोकं नसेल तर डोकेदुखी होणार नाही!” या म्हणीसारखाच हा प्रकार आहे. हे म्हणणं गंमतीशीर वाटत असलं, तरी त्यात काहीएक तथ्य आहे. शिवाय, या संदर्भातील विलक्षण बाब अशी की, बुद्धाने केवळ डोकेदुखीचं खरं कारण शोधलं असं नव्हे, तर डोकेदुखी ज्या डोक्यांना होते त्या डोक्यांच्या विविध प्रकारांचं सततचं अस्तित्वही त्याने दाखवलं. वर्तनातून उद्भवणारा कार्यकारणभाव आणि वास्तव यांविषयीचा आपला अजाणपणा, हे खरं कारण आहे.

आपण कसे अस्तित्वात आहोत याबद्दलचा अजाणपणा

आता आपण एकविसाव्या शतकाच्या आरंभिक टप्प्यात आहोत, हे गैरमाहितीचे युग आहे आणि अनेक जण तथाकथित ‘पर्यायी सत्यां’वर विश्वास ठेवतात. बुद्धाने हजारो वर्षांपूर्वी जे सर्व दुःखांचं खरं कारण असल्याचं ओळखलं होतं त्या ‘अजाणपणा’चा आता स्फोट झाला आहे. इंटरनेट कसं काम करतं हे माहीत नसण्याशी हा अजाणपणा संबंधित नाही. तर, आपल्या वर्तनाचे दीर्घकालीन परिणाम काय आहेत याविषयीचा हा अजाणपणा व संभ्रम आहे, त्यामध्ये अंतःस्थ पातळीवर वास्तवाविषयीचं- विशेषतः आपण कसे अस्तित्वात आहोत याबद्दलचा अजाणपणा व संभ्रम असतो. आपण स्वतःची चुकीची मतं पूर्ण खरी आहेत, असं मानतो ही त्याहून वाईट बाब आहे.

थोडं अधिक खोलात विचार करूया. ‘मी, मी, मी’ असा आवाज आपल्या सर्वांच्या मनात सतत अनुभवायला मिळत असतो. त्या आधारे आपण आपोआप असं मानायला लागतो की, शरीर व मन यांहून विभक्त ‘मी’ असं शोधता येणारं रूप आहे, आणि तेच हे सर्व बोलत आहे. ‘मला’ जे काही होतं आहे त्याबद्दल आपण मनातल्या मनात तक्रार करतो किंवा ‘मी’ आता काय करणार आहे त्याबद्दल विचार करतो, तेव्हा ‘मी’ असं काही ठोस रूप आहे आणि त्याबद्दल आपण चिंता करत असल्यासारखं वाटतं, त्यामुळे संभ्रमित धारणा दृढ होते. आपण अर्थातच अस्तित्वात असतो; हे बुद्धाने नाकारलेलं नाही. यातील समस्या एवढीच आहे की, आपल्याला ज्या प्रकारे आपण अस्तित्वात आहोत असं वाटतं, त्या प्रकारे आपण अस्तित्वात नसतो. या वस्तुस्थितीबाबत आपण अजाण असतो; या पर्यायी वास्तवावर आपण ठाम विश्वास ठेवतो, त्यामुळे आपण पूर्णतः संभ्रमित असतो.

अस्वस्थकारक भावना व अनिवार्य वर्तन यांद्वारे स्वतःला सुरक्षित करण्यासंदर्भातील असुरक्षितता व निष्फळ प्रयत्न

आपली ही गैरसमजूत वास्तवाशी सुसंगत आहे, असं आपण मानतो तेव्हा आपल्याला असुरक्षिततेचं दुःख अनुभवावं लागतं, यावरून आपली ही गैरसमजूत चुकीची असल्याचं स्पष्टपणे सूचित होतं. सुरक्षित वाटण्याच्या निष्फळ प्रयत्नापायी आपण स्वतःला सिद्ध केलं आहे किंवा स्वतःचा बचाव केला आहे किंवा स्वतःला प्रतिपादित केलं आहे, असं मानून स्वतःला सुरक्षित समजण्याचा निष्फळ प्रयत्न आपण करतो. असं वाटल्याने अस्वस्थकारक भावना उद्भवतात-

  • आपल्याला सुरक्षित वाटेल असं काहीतरी मिळवण्याची ओढ
  • आपल्याला सुरक्षित वाटावं यासाठी काहीतरी दूर लोटण्याचा वैरभाव व संताप
  • आपल्या भोवती भिंती उभारून त्याच्या आड आपल्याला सुरक्षित वाटेल असा भाबडेपणा.

या अस्वस्थकारक भावनांमुळे आपली मनःशांती व आत्मसंयम गमावली जाते, त्यातून आपल्या आधीच्या प्रवृत्ती व सवयी यांच्यावर आधारित काहीतरी करण्याचा हेतू निर्माण होतो. मग अनिवार्य कर्मजन्य उत्तेजनेमुळे आपण प्रत्यक्षात तसं काहीतरी करतो किंवा बोलतो.

अजाणपणा, अस्वस्थकारक भावना, व अनिवार्य वर्तन ही आपल्या भावनिक चढ-उताराला चिरस्थायी करणारी खरी कारणं

कर्मजन्य कार्यकारणभाव आपल्या वर्तनाच्या अल्पकालीन परिणामांवर लक्ष केंद्रित करत नाही, तर दीर्घकालीन परिणामांवर लक्ष केंद्रित करतो. उदाहरणार्थ, स्वतःविषयी असुरक्षित वाटताना आपण काही कल्पना करत असतो. जसं की- समाजमाध्यमांवरच्या पोस्टला ‘लाइक’ मिळाव्यात अशी ओढ आपल्याला वाटते, कारण त्यातून आपल्या अस्तित्वाला पुष्टी मिळेल, आपलं स्वतःचं मूल्य वाढल्याची जाणीव होईल, असं आपल्याला वाटतं. तुम्ही समाजमाध्यमांवर असाल, आणि तिथे स्वतःचे सेल्फी प्रसिद्ध करत असाल, तर स्वतःच्या अनुभवाची तपासणी करा. तुम्हाला किती ‘लाइक’ मिळाले आहेत हे पाहण्याची अनिवार्य इच्छा दिवसात किती वेळा होते? तुमची पोस्ट किती लोकांनी ‘लाइक’ केली आहे, हे कळल्यावर येणारी आनंदाची उबळ किती वेळ टिकते? तुम्ही नंतर किती वेळात परत फोन तपासता? तुम्हाला कधी मिळालेले ‘लाइक’ पुरेसे वाटतात का? तुमचा फोन दिवसभर अनिवार्यपणे बघत राहणं, ही सुखी अवस्था आहे का? ‘लाइक’च्या ओढीचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे दुःख अनुभवावं लागणं. पुरेशी ‘लाइक’ मिळाल्यावर एक ठोस, स्वतंत्र अस्तित्व असलेल्या ‘मला’ सुख वाटेल, अशा भ्रामक गृहितकावर हे आधारलेलं आहे.

आपली प्रेरणा चांगली असेल (उदाहरणार्थ, प्रेम), आणि त्याद्वारे आपण आपल्या मोठ्या झालेल्या मुलांना अऩिवार्यतेने मदत करायला जात असू, तरी त्यात आपण उपयुक्त असावं किंवा इतरांना आपली गरज भासावी या भाबड्या गैरसमजुतीवर आधारीत ही कृती असेल, तर त्यातून मिळणारं सुख कधीही समाधानकारक असणार नाही. थोडक्यात, आपण व इतर, किंबहुना सगळ्याच अस्तित्वाविषयीच्या अजाणपणामुळे व गैरसमजुतीमुळे आपले भावनिक चढ-उतार चिरस्थायी होत जातात, हे खरं कारण आहे. तसंच अस्वस्थकारक भावना आणि कर्मजन्य उत्कट इच्छा व त्यातून उद्भवणारं अनिवार्य वर्तन, हेसुद्धा याला कारणीभूत असतात.

अजाणपणा, अस्वस्थकारक भावना व अनिवार्य वर्तन ही आपल्या अनियंत्रित पुनर्जन्माच्या चिरस्थायी होण्याची खरी कारणं

या आणि भावी जीवनांमध्ये आपण ज्या मर्यादित शरीर व मनांच्या आधारे दुःख व असमाधानकारक सुख अनुभवतो, त्यांसोबतचं आपलं अस्तित्व अनिवार्यतेने चिरस्थायी करण्याला अजाणपणा, अस्वस्थकारक भावना व कर्मजन्य प्रेरणा ही खरी कारणं असतात, असं बुद्धाने आपल्याला शिकवलं. या भावनांबद्दलची आपली संभ्रमित प्रवृत्ती हे आपल्या सांसारिक पुनर्जन्मामागचं खरं कारण असतं, असं बुद्धाने दाखवून दिलं.

क्षणिक सुख उद्भवतं तेव्हा ते कधीच संपू नये अशी आपली तीव्र इच्छा असते, पण ही इच्छा निष्फळ ठरते, कारण सुख कधीच टिकत नाही. आपल्याला दुःखी वाटतं, तेव्हा ते कायमचं निघून जावं अशी आपली तीव्र इच्छा असते, पण आपल्या अनिवार्य वर्तनामुळे अधिक दुःख उद्भवतं. आपल्याला काहीही वाटू नये, किंवा तसं काही न वाटण्यासाठी आपण एकाग्र मनोवस्थेत बुडून जावं याकरता आपण कितीही तीव्र क्षमतेचं वेदनाशामक औषध घेतलं, तरी आपण जी गोष्ट टाळू पाहतो ती अनिवार्यतेने परत येते.

शिवाय, ‘मी’ हे ठोस रूप असल्याप्रमाणे आपण त्यावर लक्ष केंद्रित करतो, आणि ‘बिचारा मी’ असा विचार करत राहतो: “या सुखापासून माझी फारकत होऊ नये असं मला वाटतं; हे दुःख माझ्यापासून दूर जावं असं मला वाटतं; शून्यत्वाची ही भावना विरून जाऊ नये असं मला वाटतं.” आपल्या ‘मी’विषयीच्या संभ्रमित संकल्पनेबद्दलची ही ओढ आणि आपल्याला जे जाणवतं त्याबद्दलच्या अस्वस्थकारक भावना, हे सर्व आपण मरत असताना उद्भवतं. त्यातून आपली कर्मजन्य प्रेरणा सक्रिय होते, ही अनिवार्य मानसिक उबळ लोहचुंबकाप्रमाणे आपली मनं व या अस्वस्थकारक भावना पुनर्जन्माच्या स्थितीमधील शरीराकडे खेचतं. पुनर्जन्म घेण्याच्या उद्देशाने असं घडतं, जेणेकरून आपल्याला त्यासह जगत राहता येईल. टिकून राहण्याच्या प्रेरणेचं हे एक बौद्ध कथन झालं.

दुःखाच्या खऱ्या कारणांचे चार पैलू

त्यामुळे आपल्या संभ्रमित प्रवृत्ती आपल्या खऱ्या दुःखांची खरी कारणं असतात. वास्तविक आपण स्वतःच्या दुःखांची अनियंत्रित पुनरावृत्ती स्वतःहून चिरस्थायी करत राहतो. याचे चार पैलू आहेत, विशेषतः वारंवार पुनर्जन्म घेत राहण्याच्या संदर्भात हे पैलू दिसून येतात. हे पैलू एकंदर दुःखाची खरी कारणं कसे असतात, हे आपल्याला लक्षात येईल-

  • एक, अस्वस्थकारक भावना व अनिवार्य कर्मजन्य प्रेरणा यांच्यासह आपण कसे अस्तित्वात असतो याबद्दलचा अजाणपणा आपल्या सर्व दुःखाचं प्रत्यक्ष कारण असतो. आपलं दुःख कोणत्याच कारणाविना उद्भवलेलं नसतं किंवा ज्योतिष अथवा दुर्दैव अशा विसंगत कारणातून आलेलं नसतं.
  • दोन, आपल्या दुःखांची पुनरावृत्ती होण्याचा उगम त्यात आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये दुःख केवल एकाच कारणामुळे उद्भवलेलं नसतं, तर अनेक कारणं व परिस्थिती यांच्या संयोगातून उद्भवलेलं असतं. 
  • तीन, आपल्या दुःखाचे तीव्र आंतरिक उत्पादक तेच असतात. आपलं दुःख बाह्य स्त्रोतांमधून येत नाही, अगदी सर्वशक्तिमान ईश्वराकडूनसुद्धा नाही.
  • चार, आपल्या दुःखासाठीची परिस्थितीसुद्धा त्यांच्यामुळेच निर्माण होते. ऐहिक कृत्यांमधून आपोआप दुःख उद्भवत नाही, तर आपल्या संभ्रमित प्रवृत्तीमधून उद्भवतं.

सारांश

स्वतःविषयीच्या खोट्या वास्तवाविषयीची आपली प्रतिमानिर्मिती, हे निव्वळ कल्पित आहे याबद्दलचा आपला अजाणपणा आणि त्यातून उद्भवणाऱ्या अस्वस्थकारक भावना व अनिवार्य वर्तन, ही आपल्या सतत उद्भवणाऱ्या समस्यांची व दुःखांची (कोणालाचे हे सतत नको असतं) खरी कारणं आहेत, हे आपल्याला एकदा कळलं की, या संकटकारक गोष्टींपासून स्वतःला कायमचं मुक्त करणं अर्थपूर्ण ठरत नाही का?

Top