लाम-रिम आचरणासाठी ध्यानधारणेविषयी सल्ला

बुद्धाच्या शिकवणुकी आचरणात आणायच्या असतील, तर ध्यानधारणा हा अर्थातच महत्त्वाचा विषय ठरतो. परंतु, ध्यानधारणेमध्ये खास बौद्ध असं काही नाही. ध्यानधारणा सर्व भारतीय परंपरांमध्ये आणि भारताबाहेरच्या बौद्धेतर व्यवस्थांमध्येही सापडते.

संस्कृतमध्ये ध्यानधारणेसाठी (‘मेडिटेशन’) “भावना” असाही शब्द आहे. “भावना” शब्द “भू” या धातूपासून तयार होतो, त्याचा अर्थ आहे “टू बीकम” किंवा “कशाचं तरी दुसरं काही होणं.” काहीएक रचनात्मक मनोवस्था कशी प्राप्त करायची, हे शिकवणारी प्रक्रिया म्हणजे भावना. अलंकारिकरित्या बोलायचं तर आपण ती अवस्था ‘होतो’. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ध्यानधारणेद्वारे आपण स्वतःच्या मनाला विशिष्ट उपकार अवस्थेमध्ये आणतो.

भावना हा शब्द भू या संस्कृत धातूपासून आलेला असल्यामुळे, भावनेचा गर्भितार्थ रूपांतरण असा आहे. उदाहरणार्थ, आपण प्रेमाविषयी ध्यानधारणा करत असू, तर आपण प्रत्यक्षात स्वतःला आपल्या हृदयात प्रेमासह असणाऱ्या कोणामध्ये तरी स्वतःला रूपांतरित करतो. ही संज्ञा संस्कृतमधून तिबेटीमध्ये भाषांतरित झाली तेव्हा त्यासाठी वापरला गेलेला तिबेटी शब्द “सवय लावून घेणं” असं सुचवणारा होता. “गोम” हा तो तिबेटी शब्द. स्वतःला काही सकारात्मक सवय लावून घेणं- नकारात्मक किंवा तटस्थ सवय नव्हे- असा गोम या शब्दाचा अर्थ होतो, त्यातून सकारात्मक, रचनात्मक सवय लावून घेतली जाते.

त्यामुळे तिबेटी शब्द संबंधित संस्कृत शब्दाच्या अर्थाशी किंवा गर्भितार्थाशी बऱ्यापैकी साधर्म्य सांगणारा आहे. स्वतःला आपल्या ध्येयासारखं होण्यासाठी रूपांतरित करणं, हा दोन्ही संज्ञांचा गर्भितार्थ आहे- उदाहरणार्थ, आपल्याला हृदयातून प्रेम वाटतं त्या व्यक्तीमध्ये रूपांतरित होणं. आपण प्रेमाला उपकारक सवय म्हणून अंगीकारणं गरजेचं आहे. ही उपकारक सवय लावून घेण्यासाठी आपण ध्यानधारणेची पद्धत वापरतो.

Top