‘बौद्ध धर्माचा जीवनाप्रति दृष्टिकोन’ हा विषय मुख्यतः दैनंदिन जीवनात बौद्ध शिकवण कशी लागू करावी, या संबंधी आहे. त्यांचे आपल्या जीवनात नक्की काय महत्त्व आहे? हे फारच गुंतागुंतीचे आहे. आपण भलेही या शिकवणींचा अभ्यास करत असू आणि नित्य ध्यानधारणा करत असू, पण त्यांचा दैनंदिन जीवनाशी काय संबंध आहे, हे पुरेसे स्पष्ट नसते. व्यावहारिक निकषांवर त्यांचे नक्की काय महत्त्व असते? बौद्ध साधना फक्त एखादा छंद किंवा जीवनातील समस्यांपासून पळ काढण्यासाठी केलेला एखादा विधी असतात का? या साधनांमुळे आपण केवळ एखाद्या छान मनोहारी कल्पनांमध्ये रममाण होतो की या साधना जीवनासाठी खरेच उपयुक्त आहेत? शेवटी बौद्ध शिकवणींचा उद्देशही हाच होता की आपल्या जीवनातील समस्यांपासून आपल्याला मुक्त करण्यासाठी साहाय्यक ठरणे.
मार्गदर्शक सिद्धांत
आपल्या दैनंदिन जीवनात या शिकवणींना लागू करण्यासाठी एका संक्षिप्त प्रार्थनेत फार उपयुक्त मार्गदर्शन मिळते. या प्रार्थनेला निरंतर साधनेच्या तीन पद्धती म्हटले जाते. साधारणतः प्रातःकालीन प्रार्थनेच्या आधी त्यांचे पठण केले जाते. ज्यात खालील ओळींचा समावेश असतो.
कधीही काहीही नकारात्मक करू नका; भव्य विधायक कृती करा; संपूर्ण चित्ताची परिशुद्धी करा. याच बुद्धाच्या शिकवणी आहेत.
बौद्ध शिकवणीतील हे फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिल्या ‘कधीही काहीही नकारात्मक करू नका’ या ओळीतील नकारात्मकता म्हणजे आत्मघातकी, इतरांसाठी समस्या निर्माण करेल असे काही किंवा दीर्घकालीन टप्प्यात आपल्यासाठी हानिकारक ठरेल, अशी गोष्ट होय. त्यामुळे बौद्ध साधनेत आपण पहिली गोष्ट करतो ती म्हणजे स्वतःला किंवा इतरांना हानी न पोहचवण्याचा प्रयत्न होय. दुसऱ्या ‘भव्य विधायक कृती करा’ या ओळीतील विधायक म्हणजे इतरांच्या आणि स्वतःच्या भल्यासाठी अनुकूल असणाऱ्या गोष्टी, ज्या जीवनात सुख घेऊन येतील.
हे साध्य करण्यासाठी तिसऱ्या ओळीत ‘संपूर्ण चित्ताची परिशुद्धी करा’ अर्थात आपल्या मनावर संपूर्ण विजय मिळवा. असे सांगितले आहे. इथे आपल्या विघातक आणि विधायक गोष्टींचा स्रोत अभिप्रेत आहे. यात पहिल्या गोष्टीपासून बचाव करण्यासाठी आणि दुसरी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला स्वतःत सुधारणा करणे आवश्यक असते – विशेषतः आपला दृष्टिकोन आणि आपल्या भावना, ज्या मनातून उत्पन्न होतात. आपला दृष्टिकोन आणि आपल्या भावना, आपल्या इतरांसोबतच्या संबंधांवर, आपल्या वागण्या-बोलण्यावर आणि विचारांवर परिणाम करत असतात. म्हणूनच अखेरच्या ओळीत ‘याच बुद्धाची शिकवण आहेत.’ हे सुचित करण्यात आले आहे.
यथार्थाची जाणीव
जर आपण खोलात जाऊन पाहिले, तर माझ्या एका बौद्ध मित्राने नमूद केल्याप्रमाणे, बौद्ध धर्मातील प्रमुख दृष्टिकोन हा यथार्थवादी आहेः सत्य समजून घ्या आणि यथार्थवादी दृष्टिकोनातून त्याच्याशी व्यवहार करा. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपले वर्तन आणि जाणिवा सत्यावर आधारित असायला हव्यात. यथार्थ म्हणजे काय? यथार्थ कारण आणि परिणाम आहे किंवा ज्याला ‘प्रतीत्यसमुत्पाद’ असेही संबोधले जाते. कारण आणि परिणामांच्या फलस्वरूप परिस्थिती निर्माण होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपल्या विघातक आणि विधायक कृती परिणामांमधून उत्पन्न होतात. आपण आपल्या वर्तनाचे निरीक्षण केल्यास आढळून येईल की एकतर त्यातून समस्या निर्माण होत आहेत किंवा त्यातून सुखप्राप्ती होत आहे, जी आपल्यासोबत इतरांनाही उपयुक्त आहे. पण आपण आपल्या वागण्याकडे गैर-न्यायचिकित्सक वृत्तीने पाहायला हवे. जीवन व्यवहारासाठी गैर-न्यायचिकित्सक वृत्ती फार महत्त्वाची असते.
बौद्ध नैतिकता ही एखाद्या दैवी शक्तीने प्रदान केलेल्या कायद्यांवर किंवा एखाद्या न्यायसंस्थेने ठरवलेल्या नियमांवर आधारलेली नाही. जर आपली नैतिकता अशा कायद्यांवर आधारलेली असेल तर आपल्याकडे विशिष्ट न्यायसूत्रे किंवा गुणदोषांचे विवेचन असेल. जर आपण विशिष्ट कायद्यांचे किंवा नियमांचे पालन केले, तर आपल्याला चांगले समजले जाईल आणि पुरस्कृत करण्यात येईल; आणि आपण त्यांचे पालन केले नाही – आपण कायद्यांचे उल्लंघन केले – तर आपल्याला वाईट समजून शिक्षेस पात्र समजले जाईल. बौद्ध नैतिकता अशी नसते. आपण स्वतःबाबत न्यायचिकित्सक विचार करत असू तेव्हा ही जाणीव होणे फार महत्त्वाचे आहे. हा आपल्या दृष्टिकोनातील खोल बदल आहे, जो करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असतेः स्वतःबाबत न्यायचिकित्सक वागणे थांबविणे – उदाहरणार्थ, आपण फारच वाईट आहोत, फार चांगले नाही असा विचार करणे किंवा आपण जे काही केले ते फारच भयंकर होते, असा विचार करणे.
उलट आपण आपल्या जीवन व्यवहारांकडे कारण आणि परिणामांच्या संदर्भातून पाहायला हवे. जर आपण समस्या निर्माण केल्या किंवा परिस्थिती बिघडवली, तर ते कारण आणि परिस्थितीतून उद्भवलेले असते. ते आपण वाईट आहोत म्हणून घडलेले नसते. जर आपण खोलात जाऊन विचार केला, तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला परिस्थितीची जाणीव झाली नाही, कारण आपण त्याबाबत भ्रमितावस्थेत होतो. शेवटी ही गोष्ट काल्पनिकतेजवळ किंवा प्रक्षेपणाजवळ येऊन थांबते. आपण अतिरेकी विचार करून स्वतःबाबत, परिस्थितीबाबत आणि इतरांबाबतही फालतू काल्पनिक गोष्टी रंगवत राहतो. नंतर आपण विश्वास ठेवून बसतो की याच गोष्टी वास्तवाशी मिळत्याजुळत्या आहेत, पण ते सत्य नसते. आपण स्वतःचे आणि आपण विनाशकारी का वागत आहोत, याचे निरीक्षण केले तर सर्वसाधारणपणे आपल्याला जाणवते की आपण परिस्थितीविषयी काही कल्पना केल्या आहेत आणि त्यानुसारच व्यवहार करत आहोत.
दोन सत्ये
परमपूज्य दलाई लामांनी हल्लीच एका महत्त्वाच्या विषयावर विवेचन केले आहे, ज्यात त्यांनी लोकांच्या जीवनातील समस्या कमी होण्यासाठी साहाय्यक ठरतील अशा संभाव्य सार्वभौम मार्गाविषयी सांगितले आहे. त्यांचे विचार फक्त बौद्ध लोकांपुरते सीमित नाहीत, तर ते वैश्विक काळजीतून बोलतात. ते सांगतात की सर्वप्रथम आपल्याला दोन सत्यांच्या ज्ञानापासून सुरुवात करायला हवी. हाच प्राथमिक टप्पा आहे. या दोन सत्यांकडे आपण फार प्रगत मार्गांनी पाहण्याची गरज नाही, तर प्रत्येकाला स्वतःला त्याच्याशी जोडता येईल, अशा प्राथमिक पातळीवर त्याकडे पाहावे लागेल. एकीकडे आपल्या अतिरेकी विचारांवर किंवा निव्वळ आपल्या रानटी कल्पनांवर आधारलेले आपले प्रक्षेपण असते किंवा दुसरीकडे यथार्थ असते. ही ती दोन सत्ये आहेत.
भ्रमितावस्थेतील मनाला प्रक्षेपण सत्य वाटते, जसे ‘मी अभागी आहे, मी चांगला नाही, कुणीही माझ्यावर प्रेम करत नाही’ किंवा ‘ही जगातली सर्वात भयंकर घटना आहे,’ जेव्हा आपले अन्न करपते किंवा उपाहारगृहात आपण मागवलेले पदार्थ संपलेले असतात. किंवा आपण रहदारीत अडकून पडलो तर आपण कधीच घरी पोहोचणार नाही, असा विचार करणे. आपण अतिरेकी विचार करतो आणि प्रक्षेपण करतो की या भयंकरातल्या भयंकर घटना आहेत आणि जणू वाहतूक रहदारीत अडकून पडल्याने आपण कायम त्याच स्थितीत राहणार आहोत. अशा कल्पनांना आपण सत्य समजतो. ते परंपरागत सत्य असतेः ज्याला भ्रमित मनाने सत्य समजलेले असते.
नंतर एक वास्तविकता असते, गहनतम सत्य. वास्तव हे असते की तिथे रहदारी काही कारणे आणि परिस्थितीच्या परिणामस्वरूप असते. ती घाईची वेळ असते आणि प्रत्येकाला घरी पोहोचायचे असते. अशा स्थितीत आपण काय अपेक्षा करणार? हे हिवाळ्यात थंडीची तक्रार करण्यासारखे आहे. आपण काय अपेक्षा केली होती? हा हिवाळा आहे. हे तसेच आहे.
आपल्याला दोन्ही सत्यातली तफावत ओळखता येणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण अतिरेकी वागत आहोत आणि फालतू गोष्टींचे मानसिक प्रक्षेपण करत आहोत तर आपल्याला ते थांबवता यायला हवे. थोडक्यात आपल्या जीवनात काय घडते आहे, हे समजण्यासाठी या दोन सत्यांमधील फरक ओळखता यायला हवा आणि ती जाणीव आपल्या जीवनात अंतर्भूत करता यायला हवी. हे महत्त्वाचे आहे.
प्रार्थनेच्या पुढील ओळींमध्ये हाच मुद्दा सुचित करण्यात आला आहेः
कुत्रिम संरचनेला समजा एखादा अंधुकसा तारा, एखादी वावटळीतील मशाल किंवा पाण्याचा बुडबुडा, एखादं स्वप्नं, प्रकाशाचा वा ढगांचा क्षणिक लखलखाट.
आपल्या जीवनात आपण अतिरेकी वागत असू आणि एखाद्या क्षुल्लक गोष्टीबाबतही अतिरेकी प्रक्षेपण करत असू तर आपल्याला त्याची जाणीव होणे गरजेचे आहे. आपल्याला जाणीव व्हायला हवी की जे आपल्याला सत्य वाटते, तो खरे तर एक भ्रम, एक स्वप्न, एक बुडबुडा आहे. तो भासतो तितका भरीव, विश्वसनीय नाही. त्यामुळे आपण असा विचार करणार नाही की तो वास्तवाशी निगडीत आहे. आणि असे करणे म्हणजे आपल्या कल्पनेचा फुगा फोडण्यासारखे आहे.
प्रक्षेपण
मुख्यतः दोन प्रकारचे प्रक्षेपण असतात; यातील काही उपयुक्त असतात, तर काही हानिकारक असतात. उपयुक्त प्रक्षेपणे कोणती? आपल्याकडे एखादी सकारात्मक किंवा सामान्य प्रेरणा वा उद्दिष्ट असू शकते. उदाहरणार्थ, आपली एखादी सहल आयोजित करण्याची इच्छा असू शकते. आपण या स्थळापासून त्या स्थळापर्यंत यात्रा करू, अशा पद्धतीचा विचार करून आपण पुढील नियोजन करू लागतो. तेच प्रक्षेपण आहेः आपल्याला असं करायला हवं, ते घ्यायला हवं, आरक्षण करायला हवं, इत्यादी. अशा पद्धतीची प्रक्षेपणे आपल्या नियमित कामांना लागू होतात किंवा अगदी वाणसामानाच्या यादीबाबतही लागू होऊ शकतात. ही प्रक्षेपणे आपल्या कामासंदर्भातील आहेत, एखादी गोष्ट आपण कशी पूर्ण करू त्या संदर्भातील आहेत. आपण हे आपल्या कामाच्या ठिकाणी वार्षिक नियोजन करताना अनेकदा करत असतो.
पण आपल्याला जाणीव असायला हवी की आपले प्रक्षेपण एखाद्या स्वप्नासारखे आहे. त्याचा व्यावहारिक अर्थ काय होतो? तर ते लवचिक असते. प्रार्थनेत सांगितल्याप्रमाणे यालाच कृत्रिम संरचना संबोधतात. त्या कारण आणि परिस्थितीने प्रभावित असतात; कधीकधी त्यांना ‘अनुकूलित संघटना’ म्हटले जाते. त्यांच्यावर कारण आणि स्थितीचा प्रभाव असतो. त्यामुळे जेव्हा आपण योजना आखतो, ती स्थिती कारण आणि परिस्थितीने प्रभावित असते आणि त्यात बदल होऊ शकतो. बदलाचे एक उदाहरण म्हणजे एखाद्या विशिष्ट विमानात जागाच उपलब्ध नसतात. आपण जरी त्या विमानाने जाण्याची योजना आखलेली असते, तरी आपल्याला आपली योजना बदलावी लागते. त्यामुळे याबाबत निराश होऊन तक्रार करत बसण्यापेक्षा आपण वास्तव स्वीकारतो. याचेच आपल्याला प्रशिक्षण आवश्यक आहे. आपण जेव्हा आपल्या मूळ योजनेत अडकलेले असतो आणि आपली मूळ योजना हा एक भ्रम आहे, बुडबुडा आहे किंवा प्रार्थनेत उल्लेख केलेल्या इतर प्रतिमांप्रमाणे असल्याच्या जाणिवेत लवचिकता बाळगत नाही, तेव्हा आपण तिच्यावर घट्ट पकड ठेवून राहतो.
त्यातून काय उत्पन्न होते? त्यातून फार निराशाजनक मानसिक स्थिती निर्माण होते. आपण फार रागीट किंवा वैतागलेले होऊ शकतो. त्यातून आपली परिस्थिती आणखीच खराब होते आणि परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. रहदारीत अडकलेले असताना वाहतुकीला शिव्याशाप देण्याने काहीच साध्य होत नाही; हॉर्न वाजवत राहण्याने काहीच साध्य होत नाही. एकमेव गोष्ट साहाय्यक असते, ती म्हणजे या वास्तवाचा स्वीकार की आपल्याला अपेक्षित असलेली परिस्थिती बदललेली आहे. उदाहरणार्थ, आपल्याला एखाद्या विशिष्ट वेळेवर पोहोचायचे असते, आपली रेल्वे चुकते किंवा उशिरा येते आणि आपल्याला काहीच करता येत नाही. याच रीतीने आपण आपल्या दैनंदिन जीवनात ही शिकवण लागू करू शकतो.
आपल्याला जाणीव असायला हवी की या गोष्टींचा विचार करण्याचे उचित व अनुचित मार्ग असतात. अनुचित मार्ग तो असतो की एखादी गोष्ट जी सतत बदलत्या परिस्थितीने प्रभावित आहे, ती अचल किंवा स्थिर आहे – जसे एखादी योजना स्थिर किंवा पक्की असल्याचे समजणे. हा फारच सर्वसाधारण विचार आहे. आपल्या योजना बदलण्याची गरज असते किंवा आपण नियोजन केल्याप्रमाणे गोष्टी घडत नसतील, तर त्यात बदल करणे आवश्यक असते. आपण रहदारीत अडकू शकतो, लोक भेट रद्द करू शकतात किंवा अशा इतरही अनेक गोष्टी. शांतिदेवानी बोधिसत्वचर्यावतार मध्ये याविषयी योग्य सल्ला दिला आहेः
जर यात सुधारणा करणे शक्य आहे, तर त्यासाठी मनःस्थिती बिघडवण्यात काय अर्थ आहे? आणि जर यात सुधारणा करणे शक्य नसेल, तर मनःस्थिती बिघडवून उपयोग काय?
हा फार मूलभूत सल्ला आहे. एक अशी गोष्ट आहे, जी आत्मसात करून तिला आपल्या जीवनाचा भाग करायला हवे. जर जीवनात आपल्यासमोर समस्याजनक परिस्थिती असेल आणि ती बदलणे शक्य असेल, तर ती बदला. जर ती आपल्याला बदलता येत नसेल आणि ती बदलण्यासाठी आपण काहीच करू शकत नसू, तर निराश होण्यात काहीच अर्थ नाही. उदाहरणार्थ, एखाद्या प्रवासादरम्यान आपले साहित्य हरवले आणि काही दिवस ते आपल्याला मिळणार नसेल. तर आपण फक्त वास्तव स्वीकारायला हवे.
काही आठवड्यांपूर्वी मला फार गमतीशीर अनुभव आला. मी परमपूज्य दलाई लामांचा उपदेश ऐकण्यासाठी हॉलंडला जात होतो. मी अमस्टरडॅमसाठीच्या विमानासाठी विमानतळावर गेलो. आणि चेक इनसाठी वाट पाहत होतो. तेवढ्यात तिथली संगणकीय यंत्रणा बंद पडली. तिथे फार मोठी रांग होती. आपल्या विमानासाठी वेळेत पोहोचता येणार नाही, यासाठी प्रत्येक जण वैतागला होता. एका क्षणी जेव्हा सगळे लोक स्वतःचे तिकिट आणि पासपोर्ट तपासू लागले आणि मी ही जेव्हा तसेच करू लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की मी माझा पासपोर्ट सोबत घ्यायला विसरलो होतो. मी पासपोर्टशिवाय चेक इन करू शकत नव्हतो आणि माझ्याकडे जर्मन ओळखपत्रही नव्हते.
माझ्या संबंध आयुष्यात प्रथमच असं घडलं होतं. मी काय करायला हवं? मी विमानतळावर आहे आणि घरी परत जाऊन पासपोर्ट घेऊन येऊन विमान पकडणे कसेच शक्य नाही. मी अशा परिस्थितीत निराश व्हायला हवे का? त्याने काहीच फायदा होणार नाही. मी रागवायला हवे का? त्यानेही फायदा होणार नाही. मी सूचना पटलाकडे जाऊन दुसरे नंतरचे विमान आहे का विचारले. आणि त्या विमानतळावरून दुसरे विमान नव्हते. पण शहराच्या दुसऱ्या बाजूच्या विमानतळावरून रात्री दुसरे विमान होते. याचा अर्थ संध्याकाळी मला ज्या कार्यक्रमाला हजेरी लावायची होती, तो कार्यक्रम चुकणार होता. काय करणार? मी घरी गेलो, दुसऱ्या विमानाचे आरक्षण केले, त्या रात्री प्रवास केला. बस्स.
अशा प्रकारचे अनुभव एखाद्या परीक्षेसारखे असतात, ज्यातून आपण खरंच कितपत बौद्ध शिकवण अंगीकारली आहे, हे स्पष्ट होते. संपूर्ण प्रकाराबद्दल आपण निराश होतो आणि वैतागतो का? जर आपण रागावलो तरी ते आपल्यासाठी हानिकारक असेल आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. आपण तात्काळ वास्तवाचा स्वीकार करणे गरजेचे असते आणि आपल्याला जे करणे गरजेचे आहे ते करणे अपेक्षित असते. अशा रीतीने व्यावहारिक पातळीवर आपल्या प्रक्षेपणावर ठाम राहण्यापेक्षा चंचलतेसंबंधीची बौद्ध शिकवण अंतर्भूत करून उपयोगात आणावी लागेल. उदाहरणार्थ, जसे मी दुसरे विमान पकडण्याचा विचार केला, त्याजागी अमस्टरडॅम ते रोटरडॅम रेल्वे घेतली असती आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाला पोहोचलो असतो. ते एखाद्या स्वप्नासारखे असते, जे कधीच घडू शकले नसते. ठीक आहे, तर, आपण आता पर्यायी योजना करू. ध्यानधारणेसाठी दिलेल्या मूलभूत सूचनांशी याचा संबंध आहेः आपण कोणत्याही अपेक्षाशिवाय ध्यान करणे गरजेचे असते. आपल्या काही अपेक्षाच नसतील, तर आपली निराशाही होणार नाही. बौद्ध धर्माच्या व्यावहारिक अनुकरणासाठी ही फार मूलभूत बाब आहे.
माझ्या बहिणीला दोन मुले आणि चार नातवंडे आहेत. मी तिला नेहमी सांगत असतो की ते तिला फोन करतील, अशी तिने आशा करू नये. जर आपण तशी अपेक्षा ठेवली, तर आपल्या पदरी निराशा पडेल कारण ते तसे वागणार नाहीत. आपल्याला कोणाशी बोलायचे असेल तर आपण स्वतः त्यांना फोन करू शकतो. साधीसरळ गोष्ट आहे. आपण वास्तवाचा स्वीकार करतो. आपण ते बदलू शकतो, तर बदलू शकतो. जर आपण ते बदलू शकत नाही, तर बदलू शकत नाही. आपले हरवलेले सामान ज्या वेळी पोहोचायचे आहे, त्याच वेळी पोहोचेल. आपल्याला त्याच्या स्वीकार करायला हवा.
मी पुन्हा सांगेन, प्रक्षेपणाचे दोन प्रकार असतात. एक उपयुक्त असतो- आपल्याला विशिष्ट योजना आखणे आवश्यक असते. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असेल तर आपल्याला विमानाचे आरक्षण करायलाच हवे. तर दुसऱ्या प्रकारच्या योजना उपयुक्त नसतात, तर त्या हानिकारक असतात.
प्रक्षेपण आणि व्यावहारिक अंगीकार
आपल्या हानिकारक प्रक्षेपणांकडे वळण्यापूर्वी आपल्या परिस्थितीचा फेरविचार करणे योग्य ठरेल. आपण कितपत लवचिक आहोत? आपल्या नियोजनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत, तेव्हा आपण किती अस्वस्थ होतो? एखादी गोष्ट विशिष्ट पद्धतीनेच व्हावी, यासाठीच्या नियोजनाबात आपण किती हट्टी असतो; उदाहरणार्थ, एखादे काम त्याच ठरावीक वेळेत पूर्ण व्हायला हवे; किंवा जर आपण उपाहारगृहात गेलो असेल, तिथे अगदी आपल्याला हवे तसेच अन्न मिळायला हवे आणि ते वेळेत मिळावे. एखाद्या विशिष्ट योजनेला किंवा अपेक्षेला आपण कितपत चिकटून राहतो? आपण निराश होतो, ती भावना किती दुःखकारक असते, याचे निरीक्षण करा. आपण आपल्या अपेक्षांमुळे निराश होतो. आपल्याला वाटत असते की आपल्या योजना वास्तवात नियोजित प्रकारे तशाच प्रत्यक्षात उतरायला हव्या.
पण सर्व काही कारणे आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. उपाहारगृहात आपल्याला हव्या असलेल्या पदार्थांचाच तुटवडा असू शकतो. ही कारणे आणि परिस्थिती आहे. रेल्वे उशिरा येते ; आपण रहदारीत अडकतो आणि विमान सुटते. ही कारणे आणि परिस्थिती आहे. आपण आपल्या दृष्टिकोनाबाबत किती लवचिक आहोत, याचे क्षणभर परीक्षण करा. आपल्याला स्वतःच्या दृष्टिकोनात सुधारणा करायला हवी का? चंचलतेविषयी फक्त निरीक्षण किंवा श्वासांवर लक्ष केंद्रित करून श्वास अस्थिर झाल्याची जाणीव होणे पुरेसे नाही. निरीक्षण गरजेचे असले तरी ते आपल्या जीवनात कसे लागू करायचे? चंचलतेविषयक ज्ञानाचा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
एखाद्या व्यावहारिक उदाहरणाचा विचार करू, जसे एखादी प्लेट हातातून पडते आणि ती तुटते. त्याबाबत तुमची भावनिक प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही स्वयंपाक करत आहात आणि तो करपतो, ते तुम्ही भावनिक दृष्ट्या कसे हाताळाल? त्यातूनच आपली प्रगती स्पष्ट होते. तुम्ही संगणकावर किंवा फोनवर काहीतरी करू इच्छिता आणि ते काम करत नाही. तुम्ही तात्काळ दुसरा काही तरी प्रयत्न कराल का? की निराश व्हाल? की तुम्ही शिवीगाळ कराल?
शिकवणीचा हा व्यावहारिक अंगीकार आहे. जर आपण तशा परिस्थितीत निराश होत असू आणि पर्यायी योजनेचा स्वीकार करण्यास सक्षम नसू – तशा परिस्थितीत फोनवर किंवा संगणकावर काम करण्याचा दुसरा मार्ग नक्कीच असतो – जर आपण निराश होत असू, तर त्यातून आपल्याला संकेत मिळतो की त्या क्षेत्रात स्वतःत सुधारणे करणे आवश्यक आहे.
हानिकारक प्रक्षेपण
वर उल्लेखिल्याप्रमाणे, दोन पद्धतीचे प्रक्षेपण असतात, एक नियोजनासाठी उपयुक्त असतो आणि दुसरा हानिकारक असतो. विशिष्ट प्रकारच्या गोष्टींच्या कल्पना, जसे ‘मी दुर्दैवी आहे; माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही; ही व्यक्ती भयंकर आहे आणि इत्यादी’ हानिकारक असतात. किंवा जेवण करपले वा रेल्वे चुकली तर फार मोठी आपत्ती ओढवेल, असा विचार. अशी हानिकारक प्रक्षेपणे अतिरेकी विचारावर आधारलेली असतात.
क्रोधातून आपण एखाद्या गोष्टीतील नकारात्मक गोष्टींना अतिरेकी महत्त्व देत त्यांना आणखी मोठे करतो. अनेक लोकांनी हे मेट्रो किंवा सबवे बाबतीत अनुभवले असेलः आपण शिड्या उतरतच असतो, तोपर्यंत रेल्वे प्लॅटफार्म सोडते. आपण याचा सामना कसा करू? अशा वेळी आपण अपशब्द उच्चारू का? पाच दहा मिनिटे वाट पाहावी लागली, तर ती जगातली सर्वात वाईट गोष्ट ठरते का. पण आपण त्याचं फारच अवडंबर माजवतो आणि क्रोधित व निराश होतो. त्यातून आपण दुःखी होतो आणि त्याचा काहीच फायदा होत नाही, हो ना?
लोभ आणि आसक्तीच्या भावनेत आपण विचार करतो की एखादी विशिष्ट गोष्ट जगातली सर्वात सुंदर गोष्ट आहे किंवा आपण जगातल्या सर्वोत्तम व्यक्तीच्या संगतीमध्ये आहे. आपण प्रेमात पडून अतिरेकी वागतो आणि समोरच्या व्यक्तीतल्या चांगल्या गोष्टींकडे अतिरेक दृष्टिकोनातून पाहतो. आणि त्या व्यक्तीने आपल्या अतिरेकी अपेक्षांप्रमाणे वागावे, अशी अपेक्षा करतो, पण ते कोणालाच शक्य होत नाही. मग आपण निराश होतो.
असे दृष्टिकोन समस्याजनक असतात. अशा स्थितीत बहुतांश वेळा आपला दृष्टिकोन संकुचित होतो. हे विशेषतः अशा परिस्थितीत घडते जेव्हा आपल्याला जीवनात काही कटु अनुभव येतात किंवा आपल्याला नाकारले जाते किंवा एखादी व्यक्ती एखादी अप्रिय गोष्ट करते. ज्याच्यासोबत आपण नात्यात आहोत ती व्यक्ती आपल्याला आवडणार नाही असे वागते, जसे आपल्या वाढदिवसाला फोन करत नाही किंवा आपल्यावर रागवते, ओरडते किंवा असेच आणखी काही. तशा स्थितीत आपण फक्त त्या एका घटनेवर लक्ष केंद्रित करतो. नात्याचा संपूर्ण आवाका पाहत नाही. आपण नात्याला निव्वळ त्या एका गोष्टीशी जोडून पाहतो आणि त्यामुळे आपल्याला राग येतो.
आपल्यासमोर समस्या असतील किंवा आपण आजारी असू, तर कदाचित आपण असा विचार करू की ‘मी फारच बिचारा आहे. मला एकट्यालाच असे सहन करावे लागते.’ पुन्हा हाही एक संकुचित दृष्टिकोन आहे. हे व्यापक दृष्टिकोनाच्या अभावातून येणारे प्रक्षेपण आहे. उदाहरणार्थ, ‘कुणीच माझ्यावर प्रेम करत नाही.’ जर आपण आपले पूर्ण जीवन न्याहाळून पाहिले, तर आपल्या संपूर्ण जीवनात आपल्यावर प्रेम करणारी एकही व्यक्ती सापडणार नाही का? आपल्या कुत्र्याचे आपल्यावर प्रेम नसते का? कुणीच आपल्यासोबत चांगले वागलेले नसते का किंवा कुणीच आपली काळजी केलेली नसते का? जसे दुसऱ्या उदाहरणात म्हटले आहे की ‘मी किती दुर्दैवी आहे’ ते खरेच तसे आहे का? हे खरे आहे का की आपण कधीच कोणत्याच गोष्टीत यशस्वी झालो नाही ? आपण चालायला शिकण्यात यशस्वी झालो आहे. अगदी प्राथमिक टप्प्यात आपण शौचालय प्रशिक्षणात यशस्वी झालो आहे. त्यामुळे आपण अर्थातच काही गोष्टींमध्ये यशस्वी झालो आहे.
शिवाय आपले प्रक्षेपण वस्तुस्थितीला धरून नसते; पण ते वास्तव असावे असा आपला आग्रह असतो आणि त्यामुळे आपल्याला विश्वास वाटतो की ते तसेच आहे. आपल्याला अपेक्षा असते की आपला जोडीदार जगात सर्वोत्कृष्ट असावा. सर्वात चांगलं उदाहरण म्हणून दक्षिण ध्रुवीय प्रदेशातील पेंग्विनकडे पाहता येईल, ते जसे जीवनभर एकाच जोडीदारासोबत राहतात. आपल्या सर्वांना सगळे पेंग्विन एकसारखे वाटतात, पण त्यांच्यासाठी मात्र त्यातील एक फार विशेष असतो. आणि निःसंशयपणे पेंग्विनच्या दृष्टिकोनातून माणूसही अगदी तसाच असेल; पण आपल्यावर दुसरे कोणी प्रेम करत असेल तर आपल्याला फरक पडत नाही. तर आपल्याला फक्त विशिष्ट तू - ती विशिष्ट व्यक्तीच – त्या ‘तू’चे प्रेम हवे असते. अशा प्रकारचा अतिरेक उपयोगाचा नसतो.
यथार्थाचा अस्वीकार
हानिकारक प्रक्षेपणातील आणखी एक घटक म्हणजे वास्तवाचा अस्वीकार होय, इतरांची वस्तुस्थिती समजून न घेता, त्याचा अस्वीकार करणे. असे तेव्हा घडते जेव्हा आपण लोकांचे वस्तुकरण करतो आणि ते ही भावभावना असणारे मानवी जीव असल्याची जाणिवही न ठेवता त्यांचे वस्तुकरण करतो. बौद्ध धर्मात एक प्रसिद्ध वाक्य आहेः ‘प्रत्येकाला सुखी होण्याची इच्छा आहे आणि कुणालाही दुःख नको आहे.’ इतर लोकांच्या संदर्भात आपण हे किती गांभीर्याने पाळतो? बहुतांश वेळा आपण हे विसरतो आणि अशा रीतीने वर्तन करतो की त्याचा इतरांवर काय परिणाम होईल, याने आपल्याला काही फरकच पडत नाही. जसे या परिस्थितीत कारण आणि परिणामांचा संबंधच नसतो आणि इतर कुणाला भावनाच नसतात.
उदाहरणार्थ, आपल्या कार्यालयातील एखादा सहकारी खूपच अप्रिय आणि नकोसा वाटणारा आहे. पण तरीही त्या व्यक्तीला आनंदाची अपेक्षा आहे आणि त्याला दुःखी व्हायचं नाही. त्यांना आपण लोकांना आवडावे असेच वाटत असते, आपण लोकांना आवडू नये, असे वाटत नाही. ते अप्रिय वर्तन करतात कारण लोकांना कोणत्या गोष्टींमधून आनंद मिळेल, याबाबत ते भ्रमात असतात. पुन्हा हे गैर-न्यायचिकित्सक वर्तनाशी संबंधित आहे. शांतिदेवांनी सांगितल्याप्रमाणे, आपण आपला आनंद आपला शत्रू असल्याप्रमाणे नष्ट करतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपण स्वतःहूनच दुःखाच्या कारणांच्या दिशेने धावत असतो. जर एखादा अतिशय स्वार्थी वृत्तीने वागत असेल तर परिणामस्वरूप प्रत्येक जण त्याला नाकारणारच. कुणालाच ते ज्या पद्धतीने वागत आहेत, ते रुचणार नाही, पण त्या विशिष्ट व्यक्तीला वाटत राहील की त्याच्या तशा वागण्याने त्याला आनंद लाभेल.
तुम्ही दुसऱ्यांच्या संपर्कात येता, तेव्हा हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहेः ‘तुझी सुखी होण्याची अपेक्षा आहे, ती अगदी माझ्यासारखीच आहे. तुलाही माझ्यासारख्याच भावना आहेत. माझ्यासारखेच तुलाही दुःखी व्हायचे नाही किंवा इतरांच्या पसंतीस पडायचे आहे. मला जसे इतरांनी आपल्याला नाकारू नये असे वाटते, तसेच तुलाही वाटते.’ आपण बस किंवा रहदारीत असताना याचा सराव करणे फार उपयुक्त ठरू शकते. प्रत्येकाला आपल्या इच्छित स्थळी पोहोचायचे असते आणि कुणालाच रहदारीत अडकून पडायचे नसते, जसे आपल्याला तिथे अडकून पडायचे नसते. तिथे इतरांवर वैतागण्याचे काही कारणच नाही. प्रत्येकाला आपल्याप्रमाणेच भावना असतात.
सर्वात उपयुक्त ओळ आहे कीः ‘अगदी बुद्धही प्रत्येकाला आवडत होता असे नाही; त्यामुळे आपण ही अपेक्षा का करायची की आपण प्रत्येकाला आवडू?’ किंवा ‘त्यांनी येशुला सुळावर चढवले, तर आपण स्वतःसाठी काय अपेक्षा करणार?’ प्रत्येक जण आपल्यावर प्रेम करेल, असे थोडेच आहे? एखादा आपल्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला पसंत करत नसेल किंवा सकारात्मकपणे व्यक्त होत नसेल तर ते फार उपयुक्तही ठरू शकते. जीवनात व्यक्तिगत पातळीवर जेव्हा आपण अनपेक्षित गोष्टी किंवा प्रक्षेपणांना सामोरे जात असू तेव्हा या ओळी उपयुक्त ठरू शकतात. आपण असा विचार करू शकतो की ‘मी कायम बरोबरच असायला हवे आणि प्रत्येकाने माझे ऐकून घ्यायला हवे.’ पण त्यांनी तसे का करावे?
लक्षात ठेवा, आपण इथे वास्तव आणि अवास्तवात फरक करत आहोत. यात अधिक चांगल्या रीतीने गोष्टी करण्याचा, सुधारणा करण्याचा, अधिक लक्ष केंद्रित करण्याचा किंवा तत्सम उद्देश असू शकतो. आपण सुधारणा करण्यास सक्षम असू तर तशी अपेक्षा ठेवणे वास्तववादी अपेक्षा आहे. पण जेव्हा आपण विचार करतो की ‘मी कायम तुझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असायला हवे. तू कायम माझ्यासाठी उपलब्ध असायला हवे’ आणि आपला जोडीदार कामावरून घरी येतो आणि दिवसभर त्याच्या आयुष्यात काहीही नवीन घडलेले नसते, त्यामुळे आता ते पूर्णतः आपल्यासाठी उपलब्ध असायला हवेत – ही अवास्तव अपेक्षा आहे, नाही का?
एका क्षणासाठी आपण अवास्तविक अपेक्षा केव्हा बाळगतो, यावर लक्ष पुरवू. अशा किती अवास्तव अपेक्षा असतात आणि त्यातील किती अपेक्षांबाबत आपल्याला जाणीव होते की त्या अवास्तव आहेत? आपल्या लक्षात येते का की त्या हानिकारक आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने आपल्याला हानी पोहोचू शकते? त्यातून उद्भवणारी भावनिक वेदना आपण समजू शकतो का? दलाई लामा त्यांना आपले अंतरिक संकटदाते म्हणतात.
पश्चिमेतील अनेक लोक इथल्या न्यायचिकित्सक तत्त्वज्ञानाने प्रभावित आहेत. आमच्यापैकी अनेकांसाठी त्रासदायक असलेला विचार म्हणजे आपण पुरेसे चांगले नाही. हे फारच न्यायचिकित्सक आहे. आपल्याला याची जाणीव ठेवायला हवी की कोणीही आपला न्यायनिवाडा करत नाही आहे आणि आपणही स्वतःचा न्यायनिवाडा करता कामा नये. कदाचित आपण भ्रमित झालेले असू; पण त्याचा अर्थ आपण असक्षम किंवा वाईट आहोत, असा होत नाही. हे फारच आत्मघातकी प्रक्षेपण आहे.
दोन सत्यांमध्ये फरक ओळखता येणे फार आवश्यक आहे. आपल्याला जे यथार्थ वाटते – जसे आपण फार चांगले नाही – खरेतर असा विचार चुकीचा आहे. त्यावर विश्वास ठेवण्यात काहीच अर्थ नाही, त्यामुळे आपल्याला त्यावर विश्वास ठेवणे थांबवायला हवे आणि कारण व परिणामांच्या दृष्टिकोनातून जीवन व्यतीत करायला हवे. जर आपल्याला काही साध्य करायचे असेल, तर त्याची कारणे तयार करायला हवीत. हे शक्य असेल, तर हे करा. आणि हे शक्य नसेल तर वास्तवाचा स्वीकार करा. उदाहरणार्थ, जर आपल्याला चांगली नोकरी हवी आहे, तर आपल्याला ती शोधावी लागेल आणि चमत्कार होऊन आभाळातून काहीतरी आपल्या पदरी पडेल किंवा कुणीतरी ते आपल्याला आणून देईल म्हणून वाट पाहता कामा नये. त्यासाठी कारणे आणि परिणाम असतात. आपण शक्यतांचा स्वीकार करून त्यातून लाभ उठवायला शिकायला हवे आणि नुसते परिस्थितीत अडकून राहून ती किती वाईट आहे, असा विचार करत बसणे कामाचे नाही. अशा विचारांमुळे आपण पुढे पाऊल टाकू शकत नाही आणि त्या परिस्थितीबाबतही काही करणे शक्य नसते. अशा रीतीचे विचार नकारात्मक असतात. जसे प्रार्थनेत नमूद केले आहे कीः कधीही काहीही नकारात्मक करू नका. हे फक्त आपल्या वागण्याबोलण्याला लागू होत नाही, तर वैचारिक प्रक्रियेसही लागू होते. यात आपण स्वतःबाबत आणि इतरांबाबत काय विचार करतो, ते ही अंतर्भूत असते.
चार आर्यसत्य
मानसिक प्रक्षेपणाला यथार्थापासून वेगळे करण्याचा दृष्टिकोन म्हणजेच चार आर्यसत्यांचा जीवनातील अंगीकार होय. जसे परमपूज्य भर देतात की, आपल्याला दोन सत्यांकडून चार सत्यांच्या दिशेने जायला हवे. आपल्याला जाणीव व्हायला हवी की आपली दुःखे, अर्थात पहिले आर्यसत्य, कारणांमधून उत्पन्न होतात, अर्थात दुसरे आर्यसत्य. याबाबत आपली मानसिक प्रक्षेपणे असतात आणि त्यात अज्ञान आणि ही प्रक्षेपणे य़थार्थाशी संबंधित नसल्याच्या तथ्यांबाबतच्या अनभिज्ञतेची भर पडते. जर आपल्याला हे खरेच थांबवायचे असेल – तिसरे आर्यसत्य – समस्यांच्या निरोधासाठी, आपल्याला यथार्थाची जाणीव असायला हवी – चौथे आर्यसत्य – आणि आपल्या कल्पकतेचा फुगा फोडायला हवा.
हे साध्य करण्यासाठी आपण बौद्ध असण्याची आवश्यकता नाही. जसे दलाई लामांनी सांगितले आहे की, हा वैश्विक दृष्टिकोन आहे, आणि त्याला आपण केवळ चार आर्यसत्ये म्हणूनच पाहायचीही गरज नाही. आपल्याला त्याला काहीच संबोधायची गरज नाही. अशा प्रकारे ती काय आहेत, याबाबत चर्चाही न करता आपण त्या तीन रत्नांच्या दिशेनेच मार्गस्थ होऊ. आपल्याला जाणीव होते की आपल्या समस्यांची कारणे नष्ट केल्यास समस्याही आपोआप नष्ट होतील. ज्या स्तरावर कारणे आणि समस्या नष्ट होतात आणि ज्या ज्ञानाने हे साध्य होते, त्याला धम्म रत्न म्हणतात. ही तिसरी आणि चौथी आर्यसत्ये आहेत. ज्यांनी ही पूर्णपणे साध्य केली ते बुद्धत्व प्राप्त करतात, तर संघ हे अंशतः साध्य करतात.
अशा रीतीने आपल्याकडे दोन सत्ये, चार आर्यसत्ये आणि त्रिरत्ने आहेत आणि त्यासाठी आपल्याला बौद्ध असण्याचीही गरज नसते. बौद्ध होण्यासाठीचा विभाजक म्हणजे भविष्यातील जीवन सुधारण्याचे उद्दिष्ट होय. अर्थात यासाठी पूर्वायुष्य आणि पुनर्जन्म यावर विश्वास असायला हवा. जसे परमपूज्य दलाई लामांनी सांगितले आहे, अतिशाच्या काळात तिबेटमध्ये प्रस्थापित करण्यात आलेला पारंपरिक सूत्र दृष्टिकोन म्हणजेच लाम-रिम, अर्थात त्रिस्तरीय ध्यानधारणा. याच्या अंगीकारातून आपण भविष्यातील जीवन सुधारू शकतो, पुनर्जन्माच्या अनियंत्रित चक्रातून मुक्ती मिळवू शकतो आणि इतरांनाही पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवून देण्यासाठी साहाय्यक असणारी ज्ञानप्राप्ती साध्य करू शकतो. ही संपूर्ण व्यवस्था भविष्यातील जीवन आणि पुनर्जन्माच्या संकल्पनेवर आधारित आहे. या चार विचारांमुळे चित्त धम्मासाठी परावर्तित होते, ज्याचाच अर्थ त्याचा पुनर्जन्म होतो. हा संपूर्ण मार्ग पुनर्जन्मासारखी एखादी गोष्ट अस्तित्वात असल्याच्या विश्वासावर आधारलेला आहे.
पाश्चिमात्त्यांसाठी किंवा अगदी सर्वसाधारण दृष्टिकोन असणाऱ्यांसाठी दोन सत्ये, चार आर्यसत्ये आणि त्रिरत्नांपासून सुरुवात करणे चांगले आहे. त्यानंतर आपण कारणे आणि परिणामासंबंधी चर्चा करू शकतो; पण आपण निरपेक्ष आरंभ केल्यास कारणे आणि परिणामांना अर्थ राहत नाही. हे सर्व आपल्याला अनादी चित्ताच्या दिशेने नेते आणि आपण अनादी चित्त समजून घेतल्यास आपल्याला पुनर्जन्म समजेल. या टप्प्यावर आपल्याला भविष्यातील जीवन आणि अनियंत्रित पुनर्जन्माच्या चक्रातून अर्थात संसारातून मुक्तीची इच्छा असू शकते. लाम-रिम क्रमिक मार्गाशी आपला संबंध केवळ पुनर्जन्माच्या संदर्भातून असेल तर तो स्थिर असणार नाही. याचा अर्थ या आधारावर लाम-रिम साधना करणे उपयुक्त नाही, असा नाही, पण ते अधिक स्थिर तेव्हाच असेल जेव्हा आपण अशा जागी पोहचू, जिथून परंपरागत तिबेटी प्रारंभ करतात, अर्थात पुनर्जन्मावरील विश्वास.
या दोन सत्यांची योजना ही शिकवण प्रत्यक्ष जीवनात अंगीकारण्याचे मार्गही सुचित करते. प्रक्षेपण आणि यथार्थातील फरक ओळखण्यापासून याचा आरंभ होतो. आपल्याला आपण केव्हा प्रक्षेपण करत आहोत याची आणि त्या प्रक्षेपणातील गैरविश्वासाची जाणीव होते. आणि हे सर्व न्यायचिकित्सक न होता साध्य करता येते. उदाहरणार्थ, ‘मला वाटले होते की तू मला त्याविषयी मदत करणार आहेस, पण तू नाही केलीस’ किंवा ‘मला वाटले होते की तू हे नीट करशील, पण तू तसे केले नाहीस.’ आपल्या कामात आपण कुणावर तरी या अपेक्षेने जबाबदारी सोपवलेली असते की ते चांगले काम करतील, पण ते करत नाहीत. मग आपण काय करतो? आपण ते स्वतः करतो. आपण त्या व्यक्तीवर वैतागतो का? त्याने काहीच साध्य होत नाही. त्यांना भविष्यात तशा पद्धतीचे काम देऊ नका किंवा ते कसे करावे, याबाबत शिकवत बसू नका. वास्तवाला धरून वागा. कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय ते चांगलं काम करतील, या आपल्या अपेक्षेमुळे आपण निराश होतो. ते करतील अशी आपण आशा करू शकतोः ती गोष्ट निराळी आहे. पण अपेक्षा नसतील तर निराशाही असणार नाही.
जीवन आपले प्रशिक्षण केंद्र आहे
आपण इतकेही भोळसट होऊ इच्छित नसतो की इतरांचे चांगले गुण ओळखू शकणार नाही. आपल्याला ही जाणीव होणे आवश्यक असते की जशा आपल्या भावना असतात, तशाच इतरांच्याही असतात. जसे आपल्याला नाकारलेले किंवा दुर्लक्षित केलेले आवडत नाही, तसे इतरांनाही आवडत नाही. या जाणिवा आपल्याला जीवनात लागू करण्याची आवश्यकता असते. हे साध्य करण्यासाठी प्रार्थनेच्या तिसऱ्या ओळीत नमूद केल्या प्रमाणे आपल्याला चित्ताची परिशुद्धी आवश्यक असते.
आपल्या जीवनाला प्रशिक्षण केंद्राप्रमाणे पाहिल्यास फार उपयुक्त ठरू शकते. साधनेचा याच्याशीच संबंध आहे. निश्चितच ती काही मनोहारी वातावरणात, जिथे मेणबत्तीचा प्रकाश, मंद सुगंध आणि निरव शांतता असेल आणि निश्चितच एखादे रडणारे बाळ आजूबाजूला नसेल, अशा वातावरणात आसनावर बसून ध्यान लावण्याशी संबंधित नाही.
एकदा मी एका बौद्ध केंद्रात गेलो होतो, जिथे माझा विद्यार्थी प्रशिक्षण घेत होता आणि तिथे कुणीतरी आपल्या दोन वर्षाच्या बाळाला घेऊन आले होते. ते दोन वर्षाचं बाळ प्रशिक्षण वर्ग सुरू असताना वर्गातच अवतीभोवती पळत होते. दोन वर्षांच्या बाळाकडून आपण अपेक्षा तरी काय करणार – ते थोडेच तास-दीडतास एका जागी शांत बसेल? प्रशिक्षकांनी नमूद केले की त्या दोन वर्षाच्या मुलाला तिथे घेऊन येणे फारच चांगले योग्य झाले आहे; कारण ते मूल तिथे अवतीभोवती बागडत असताना आणि दंगा करत असताना, अशा स्थितीत आपण ध्यानधारणेचा प्रयत्न करणे हे मोठे आव्हान होते. तीच खरी साधना आहे. आपण खरंच साधना करु शकतो का किंवा आपण निराश होत नाही ना वा आपले लक्ष विचलित तर होत नाही ना? याचा अर्थ पालकांनी मुलाला एखादी दुखापत होऊ शकते, याकडे दुर्लक्ष करावे असा होत नाही. बाहेर रहदारीचा दंगा असताना आपण साधना करु शकतो का किंवा अगदी आपण रहदारीत अडकलेले असताना साधना करू शकतो का?
हेच जीवन आहे आणि जीवन साधनेसाठीचे, आपल्या तणावदायी भावनांबाबतची अनभिज्ञता आणि अज्ञानविरोधी लढ्यासाठीचे कुरूक्षेत्र असायला हवे. अतिशाने बोधिसत्व रत्नमालेत हे स्पष्टपणे नोंदवले आहे.
अनेकांमध्ये असताना माझ्या वाणीवर ध्यान असू दे. एकटे असताना माझ्या चित्तावर ध्यान असू दे.
हे फारय उपयुक्त आहे. आपण इतरांसोबत असतो, तेव्हा आपण कसे बोलतो त्यावर लक्ष द्या. फक्त शब्दच नाही, तर आपल्या आवाजाचा पोत, भावना आणि आपल्या बोलण्यामागच्या दृष्टिकोनाकडे लक्ष द्या. जर आपल्याला आढळले की आपण द्वेषाने किंवा अहंगंडाने बोलत आहोत, तर तात्काळ आपल्याला त्याची जाणीव होऊन आपण आपला स्वर बदलायला हवा. आपण एकटे असतो तेव्हा आपल्या मनाबाबतही हे लागू होते. आपण काय विचार करत आहोत, याकडे लक्ष पुरवा, तेच सारे ‘मी फार बिचारा आहे. कुणीच माझं कौतुक करत नाही’चा आजार.
हे आपल्याला सप्त बिंदु चित्त साधनेच्या दिशेने घेऊन जाते, जिथे नमूद करण्यात आले आहे की आपल्याला तीन गोष्टींप्रति सचेतनता बाळगायला हवीः सचेतन राहणे म्हणजेच त्यांना लक्षात ठेवणं, त्यांना लागू करणं आणि त्यात सातत्य ठेवणं. सचेतनतेबाबत ही फार महत्त्वपूर्ण बाब आहे. आपण सचेतन साधनेविषयी एकतो, पण त्याचा अर्थ केवळ तिथे उपस्थित असण्याच्या पाश्चिमात्त्य संदर्भातील नाही. ‘सचेतन’ शब्दातून एखादी गोष्ट लक्षात ठेवण्याचा संदर्भ प्रतिबिंबित होतो. आपल्याला लक्षात ठेवायला हवे की आपल्या मनात जे प्रक्षेपण सुरू आहे, ते सर्व निरर्थक आहे. आणि ही जाणीव जीवनात लागू करून त्यात सातत्य ठेवायला हवे. हीच दैनंदिन जीवनातील खरी साधना आहे.
अकाल्पनिक आणि काल्पनिक अवस्था
बौद्धधर्मात अकाल्पनिक दृष्टिकोन बाळगण्याचा सल्ला दिला गेला आहे. याचा मतित अर्थ काय आहे? आपण त्याची तांत्रिक व्याख्या पाहून त्याचे विश्लेषण करू शकतो; पण आपण व्यावहारिक पातळीवर पाहिल्यास, आपले उद्दिष्ट हे आहे की त्या लागू करण्यासाठी आपल्याला विचार करण्याची गरज भासू नये. एखाद्या अशा स्थितीत जेव्हा आपले विमान किंवा रेल्वे चुकते, तेव्हा मानसिक चंचलता आणि प्रत्येक गोष्ट कारणे आणि परिस्थितीने प्रभावित असते आणि आपल्या रागवण्याचा काहीच उपयोग नाही, याविषयी विचार करत बसण्याचे आपले उद्दिष्ट नसते. प्राथमिक पातळीवर आपल्याला या मुद्द्यांचा विचार करावाही लागेल, पण आपल्याला हे उत्स्फूर्तपणे होणे अपेक्षित आहे. आपल्याला त्याविषयी विचार करत बसण्याची गरज पडू नये, ते तिथे असावेच. उत्स्फूर्तपणे किंवा आपोआपच आपण अतिरेकी वागणार नाही किंवा आपल्या वागण्यात लवचिकता असेल.
हे आपले खरे उद्दिष्ट आहे. ही काही गूढ अवस्था नाही. कदाचित ही खोल अकाल्पनिक अवस्था नसेलही, पण अशा अतांत्रिक मार्गाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आपण साधना करतो. ही शिकवण आपल्या जीवनात लागू करणे शक्य व्हावे, यासाठी आपण साधना करतो, ज्यामुळे स्वतःला स्वतःसाठी आणि इतरांसाठीही अधिकाधिक समस्या निर्माण करण्यापासून रोखता येईल. बस, ही इतकीच गोष्ट आहे.
प्रश्न
एखाद्या योजनेच्या अंमलबजावणीवेळी लवचिकता केव्हा बाळगायला हवी
मला वाटते की मी बदलासाठी तयार असतो, पण ते कायम सत्य नसते. माझ्यासाठी यथार्थाच्या जाणिवेबाबतचा अडथळा म्हणजे एखादी योजना केव्हा सोडून द्यायला हवी किंवा केव्हा पकडून ठेवायला हवी ही समज. काय बदलता येऊ शकते आणि काय नाही ही समज. उदाहरणार्थ, माझी रेल्वे चुकली, मी पळत जाऊन टॅक्सी पकडली आणि पुढच्या स्टेशनवर रेल्वे पकडली. पण हा निर्णय कसा करणार करायचा की आपल्या योजनेवर ठाम राहणे केव्हा उपयुक्त आहे?
एखाद्या योजनेवर अंमल करण्यासंदर्भात किंवा ती सोडण्यासंदर्भात अनेक घटक अंतर्भूत असतात. आपल्याला हे पाहायला हवे की यासाठी काही पर्याय उपलब्ध आहे का आणि ते बदलणे शक्य आहे का, जसे तुमच्या उदाहरणात टॅक्सी घेऊन पुढच्या स्टेशनवर रेल्वे पकडण्याचा मार्ग. हे व्यावहारिक पातळीवरील उदाहरण आहे. पण दुसऱ्या पातळीवर, असे समजू आपण शाळेत प्रवेशासाठी अर्ज केला आणि आपण त्या वर्षीसाठी निवडले गेलो नाही. आपण ते सोडून देऊ का, की आपण पुढच्या वर्षीसाठी पुन्हा अर्ज करू? अशा स्थितीत आपल्याला विश्लेषण करायला हवे. आपली दुसऱ्या ठिकाणी निवड झाली नाही, तर दुसऱ्या वर्षासाठी पुन्हा अर्ज करण्यात काहीच वाईट नाही. अशा स्थितीत काय यथार्थ आहे, याचे विश्लेषण करायला हवे. आपण आपल्या क्षमता आणि आर्हतेविषयी अतिरेकी विचार तर करत नाही ना? अशा स्थितीत आपल्याला इतर लोकांचाही सल्ला घ्यायला हवा.
प्रत्येक वैयक्तिक निवडीचे विश्लेषण आवश्यक असते, याचे कोणतेही एक प्रमाणीकृत उत्तर नसते. आपली उद्दिष्टपूर्ती कोणत्या घटकांवर अवलंबून आहे, हे तपासून पाहायला हवे कारण कारणे आणि परिस्थितीतून गोष्टी निर्माण होतात. ती कारणे आणि परिस्थिती पूर्ण होत आहे का? आणि त्या सध्या पूर्ण होत नसतील तर भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे का? काही पर्याय आहेत का? आपल्याला असे निर्णय आणि परिस्थितीच्या संदर्भात फार विवेकी दृष्टिकोन ठेवायला हवा.
फार भावुक व्यक्ती असणे
माझ्यासाठी ही फार नवी गोष्ट आहे की मी कसे स्वतःला दुःखाच्या चक्रात गुरफटून घेतो. मी माझ्या मनाचे प्रक्षेपण विवेकी नाही, याची आठवण ठेवायचा प्रयत्न करतो, पण माझ्या भावना मात्र वेगळ्या असतात आणि मी पुन्हा मागे वळतो. मी स्वतःचे अवमूल्यन रोखण्यासाठी काय करावे, कारण आता स्मृती विरळ होत आहे?
बहुतांश वेळा आपल्याला माहीत असते की काय उपयुक्त असते आणि काय सर्वोत्तम असते, पण आपल्या भावना इतक्या भक्कम असतात की आपण त्याबाबत काहीच करू शकत नाही. ही सामान्यतः वारंवार उद्भवणारी स्थिती असते. आपण अधिक निर्णयक्षम होणे गरजेचे असते, अर्थात आपण जरी भावनिक किंवा उदास झालो तरी आपल्यात विश्वास असायला हवा की ही फार गांभीर्याने घेण्याजोगी गोष्ट नाही.
आपण त्याचा चुकीचा अर्थ लावणार नाही, हे गरजेचे असते. आपण एखाद्या गोष्टीमुळे फार निराश, भावुक झालेले असू शकतो, पण या गोष्टी सरून जातात. मनस्थिती आणि भावना बदलत राहतात. आपण त्यांना पकडून ठेवता कामा नये. आपण असा विचार करू नये की ‘मी पुन्हा निराश झालो आहे कारण मी सर्व बिघडून टाकले आहे. आणि मी माझ्या अपेक्षेप्रमाणे जगू शकलो नाही. मी काही कामाचा नाही.’ असा विचार करून आपण त्या मनस्थितीशी अधिक जोडले जातो आणि तेच पकडून ठेवतो. आपल्याला जे वाटते तेच फार महत्त्वाचे आहे, असा आपल्याला विश्वास वाटू लागतो. ही फक्त अस्थायी मनोवस्था असते. आपल्याला जाणीव व्हायला हवी की आपल्याला जे खरेच हवे आहे, ते हे नाही. ही मनोवस्था अस्थायी आहे आणि ती बदलत असेल तर तिला बदलू द्यायला हवे, यावर विश्वास दृढ होणे आवश्यक आहे. खोल आत आपल्याला जाणीव असते की आपल्या अपेक्षा अवास्तव होत्या. आपण दुखावले जाऊ, पण ते दुखावले जाणेही अस्थायी असेल. आपण ते दुखावले जाणे इतक्या गांभीर्याने घेणार नाही, जणू ती जगाची अखेर असेल.
परंपरागत रीत्या, मनोवस्थेचे एखाद्या ढगाप्रमाणे वर्णन केले जाऊ शकतो, जो ढग निघून जाणार आहे. परिस्थिती हाताळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. शिवाय आपल्याला ही जाणीवही असायला हवी की भावनांमध्ये चढउतार होत राहणार आहे. आपल्यापैकी काही जण इतरांहून अधिक भावुक असतात आणि आपण त्यांच्याबाबत न्यायचिकित्सक विचार करता कामा नये. हा वास्तव स्वीकारण्याच भाग आहे. वास्तव हेच आहे की आपण आत्ता इथे आहोत; आपण भावुक असू शकतो आणि सहज निराश होऊ शकतो, पण आपण तेच धरून बसता कामा नये. वास्तव काय आहे, याबाबत अधिक सजग होण्यासाठी स्वतःत सुधारणा करत राहायला हवे.
उदाहरणार्थ, ‘मी एकांतवासात गेलो आणि मला वाटले होते की मी एकाग्र होऊ शकेन, पण माझे मन संपूर्ण वेळ भरकटत राहिले.’ ठीक आहे. तर आपली अपेक्षा अवास्तव होती. अर्थात मन भरकटत राहणारच आणि अर्थातच ते आत्ताच अतिउत्तम असणार नाही. तुमच्या अपेक्षा कमी ठेवा आणि तितक्याच गांभीर्याने त्यांना अनुभवा. उदाहरणार्थ, ‘मी उच्च स्तरावर पोहोचू शकतो, पण ते कारणे आणि परिस्थितीवर अवलंबून राहिल्याशिवाय शक्य होणार नाही. त्यामुळे मला अधिक कष्ट घ्यावे लागतील.’
शिवाय आपण अति भावनिक असू, तर ती प्रवृत्ती परावर्तित करून सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकते. त्या स्थितीत आपल्याला अधिक सक्षम प्रेम आणि करुणा अनुभवणे शक्य होईल. याअर्थी भावनिक असणे सकारात्मक आहे. शेवटी काही लोक अतिशय तर्कवादी असतात आणि त्यांना कोणतीही भावना अनुभवणे जड जाते. त्यांच्यासाठी प्रेम आणि करुणेसारख्या भावना अनुभवणेही फार कठीण असते. तुम्ही अति भावनिक व्यक्ती असाल, तर तुमच्यात आधीपासूनच काहीतरी सकारात्मक आहे आणि मुद्दा फक्त ते परावर्तित करण्याचा आहे. तुम्ही कारणे आणि परिणाम लागू केल्यास ते हळूहळू साध्य होईल.
आपल्या सुरक्षित चौकटीबाहेर येऊन काम करणे
आपण हे संपूर्ण प्रशिक्षण घेतो आणि हे ही पाहतो की समाजात लोकांना अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या घेणे भाग असते. आपल्याला हे ज्ञान केव्हा होते की आपण आपली सुरक्षित चौकट सोडून या मार्गावर पुढे जाण्यासाठी आणि आपल्याला भावनिक आव्हान देणाऱ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत?
याचा संंबंध काय विधायक आहे किंवा काय विनाशकारी आहे, याच्याशी आहे. बारमध्ये जाण्यासाठी सुरक्षित चौकट मोडणे आणि मद्यपी लोकांसोबत वेळ घालवणे हे नक्कीच सकारात्मक नाही. एखादा बोधिसत्व नरकातल्या जिवांच्या मदतीसाठी तिथेही जाईल, असे आपण म्हणू शकतो, पण आपल्यासारख्या लोकांसाठी ते कठीण आहे. पण काहीतरी विधायक, सकारात्मक करण्यासाठी सुरक्षित चौकटीच्या बाहेर पडणे, जसे रस्त्यावरच्या निराधार लोकांशी संवाद साधण्यासारख्या कृती करणे शक्य आहे.
सर्वप्रथम आपल्याला हा फरक ओळखता यायला हवा की ज्या गोष्टीसाठी आपण सुरक्षित चौकट मोडत आहोत, ती स्थिती आपल्याला जे साध्य करायचे आहे, त्यासाठी कितपत साहाय्यक आहे. काही तरुण मुले क्लबमध्ये जाऊन रात्रभर टेक्नो संगीतावर नाचू शकतील. सुरक्षित चौकटीच्या बाहेर पडून असे काही करणे आपल्याला उपयोगाचे असेल का? हे सुरक्षित चौकटीच्या बाहेर पडणे असले तरी यात काहीच सकारात्मक नाही, किमान आपण जोवर आपल्या नकारात्मक न्यायचिकित्सक दृष्टिकोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत नाही. पण आपण सकाळपर्यंत नृत्य करत न बसता किंवा संगीताने बधीर न होताही असे नियंत्रण मिळवू शकतो. अर्थात आपल्या सुरक्षित चौकटीबाहेर पडण्याचे इतर मार्गही असू शकतात, जसे निर्वासितांसोबत काम करणे. त्यांच्यासोबत काम करण्यासाठी आपल्या सुरक्षित चौकटीच्या बाहेर पडणे विधायक आणि सकारात्मक ठरेल आणि आपल्यातील औदार्याची भावना अधिक विकसित करण्यासाठीही साहाय्यक ठरेल. बर्लिनमध्ये मी एक छोटं साप्ताहिक चर्चासत्र भरवतो. आम्ही सगळे मित्र आहोत आणि आमचे सत्र संपले की आम्ही एकत्रित भोजनास जातो. मी त्यांना एकदा विचारलं की धम्म त्यांच्या दैनंदिन जीवनात कशा रीतीने उपयुक्त ठरत आहे. माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की तो त्याच्या सहजभावाच्या सुरक्षित चौकटी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने स्पष्ट केले की चांगल्या दिसणाऱ्या लोकांकडे अधिक लक्ष देण्याकडे किंवा त्यांच्याशी जवळीक साधण्याकडे त्याचा अधिक कल होता. एक प्रकारे तो त्यांना इतर लोकांपेक्षा अधिक महत्त्वाचे समजतो. त्यामुळे त्याने त्याच्या कामाच्या ठिकाणच्या एका स्थूल, चेहऱ्यावर विचित्र काहीतरी असणाऱ्या आणि अजिबात आकर्षक नसणाऱ्या व्यक्तीसोबत मैत्री करण्याचे ठरविले. त्याला खरोखरच पाहायचे होते की ती ही माणसे असतात, ज्यांना सुखाची, इतरांकडून आवडले जाण्याची इच्छा असते आणि दुलर्क्षित केलेले आवडत नाही. ही व्यक्ती कदाचित नवा, जिवलग, एखाद्या रत्नासारखा खरा मित्र ठरू शकला असता. त्याने त्या व्यक्तीला दुर्लक्षित न करण्याचे ठरविले. हे एखाद्या सकारात्मक गोष्टीसाठी स्वतःच्या सुरक्षित चौकटीतून बाहेर येण्याचे खूपच चांगले उदाहरण आहे. अशा गोष्टी सहज करण्याजोग्या असतात. जर आपण आपल्या सर्वसाधारण मर्यादांच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न करत असू, तर त्या सहजसाध्य असाव्यात, असाध्य असू नयेत.
दुसरा एक मित्र अतिरेकाच्या पातळीवर गेला. त्याला नेहमीच स्वतःच्या सुरक्षित चौकटीच्या बाहेर जायला आवडते, त्यामुळे तो अगदी अमली पदार्थ विकणाऱ्या व्यसनी लोकांसोबत जाईल. तो हे करतो कारण त्याला त्या लोकांसोबत वेळ घालवणे असमाधानकारक वाटते. मला हे फार लाभकारक वाटत नाही. हे अशा व्यवहाराचं अतिसाहसी प्रदर्शन आहे.
आपल्या सुरक्षित चौकटी बाहेर कसे पडावे किंवा सुरक्षित चौकट म्हणजे नक्की काय, हा एक मजेशीर प्रश्न आहे. आपल्या सुरक्षित चौकटीत आपण त्या विशिष्ट सीमेत स्वतःला सुरक्षित समजतो, असा विचार करणे किती मोठे प्रक्षेपण आहे? सुरक्षित चौकट म्हणजे काय? त्याचे आपण स्वतः विश्लेषण करणे आवश्यक असते. आपण कोणत्याही स्थितीत कोणत्याही व्यक्तीसोबत सुरक्षितता अनुभवू शकतो का?
याचा उपाय म्हणजे सर्व दोष आपल्या आत्मप्रेमावर लादणे. आपण जर इतरांसोबत किंवा ठरावीक परिस्थितीत सहजता अनुभवत असू , तर त्याचे कारण आपण फक्त ‘मी,मी,मी’ असा स्वकेंद्री विचार करत असतो. उदाहरणार्थ, आपण विचार करतो की, ‘मला हे आवडले नाही आणि मी हे सहन करू शकत नाही,’ आपण इतरांचा विचार करत नाही. याचा संबंध इतरांमध्येही रस घेण्याशी आणि आपण सर्व माणूस आहोत, या विचाराशी आहे.
सारांश
ही फार मूलभूत तत्त्वे आहेत. आपण स्वार्थी आणि आत्मकेंद्री वागणे बंद केले तर आपण आनंदी होऊ शकतो. आपण जेव्हा एखाद्या व्यक्ती सोबत असतो, तेव्हा फक्त स्वतःविषयी बोलण्याऐवजी आपण समोरच्या व्यक्तीत रस घेतला आणि त्यांची चौकशी केली, तर आपण अधिक आनंदी होऊ आणि अर्थातच समोरची व्यक्तीही आनंदी होईल. हे जीवनाशी आणि इतरांशी व्यवहार करण्याच्या मार्गातील मूलभूत आणि व्यावहारिक बदल आहेत. आपल्याला सतत आठवण असायला हवी की आपले उद्दिष्ट सचेतनता साध्य करण्याचे आहे. आपण जेव्हा स्वार्थी वागतो किंवा फक्त स्वतःचा विचार करतो, तेव्हा हा सल्ला अमलात आणायला हवा. उदाहरणार्थ, दुसरी व्यक्ती व्य़ग्र आहे आणि तिला जायचे आहे, पण आपण तरी बोलत राहतो. आपण विचार करतो की आपण जे बोलत आहोत, ते फार महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीला ते ऐकण्यात खरोखर रस आहे का? पण आपला ग्रह असतो की त्यांना रस आहे. जीवनात अशा क्षणी आपल्याला धम्म रत्न अमलात आणणे आवश्यक असते.