ताण कमी करण्यासाठी, वेदना हाताळण्यासाठी आणि कामामध्ये किंवा एकंदरच जीवनामध्ये परिणामकारकता वाढवण्यासाठी आधुनिक पाश्चात्त्य समाजांमध्ये “सजगते”ची उपासना मोठ्या प्रमाणात स्वीकारली जाते आहे. विविध बुद्ध साधनेच्या उपासनापद्धतींमधून निर्माण झालेल्या सजगता प्रशिक्षणामध्ये आपलं मन शांत करणं, आणि आपला श्वासोच्छवास, आपले विचार, भावना, आनंद वा दुःखाच्या जाणिवा, शारीरिक संवेदना, इत्यादींवर लक्ष केंद्रित करणं यांचा समावेश होतो. आपल्या मनाच्या सतत बदलणाऱ्या उद्दिष्टांच्या सतत बदलणाऱ्या सद्य क्षणावर लक्ष केंद्रित करणं, असं या प्रशिक्षणाचं सर्वसाधारण भाषेत अनेकदा वर्णन केलं जातं.
भारतीय बौद्ध स्त्रोत
सजगतेविषयी थेरवादातील मांडणी (पाली: सती) उपातिस्स यांच्या ‘मुक्तीचा मार्ग’ (पाली: विमुत्तीमाग्ग) बुद्धघोषांच्या ‘विशुद्धीचा मार्ग’ (पाली: विशुद्धीमाग्ग) या संहितांवर आधारलेली आहे. साधनेमध्ये लक्षात ठेवणं हे सजगतेचं खास वैशिष्ट्य आहे, उदाहरणार्थ- श्वासोच्छवास किंवा मृत्यू ही वस्तुस्थिती कायम लक्षात ठेवणं. न विसरणं हे याचं कार्य आहे आणि मनाने स्वतःचं उद्दिष्ट विसरू नये यासाठी त्याचं रक्षण करणं, हा या सजगतेचा आविष्कार असतो. एका अर्थी मनाला एकाग्रतेच्या उद्दिष्टाशी घट्ट जोडून ठेवणारा “मानसिक डिंक” असं सजगतेचं एक रूप असतं. एखाद्या उद्दिष्टाशी जोडलं गेल्यावर त्या उद्दिष्टाच्या काही वैशिष्ट्यांबाबत- उदाहरणार्थ चंचलता- भेदजन्य जागरूकता दाखवणं गरजेचं असतं.
हिनयान वैभाषिक पंथाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वसूबंधू यांनी ट्रेझर हाऊस ऑफ स्पेशल टॉपिक्स ऑफ नॉलेज (संस्कृत: अभिधर्मकोश) या त्यांच्या संहितेमध्ये बोधाच्या सर्व क्षणांसोबत असलेल्या दहा मानसिक घटकांपैकी एक म्हणून सजगतेचा (संस्कृत: स्मृती) उल्लेख केला आहे. या बोधांसोबत इतर रचनात्मक, विध्वंसक किंवा केवळ अनिश्चित (नैतिकदृष्ट्या तटस्थ) मानसिक घटकही असतात का, हेही त्यासोबतच विचारात घ्यावं लागतं. तर, सजगता सदासर्वकाळ उपस्थित असते, केवळ साधनेच्या संदर्भातच उपस्थित असते असं नाही.
“ट्रेझर हाऊस ऑफ स्पेशल टॉपिक्स ऑफ नॉलेज” या संहितेवरील भाष्यामध्ये (संस्कृत: अभिधर्मकोश-भाष्य) वसूबंधूने सजगतेची व्याख्या दिली आहे. स्वतःचं उद्दिष्ट न सोडणारा व न विसरणारा मानसिक घटक म्हणजे सजगता, त्यामुळे स्वतःचं उद्दिष्ट हवंहवंसं वाटणं किंवा त्याची नोंद घेणं हे त्यातून अभिप्रेत असतं. स्वतःचं उद्दिष्ट हवंहवंसं वाटण्यातून किंवा त्याची नोंद घेण्यातून सजगता ते उद्दिष्ट नंतर लक्षात ठेवायला वाव देते.
“ट्रिटमेन्ट ऑफ द फाइव्ह अॅग्रिगेट्स्” (संस्कृत: पंचस्कंध-प्रकरण) या महायान चित्तमात्र संहितेमध्ये वसूबंधूने एखादं उद्दिष्ट लक्षात ठेवण्याच्या विशेष संदर्भामध्ये सजगतेची मांडणी केली आहे. परिचित उद्दिष्ट सोडून न देण्याची आणि उद्दिष्टाची पुन्हा एकदा नोंद घेण्याची मनस्थिती म्हणजे सजगता, असं तो प्रतिपादन करतो. या संहितेवर केलेल्या भाष्यामध्ये स्थिरमतीने स्पष्ट केलं आहे की, “परिचित उद्दिष्ट” म्हणजे आपण आधी अनुभवलेलं काहीतरी असतं. त्यामुळे, त्या उद्दिष्टावरील साधनेच्या संदर्भात किंवा काहीतरी आठवण्याच्या दैनंदिन प्रसंगांमध्ये उद्दिष्ट लक्षात येऊ शकतं.
असंगाने अँथॉलॉजी ऑफ स्पेशल टॉपिक्स ऑफ नॉलेज (संस्कृत: अभिधर्मसमुच्चय) या चित्तमात्र संहितेमध्ये सजगता हा पाच निर्णायक मानसिक घटकांपैकी एक असल्याची मांडणी केली आहे. या पाचांपैकी एक म्हणून सजगता हा मानसिक घटक केवळ रचनात्मक बोधांमध्येच आणि आपली उद्दिष्ट पकडून ठेवणाऱ्या रचनात्मक बोधांमध्येच उत्पन्न होतो. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, स्वतःच्या उद्दिष्टांचा अचूकरित्या व निर्णायकरित्या बोध करून घेणाऱ्या बोधांमध्येच हा घटक उत्पन्न होतो. आपण परिचित आहोत अशाबद्दलचं रचनात्मक उद्दिष्ट असायला हवं; या उद्दिष्टावर त्याचं लक्ष केंद्रित असायला हवं आणि हे त्याने विसरू नये; आणि मानसिक भरकटलेपण रोखणं हे त्याचं कार्य असतं.
त्सोंगखापा यांची मांडणी
ग्रँड प्रेझेन्टेशन ऑफ ग्रेडेड स्टेजेस ऑफ द पाथ (लाम-रिम चेन-मो) या संहितेमधील समाधीवस्था व स्थिर मनोवस्था (संस्कृत: शमथ) विकसित करण्यासंदर्भातील विभागात तिबेटी गुरू त्सोंगखापा यांनी असंगाच्या सजगतेच्या व्याख्येचं स्पष्टीकरण केलेलं आहे. शमथ साधनेच्या संदर्भात सजगतेची (तिबेटी: द्रान-प) तीन वैशिष्ट्यं असतात:
- आपण आधी परिचित असलेल्या एखाद्या उद्दिष्टावर ते लक्ष केंद्रित करतं, अपरिचित असलेल्या उद्दिष्टावर नाही. त्यामुळे आपल्याला खात्री झालेलं असं ते उद्दिष्ट असतं- ते बुद्धाच्या काल्पनिक चित्रासारखं रचनात्मक असेल किंवा शरीरासारखं अनिश्चित (नैतिकदृष्ट्या तटस्थ) असेल.
- सजगतेचा उद्दिष्टावर इतकी घट्ट मानसिक पकड असते की आपण ते उद्दिष्ट विसरत नाही: “न विसरणं” याचा अर्थ कोणीतरी आपल्याला विचारल्यावर आपण त्या उपासनेसंबंधीच्या सूचना आठवतो किंवा आपलं लक्ष केंद्रित करायचं उद्दिष्ट असं अथवा तसं आहे हे आठवतो, एवढंच नव्हे. आपण आपलं मन त्या विशिष्ट उद्दिष्टाशी बांधून घेतलं की आपण तत्काळ मानसिकदृष्ट्या त्याची पकड घेतो, त्यात अजिबात मानसिक भरकटलेपण येऊ देत नाही, असा याचा अर्थ होतो. आपण लक्ष थोडं जरी विचलित झालं तरी आपली सजगता आपण गमावलेय असं समजावं. त्यामुळे एका विशिष्ट उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केल्यानंतर आणि माझं मन मी अशा उद्दिष्टावर केंद्रित केलं आहे असा विचार निर्माण झाल्यावर शाब्दिकदृष्ट्या कोणत्याही नवीन गोष्टीचा विचार न करणारी मनोवस्था राखून, या अथक सामर्थ्याचं सातत्य विकसित करण्यातूनच आपण सजगतेपर्यंत जाऊ शकतो. आपण सजगतेपर्यंत जाणं म्हणजे आपल्या डॉक्टरकडे किंवा आपल्या आध्यात्मिक गुरूकडे जाण्यासारखंच आहे. एखादी डॉक्टर व्यक्ती पूर्ण पात्र आहे असा विश्वास आपल्याला वाटतो तेव्हाच आपण त्याच्याकडे जातो. त्याचप्रमाणे आपली मनोवस्था सजगतेच्या स्थितीच्या सर्व पात्रता पूर्ण करते आहे, असं वाटल्यावरच आपण त्या स्थितीमध्ये जातो.
- आपलं लक्ष दृष्टीच्या टप्प्यातील इतर कोणत्या वस्तूसंदर्भात किंवा उद्दिष्टासंदर्भात विचलित न करणं हे याचं कार्य असतं. अधिक पूर्णत्वाने बोलायचं तर, लक्ष केंद्रित केलेलं उद्दिष्ट विसरलं जाऊ नये किंवा त्यावरचं लक्ष विचलित होऊ नये, याची तजवीज सजगता करते; ती या विशिष्ट उद्दिष्टावर चिकाटीने आपलं लक्ष केंद्रित ठेवून देते; आणि या उद्दिष्टाशी परिचितता वाढवून सातत्य राखते.
सजगतेची साधना
अचल व स्थिर मनोवस्थेची- शमथ- उपासना करत असताना साधनेमधील लक्ष केंद्रित करायचं उद्दिष्ट कायम राहतं. उदाहरणार्थ, आपण कल्पनेतील बुद्धप्रतिमेवर लक्ष केंद्रित करतो. परंतु, आधुनिक पाश्चात्त्य समाजात शिकवल्या जाणाऱ्या सजगतेच्या उपासनेमध्ये उद्दिष्ट म्हणजे आपल्या मानसिक वा शारीरिक बोधाच्या सतत बदलणाऱ्या उद्दिष्टांचा सतत बदलता सद्य क्षण असतो. सजगतेविषयीच्या थेरवादी मांडणीशी हे बरचंसं जुळणारं आहे. उद्दिष्ट आणि वसूबंधू यांनी केलेली वैभाषिकाची मांडणी याच्याशी हे सुसंगत आहे- या मांडणीनुसार बोधाच्या सर्व क्षणांसोबत सजगता असते. परंतु, वसूबंधू व असंग यांनी त्यांच्या चित्तमात्र संहितांमध्ये स्पष्ट केल्यानुसार, आपण आधी परिचित झालोय अशी एखादी गोष्ट- उदाहरणार्थ, बुद्धाचं शारीरिक सादरीकरण- म्हणजे उद्दिष्ट नव्हे. तर, प्रत्येक क्षणी काय अनुभवतो आहोत- शारीरिक संवेदना, विचार, भावना, किंवा जाणिवा- त्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न यात अभिप्रेत आहे. पण यावर आपण अचूक व निर्णायक लक्ष केंद्रित करायला हवं, असं असंगाने स्पष्ट केलं आहे.
सद्य क्षणाबद्दल सजगता राखण्याची स्थिती आपण प्राप्त करू पाहतो, त्यात वास्तविक विविध मानसिक घटकांचं मिश्रण झालेलं असतं आणि मनाविषयीच्या बौद्ध विश्लेषणामध्ये हे घटक नमूद केलेले आहेत. यातला एक मुख्य घटक खुद्द सजगता हाच आहे, शिवाय, सतर्कता आणि काळजी घेण्याची वृत्ती, हे दुसरे दोन घटक. सजगतेची उपासना अधिक परिणामकारकतेने करण्यासाठी यातील प्रत्येक घटक ओळखणं मदतीचं ठरतं, जेणेकरून सामर्थ्यामध्ये काही अभाव असेल तर त्यानुसार आपल्याला जुळवून घेता येईल.
सजगता
खुद्द सजगतेसोबत, म्हणजे तथाकथित “मानसिक डिंका”सोबत दोन अधिकचे मानसिक घटक असावे लागतात: भेद करणं (ओळखणं) आणि विचार करणं.
“भेद करणं” (तिबेटी: दू-शेस, संस्कृत- समज) हा घटक आपल्या अनुभवाच्या प्रत्येक क्षणामध्ये सामावलेल्या विविध घटकांच्या वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करतो. इतर गोष्टींपासून तो ही वैशिष्ट्यं वेगळी काढतो. उदाहरणार्थ, आपल्याला एकाच वेळी अनुभवायला येणाऱ्या शारीरिक संवेदनांपासून- उदाहरणार्थ, एखाद्या खोलीतील तापमान- वेदनेची शारीरिक संवेदना हा घटक वेगळी काढतो. अचूक विचार करण्याचा घटक त्या उद्दिष्टाचा अचूक आहे त्या स्थितीत विचार करतो- वेदना ही केवळ शारीरिक संवेदना आहे, त्याहून अधिक काही नाही आणि कमी काही नाही.
सजगतेसोबत भेद करणं व अचूक विचार करणं यांद्वारे आपण सतत बदलत्या सद्य क्षणाच्या आशयावर लक्ष केंद्रित करून ठेवतो. सद्य क्षणाचा आशय हे आपलं उद्दिष्ट आहे, यावरून लक्ष विचलित न करता आपण हे साधायचा प्रयत्न करतो. आधीच्या क्षणी आपण काय अनुभवलं किंवा भविष्यातील क्षणी आपण काय अनुभवण्याची शक्यता आहे, याचा विचार करून अनेकदा लक्ष विचलित होतं. गतकाळाचे किंवा भविष्याचे हे विचार केवळ आत्ता काय घडतंय याचा भाग असतात, या वस्तुस्थितीपासून आपलं लक्ष विचलित होतं. आपल्या अनुभवातील सद्य क्षणाचा आशय एवढ्याच रूपात त्यांना ओळखण्याचं आपण थांबवतो आणि त्याऐवजी “कथनाका”मध्ये गुंतून जातो. परिणामी, या विचारांनी लक्ष विचलित झाल्याने आपलं उद्दिष्टावरचं लक्षही केंद्रित होत नाही. परंतु, आपण अविचल मनोवस्था टिकवण्यात यशस्वी झालो, तर आपलं उद्दिष्ट न विसरणारी स्थिर सजगता आपण प्राप्त केलेली असते. अशा प्रकारे सजगता मानसिक डिंकाप्रमाणे कार्य करते आणि आपल्या अनुभवाच्या सतत बदलत्या सद्य क्षणावर आपलं लक्ष केंद्रित ठेवायला मदत करते.
असंगाच्या डिफरन्शिएटिंग द मिड्ल फ्रॉम द एक्स्ट्रिम्स (संस्कृत: मध्यान्तविभाग) या संहितेवरील भाष्यामध्ये स्थिरमतीने स्पष्ट केलं आहे की, सजगतेला पूरक म्हणून आपण वेळोवेळी आपण स्वतःला आपल्या उद्दिष्टाची आठवण करून देणं गरजेचं असतं. आपल्या सजगतेची पकड बळकट राहावी यासाठी एखादा परवलीचा शब्द मनात म्हणणं, असा याचा अर्थ होतो. उद्दिष्टाची नोंद घेणं हा सजगतेचा अर्थ असतो, या वसूबंधूच्या प्रतिपादनाशी सुसंगत असंच हे म्हणणं आहे. त्सोंगखापा यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे: “हा विवादास्पद विचार आहे, त्यामुळे आपण स्वतःला शाब्दिक आठवण करून द्यायला नको, असं म्हणून तुम्ही हे नाकारणार असाल, तर बळकट सजगता व सतर्कता विकसित करणं अतिशय अवघड होईल.”
सतर्कता
सतर्कता (तिबेटी: शेस-ब्झिन, संस्कृत- सम्प्रज्ञ) हा मानसिक घटक सजगतेची उद्दिष्टावरील पकड कोणत्या स्थितीत आहे यावर देखरेख ठेवतो व त्याची तपासणी करतो. आपल्या अनुभवातील सद्य क्षणाच्या आशयावर- आपल्या उद्दिष्टावर सजगता राखण्यासंदर्भात तो कार्यरत असतो. एका अर्थी, सतर्कता हा आपल्या बळकट सजगतेचा एक भाग असतो. त्सोंगखापा यांनी दाखवून दिल्यानुसार, सजगता जितकी अधिक बळकट होईल तितकं आपण विचलित न होता सजग राहणं आपल्याला अधिक सवयीचं होतं. परिणामी, आपण कधी विचलित होतोय हे ओळखण्याबाबत आपण अधिक संवेदनशील होतो. अशा प्रकारे आपली सजगता जितकी बळकट असेल तितकी आपली सतर्कता बळकट होते.
एखाद्या प्रशिक्षणार्थी मनावर देखरेख ठेवणारं आणि त्यापासून पूर्णतः विभक्त व स्वतंत्र अस्तित्वात असलेलं पर्यवेक्षक मन, अशा द्वैतासंदर्भात आपण सतर्कतेचा विचार करू नये. दुसऱ्या बाजूला, आपण सजगता व सतर्कता यांच्यात काळजीपूर्वक भेद करणं गरजेचं आहे, असं त्सोंगखापांनी नमूद केलं आहे. ते धोक्याचा इशारा देताना लिहितात, “या सर्व मनोवस्थांमध्ये गोंधळ करून त्या एकमेकांत मिसळून टाकल्या, आणि आजकाल तिबेटमध्ये अनेक साधक करतात त्याप्रमाणे त्यांच्यात भेद केला नाही, तर सगळाच विचका होतो आणि अशा रितीने आपल्याला खरोखरच समाधीवस्था प्राप्त होईल का याबद्दल मला साशंकता वाटते.”
सतर्कता केवळ आपल्या सजगतेच्या विचलित होणाऱ्या प्रसंगांची नोंद ठेवत नाही, तर एका अर्थी ती अंतर्गत “धोक्याचा इशारा देणारी व्यवस्था” सुरू करते, जेणेकरून लक्ष पूर्ववत केल्यानंतर आपण आपलं लक्ष परत केंद्रित करू आणि सजगता पुनर्स्थापित होईल. सतर्कता येण्यासाठी आणि कार्य पुन्हा सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला सजगतेच्या उपासनेतील तिसरा महत्त्वाचा घटक वापरावा लागतो, तो असा: काळजी घेण्याची वृत्ती.
काळजी घेण्याची वृत्ती
काळजी घेण्याची वृत्ती (तिबेटी: बाग-योद, संस्कृत: अप्रमदा, काळजीपूर्वकता) हा मानसिक घटक काळजी घेतो आणि आपल्या मनस्थितीविषयी सावध राहतो. आपलं मन विध्वंसक बाजूला कलू नये यासाठी तो संरक्षण पुरवतो आणि आपल्या मनाला रचनात्मक, सकारात्मक बाजूकडे ठेवतो. त्यामुळे काळजी घेण्याच्या वृत्तीद्वारे आपण स्वतःच्या मनोवस्थेला गांभीर्याने घेतो, तिची काळजी घेतो. या संदर्भात काळजी घेण्याची वृत्ती आणि वसूबंधू यांनी सजगतेसंदर्भात वर्णिलेला उद्दिष्ट हवंहवंसं वाटणारा मानसिक घटक यांच्यात काहीसं साधर्म्य आहे.
आपण लक्ष केंद्रित केलेलं उद्दिष्ट आपल्याला विशिष्ट क्षणी हवंहवंसं वाटलं नाही, किंवा निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ते उद्दिष्ट आपल्याला जवळचं वाटलं नाही, लक्षात ठेवण्याइतकं महत्त्वाचं वाटलं नाही, तर ते आपल्याला आठवणार नाही, हे वसूबंधू नमूद करतो. तर, काळजी घेण्याच्या वृत्तीमध्ये हवंहवंसं वाटण्यापलीकडचं काही अभिप्रेत आहे. सजगतेमध्ये कमतरता आल्याचं सतर्कतेने शोधल्यानंतर लक्ष पुन्हा अचूक मानसिक पकडीवर केंद्रित करण्यासाठी आपल्याला ही काळजी घेण्याची वृत्ती प्रेरित करते. काळजी घेण्याची वृत्ती नसेल, तर आपल्याला उद्दिष्टाचा, सद्य क्षणाचा विसर पडलाय, आपण विचलित झालो आहोत, हे कळूनही त्याबद्दल काळजी वाटणार नाही. काळजी घेण्याची वृत्ती ही नैतिक स्वयंशिस्तीचा पाया असते, त्याद्वारे आपण विध्वंसक वर्तणुकीपासून दूर राहतो.
काळजी घेण्याच्या वृत्तीला बाग-योद ही तिबेटी संज्ञा वापरली जाते, त्याचा शब्दशः अर्थ “सावध राहणं” असा आहे. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे- बाग-मेद, म्हणजे सावधपणा नसणं, निष्काळजी असणं. परंतु, तिबेटीमध्ये बाग-योद म्हणून भाषांतरित झालेली मूळ संस्कृत संज्ञा आहे- अप्रमाद- त्याचा अर्थ “प्रमाद नसणं” असा आहे. प्रमाद म्हणजे नशेत किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर असणं, म्हणजे आपण काय बोलतो किंवा करतो याची आपल्याला काळजी नसते. काळजी घेण्याच्या वृत्तीद्वारे आपण दारूच्या नशेतील व्यक्तीसारखे होत नाही. आपण सभ्य, मोजके बोलणारे व जबाबदार होतो, आणि आपल्या मनोवस्थेची काळजी घेतो.
सारांश
तर, सजगतेच्या उपासनेमध्ये मानसिक घटकांचं एक व्यामिश्र जाळं उपयोगात आणलं जातं, त्या सगळ्या घटकांचं लक्ष अनुभवाच्या सद्य क्षणावर केंद्रित झालेलं असतं. सजगता, सतर्कता व काळजी घेण्याची वृत्ती या तीन प्रमुख घटकांसोबतच, भेद करणं, अचूक विचार करणं, नैतिक स्वयंशिस्त व गरज असेल तेव्हा लक्ष पूर्ववत करणं या घटकांचाही यात समावेश आहे. तर, यातील प्रत्येक घटक ठोसपणे वेगळा ओळखण्यासाठी आपल्याला भेदक्षम जागरूकता गरजेची आहे. सजगतेच्या साधनेसंदर्भात भेदक्षम जागरूकता म्हणजे केवळ लक्ष केंद्रित झालेल्या उद्दिष्टाच्या काही पैलूंपुरतं लक्ष मर्यादित न ठेवणं. उदाहरणार्थ, आपल्या अनुभवातील प्रत्येक क्षणाची चंचलता, एवढ्यावरच लक्ष केंद्रित असू नये. आपण साधना करत असताना आपल्या मनोवस्थेच्या विविध पैलूंवरही लक्ष केंद्रित असावं.
अचल व स्थिर मनोवस्था- शमथ- प्राप्त करण्यासंदर्भातील चर्चेमध्ये त्सोंगखापा यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, महान भारतीय बौद्ध गुरूंच्या प्रमाणित संहितांवर विसंबून राहणं गरजेचं आहे. ते असा सल्ला देतात:
अंधउत्साहाने स्वतःवर जास्त ताण घेतला तर आपल्याला हे साधेल, एवढीच आशा ठेवू नका. आर्यशुराने कॉम्पेडिअण ऑफ द फार-रिचिंगमध्ये (संस्कृत: परमितासमास) नमूद केल्यानुसार, “केवळ उत्साहाचा वापर केलात तर तम्ही थकून जात. पण भेदक्षम जागरूकतेच्या मदतीने स्वतःला विकसित केलं, तर तुम्ही महान उद्देश साध्य कराल.”