परिचय 

चार आर्य सत्ये 

जवळजवळ २५०० वर्षांपूर्वी बुद्धांचा भारतात जन्म झाला. बुद्धांच्या सर्व शिष्यांची क्षमता आणि  स्वभाव वेगवेगळे असल्याने बुद्धांनी प्रत्येक शिष्याला व्यक्तिगत स्वरूपात अशी शिकवण दिली की जी त्याला व्यवस्थित समजू शकेल, पण त्यांनी त्यांना आत्मज्ञान मिळण्यास कारणीभूत असणार्‍या मूलभूत बोधाची कशा प्रकारे मदत झाली हे सांगणारी शिकवण प्रथम त्या सर्वांना दिली:  त्यांच्याच शब्दात सांगायचं तर त्यांनी “चार आर्य सत्ये ” सर्वांना शिकवली. या जीवनविषयक अशा चार वस्तुस्थिती आहेत जी सामान्य माणसे ओळखू शकत नाहीत, पण उच्च सिद्धिप्राप्त लोक (आर्य ) ज्यांनी वास्तवाचा तटस्थपणे अनुभव घेतला आहे, अशांना सत्याची अनुभूती होते. थोडक्यात ही चार सत्ये खालील प्रश्नांची उत्तरे देतात :

  • प्रत्येक मनुष्य अनुभवत असलेल्या दु:खांचे आणि समस्यांचे सत्य प्रकार काय आहेत ?
  • त्यांची कारणे काय आहेत ?
  • या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी त्यांचं अशा पद्धतीने निवारण करणे शक्य आहे का की ज्यामुळे त्या परत कधीच उद्भवणार नाहीत ?
  • अशा प्रकारचं समस्यांचं निवारण शक्य करणारं असं कोणतं ज्ञान आहे जे समस्यांच्या कारणांना समूळ नष्ट करेल?

या प्रश्नांची उत्तरं हीच बुद्धांनी त्याच्या उर्वरित आयुष्यात दिलेल्या सखोल शिकवणीचा पाया आहेत आणि ही ती शिकवण आहे जी त्यांनी सर्वप्रथम दिली.

आपण जेव्हा या चार आर्य सत्यांकडे पाहतो तेव्हा ती वेगवेगळी अशी स्वतंत्रपणे अस्तित्वात असलेली आढळत नाहीत. ती एका मूलभूत आधाराकडून सुरू होतात आणि त्यांचं पूर्णपणे आकलन झाल्यावर एका लक्ष्यापर्यंत पोहचतात. अगदी साध्या शब्दात सांगायचं झाल्यास, या चार सत्यांचा - या जीवनातील या चार खर्‍या गोष्टींचा पाया आहे – यथार्थ! 

जर एका शब्दात आपल्याला बौद्ध धर्माचे सार सांगायचे असेल तर माझा एक बौद्ध शिक्षक मित्र आहे त्याच्या मते “यथार्थता” हा तो शब्द असू शकेल. ; 

जर आपण वास्तव पाहू शकलो व कोणत्याही अवास्तव किंवा अवाजवी अंदाजाशिवाय समजू आणि    स्वीकारू शकलो तर आपल्या जीवनात येणार्‍या समस्यांचा आपण यथार्थ मार्गाने सामना करू शकू.

तर यथार्थाविषयक शिकवण हा या चार सत्यांचा पाय आहे. तथापि, जीवनामध्ये गोष्टी कशा अस्तित्वात असतात आणि त्या कशा कार्य करतात याचे विविध स्तर या वास्तवामध्ये अंतर्भूत असतात. बुद्धांनी त्या सर्व गोष्टींची शिकवण दिली. 

तीन बहुमूल्य रत्ने 

आपल्या जीवनातील समस्या आणि दु:खे यांच्यावर मात करण्यासाठी आपल्या जीवनाला जी योग्य दिशा देणे गरजेचे आहे ती या चार सत्यांच्या आकलनापासून स्पष्ट होते. बौद्ध परिभाषेत सांगायचं झाल्यास बुद्ध, धर्म आणि संघ ही ‘तीन बहुमूल्य रत्ने’ किंवा ‘शरणागतीचे तीन अलंकार’ ही दिशा दर्शवतात. यातील प्रत्येकाच्या अर्थाचे अनेक स्तर आहेत, पण सर्वात सखोल स्तर खालील बाबी दर्शवतो :

  • धर्म : ते ध्येय ज्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्नरत आहोत, उदाहरणार्थ, आपल्या समस्यांपासून आणि त्यांच्या कारणांपासून मुक्तता मिळवणे आणि त्यांच्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळवून देईल अशा शिकवणीचे पूर्ण ज्ञान प्राप्त करणे. 
  • बुद्धजन : ज्यांनी हे ज्ञान पूर्णपणे आत्मसात केले आहे आणि आपल्याला ते आत्मसात कसे करावे हे शिकवणारे असे लोक. 
  • संघ : या शिकवणीचे अनुसरण करणारे आणि अंशत: ते ध्येय प्राप्त करू शकलेले, पण पूर्णपणे ते ध्येय प्राप्त करणे अजून बाकी असलेले लोक. 

नालंदाच्या १७ आचार्यांची प्रार्थना

प्राचीन भारतातील महान बौद्ध मठाच्या १७ बौद्ध आचार्यांना प्रेरणेसाठी विनंती करणारा एक सुंदर ग्रंथ परमपूज्य दलाई लामा यांनी लिहिला. त्या मठाचं नाव होतं नालंदा आणि तो हजार वर्षे टिकला. एखाद्या मठाप्रमाणे चालवल्या जाणार्‍या या आपल्या काळातील विख्यात विद्यापीठाने भारतीय बौद्ध परंपरेला अनेक महान बौद्ध आचार्य दिले. दलाई लामा यांनी या ग्रंथाची रचना १७ बौद्ध आचार्यांपैकी प्रत्येकाला उद्देशून केलेल्या प्रार्थनेच्या स्वरूपात केली, “आपण दाखवलेल्या मार्गाने चालता येण्यासाठी मला प्रेरणा द्या..” या वैयक्तिक स्वरूपात केलेल्या प्रार्थनारूपी श्लोकांनंतर परमपूज्य दलाई लामा यांनी समारोपात सर्वांना एकत्रितपणे उद्देशून अनेक श्लोकांचीही रचना केली. 

त्या समारोप श्लोकांतील एका श्लोकावरील विश्लेषण मला आपल्यासमोर ठेवायला आवडेल. त्याचा सारांश मी आताच सांगितल्याप्रमाणे, दोन सत्ये, चार आर्य सत्ये आणि शरणागतीचे तीन अलंकार हा आहे. शरणागतीचा अर्थ असा आहे की या तिन्ही प्रकारच्या सत्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण चाललो तर आपल्या समस्या आणि दु:खे यांच्यापासून आपण आपलं रक्षण करू शकू. 

श्लोक असा आहे :

दोन सत्यांचा अर्थ जाणून घेऊन, जो पाया आहे, की ज्या पद्धतीने सर्व गोष्टी स्वीकारार्ह आहेत, 

“स्वीकारार्ह” म्हणजे कशा प्रकारे गोष्टी अस्तित्वात आहेत, कशा कार्यरत आहेत. अन्य शब्दात, सत्य जाणणे. 

आपल्याला खात्री पटते की, चार सत्यांच्या माध्यमातून, आपण अनियंत्रितपणे पुन्हा पुन्हा होणार्‍या पुनर्जन्माच्या फेर्‍यात सापडत असतो पण हा क्रम आपण उलटवूदेखील शकतो. 

जर आपण वास्तव समजू शकलो तर आपल्याला समजेल की कशा प्रकारे, या चार सत्यांच्या माध्यमातून, आपण आपल्या समस्यांना चिरस्थायी करत असतो आणि हेही समजेल की कशा प्रकारे आपण या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतो. 

आपल्या प्रामाणिक अनुभूतीने, नंतर, तीन शरणागती सत्य आहेत हा आपला विश्वास अजून दृढ होतो.

लक्षात ठेवा या तीनही शरणागती एक असं ध्येय ठेवून तयार केल्या गेल्या आहेत, जे आपण प्राप्त करू शकू- आपल्या समस्यांचं पूर्ण निवारण (निरोध) जेणेकरून त्या परत कधीही उद्भवू नयेत आणि हे आकलन की आपण हे शक्य करू शकू. 

जर तुम्ही बौद्ध धर्माचे अनुसरण करू इच्छित असाल तर तुम्ही एका लक्ष्याचा पाठलाग करू इच्छित असता. ध्येय प्राप्त करणे शक्य आहे हे तुम्हाला कसे कळते ? ती एक केवळ कल्पना आहे का? ही एक सुंदर कहाणी आहे की ही खरी वस्तुस्थिती आहे ? अनेकजण केवळ श्रद्धेवर आधारित असलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतील, “माझ्या शिक्षकांनी मला मला तसं सांगितलं आणि ठीक आहे, मला विश्वास ठेवायचा आहे, म्हणून माझा विश्वास आहे.” 

ही पद्धत अनेकांसाठी फायदेशीर होईलही, पण ही पद्धत नेहमीच फायदेशीर ठरेल असं नाही कारण ही फार स्थिर पद्धत नाही. दीर्घ काळापर्यंत साधना केल्यावर असं वारंवार घडतं की तुम्ही प्रश्न विचारणे सुरू करता, मी काय करत आहे ? कारण तुम्ही अजूनही राग, आसक्ती, स्वार्थ आणि अजून बरेच काही त्रास अनुभवत असता जे खरे क्लेशकारक घटक असतात आणि ज्यांच्यापासून मुक्ती मिळवणे खरोखरच कठीण असतं. त्यामुळे प्रगती अतिशय संथ असते, पण तुम्हाला हे कळणे गरजेचं आहे की प्रगती कधीही सरळ रेषेसारखी नसते त्यात उतार चढाव असतातच. काही दिवस खूप छान जातात तर काही दिवस खूप वाईट. जर तुम्ही केवळ श्रद्धेच्या आधारावर बौद्ध धर्माचे अनुसरण करत असाल तर तुम्ही निराश होऊ शकता कारण असं दिसत नाही की तुम्ही कुठेतरी पोहचत आहात. मग तुम्ही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे, “ हे लक्ष्य गाठणं खरोखरच शक्य आहे का ?”

म्हणूनच हा श्लोक म्हणतो, ‘आपल्या प्रामाणिक अनुभूतीने.’ दुसर्‍या शब्दात सांगायचं तर, तर्क आणि विवेक यांच्या आधारे जेव्हा तुम्हाला समजतं की असं लक्ष्य असतं आणि ते गाठलंही जाऊ शकतं, तेव्हा लक्ष्याबद्दलची तुमची खात्री, त्याची व्यवहार्यता आणि हे लक्ष्य गाठणारे लोक होऊन गेलेले आहेत ही धारणा अजून दृढ होते. तुमचा विश्वास बसू लागतो की या गोष्टी केवळ कोणत्या धर्मग्रंथात लिहिलेल्या आहेत म्हणून खर्‍या नाहीत. तुमची खात्री पटते की त्या खर्‍या आहेत कारण दोन सत्ये हे वास्तव आहे आणि चार आर्य सत्ये व तीन शरणागती तार्किकदृष्ट्या वास्तविकतेवर आधारित आहेत. 

मुक्तीकडे नेणार्‍या मार्गचित्ताच्या मुळांचे रोपण करण्यासाठी मला प्रेरणा द्या  

तुम्ही झाडासाठी बीजारोपण करता, पण इथे बीज नाही तर ‘मूळ’ आहे ज्याचे तुम्ही रोपण करत आहात.  शब्दांची ही निवड दर्शवते की दोन सत्ये, चार सत्ये आणि तीन शरणागती हेच बौद्ध आध्यात्मिक मार्गाचे मूळ आहे कारण बाकी सर्व यापासूनच उगम पावतं. या मुळांच्या तुमच्या मनातील दृढ रोपणाबरोबरच आता तुमची पूर्ण साधना खात्रीच्या आधारावर चालते. तुम्ही काय करत आहात याचे तुम्हाला ज्ञान असते, तुम्हाला कळतं की हे लक्ष्य गाठणं शक्य आहे आणि तुम्हाला समजतं की लक्ष्य काय आहे. 

मला वाटतं बौद्ध धर्माविषयी असा दृष्टिकोन असणं फार महत्वाचं आहे, कारण जर आपण एखादा आध्यात्मिक मार्ग अनुसरणार असू तर त्याच्या सत्याधिष्टीत स्वरूपाबद्दल आपल्याला खात्री असणं गरजेचं आहे. ही काही कोणती आदर्शवादी संकल्पना नाही की ज्याकडे आपण भावनिक कारणांमुळे आकर्षित झालेलो असू आणि जी पूर्णत: अशक्य असेल. जर आपली खात्री असेल की आपल्या आध्यात्मिक आयुष्यात आपण जे करत आहोत ते व्यवहार्य आहे, सत्यधिष्टीत आहे तर आपण त्यात निश्चितच उत्तम भावना गुंतवू शकतो. आपल्याला आकलन आणि भावना जसे की करुणा, उत्साह, धैर्य इत्यादी यांच्यामध्ये संतुलन राखावे लागेल. 

दोन सत्ये 

सापेक्ष, रूढीबद्ध सत्य 

दोन सत्यांचा अर्थ जाणून घेऊन, जो पाया आहे, की ज्या पद्धतीने सर्व गोष्टी स्वीकारार्ह आहेत, 

श्लोकातील पहिली ओळ दोन सत्यांविषयी बोलते, ‘सापेक्ष सत्य’ किंवा ‘रूढीबद्ध सत्य’ आणि ‘गहनतम सत्य’ – दुसर्‍या शब्दात, सर्व गोष्टींबद्दलच्या दोन खर्‍या वस्तुस्थिती. एक हे वरवरचे, बाह्य स्तराचे आहे तर दुसरे गहनतम स्तर असलेले आहे . दोन्ही वैध आहेत पण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून. दोन्ही सत्यांच्या अनेक संदर्भात अनेक सादरीकरणे आहेत, पण आपण त्याच सादरीकरणाचा विचार करू जे परमपूज्य दलाई लामा सामान्य जनतेला संबोधित करताना वापरतात. 

कारण आणि परिणाम  

आपण अनुभवत असलेल्या सर्व गोष्टींचे बाह्य स्तरीय सत्य काय आहे ? हे ते आहे की आपला प्रत्येक अनुभव वर्तमान काळात घडत आहे, कारण तो आपल्या पूर्वीच्या कारणांशी जोडलेला आहे. अन्य शब्दात सांगायचं तर, होणार्‍या किंवा घडणार्‍या सर्व गोष्टी ह्या कारण आणि परिणाम यावरच अवलंबून असतात. भौतिकशास्त्रदेखील या कार्यकारण भावाबद्दल सांगतं, पण ते केवळ एखाद्या चेंडूला लाथेने फटकावणे आणि त्याबरोबर चेंडूचे पुढे सरकणे यासारख्या भौतिक विषयांबद्दलच सांगतं. हा संबध म्हणजे साधं तंत्र आहे, कारण आणि परिणाम. 

एखादी गोष्ट घडून येण्यासाठी कारणीभूत असणारे सर्व घटक विचारात घेतल्यास घटनेची अधिक जटील पातळीवर व्याख्या केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, प्रादेशिक युद्धे यासारख्या गोष्टींकडे पाहिलं तर लक्षात येईल की एकाच कारणामुळे हे सगळं घडत नाही. या समस्या विनाकारण उद्भवत आहेत असं नाही किंवा त्या एखाद्या असंबद्ध कारणामुळे घडत आहेत असंही नाही. त्याऐवजी अशा सर्व गोष्टी अनेक घटकांवर अवलंबून असल्याने घडतात. यामध्ये केवळ वर्तमानातल्या गोष्टीच अंतर्भूत असतात असे नाही तर भूतकाळातील गोष्टीही अंतर्भूत असतात. ज्याप्रमाणे या देशामध्ये, युक्रेनमध्ये, तुम्ही सोव्हिएतचा भूतकाळ किंवा दुसरं महायुद्ध दुर्लक्षित करू शकत नाही. आज उद्भवणार्‍या आर्थिक आणि पर्यावरणशास्त्रसंबंधी समस्या ह्या इतिहासात घडलेल्या सर्व घटनांच्या परिणामस्वरूप आहेत. त्यामुळे आपण असे नाही म्हणू शकत की जे घडत आहे त्यासाठी कुणी एक व्यक्ती किंवा एक घटना दोषी आहे. ह्या घटना घडणे हे कारणे आणि स्थितींच्या प्रचंड मोठया जाळ्यावर अवलंबून असते. हे एक वास्तव आहे, आहे ना ? किंवा तुम्ही अगदी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर : एखाद्या परिवारात काही समस्या असेल तर तुम्ही अर्थातच ते एकाच कोणत्यातरी कारणामुळे आहे किंवा त्याला कारणच नाही असे म्हणू शकत नाही. या परिवाराच्या समस्येत प्रत्येक सदस्याचा काही न काही हातभार आहे. त्याचप्रमाणे आपण असंही म्हणू शकत नाही की परिवरातील प्रत्येक सदस्य ज्याप्रमाणे वागत आहे त्याचा आणि कामाच्या ठिकाणी, शाळेत किंवा मित्रमंडळींमध्ये घडणार्‍या गोष्टींचा काहीही संबंध नाही . प्रत्येक गोष्ट आपला प्रभाव पाडत असते. किंबहुना परिवाराची स्थिती ही समाज आणि त्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेपासून वेगळी राहू शकत नाही. हे सर्व घटक, या ना त्या प्रकारे, समस्यांवर प्रभावही टाकतात. 

इथे, मग, वास्तववादाचा अर्थ असा होतो की सर्व गोष्टी परस्परांशी आतून जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्या इतर सर्व गोष्टींवर प्रभाव टाकतात. घडणारी प्रत्येक घटना ही कारणे आणि स्थितींच्या प्रचंड मोठया जाळ्याच्या परिणामस्वरूप घडत असते. हे वास्तव आहे.

जर भौतिक गोष्टी, वैश्विक विषय आणि पारिवारिक समस्यांबाबत असे होते तर मग आपल्यापैकी प्रत्येकाच्या, वैयक्तिक स्तरावरदेखील असे होऊ शकते का ? सुख आणि दु:खाच्या बाबतीत काय म्हणावं ? त्यांना कारण असतं का? ते विनाकारण उत्पन्न होतात का ? तसं बघितलं तर, कधी कधी मी आनंदी असतो तर कधी मी दु:खी असतो आणि पुढच्या क्षणी मला काय वाटणार आहे हे कळण्याचा काहीही मार्ग नाही. मग हे कोणत्याही कारणाशिवाय, विनाकारण घडतं का  की ते मी आता काय करत आहे यावर अवलंबून आहे ? नाही नाही, हे काही पटण्यासारखं नाही आहे, आहे का? मी एकच पदार्थ दोन वेगवेगळ्या दिवशी खात असू शकतो आणि एक दिवस मला तो खाताना आनंद होऊ शकतो, पण दुसर्‍या दिवशी मला तो खाताना वाईट वाटलेलं असू शकतं. याचा अर्थ असा आहे की याला अन्नपदार्थ कारणीभूत नाही आहे. माझ्या अतिशय प्रिय व्यक्तीसोबत असतानादेखील कधी मला फार आनंद झालेला असू शकतो तर कधी दु:खही झालेलं असू शकतं. मी धनिक असून माझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं चाललेलं असूनही मी दु:खी असू शकतो. 

मग, आनंद आणि दु:ख या भावना येतात कुठून ? अशी कोणती उच्च शक्ती आहे का की जिने बटन दाबल्यामुळे आपण कधी आनंदी होतो तर कधी दु:खी होतो ? माफ करा, मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. मी ही बाब वेडेपणाच्या सीमापार नेत आहे. पण, जर तुमच्या प्रत्येक अनुभवाच्या - जसे की भौतिक गोष्टींची हालचाल किंवा तुमचा हात चुकीने पेटत्या स्टोव्हला लागून जळणे व जखम होणे –मुळाशी कारण आणि परिणाम हा नियम असतो, तर मग सुख आणि दु:खदेखील घटनेच्या आकलनयोग्य कारण आणि परिणामांच्या नियमाच्या अधीन असणे का शक्य असू शकत नाही ? हा प्रश्न आहे आणि या श्लोकातील सापेक्ष सत्याच्या संदर्भातील एक मुख्य मुद्दा आहे. याचा संबंध आपलं वर्तन व आपला अनुभव आणि परिणामत: आपल्याला मिळणारं सुख किंवा दु:ख यांच्यातील संबंधाच्या सत्याशी आहे.

कर्म 

बौद्ध धर्माच्या कर्मविषयक मूलभूत शिकवणीकडे आपण आलो आहोत. कर्म म्हणजे काय ? हा विषय सोपा नाही. याविषयी अनेक स्पष्टीकरणे आणि गैरसमज आहेत पण मूलभूतपणे:

कर्म म्हणजे आपल्या कार्य करण्याच्या, विचार करण्याच्या आणि बोलण्याच्या मार्गाला संचालित करणारी आणि वैशिष्ट्यपूर्णता प्रदान करणारी अनिवार्यता. 

जर तुम्ही याविषयी विचार केला तर असं लक्षात येईल की आपलं वर्तन, मग ते विध्वंसक असो, विधायक असो की तटस्थ असो, एक प्रकारे अनिवार्य असतं. 

  • मी रागावलो आहे आणि मला कुणावर तरी मोठयाने ओरडावंसं वाटतं आणि मग अनिवार्यपणे मोठयाने ओरडतो.
  • मी अतिबचावात्मक आहे आणि मला वाटतं की बाळ सुरक्षित आहे की नाही हे आत जाऊन पाहावं आणि मग अनिवार्यपणे, मी पुन्हा पुन्हा आत जाऊन वाकून बघून येतो जे आवश्यकतेपेक्षा आणि उपयुक्ततेपेक्षा अधिक प्रमाणात असतं. 
  • मला भूक लागली आहे आणि मला वाटतं की जाऊन फ्रीज उघडून काहीतरी खावं आणि मग मी अनिवार्यपणे जातोच. 

ही अनिवार्यता कुठून येते ? आणि, याचा परिणाम काय होतो ? कर्मविषयक शिकवणींमध्ये हेच प्रश्न विचारले जातात. बौद्ध विचारसरणीनुसार जेव्हा तुम्ही अनिवार्यपणे बोलता, विचार करता किंवा कार्य करता तेव्हा तुमच्या मानसिक सातत्यावर संभाव्यता आणि प्रवृत्ती अशा जमतात  की त्यानंतरच्या प्रत्येक क्षणी त्या  तुमच्यासोबत असतात. जेव्हा विविध परिस्थितींमुळे त्या सक्रिय होतात, तेव्हा तुमच्या वागण्याच्या पद्धतीत पुनरावृत्ती  आणण्यासाठी त्या तुम्हाला प्रेरित करतात. त्या भावनेमुळे अनिवार्यता उत्पन्न होते जी तुम्हाला तीच कृती अनियंत्रितपणे पुन्हा पुन्हा करण्यास भाग पाडते. ही अनिवार्यता म्हणजेच खरे कर्म आहे. 

निश्चितच, ही प्रक्रिया मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनही विश्लेषित केली जाऊ शकते:  एका विशिष्ट मार्गाने कृती करण्याने एक तटस्थ मार्ग निर्माण केला जातो आणि दृढ केला जातो, ज्यामुळे आपण अधिक सहजपणे वर्तनपद्धत अनुसरू शकता. बौद्ध धर्म निश्चितच हा भौतिक आधार नाकारत नाही, तर तो या प्रक्रियेकडे आनुभविक दृष्टिकोनातून पाहतो, पण त्याचवेळी हे कारण आणि प्रभाव याचे एक पुढचे उदाहरण म्हणून विश्लेषणही करतो.       

आनंद आणि दु:ख यांचं काय ? बौद्ध धर्म यांचेही कार्मिक कारण आणि प्रभाव या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण देतो. जर तुम्ही दु:खी असाल तर तो तुम्ही अस्वस्थ भावनांच्या प्रभावाखाली केलेल्या तुमच्या अनिवार्य विध्वंसक वर्तनाचा दीर्घकालीन परिणाम असतो. जर तुम्हाला सामान्य आनंद झाला - असा आनंद अधिक काळ टिकत नाही आणि कधीही समाधान करत नाही, पण तरीही चांगलं वाटतं – हा तुम्ही सकारात्मक भावनांच्या, जसे की सहनशीलता आणि दयाळूपणा, प्रभावाखाली  केलेल्या विधायक कार्याचा दीर्घकालीन परिणाम असतो. तो तरीही अनिवार्य असतोच, तथापि, त्यामध्ये स्वत:च्या अस्तित्वाविषयी भ्रम असतो जसा तो अनिवार्यपणे उत्तम कार्य करणार्‍यामध्ये किंवा अनिवार्यपणे पूर्णतावादी असणार्‍यामध्ये असतो. 

या प्रासंगिक संबंधांना आपण कसे समजू शकतो? प्रथमत: आपल्याला विध्वंसक आणि विधायक वर्तनामधील फरक समजून घेणे गरजेचं आहे. या दोघांमधील फरक तुमच्या वर्तनाचा इतरांवर होणार्‍या परिणामांच्या स्वरूपात जोखला जात नाही. उदाहरणार्थ, तुम्ही कुणावर रागावला आहात आणि रागाच्या भरात तुम्ही त्याला सुरीने भोसकून ठार मारलंत, तर ते विध्वंसक वर्तन आहे, पण एक शल्यचिकित्सक म्हणून जीवनरक्षक शस्त्रक्रियेसाठी तुम्ही एखाद्याचे शरीर सुरीच्या साहाय्याने कापले, तर ते विधायक वर्तन असेल. स्वाभाविकपणे, एखाद्याच्या शरीरात सुरी घुसवणे हे कृत्य, वर्तन विध्वंसक आहे की विधायक हे ठरवणारा निकष नाही. हे सर्व प्रेरणेवर अवलंबून आहे : ते कृत्य करण्याच्या वेळी असणार्‍या  मानसिक अवस्थेवर अवलंबून आहे आणि कृत्याने साध्य करू इच्छित असलेल्या लक्ष्यावर अवलंबून आहे. 

जर कृत्याची प्रेरणा ही क्रोध, आसक्ती, लोभ,अज्ञान, ईर्ष्या, अहंकार, स्वार्थ आणि अशा प्रकारच्या अस्वस्थ भावनांमधून आलेली असेल तर ते वर्तन विध्वंसक असेल, मग भलेही ते कार्य त्याच्याजागी चांगलं का असेना. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला आपण चांगला मसाज करत असाल पण त्यामागे त्या व्यक्तीचं लैंगिक शोषण ही इच्छा तुमच्या मनात असेल, तर ते वर्तन विध्वंसक असेल. याउलट जर कृती तुलनेने तणावदायी भावनांपासून मुक्त असेल, तर ती विधायक असेल, मग भलेही ती कृती प्रथमदर्शनी वाईट वाटत असली तरी. उदाहरणार्थ, पालक म्हणून, जेव्हा तुम्ही तुमच्या व्रात्य वर्तन करणार्‍या मुलाला त्याच्या खोलीत पाठवता, तेव्हा त्यात राग नसून प्रेम आणि काळजी असते की तुमच्या मुलाने खोड्या करू नयेत. अनेक दाखल्यांमध्ये, तथापि, हे विधायक वर्तन तरीही अनिवार्य असेल कारण यात ओळख बनवण्याची एक नकळत प्रेरणा मिश्रित असेल- या प्रकरणामध्ये हे कृत्य एक पालक म्हणून ओळख बनवण्याच्या नकळत प्रेरणेमध्ये मिश्रित आहे. 

मग, अस्वस्थ करणार्‍या भावनांवर आधारित असणारे दु:ख आणि विध्वंसक वर्तन यांच्यामधील तसेच आनंद आणि तणावदायी भावनांपासून तुलनेने मुक्त असणारे विधायक वर्तन यांच्यामधील प्रासंगिक संबंध आपल्याला कसा समजतो ? हा केवळ एक अतिशय रोचक प्रश्न नाही, तर अतिशय महत्वाचा सुद्धा आहे कारण बुद्धांनी कर्म, तणावदायी भावना आणि आपल्या अस्तित्वाविषयी असणारा भ्रम ही आपल्या अनुभवामागची कारणे असल्याचे ओळखले. दु:ख आणि समाधानी न करणार्‍या सामान्य आनंदाची ही कारणे आहेत. या दोन्ही प्रकारच्या अनुभवांमुळे होणार्‍या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आपल्याला या दोन्ही अवस्थांच्या पलीकडे जावे लागेल. 

जरा त्याच्याबद्दल विचार करून पाहू. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयी किंवा वस्तुविषयी रागाने बोलता, विचार करता किंवा कृती करता तेव्हा, उदाहरणार्थ, तुम्ही स्थिर असता का ? तुमची ऊर्जा शांत असते का? नाही, ती मुळीच शांत नसते, ती क्षुब्ध असते. अशा वेळी तुम्ही आनंदी असता का? मला वाटत नाही की कुणीही असे म्हणेल की राग किंवा कोणत्याही तणावदायी भावना अनुभवत असताना आम्ही आनंदी असतो. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळी लोभाची भावना अनुभवत असता त्यावेळची ऊर्जा पाहिलीत तर लक्षात येईल की तुम्ही स्थिर नसता कारण तुम्हाला जे मिळेल ते पुरेसं असेल की नाही याविषयी तुमच्या मनात भीती असते. जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीची आसक्ती वाटत असते आणि तुम्हाला त्यांची खूप आठवण येत असते तेव्हा तुम्ही स्थिर नसता आणि तुमची ऊर्जा अशांत असते. याउलट जेव्हा तुम्ही राग, लोभ, स्वार्थ किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही भावना तुमच्या मनात नसतात आणि तुम्ही दयाळू होण्याचा प्रयत्न करत असता, तुमचं मन तुलनेने शांत असतं, तुमची ऊर्जा नितळ असते, असते ना? तुम्हाला आनंद होतो जरी हे एक सूक्ष्म पातळीवरील सुख असतं ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाट्यमयता नसते. जरी तुम्ही एक अनिवार्य ‘समाजसेवक’ असाल आणि प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करू इच्छित असाल, तुमची ऊर्जा अधिक शांत असते आणि रागात कृत्य करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी फायदेशीर करत असता याचा तुम्हाला जास्त आनंद होत असतो. अर्थातच, काहीतरी सकारात्मक कार्य करत असताना चुका होण्याची भीती तुम्हाला वाटत असेल किंवा ते  तितकेसे चांगले नाही आहे अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर अशा विचारांमुळे आणि शंकांमुळे निश्चितच तुम्ही स्थिर राहात नाही.   

इथे लक्षात घेण्याजोगी ही बाब आहे की ही दु:खाची भावना किंवा सापेक्ष सुख तुमचं कृत्य संपल्यावर फार काळ टिकत नाही.  हे दर्शवतं की तुम्ही दुसरं कोणतं काम करत असतानाची तुमची अनुभूती ही तुम्ही पूर्वी केलेल्या कामाने प्रभावित असू शकते. जेव्हा कर्म आणि तुम्ही अनुभवत असलेल्या आनंद किंवा दु:खाचा स्तर यामधील संबंधांविषयी बुद्ध बोलले, तेव्हा एखाद्या कृत्यानंतर लगेचच आपल्याला जे वाटतं त्याबद्दल प्रथमत: ते बोलत नव्हते. ते अधिक दीर्घकालीन प्रभावाविषयी बोलत होते. परंतु, आपले अनिवार्य भावनिक वर्तन आणि ज्याप्रकारे आपल्या शरीरात ऊर्जा वाहते यामधील संबंधांबद्दल आपण विचार करतो तेव्हा आपल्याला बुद्धांचा मुद्दा समजू शकतो. 

आपण अनुभवत असलेल्या सर्व गोष्टींविषयीचे सापेक्ष सत्य हे आहे की प्रत्येक गोष्ट ही कारणे आणि स्थिती यावर अवलंबून उत्पन्न होत असते, आपल्या सामान्य मानसिक अवस्थेसह आणि फक्त आपल्याला काय करावेसे वाटते हेच नाही, पण आपण आनंदी आहोत की दु:खी हेदेखील त्यात अंतर्भूत असते. हा वास्तवाचा एक पैलू आहे – श्लोकातील ओळ त्याला पाया म्हणते, असा मार्ग ज्याद्वारे सर्व गोष्टी स्वीकारार्ह असतात – म्हणजे असा मार्ग ज्याद्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात असतात, संचालित होतात आणि कार्य करतात. 

गहनतम सत्य 

सर्व गोष्टीविषयीचं दुसरं सत्य अधिक सखोल स्तरावर लक्ष केंद्रित करतं. आपल्या कल्पनेच्या अंदाजामुळे जरी गोष्टी अस्तित्वात असल्यासारख्या दिसल्या आणि अशक्य मार्गानी कार्य करत असल्या, तरी ज्या अशक्य मार्गांनी त्या अस्तित्वात असल्यासारख्या वाटतात त्या यथार्थाचं प्रतिनिधित्व करत नाहीत. 

आपल्या कल्पनांनुसार अपेक्षित असणार्‍या गोष्टींच्या पूर्ण अभावाला ‘शून्यता’ किंवा ‘रिक्तता’ म्हणतात.

सवयीच्या भ्रमामुळे आपल्या मनाने कल्पिलेल्या  अस्तित्वात असण्याच्या अशक्य मार्गाचे अनेक सूक्ष्म स्तर असले, तरी आपण सामान्य स्तरापासून या गहनतम सत्याचा अभ्यास सुरू करू शकतो: गोष्टी अशक्य   मार्गांनी अस्तित्वात असत नाहीत. कशा असू शकतात? वास्तव हे आहे की असं काहीच नाही आहे जे आपल्या भ्रमित मनाने केलेल्या अशक्य निरर्थक कल्पनेशी मिळतंजुळतं असेल. ते पूर्णपणे अनुपस्थित असतं, अशी कोणतीही गोष्ट नसते. 

याचं एक उत्तम उदाहरण पाहू : मुलाला वाटतं की त्याच्या बिछान्याखाली राक्षस आहे. खरं तर त्या मुलाच्या बिछान्याखाली मांजर लपले आहे, पण मुलाने त्या मांजरालाच राक्षसाच्या रूपात कल्पना करायला सुरुवात केली आहे. आता, एकदा का त्या मुलाला वाटत आहे की तिथे राक्षस आहे, मग ते निरर्थक जरी असलं, तरी मग ते मूल घाबरतं. त्यामुळे अशा प्रकारच्या मूर्खपणाच्या कल्पनेचा मुलावर प्रभाव पडतो, पण निश्चितपणे त्याने त्या मांजराचा खराखुरा राक्षस होत नाही, कारण राक्षस नावाची गोष्ट मुळात तिथे अस्तित्वातच नाही. इथे शून्यता ही त्या राक्षसाच्या अस्तित्वाच्या पूर्ण अभावाशी संबंधित आहे जी मुलाच्या कल्पनेशी मिळतीजुळती असायला हवी होती. तिथे राक्षस कधीही नव्हता आणि कधीही असू शकत नाही, पण आता ती कल्पना दूर करून पाहा, अजूनही त्या बिछान्याखाली मांजर असेल, असं नाही की तिथे काहीच नाही. 

सवयीमुळे आपण अशी कल्पना करतो की गोष्टी आपल्याला जशा वास्तवात दिसतात तशाच अस्तित्वात असतात. आपल्याला फक्त याची जाणीव असते की आपल्या डोळ्यासमोर त्या क्षणी काय आहे किंवा आपल्याला त्या क्षणी काय वाटत आहे. उदाहरणार्थ, मी आता दु:खी असू शकतो आणि असं वाटतं की ही  भावना कोणत्याही कारणाशिवाय आपोआप उत्पन्न झाली आहे. मी दु:खी आहे. मला माहीत नाही का. मला कंटाळा आला आहे, मला अजून काय काय वाटतं माहीत नाही; मी दु:खी आहे आणि ते मी करत असलेल्या कामाशी किंवा माझ्या संपर्कात असलेल्या लोकांशी संबंधित आहे असं वाटत नाही. अगदी अचानक, मला काय काय वाटू लागतं, मी दु:खी होतो. ते नाट्यमयच असायला हवं असं नाही. असमाधानाचा तो निम्नस्तर असू शकतो. मग, ते कसं भासतं ? ते असं भासतं की त्यामागे काहीही कारण नाही, पण ते अशक्य आहे. ते यथार्थ नाही. हेच गहनतम सत्य आहे.

रूढीबद्ध, सापेक्ष सत्य हेच आहे की प्रत्येक गोष्ट, अगदी माझं दु:खी किंवा आनंदी होणंही, कारण आणि परिणाम या प्रक्रियेमुळे उत्पन्न होते. जरी ते सत्य असलं तरी मला ते तसं भासत नाही. मला असं भासतं की मला जे वाटत आहे ते अचानक आलं आहे आणि विनाकारण आलं आहे. गहनतम सत्य हेच आहे की मला जसं भासतं ते वास्तवाशी मिळतंजुळतं नसतं – ती एखाद्या अशक्य अशा गोष्टीची कल्पना असते. तुम्ही जर विचार केला तर ही खूप सखोल गोष्ट आहे. 

मी आता अजून एक उदाहरण देतो. समजा माझा एक घनिष्ठ मित्र आहे जो कधी कधी माझ्यावर ओरडतो. आमचे संबंध खूप चांगले आहेत पण अचानक माझा मित्र कशाने तरी सटकतो आणि माझ्यावर ओरडू लागतो. मला हे सर्व कसं भासतं? असं वाटतं जणू “ तुझं आता माझ्यावर प्रेम राहिलं नाही आहे!” मी अतिशय निराश होतो कारण माझ्या मनाला माझा मित्र फक्त माझ्यावर ओरडताना दिसतो आणि मी त्याला केवळ त्याच रूपात पाहतो, त्याच रूपात ओळखतो, पण ही कल्पना म्हणजे वास्तव नाही. ते ओरडणं विनाकारण नव्हतं, पण आपल्या दीर्घकालीन मैत्रीच्या संदर्भात त्या घटनेचं एक स्वतंत्र अस्तित्व होतं. असं तुमच्याबाबतीतही घडलेलं असू शकेल. 

होतं काय की आपण त्या मित्रासोबत असलेले आपले समग्र चांगले संबंध विसरतो – इतर सर्व वेळा ज्यावेळी आपण या व्यक्तीबरोबर होतो आणि आपल्यात झालेला पूर्वीचा सुसंवाद – आपण दुर्लक्षित करतो. गोष्ट केवळ एवढीच नाही, आपण व्यापक शक्यतेकडेही दुर्लक्ष करतो. त्याच्या आयुष्यात आपण केवळ एकटेच नाही आणि केवळ आपल्या मैत्रीशिवायही त्याच्या आयुष्यात बरंच काही घडत असतं. माझ्याशिवायही आपल्या मित्राचं एक मोठं आयुष्य आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या भावनांवर आणि वागण्यावर होतो. कदाचित त्याला कामाच्या ठिकाणी वाईट दिवस गेला असेल किंवा त्याच्या पालकांसोबत काहीतरी समस्या उद्भवली असेल, ज्यामुळे त्याच्या मानसिक अवस्थेवर वाईट परिणाम झाला आणि तो माझ्यावर ओरडला. गहनतम सत्य हे आहे की मी जी कल्पना केली ती अशक्य आहे: त्याचं माझ्यावर ओरडणं पूर्णत: वेगळ्या अस्तित्वात होतं आणि आपल्या मैत्रीच्या इतर पैलूंच्या आणि त्याच्या आयुष्यातील इतर घटनांच्या संदर्भापासून पूर्णत: स्वतंत्र होतं, हे सत्य नाही. स्वतंत्रपणे अस्तित्वात असणार्‍या घटनांची ही कल्पना खर्‍या वास्तवात अस्तित्वात असू शकत नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. अशा प्रकारच्या अस्तित्व पद्धतीच्या पूर्ण अभावाला ‘रिक्तता’ म्हणतात किंवा संस्कृतमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘शून्यता’ असे म्हणतात, ज्याचा अर्थ ‘शून्य’ या शब्दाच्या अर्थासारखाच आहे. 

म्हणूनच मग, दोन सत्यांच्या दृष्टीने जेव्हा गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या आणि स्वतंत्र अस्तित्व असण्यापासून रिक्त असतात, तेव्हा कारण आणि परिणाम सिद्धांत लागू होतो. याचं कारण हे आहे की कारण आणि परिणाम यांचं अस्तित्व एकमेकांच्या सापेक्ष आणि एकमेकांवर अवलंबूनच असतं. कोणतीही गोष्ट कारण म्हणून तोपर्यंत अस्तित्वात असू शकत नाही, जोपर्यंत त्याचा काही परिणाम शक्य असेल. जर कोणतीही गोष्ट कोणताही परिणाम साधू शकत नसेल, तर ती कोणत्याही गोष्टीचे कारण म्हणून अस्तित्वात कशी येऊ शकेल? त्यामुळे गोष्टींचं सापेक्ष सत्य म्हणजेच त्यांचा प्रासंगिक संबंध प्रत्येक गोष्टीचं गहनतम सत्य म्हणूनच कार्यरत होऊ शकेल: कोणत्याही गोष्टीचं अस्तित्व अशक्य मार्गाने इतर गोष्टींपासून वेगळं असूच शकत नाही. 

दोन्ही सत्यांचं एकमेकांना पूरक असणं हा, श्लोकात म्हटलं आहे त्याप्रमाणे, पाया असतो, जो असा मार्ग असतो ज्याद्वारे प्रत्येक गोष्ट स्वीकारार्ह असते. ‘पाया’ हेही दर्शवतो की पुढील ओळीत काय येणार आहे त्याचा तो पाया आहे. तो वास्तवाच्या दर्शनावर आधारित आहे, म्हणजेच दोन सत्ये ज्यांच्या आकलनानेच बुद्धांनी चार सत्यांचं कोडं उकललं होतं. 


प्रश्न 

यथार्थाची अनुभूती घेणे 

जेव्हा व्यक्तीची कोणतीही खोटी धारणा नसेल तेव्हा यथार्थाची थेट अनुभूती घेणं शक्य आहे का ? की हे पूर्णत: अशक्य आहे ?

नाही, नाही, हे शक्य आहे. जरी आपली मानसिक क्रियाशीलता प्रत्येक गोष्टीला अशक्य मार्गाने भासमान अस्तित्व दर्शवण्यासाठी उद्युक्त करते, तरीही, ते यथार्थ नसल्याने, भ्रम उत्पन्न करणार्‍या घटकांपासून मुक्त होणे शक्य आहे. याचं कारण असं आहे की वास्तव म्हणून एक गोष्ट अस्तित्वात आहे आणि भ्रमित वास्तव हा मानसिक क्रियाशीलतेचा मूळ स्वभाव नाही. मानसिक क्रियाशीलतेला कोणत्याही भ्रमाशिवाय किंवा भासाशिवाय कार्यरत राहणे शक्य आहे. 

यावरुन आपल्या लक्षात येते की जेव्हा आपली मानसिक क्रियाशीलता वास्तव भ्रमित करते, तेव्हा आपल्या आयुष्यात समस्या, क्लेश आणि दु:ख इत्यादी उत्पन्न होतात, पण आपल्या मनाला असे करण्यापासून रोखणे शक्य असल्याने आपण अधिक काळ आपल्यासाठी समस्या उत्पन्न करू शकत नाही आणि त्या अनुभवत राहू शकत नाही. एकदा का आपल्या लक्षात आलं की आपलं मन हे लक्ष्य गाठू शकतं, मग आपण ते सुरक्षित दिशेने गाठत आपल्या आयुष्यात आणतो, जेणेकरून आपल्या आयुष्यातील वेदना आपण टाळू शकतो आणि रोखूही शकतो. ही सुरक्षित दिशा आपली तथाकथित ‘शरणागती’ आहे, पण आपण तेव्हाच हे लक्ष्य आपल्यासमोर ठेवू शकतो जेव्हा आपली खात्री पटेल की खरोखरच आपण ते गाठू शकतो. आपली खात्री ही आपल्या या जाणिवेपासून उत्पन्न होते की मी जे म्हटलेलं आहे ते वास्तवावर  आणि ते साध्य करण्याच्या आपल्या समर्थतेवर आधारित आहे. 

आपल्या मानसिक अडथळयांना पार करण्याच्या दृष्टीने आपल्याला वास्तवाशी परिचित करून घेण्यासाठी खूप दीर्घ प्रशिक्षणाची आवश्यकता असते. इथेच साधना महत्त्वाची ठरते. या संदर्भाने, साधना म्हणजे वास्तव अनुभवण्याची एक फायदेशीर सवय विकसित करून वास्तवाशी आपला परिचय घडवून देणारी प्रशिक्षण प्रणाली आहे. अशी सवय तुम्ही विकसित केली की जेव्हा कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटता तेव्हा ती तुमच्या डोळ्यांना कशी दिसते यावर फक्त आराखडे न बांधता ती त्यापलीकडे कशी असेल हे बघण्यासाठी तयार होता. किंबहुना, तुम्हाला याची पूर्ण जाणीव असते की ते कधीकाळी बालक होते, त्यांनी बालपण आणि प्रौढपण अनुभवलं आहे आणि आतापर्यंत अनेक गोष्टींनी त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकलेला आहे आणि कदाचित ते म्हातारे होतील त्याबरोबर अजूनही काही गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर पडेल. अशा प्रकारे तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचं संपूर्ण वास्तव संदर्भासहित पाहता आणि जाणू शकता की त्याच्या आयुष्यात घडणार्‍या गोष्टी या परस्परांशी जोडल्या गेलेल्या आहेत. अशा प्रकारच्या दृष्टीमुळे, डोळ्यासमोर असणारे एखादे स्थिर छायाचित्र पाहून केवळ त्याप्रमाणे त्याचा अंदाज बांधण्याची चूक करण्यापेक्षा, तुम्ही त्या व्यक्तीशी अधिक वास्तववादी आणि फायदेशीर मार्गाने वागू शकता.  

मात्र, हे करण्याठी तुम्हाला स्वत:ला तयार करण्याची गरज आहे. अर्थातच, तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील बारीकसारीक गोष्टी आणि त्यांचे परिणाम अगदी अचूकपणे माहिती असू शकत नाहीत, पण त्याने काहीही फरक पडत नाही. या व्यक्तीला इतिहास आहे आणि त्यामधील अनेक घटनांचा त्याच्या आयुष्यावर प्रभाव पडलेला आहे आणि अपेक्षित आहे की त्याला भविष्यही आहे, एवढी जाणीव असणे हेदेखील तुम्हाला त्या व्यक्तीची वास्तविकता समजण्यास मदत करू शकते.  उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही एखादे बाळ पाहता, तेव्हा तुम्ही त्याच्याकडे फक्त एक बाळ म्हणून पाहत नाही, तर एक संभाव्य प्रौढ व्यक्ती म्हणूनही पाहता आणि आता मी जे काही म्हणून करेन त्याचा प्रभाव या बाळाच्या प्रौढ होण्याच्या प्रक्रियेवर पाडणार आहे आणि अशा प्रकारे ते प्रौढ बनणार आहे. तुम्हाला पूर्ण चित्र दिसतं. तुम्ही वास्तवाच्या संपर्कात आहात.

Top