मूल्यवान मानवी जीवनाविषयी ध्यानधारणा

प्रस्तावना

आजच्या संध्याकाळी आपण विश्लेषणात्मक ध्यानधारणा या विषयावर बोलणार आहोत. जीवनामध्ये सुरक्षित, सकारात्मक दिशेने आणि बोधिचित्ताकडे जाण्यासाठी तीन टप्प्यांची प्रक्रिया पार पाडावी लागते.

  • आपण शिकवणुकी ऐकून घ्याव्यात.
  • मग आपण त्यावर विचार करायला हवा.
  • आणि त्यानंतर आपण त्याबद्दल ध्यानधारणा करायला हवी.

ही सर्वमान्य प्रक्रिया आहे. ही अतिशय प्रमाणित बौद्ध शिकवणूक आहे.

शांतचित्त होणं

श्वासोच्छवास शांत होण्यावर लक्ष केंद्रित करणं- शमथाची पूर्ण व्याप्ती हीच आहे, असं काही लोकांना वाटतं, पण तीन टप्प्यांमधील हा केवळ प्राथमिक टप्पा आहे. शिकवण ऐकून घेण्यापूर्वी आपण शांतचित्त होणं गरजेचं असतं; त्याबद्दल विचार करण्यापूर्वी आपण शांतचित्त होणं गरजेचं असतं; ध्यानधारणा करण्यापूर्वी आपण शांतचित्त होणं गरजेचं असतं, आणि श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून हे साधता येते. केवळ शांतचित्त होण्याने काही आपण एकाग्रतेच्या स्थितीपर्यंत पोचत नाही, आणि त्यातून आपल्या समस्यांची कारणं तर निश्चितपणे नष्ट होत नाहीत (पण या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आपण यातून अधिक स्वच्छ मनाचे मात्र होऊ शकतो).

पूर्ण एकाग्रता साधण्यासाठीचं उद्दिष्ट म्हणून श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करता येऊ शकतं, पण केवळ शांतचित्त होण्यावर लक्ष केंद्रित केल्याने आपण एकाग्रतेच्या स्थितीपर्यंत पोचत नाही. किंबहुना अधिक सूक्ष्म विचार केला तर, श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून पूर्ण एकाग्रता साधता येते असं केवळ थेरवादातील शिकवणुकींमध्ये म्हटलेलं आहे. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणं ही अवबोधाची संवेदना आहे- शारीरिक संवेदनेचा बोध त्यातून होतो. आणि महायान शिकवणुकीनुसार, (तिबेटी परंपरा हीच शिकवण मानते), पूर्ण एकाग्रता साध्य करण्यासाठी आपण मानसिक बोधक्षमता वापरणं गरजेचं असतं, संवेदनक्षमता नाही.

तर, आपण तिबेटी बौद्ध परंपरेतील ध्यानधारणेचा विचार करतो, तेव्हा आपण केवळ श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करून शांतचित्त होण्यापलीकडचा विचार करायला हवा. ही एक प्राथमिक पायरी आहे.

ऐकून घेणं

तर, आपण शिकवणूक ऐकून घ्यायला हवी, त्यावर विचार करायला हवा, आणि ध्यानधारणा करायला हवी. यातील प्रत्येक टप्प्यातून आपण एक प्रकाराची भेदक्षम जागरूकता प्राप्त करतो (सर्वसाधारणतः याचं भाषांतर विस्डम असं केलं जातं, पण विस्डम हा खूप ढोबळ अर्थ आहे). आधी आपण काही भेद स्पष्ट करायला हवा. याला सर्वसाधारणतः “अभिज्ञान” असं म्हणतात. अवकाशाच्या दृश्यसंवेदनेमध्ये खोलीचं आकलन व्हायचं असेल, तर भिंतीपासून कोणाच्यातरी चेहऱ्याचा आकार व रंग यांच्यातील भेद आपल्याला कळावा लागतो. तर, भेद करता येणं, हा पहिला टप्पा असतो. भेदक्षम जागरूकता त्यामध्ये निर्णायकत्वाची भर घालते: “हे निश्चितपणे हेच आहे आणि ते नाही” अशी स्पष्टता आणते. भेदजन्य जागरूकतेचा अर्थ हा होतो (मी म्हटल्याप्रमाणे, याचं भाषांतर सर्वसाधारणतः विस्डम असं केलं जातं, पण विस्डममधून आपण आत्ता बोलतोय त्याचा खरा अर्थ पोचत नाही).

काही शिकवणुकी ऐकून घेतल्याने आपल्याला भेदक्षम जागरूकता प्राप्त होते- बौद्ध शिकवणुकींमधील शब्दांमध्ये भेद करणं, असा याचा अर्थ होतो. बौद्ध विधान आपण इतर विधानांपेक्षा (समजा, बौद्धेतर विधानांपेक्षा) भिन्न असल्याचं आपण ओळखतो आणि त्याबद्दल निर्णायक भूमिका घेतो: “ही बुद्धाची शिकवण आहे.” या शिकवणुकींचा अर्थ लावण्यासाठी आपल्याला त्या बौद्ध शिकवणुकी आहेत, याबद्दल निर्णायक राहावं लागेल, नाही का?

तर, या टप्प्यावर आपल्याला हे धर्माचे शब्द आहेत याची कल्पना येते, पण त्या शब्दांच्या अर्थाची आपल्याला कल्पना नसते. उदाहरणार्थ, माझ्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे. हे विधान बौद्धेतर विधानांहून भिन्न असल्याचा भेद आपल्याला करता येतो. तर, आपल्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे, असं विधान सत्य आहे असं आपण मानतो, कारण बुद्धांविषयी आपल्याला आदर वाटतो. पण या टप्प्यावर आपल्याला सदर विधानाचा खरा अर्थ कळत नाही. हे मानवी जीवन निरर्थक हे, निरुद्देश आहे आणि या जीवनाचा काहीही उद्देश नाही, असं बौद्ध शिकवण मानत नाही, एवढं आपल्याला कळतं. इथे आपण भेद केलेला असतो: “बरं, आपल्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे, असं बौद्ध विधान आहे.”

विचार करणं

आता आपण पुढच्या टप्प्यावर जायला हवं. यात संबंधित विधानाबद्दल विचार करून त्याचा अर्थ समजून घ्यावा. बहुमोल मानवी जीवनाच्या व्याख्येबद्दल विचार करावा- याचा अर्थ काय- आणि हे बहुमोल का आहे याबद्दलचा तर्कविवेकी विचार करावा. हे आपल्याला समजलं, तर आपल्याला संबंधित शिकवण समजली, असं म्हणता येतं, नाही का? तर, यावर आपण काम करायला हवं. यावर आपण विचार करायला हवा. बहुमोल मानवी जीवनाची अठरा वैशिष्ट्यं कोणती आहेत हे आपण समजून घ्यायला हवं. उदाहरणार्थ, मी पशू नाही. इथे आपण जैविक अर्थाने बोलत नाही आहोत- आपण वनस्पती नाही; आपण पशू नाही. अशा अर्थाने आपण बोलत नाही आहोत. मानवी जीव म्हणजे दीर्घकालीन दृष्टीने काय उपकारक आहे आणि काय उपायकारक आहे यात भेद करण्याची क्षमता असलेला जीव, आणि तो समजून घेऊ शकतो, संवाद साधू शकतो, इत्यादी.

तर, याचा अर्थ काय हे आपण समजून घ्यायला हवं- मी पशू नाही- आणि आपण तर्कविवेक समजून घ्यायला हवा आणि त्यातून प्रमेय सिद्ध होतं याबद्दल आपल्याला खात्री वाटायला हवी. आपण मानव म्हणून जन्मलो आहोत, पशू म्हणून नाही, आणि धर्माच्या आचरणासाठी व धर्म जाणून घेण्यासाठी हा जन्म बहुमोल आहे, असं इथलं प्रमेय आहे. आपण जे काही सिद्ध करू पाहत आहोत त्याला प्रमेय म्हणतात.

मानव म्हणून जन्माला येणं, पशू म्हणून जन्माला न येणं, हे धर्माच्या आचरणासाठी व धर्म जाणून घेण्यासाठी बहुमोल आहे. यातील तर्कविवेक असा आहे की, पशू म्हणून मी पाशवी प्रेरणांच्या प्रचंड प्रभावाखाली असेन. पाशवी प्रेरणा म्हणजे काय? शिकार करणं व मारणं. स्वतःच्या जागेचं संरक्षण करण्यासाठी असं केलं जातं, उदाहरणार्थ- कोणी आपल्या अंगणात आलं तर कुत्रा भुंकतो. आणि उत्कट इच्छा वाटली की कोणत्याही वेळी दुसऱ्या पशूशी संभोग करणं. पशू म्हणून आपल्याला दीर्घकालीन दृष्टीने उपकारक काय आहे आणि अपायकारक काय आहे, याचा भेद करण्याची क्षमता अत्यंत कमी असते. अल्पकालीन पातळीवर पशूंना अर्थातच भेद करता येतो- सिंहापासून आपण पळून जातो, कारण ते उपकारक असतं. पण दीर्घकालीन पातळीवर काय अपायकारक आहे व काय उपायकारक आहे, याचा भेद त्यांना करता येत नाही. त्यामुळे मी तसा असतो, तर मला धर्माचं आचरण करणं अतिशय अवघड गेलं असतं.

याबद्दल विचार करावा आणि कशाबद्दल बोललं जातंय याची कल्पना करायचा प्रयत्न करावा. पशू असण्याचे तोटे कळून घेण्यासाठी आपण स्वतः पशू असण्याची कल्पना करण्याचा प्रयत्न करावा. माझ्यात शिकार करण्याची अतिशय तीव्र तत्काळ उटणारी प्रेरणा असेल तर... म्हणजे, एखादं मांजर किड्याच्या मागे किंवा उंदराच्या मागे पळतं ते पाहा- ते काही वेळा खाण्यासाठीही तसं पाठी जात नाही- फक्त त्या किड्याला किंवा उंदराला छळण्यासाठी आणि पकडण्यासाठी हे सुरू असतं. तर, जमिनीवरचं लहान काही हलताना पाहिल्यावर माझी पहिली उत्कट प्रेरणा ही अशी असेल... माझी आपोआप उद्भवणारी प्रेरणा अशी असेल, ती इतकी उचंबळून येत असेल, तर मी स्वतःवर खरोखरच कसं काम करू शकतो?

खरंतर स्वतःच्या वर्तनाचं निरीक्षण करणं अतिशय रोचक असतं. खोलीत आपल्याला एखादी माशी किंवा झुरळ किंवा डास दिसतो, आणि आपण जणू काही हेल्मेट घालून रायफलच बाहेर काढतो, मग माग काढायला लागतो आणि अशाने आपल्याला शिकार सापडेपर्यंत किंवा त्याला ठार करेपर्यंत ध्यानधारणा करता येत नाही- आपल्याला काहीच करता येत नाही. त्याला पकडून ठार करेपर्यंत आपल्याला ध्यानधारणा करणं शक्य होत नाही, अभ्यास करणं शक्य होत नाही- काहीच करणं शक्य होत नाही. गोष्टी त्यांच्या असंगत अंतापर्यंत नेऊन पाहणं अतिशय उपयुक्त ठरतं, असं मला वाटतं. हे वर नोंदवल्याप्रमाणे काही करत असताना आपण असा विचार केला की, आपण हेल्मेट घालून आफ्रिकन सफारीवर निघालोय, तर आपलं वर्तन किती हास्यास्पद आहे याचा आपल्याला अंदाज येईल. आपण डासाला खोलीतून बाहेर काढायचा प्रयत्न सुरू ठेवला, तरी आपण जे काही करतो आहोत त्याबद्दल आपली प्रवृत्ती किमान बदललेली असेल. आपण केवळ शिकारीवर निघालेले पशू नसतो.

शिवाय, आपण पशू असलो आणि इतर जीव सातत्याने आपला पाठलाग करत असतील, तर ते कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतात- त्यामुळे आपल्याला सतत सावध राहावं लागतं- त्यातूनही आपल्याला शांतचित्त होण्यासाठी, एकाग्रता कमावण्यासाठी व अभ्यासासाठी आवश्यक परिस्थिती मिळणार नाही.

तर, अशा प्रकारे आपण पशूच्या इतर गुणवैशिष्ट्यांचाही विचार केला- एखाद्या पशूच्या लैंगिक वर्तनाचा प्रकार, संबंधित पशूची प्रदेश निश्चित करण्याची प्रवृत्ती, इत्यादी- आणि आपली प्रेरणा, आपली प्रभुत्वशाली प्रेरणाही अशीच असेल, तरीही काही प्रगती साधणं अतिशय अवघड जातं.

आपल्याला सातत्याने प्रचंड ओझं वाहून न्यावं लागत असेल- उदाहरणार्थ, भारतामध्ये बैलाला प्रचंड अवजड ओझं वाहून न्यावं लागतं (त्यासाठी त्याला सतत चाबूक मारला जातो, इत्यादी)- तर त्यामुळेदेखील कोणतंही आचरण अतिशय अवघड होऊन जातं. तर, अशा प्रकारे आपण या उदाहरणाचा विचार करतो, पशू म्हणून जन्माला येण्याच्या या विशिष्ट क्षणाचा विचार करतो तेव्हा आपण याचा संदर्भा प्राचीन भारताशी जोडायला हवा. आपण बाम्बीविषयी किंवा कोणाच्या श्रीमंत घरातील केसाळ कुत्र्याविषयी विचार करत नाहीयोत. आपण झुरळाविषयी विचार करतो आहोत. आपण रस्त्यावरच्या कुत्र्याविषयी विचार करतो आहोत. आपण कष्टकरी पशूविषयी बोलतो आहोत.

तर इथे आपल्याला निर्णायक गुणवैशिष्ट्य योग्यरित्या सापडतं, आणि आपण असं नसल्याचंही आपल्याला कळतं. त्यामुळे मी यापासून मुक्त आहे. मी यापासून मुक्त आहे म्हणूनच मला धर्माचरणासाठी सक्षम होण्याची संधी व स्वातंत्र्य मिळतं. त्यामुळे मला बहुमोल मानवी जीवन मिळालं आहे.

हा टप्पा पूर्ण करण्यात काही वेळ जाऊ द्यावा. आपण पशूंविषयी बोलत असतो तेव्हा काय बोलतोय हे आपल्याला कळतं आणि आपण त्यापासून मुक्त असल्याचंही आपल्या लक्षात येतं, आणि आपण त्यापासून मुक्त असल्यामुळे आपल्याला धर्माचरणाची संधी मिळते.

बरं. आपण पूर्णतः पाशवी प्रेरणांच्या आहारी नाही, हे आपल्या लक्षात येतं:

  • जमिनीवरून हलणाऱ्या प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे मी धावत जाऊन झडप घालण्याची गरज नाही.
  • इतर सर्व पशू भुंकत असतील तेव्हा मी भुंकायची गरज नाही आणि ते करत असतील ते मी करायची गरज नाही.
  • मला आकर्षित करणारा इतर कोणी प्राणी दिसल्यानंतर मी त्यावर सरळ झडप घालायला नको.

माझ्यात या पाशवी प्रेरणा थोड्याफार प्रमाणात असतीलही, तरी मी त्यानुसार कृती करायला नको. मी माणूस आहे. काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे यात भेद करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. तर, या कारणाने माझ्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे आणि या बहुमोल मानवी जीवनाला काही उद्देश आहे. धर्माचा अभ्यास करणं व त्यानुसार आचरण करणं, हा तो उद्देश. खूप पैसा कमावण्यासाठी हे जीवन बहुमोल नाहीये.

तर, या टप्प्यावर आपण काय करतो? धर्माविषयी विचार व चिंतन करतो. आपण केवळ शब्दांवर विसंबून राहत नाही. ही पहिली पायरी आहे. बहुमोल मानवी जीवनाच्या आणि आपल्या परिस्थितीच्या, आपल्या विशिष्ट वातावरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण खुणा व निर्णायक गुणवैशिष्ट्यांवर आपण विसंबून राहतो, तर्कविवेकाच्या मांडणींवर विसंबून राहतो, आणि त्यातून तर्काधारित आकलन प्राप्त होतं. तर्क लावणं म्हणजे तर्कविवेकाच्या मांडणीवर विसंबून राहणं- कारण हे आहे म्हणून मला ते कळतं. आणि विचारप्रक्रियेतून उगम पावणारी भेदजन्य जागरूकता आपल्याला प्राप्त होते, ती अर्थपूर्ण संकल्पनेवर लक्ष केंद्रित करते, केवळ निरर्थक शब्दांवर नव्हे. तर, “माझ्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे, कारण मी पशू असण्यापासून मुक्त आहे,” ही अर्थपूर्ण संकल्पना आहे. आणि त्याबद्दल निर्णायक अशी ही संकल्पना आहे. इतर कारणांपासून व अचूक नसलेल्या व्याख्यांपासून ती भेद निश्चित करते आणि त्याबद्दल निर्णायक भूमिका घेते.

या भेदक्षम जागरूकतेवर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करू: “माझ्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे, कारण मी पशू असण्यापासून मुक्त आहे.” या आकलनावर आपण लक्ष केंद्रित करतो. वास्तविक क्रम उलटा असायला हवा: “मी पशू असण्यापासून मुक्त आहे, कारण माझ्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे.” निराळ्या शब्दांत सांगायचं तर, आपण तर्कविवेकाच्या मांडणीवर विसंबून राहतो आणि मग काहीएक निष्कर्ष काढतो, आणि वारंवार आपण तर्कविवेकावर विसंबून राहतो.

बरं. तर, ऐकणं आणि विचार करणं या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये बराच मोठा फरक आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. या दोन्हींतून आपल्याला मिळणारी भेदक्षम जागरूकता बरीच भिन्न असते. 

  • पहिल्या टप्प्यामध्ये: “माझ्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे.” ही बौद्ध शिकवणूक असल्याचं तुम्हाला कळतं- त्यात काही शंका नाही- पण आपण हे सत्य असल्याचं गृहित धरतो. आपल्याला त्याचं खरोखरचं कारण माहीत नसतं. त्याचा खरोखरचा अर्थ माहीत नसतो.
  • पण दुसऱ्या टप्प्यावर आपल्याला बहुमोल मानवी जीवनाचा अर्थ काय हे कळतं, आपल्याकडे हे जीवन का आहे (त्याचं कारण काय आहे) हे आपल्याला कळतं, आणि हे जीवन बहुमोल का होतं याचा उद्देश आपल्याला कळतो (धर्माचरण करता यावं यासाठी ते बहुमोल असतं). तर, आकलनाशिवाय ते विधान सत्य म्हणून गृहित धरण्याऐवजी आपल्याला हा निष्कर्ष काढणं शक्य होतं आणि तर्काद्वारे त्याची वैधता कळते. याचा अर्थ आपण तर्कविवेकाच्या मांडणीवर विसंबून राहतो. आणि त्याबद्दल आपल्याला भेदक्षम जागरूकता प्राप्त होते. त्याबद्दल आपण निर्णायक भूमिका घेतो. “या व त्या कारणासाठी माझ्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे आणि ते या व त्या उद्देशाने वापरायचं आहे,” असा आपला ठाम निर्धार असतो.

वादचर्चा

ठोस निर्धार प्राप्त करण्यासाठी इथे वादचर्चा अतिशय उपयुक्त ठरते, कारण वादचर्चेमुळे आपल्याला स्वतःचं अनिश्चित भरकटणं नष्ट करता येतं किंवा अर्थाची अचूक नसलेली संकल्पना सोडून देता येते. आपण अनिश्चित राहत नाही. आपण भरकटत नाही: माझ्याकडे हे आहे का? माझ्याकडे हे नाहीये का? याचा अर्थ हा होतो का? याचा अर्थ तो होतो का? आपल्या विचारप्रक्रियेमध्ये आपल्याला जितक्या उणिवा सापडणं शक्य असतं त्याहून अधिक उणिवा इतरांना सापडू शकतात. तुम्ही एकटं बसून स्वतःच्या आकलनाची तपासणी करत असाल, तर “अरे, आता पुरेसं झालंय” असं वाटणं सोपं जातं. इतरांना आपल्या विचारप्रक्रियेमधील दोष व उणिवा अधिक परिणामकारकतेने सापडणं शक्य असतं आणि आपण करणार नाही इतक्या चिकाटीने व उत्साहाने ते हे काम करतात. काही वेळा वादचर्चेमध्ये आपण एखाद्या भावूक क्षणी असं म्हणून जातो की, “आता पुरे झालं. मला जरा एकटं सोडा.” तुम्ही ध्यानधारणेमध्ये ही अशा प्रकारे तपासणी करत असाल, तर कधीच तुम्ही ती प्रक्रिया थांबवली असती. तर, या कारणामुळे तिबेटी परंपरा वादचर्चेच्या पद्धतीवर खूप जास्त भर देते. आपल्या आकलनाविषयी कोणतीही अनिश्चितता न बाळगता ठोस निर्धारासाठी आपल्याला मदत व्हावी हा त्यामागचा हेतू असतो.

विश्लेषणात्मक ध्यानधारणा

तर अशा प्रकारे शिकवणुकींबद्दल आपण विचार करतो किंवा चिंतन करतो. मग आपण त्याबद्दल ध्यानधारणा करणं गरजेचं असतं. म्हणजे, दुसरा टप्पा ध्यानधारणेचा आहे असं लोकांना अनेकदा वाटतं, पण प्रत्यक्षात तो शिकवणुकीबद्दल विचार करण्याचा- चिंतन करण्याचा टप्पा असतो. ध्यानधारणा त्यापलीकडे जाते. पण आपण दुसरा टप्पा पार केल्याशिवाय ध्यानधारणा करू शकत नाही. तुम्हाला शिकवण समजल्याशिवाय आणि ती अचूक असल्याबद्दल तुमची खात्री पटल्याशिवाय, तुम्हाला त्यावर ध्यानधारणा करता येत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट समजलेली आहे आणि ती चुकीची असल्याबद्दल तुम्हाला खात्री वाटते, हे शक्य असतं. पण आपण आकलनाविषयी आणि ती सत्य असल्याबद्दल खात्री वाटण्याविषयी बोलतो आहोत. हे आकलन व निर्धार यांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एकात्मक करण्याचा टप्पा ध्यानधारणेत येतो.

तर आधी आपण विश्लेषणात्मक ध्यानधारणा करावी. मी याला “सूक्ष्मदर्शी ध्यानधारणा” असं म्हणणं पसंत करतो. त्यानंतर स्थिरीकरण ध्यानधारणा असते. शिकवणुकी अंगीकारण्यासाठी व पचवण्यासाठी या दोन ध्यानधारणा आहेत. आता, सूक्ष्मदर्शी ध्यानधारणेसाठी आपण मूलतः दोन मानसिक घटक वापरतो (यावर भर दिलेला आहे; आपल्या वापरामध्ये अर्थातच इतर अनेक मानसिक घटक असतात, एकाग्रता इत्यादी). ‘सकल शोध’ / ग्रॉस डिटेक्शन (रतोग-पा) व ‘सूक्ष्म पारख’ / सट्ल डिसर्नमेन्ट (दप्योद-पा) असं याचं भाषांतर करायला मला आवडतं. काही संदर्भांमध्ये या दोन संज्ञांचा अर्थ “तपास करणं” व “छाननी करणं” असा होतो.

हे दोन मानसिक घटक आपण कसे समजून घ्यायचे? यासाठी संहितासंपादनाचं उदाहरण घेऊ. तुम्ही लिहिलेल्या किंवा इतर कोणीतरी लिहिलेल्या मजकुरात चुका असतील तर त्या अशा संपादनामध्ये दुरुस्त केल्या जातात. त्यासाठी आधी आपण ढोबळपणे तपास करू, मग विशिष्ट छापील पानावर चुका असल्याचा शोध आपल्याला लागतो. ढोबळपणे पाहिलं तरी चूक शोधता येते. मग आपण अधिक सूक्ष्मरित्या छाननी करतो आणि विशिष्ट तपशिलांचा सूक्ष्मदर्शी वेध घेतो. यातला भेद तुमच्या लक्षात आला का? तर, याला तपास करणं असं म्हणतात. काय चाललंय याचा सकल शोध यात घेतला जातो. त्यानंतर अतिशय काळजीपूर्वक छाननी केली जाते. काय चाललंय याची सूक्ष्म पारख केली जाते.

तर, आपल्याला मिळालेल्या बहुमोल मानवी जीवनासंदर्भात विश्लेषणात्मक किंवा सूक्ष्मदर्शी ध्यानधारणा करण्यासाठी आपण काय करायला हवं? आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करावं, आणि पशू नसण्याची निर्णायक गुणवैशिष्ट्यं आपल्यामध्ये आहेत का, याचा तपास करावा व छाननी करावी. हा तपास आपण ढोबळपणे करतो, आणि अशा प्रकारे असण्याचं आपलं स्वातंत्र्य आपल्याला शोधता येतं. आपण तपास केल्यावर आपल्याला कशाचा शोध लागतो? आपल्याला शिकता येतं, आपल्याला संवाद साधता येतो, आपल्याला पशूहून शक्य तितक्या अधिक प्रगत पातळीवरून कृती करता येते, याचा शोध आपल्याला लागतो. आणि हे आपण व्यक्तीशः पाहावं, केवळ शब्दांद्वारे नव्हे. असे दोन टप्पे पार पडतात. या शब्दांना अर्थ असतो, हे लक्षात आहे ना? त्यातून आपल्याला पुढील गोष्टींचा शोध लागतो:

  • मला शिकणं शक्य आहे
  • मला संवाद साधता येतो.
  • पशूहून अधिक प्रगत पातळीवरून मी कृती करू शकतो.

तर, पशू असण्यापासून मिळालेल्या मुक्तीचा शोध आपल्याला लागतो. मग आपण त्याची अतिशय काळजीपूर्वक छाननी करतो आणि काही वेळा आपण पशूसारखी कृती करतही असलो- उदाहरणार्थ, डिस्को-क्लबमध्ये जाऊन आपण करतो ते लैंगिक वर्तन, त्यात आपल्या संभाव्य जोडीदार व्यक्तीच्या पार्श्वभागाचा वास घेतला जातो आणि एका रात्रीपुरते संबंध येतात- तरी आपल्यावर तसं करण्याची सक्ती नसते. आपल्यावर तसं असण्याची सक्ती नसते.

आपण भेद जाणू शकतो आणि स्वतःचं वर्तन बदलू शकतो. तर, आपण पशू नसण्याच्या स्वतःच्या सूक्ष्मदर्शी आकलनावर लक्ष केंद्रित करतो. वर्तनासंदर्भातील सूक्ष्म तपशील हे असे आहेत.

स्वतःला जोडीदार शोधण्यासाठी आसपास भटकणं किंवा आपल्या घरातील डास व झुरळं शोधून मारणं असो किंवा काहीही असो, आपण त्यातून असं सूक्ष्मदर्शी आकलन आणायचा प्रयत्न करतो की, “बरं, मी अशी कृती करू शकत असलो, तरी माझ्यावर त्याची सक्ती नाही. मी निवड करू शकतो. मी तसं असण्याची गरज नाहीये. मी मानव आहे. मी पशू नाही. इतर सर्व कुत्र्यांवर मी सतत भुंकायची गरज नाही. मी इतक्या लांबीचे कपडे घालायला हवेत आणि तितक्या लांबीचे कपडे घालायला नकोत, किंवा मी माझे केस अशा प्रकारे ठेवायला हवेत आणि तशा प्रकारे ठेवायला नकोत, किंवा मी हे गाणं म्हणायला हवं आणि ते गाणं म्हणायला नको, असं कोणी मला सांगितलं, तरी मी तसं करायलाच हवं असं नाही. आपण पशू नाही आहोत- त्यामुळे कोणी भुंकलं की आपण त्यावर प्रतिसादादाखल भुंकायची गरज नाही.” अधिक प्रस्तुत ठरणारा, सयुक्तिक मुद्दा वापरू. प्रत्येक जण “युद्ध, युद्ध, युद्ध” असं ओरडत असतो, तेव्हा आपणही “युद्ध, युद्ध” असं ओरडायची गरज नाही, हो, ना? आपण पशूसारखं इतरांनी भुंकल्यावर भुंकायलाच हवं असं नाही.

तर, “मी खरोखरच पशू नाही”, हा सूक्ष्म तपशील या प्रक्रियेत आपल्या लक्षात येतो. मालकाने “जा, ते हाड घेऊन ये” असा आदेश द्यायची वाट पाहत बसणाऱ्या कुत्र्यासारखे आपण पशू नसतो. आपण विचार करू शकतो.

हा शोध घेणं व सूक्ष्मदर्शी आकलन टिकवणं, विशेषतः आपण पशू नाही हे सूक्ष्मदर्शी आकलन टिकवून आपण पुन्हा तर्कविवेकाची मांडणी स्वीकारतो:

  • आपण पशू असतो, तर आपल्याला धर्माचं पूर्णतः आचरण करता आलं नसतं.
  • आपल्याला पशू नसण्याचं स्वातंत्र्य आहे.
  • त्यामुळे धर्माचारण करण्यासाठी आपल्याकडे बहुमोल मानवी जीवन आहे.

मग आपण त्या तर्काधारित आकलनावर लक्ष केंद्रित करतो आणि बहुमोल मानवी जीवन असण्यासंदर्भात स्वतःची सूक्ष्म पारख करण्यावर एकाग्र होतो.

तर, कृपया तसं करा:

  • आपण पशू असतो, तर आपल्याला धर्माचरण पूर्णतः करता आलं नसतं.
  • आपल्याला पशू नसण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याची सूक्ष्म पारख आपल्याला करता येते.
  • त्यामुळे आपल्याकडे धर्माचरणासाठी बहुमोल मानवी जीवन आहे.
  • आणि आता या कारण शोधणाऱ्या तर्काधारित आकलनासह आपल्याकडे बहुमोल मानवी जीवन असते, याची सूक्ष्म पारख आपल्याला करता येते.

बरं. ही सूक्ष्म पारख असल्यामुळे याला सूक्ष्मदर्शी ध्यानधारणा असं म्हणतात. मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे, याचं भाषांतर सर्वसाधारणतः अनॅलिटिकल मेडिटेशन / विश्लेषणात्मक ध्यानधारणा असं केलं जातं, पण अनॅलिटिकल / ध्यानधारणा या संज्ञेतून खरा अर्थ नीटसा पोचत नाही, हो ना? इथे आपल्याला ध्यानधारणेतून उद्भवणारी भेदक्षम जागरूकता उपयोगी पडते. हे अतिशय निर्णायक असतं, कारण आपल्याकडे यात्या कारणासाठी हे बहुमोल मानवी जीवन असल्याची सूक्ष्म पारख आपल्याला करता येते. मग आपण काळजीपूर्वक छाननी करतो. निश्चितपणे यात्या कारणासाठी आपल्याकडे हे जीवन असल्याची सूक्ष्म पारख आपण करतो.

स्थिरीकरण ध्यानधारणा

ध्यानधारणेचे दोन टप्पे असतात- सूक्ष्मदर्शी व स्थिरीकरण. स्थिरीकरण ध्यानधारणेद्वारे आपण बहुमोल मानवी जीवन असण्यावर लक्ष केंद्रित करतो, आणि त्याच्या तपशिलांची सक्रियरित्या सूक्ष्म पारख करत नाही- सक्रियरित्या हा इथे महत्त्वाचा शब्द आहे. “मी पशू नसल्यामुळे हे असं आहे” आणि “मी पशू असतो, तर मला ध्यानधारणा करता आली नसती,” अशी सूक्ष्म पारख त्या टप्प्यात नसते. तर, आपण बहुमोल मानवी जीवन आपल्याकडे आहे या जाणीवेवर लक्ष केंद्रित केलेलं असतं. जाणीव या शब्दाचा इथला अर्थ ठाम निर्धार असा आहे- आपला त्यावर खरोखरचा विश्वास असतो. त्यावर आपण लक्ष केंद्रित करतो. यात तपशिलांची सूक्ष्म पारख नसते. यात ठाम निर्धार असतो आणि हे बहुमोल मानवी जीवन आपल्याकडे आहे याची जाणीव असते. हे जीवन म्हणजे काय आहे याची समज व त्याची सूक्ष्म पारख यांवर हे आधारलेलं असतं.

एका क्षणासाठी हे करून पाहू.

अशा प्रकारच्या ध्यानधारणेद्वारे आपण स्वतःच्या उणिवांपासून आणि वेळ वाया घालवण्यासारख्या समस्यांपासून सुटका करू घेतो. या प्रकारच्या ध्यानधारणेद्वारे आपण स्वतःच्या बहुमोल मानवी जीवनाची जाणीव ठेवून गुण विकसित करतो आणि धर्मासाठी जीवनाचा रचनात्मक वापर करतो. स्वतःविषयी आपल्याला काही समजल्यामुळे आपण ते अंगीकारायचा प्रयत्न करतो; ते जाणवून घेतो. यातून बदल घडतो, कारण यातून समस्यांचं कारण नष्ट होतं आणि गुण विकसित होतात.

केवळ श्वासावर लक्ष केंद्रित करणं व त्यासोबत कोणतंही आकलन नसणं, या स्थितीशी उपरोक्त स्थितीशी तुलना करून पाहावी. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्याने आपण शांतचित्त होऊ शकतो, त्यातून आपल्याला झोप लागते आणि तणावनिवारणाची गोळी घेतल्यासारखा परिणाम होतो. यातून आपल्या समस्यांची कारणं संपुष्टात येत नाहीत. दुसऱ्या बाजूला, आपण आकलनासह व सूक्ष्मदर्शी पद्धतीने श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केलं, तर आपल्याला अनित्यता, क्षणिक बदल, श्वासोच्छवासावर नियंत्रक म्हणून कोणीही ठोस मी नाही, अथवा प्रक्रियेतून अलिप्त निरीक्षक, अशा गोष्टींची सूक्ष्म पारख होते व समजूत पटते. यातून आपल्या समस्यांची कारणं दूर करण्याठीच्या कृतीची सुरुवात होऊ शकते.

धर्माचं ध्येय गाठण्यासाठी ही सूक्ष्मदर्शी पारख खूप, खूप महत्त्वाची असते: आपल्या समस्यांच्या कारणांपासून मुक्त होणं आणि आपलं सामर्थ्य, सकारात्मक सामर्थ्य प्राप्त करणं यातून शक्य होतं.

बौद्धिक, अंतर्ज्ञानात्मक, उत्स्फूर्त व भावनिकदृष्ट्या जाणवणारी आकलनं

सूक्ष्मदर्शी व एकाग्रताधिष्ठित, या दोन्ही ध्यानधारणा सांकल्पनिक आहेत, हे इथे लक्षात घ्यायला हवं. आपण इथे केलेल्या वर्णनामधील हे दोन सांकल्पनिक बोध आहेत. हे दोन्ही सांकल्पनिक आहेत. बहुमोल मानवी जीवनाचा अर्थ काय या संकल्पनेच्या माध्यमातून या दोन ध्यानधारणा केल्या जातात. सांकल्पनिक म्हणजे संकल्पनेच्या माध्यमातून. सूक्ष्मदर्शी ध्यानधारणा तर्कविवेकाच्या मांडणीवर विसंबून असते, स्थिरीकरण ध्यानधारणेमध्ये तर्कविवेकाच्या मांडणीवर विसंबून राहायचे नसते, तरीही या दोन्हींमध्ये आपल्या बहुमोल मानवी जीवनावर संकल्पनेद्वारे लक्ष केंद्रित केले जाते, त्यासाठी बहुमोल मानवी जीवन म्हणजे काय याबद्दलची संकल्पना वापरली जाते. तर, ही संकल्पना म्हणजे चित्रण. संकल्पना म्हणजे काय? संकल्पना म्हणजे बहुमोल मानवी जीवनाचं चित्रण. हे आपण शब्दाने चित्रित करतो किंवा प्रतिमेद्वारे चित्रित करतो किंवा जाणिवेद्वारे चित्रित करतो, पण या चित्रणाशी अर्थ जोडलेला असतो. शब्द, प्रतिमा किंवा जाणीव यांच्याशी अर्थ जोडलेला असतो.

आपण पाश्चात्य संज्ञा वापरतो, आणि त्या पूर्णतः निराळ्या व्यवस्थेतून आलेल्या असतात, त्यामुळे बौद्ध ध्यानधारणेची प्रक्रिया समजून घेण्याबाबत बराच गोंधळ असल्याचं अनेकदा दिसतं, म्हणून मी हा मुद्दा मांडतो आहे. पाश्चात्त्य शब्दप्रयोगांमध्ये आपण बौद्धिक प्रक्रिया व अंतर्ज्ञानी प्रक्रिया यांच्यात भेद करतो. तर, इथे आपल्या बौद्ध विश्लेषणामध्ये त्यासारखे कोणते शब्दप्रयोग करता येतील?

  • आपण शब्दांद्वारे कशाचंतरी चित्रण करत असलो- शब्दांनी बनलेली संकल्पना मांडत असलो- आणि शब्दांच्या माध्यमातून कशावरतर लक्ष केंद्रित करत असलो, तर त्याला आपण बौद्धिक प्रक्रिया म्हणतो.
  • आपण जाणिवेद्वारे किंवा प्रतिमेद्वारे कशाचंतरी चित्रण करत असलो- जाणीव किंवा प्रतिमा यांवर आधारलेली संकल्पना मांडत असलो- आणि त्यावर लक्ष केंद्रित करत असलो, तर त्याला अंतर्ज्ञानी प्रक्रिया असं म्हणता येतं.

आपण एखाद्या गोष्टीचं चित्रण शब्दांद्वारे किंवा एखाद्या प्रतिमेद्वारे व जाणिवेद्वारे करत असलो, तरी कोणत्याही स्थितीत चित्रण योग्य अथवा अयोग्य असू शकतं, हे कृपया लक्षात घ्यावं. आणि या दोन्ही प्रक्रिया, बौद्धिक प्रक्रिया व अंतर्ज्ञानी प्रक्रिया सांकल्पनिक असतात आणि दोन्हींसोबत शब्द म्हणजे काय किंवा जाणीव म्हणजे काय किंवा प्रतिमेचा अर्थ काय होतो याचं अचूक आकलन आवश्यक असतं. हे आपल्या लक्षात येतंय ना?

शिवाय, हे आकलन पचवण्यासाठी त्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे आणि ठाम निर्धाराने आपण त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पाश्चात्त्यांमध्ये याला उत्स्फूर्त आकलन असं म्हणतील असं मला वाटतं. आणि या उत्स्फूर्त आकलनासोबत आस्वादासारख्या- आपण बहुमोल मानवी जीवनाचे मूल्य व अनन्यता यांचा आस्वाद घेतो- रचनात्मक भावना असतील, तर भावनिकदृष्ट्या आपल्याला आकलनाचा आधार आहे असं आपण पाश्चात्त्य देशांमध्ये म्हणतो. 

त्यामुळे अध्यात्मिक गुरूच्या सुदृढ नातेसंबंधांना, त्यावरील ध्यानधारणेला दोन आयाम आहेत. गुरूच्या गुणांविषयी ठाम खात्री, हा एक आयाम. आणि त्यांच्या दयाळूपणाला दाद देणं, हा दुसरा आयाम. तर, आपला निर्धार ठाम असतो, आणि आपण भावनिकदृष्ट्या प्रेरित असतो. या दोन गोष्टी आपल्याकडे असतात, तेव्हा शब्दांच्या चित्रणातून आकलन तयार झालं की जाणिवेच्या चित्रणातून तयार झालं याने काही फरक पडत नाही. तर, आपल्या पाश्चात्त्य विश्लेषणाद्वारे आपण बौद्धिक दृष्टिकोन अनुसरतोय किंवा अंतर्ज्ञानी दृष्टिकोन अनुसरतोय याने काही फरक पडत नाही. आपला निर्धार ठाम असेल आणि त्याबद्दल आकलन असेल व आपण त्याचा उचित आस्वाद घेत असू, तर आपण त्यात निश्चितपणे परिवर्तन घडवू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी: आपण संसारात आहोत तोवर परिवर्तन एकरेषीय नसतं. त्यात चढ-उतार येतात. दर दिवशी ते सुधारत जात नाही. दीर्घकालीन कल सुधारणेचा असेलही, पण दर दिवसाला, दर तासाला, त्यात चढ-उतार होत असतो.

आपण अंतर्ज्ञानी दृष्टिकोन ओळखण्याचा प्रयत्न करतो तेव्हादेखील आपल्याला आकलनासाठी व निर्धारासाठी तर्कविवेकावर अवलंबून राहणं गरजेचं ठरतं. अन्यथा आपल्याकडे केवळ कशाचीतरी जाणीवच तेवढी असेल, तर ते अतिशय चुकीचं व ढोबळ होऊ शकतं आणि त्याचा अर्थ काय याचं काहीच आकलन आपल्याकडे असत नाही. पण आपण तर्कविवेकाची वाट वापरली आहे, स्वतःमधील विविध गोष्टींची सूक्ष्म पारख आपण केली आहे आणि त्यांचं आकलन आपल्याला झालं आहे, त्याबद्दल आपल्याला खात्री वाटते आहे, आपल्याला त्यांच्या व्याख्या माहीत आहेत, आपल्याला स्वतःमध्ये त्याची ओळख पटते आहे- अशा वेळी आपण बुद्धिजीवी प्रकारचे असलो तर शब्दांद्वारे त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो, किंवा आपण अंतर्ज्ञानी प्रकारचे असलो, तर आपण प्रतिमा वा जाणिवेच्या संदर्भात त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. कोणता प्रकार वापरला जातो याने काही फरक पडत नाही. दोन्ही वैध असू शकतात आणि दोन्ही सांकल्पनिक असतातच. आपली बोधनाच असांकल्पनिक असेल तर गोष्ट वेगळी- पण तसं असणं खूप खूप अवघड आहे. हे केवळ आकलन करून घेण्याबद्दल झालं- आपल्याला बहुमोल मानवी जीवन मिळालं आहे याचं आकलन करून घेणं- त्याबद्दलच्या संकल्पनेद्वारे नव्हे, तर त्याबद्दलच्या जाणिवेद्वारे, पण सरळसोटपणे. हे अतिशय अवघड आहे.

आपल्याला हे स्पष्ट असेल, तर आपण बुद्धिजीवी प्रकारचे असलो किंवा अंतर्ज्ञानी प्रकारचे असलो, तरी कोणतीही प्रगती करण्यासाठी आपल्याला जाणून घेण्याच्या या वैध मार्गांमधून जावं लागतं, हे आपल्याला कळतं. तुम्ही काहीतरी ऐकता, ते सत्य आहे असं तुम्ही गृहित धरता. मग तुम्ही समजून घेऊ पाहता, सूक्ष्मदर्शी आकलन करून घेता आणि समजून घेता; याचं तर्काधारित आकलन करून घ्यावं लागतं. आणि मग त्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. बरं, या वाटेवर प्रगती करण्याची प्रक्रिया ही अशी आहे. ऐकून घेणं, विचार करणं, आणि ध्यानधारणा करणं, अशी ही प्रक्रिया आहे. विश्लेषणात्मक ध्यानधारणा अशी असते. 

त्यासाठी काही वेळ लागतो. आता तुम्ही याबद्दल बहुधा फक्त ऐकून घेतलं असेल. मग तुम्ही त्यावर विचार कराल आणि ते चघळून पाहाल. आधी तुम्हाला विश्लेषणात्मक ध्यानधारणेविषयी केवळ काही ढोबळ आकलन असेल, पण आता तुम्ही अधिक प्रगत चर्चा थोडी ऐकली आहे. आता तुम्ही त्यावर विचार करायला हवा. त्यावर शांतपणे विचार करावा.

प्रश्न

या विश्लेषणात्मक ध्यानधारणेचं महत्त्व मला कळलं आणि गुरूसोबतच्या संबंधांशी ते कसं जोडलेलं आहे हेदेखील कळलं. पण आम्ही गुरूंना प्रश्न विचारायचे नाहीत, ते जे काही बोलतात आणि ते जसंकसं वागतात ते आम्ही शांतपणे, कोणत्याही शंका वा प्रश्न न विचारता स्वीकारायलाच हवं, असं आम्हाला का सांगितलं गेलं, हे मला कळलं नाही.

धर्मामध्ये आपल्याला अशीच्याअशीच शिकवण आढळते असं नाही. विशेषतः विनयाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर: गुरू नैतिक शिस्तीविरोधात, प्रतिज्ञेविरोधात जाणारं वागत असतील, तर आपण ते दाखवून द्यायला हवं. आपण त्या वागण्याला साथ देऊ नये. गुरूने आपल्याला नैतिक शिकवणुकीविरोधात जाणारं काही करायला सांगितलं, तर आपण त्यावर स्पष्ट नकार द्यावा.

आणि सूत्र व तंत्र शिकवणुकींचा सखोल विचार केला, तर आपल्याला असं म्हणता येईल: गुरूने शिकवणुकींशी सुसंगत नसलेलं काही सांगितलं तर, “मला हे समजलं नाही. तुम्ही आधी बोललात त्याला याने छेद जातो. तुम्ही हे अधिक स्पष्ट करून सांगाल का?” असं आपण विचारावं. “हे संहितेला छेद देणारं आहे. तुम्ही हे अधिक स्पष्ट करून सांगाल का?” असं विचारावं. इतर कोणाहीप्रमाणे गुरूंचीही बोलताना गफलत होऊ शकते.

बुद्धाच्या गतजीवनातील अभिजात उदाहरणाप्रमाणे: संबंधित गुरूने बुद्धाला व इतर विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन चोरी करायला सांगितलं, तेव्हा बुद्ध बाहेर गेला नाही व चोरी केली नाही. त्यावेळी गुरूने त्याला जाब विचारला, त्यावर बुद्ध म्हणाला, “चोरी करण्याने कोणाला काय मदत होणार आहे?” यावर गुरू म्हणाले, “अरे, तुला या धड्याचं मर्म कळलंय. केवळ तुलाच ते कळलं.”

सर्वोच्च तंत्र दृष्टिकोनातून: गुरूच्या वागण्याबोलण्यात आपल्याला अंतर्विरोध दिसले आणि गुरू धर्माविरोधात वागत असतील, आणि आपण त्यांना प्रश्न विचारल्यावरही त्यांनी ते कबूल केलं नाही, त्यांनी स्वतःमध्ये बदल केला नाही, तर काय करायचं? आपल्याला त्यांचे हे सगळे दोष दिसत असतात, त्यामुळे आपण गुरूकडून तांत्रिक दीक्षा घेतली असली, तरी त्यांच्यापासून अंतर राखावं. त्या गुरूसोबत अध्ययन करण्याची गरज नाही किंवा त्याच्या सोबत असण्याची गरज नाही. पण आपलं तोंड बंद ठेवावं. सन्मानजनक अंतर राखावं. गोष्टी पसरवू नयेत. “हे गुरू किती भयंकर आहेत” असाही विचार करू नये. आपण काय शिकलो याची जाण ठेवावी, आपण शिकलेल्या गुणांची जाण ठेवावी, आणि मग उर्वरित बाबतीत स्थिर राहावं.

आपण प्रश्न विचारू नयेत, यामध्ये काय अभिप्रेत आहे? तर, गुरू बुद्धस्वरूप आहे, हे प्रश्नांकित करू नये. पण गुरूच्या सूचना अयोग्य वाटतील तेव्हा त्यावरही प्रश्न विचारू नयेत, असा याचा अर्थ नाही. तिरोपा यांनी नरोपाला कड्यावरून उडी मारायला सांगितली आणि नरोपाने उडी मारली, अशी उदाहरणं आपण पाहतो: परम पूजनीय दलाई लामा नेहमी सांगतात, त्याप्रमाणे, तपासणी करावी. तिरोपा हे एक गुरू होते, ते अशा स्थितीला पोचले होते जिथे ते जिवंत मासा खात आणि मग त्याची हाडं तोंडातून जमिनीवर टाकत, नंतर ते टिचकी मारत, मग तो मासा जिवंत व्हायचा. नरोपा हे त्या काळातील सर्वांत विद्वान मठाधिपती होते. तर, आपला गुरू तिलोपाच्या पातळीवर असेल आणि आपण नरोपाच्या पातळीवर असूत, तर नरोपाच्या चरित्रातील हा दाखला प्रस्तुत ठरेल. पण आपण त्या पातळीवर नसू आणि आपले गुरूही त्या पातळीवर नसतील- जे जवळपास सर्वांच्या बाबतीत म्हणता येईल- तर पूर्णतः वेगळी मांडणी करावी लागते. अशा वेळी गुरू काय करतोय हे आपण सतत तपासत राहायला हवं. गुरू काय करतो आहे आणि ते धर्माशी सुसंगत आहे का? आणि गुरू काय शिकवतो आहे, ते धर्माशी सुसंगत आहे का? हे आपण तपासत राहावं. आपल्याला माहीत नसेल, तर आपण तपासावं.

मी पहिल्या स्तरावरील विद्यार्थी आहे. मी केंद्रात नवखा आहे, शिकवणुकी पहिल्यांदाच ऐकतोय.  माझ्यातल्या उणिवांमुळे आणि आकलनाच्या अभावामुळेच मला ही अडचण येतेय, हे मला कळतं, पण पुनर्जन्माची आणि भावी जीवनकाळांची संकल्पना समजून घ्यायला व स्वीकारायला मला खूप, खूप अवघड जातंय. बौद्ध शिकवणुकींमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे, हेही मला कळतं. उदाहरणार्थ, मी माझ्या बहुमोल मानवी जीवनाविषयी ध्यानधारणा करतो- मी ती खूप सखोलपणे करतो- आणि त्याकडे भेट म्हणून पाहतो, बदलाची शक्यता, संधी म्हणून पाहतो, तेव्हा मी भविष्यातील जीवनकाळांचा विचार करायला हवा हे मला कळतं, पण मला तसं करणं खूप, खूप अवघड जातंय. त्यामुळे मी माझ्या बहुमोल मानवी जीवनाविषयी कितीही सखोल व कितीही वेळा ध्यानधारणा केली, तरी भविष्यातील जीवनकाळांच्या आकलनाविना माझ्या बहुमोल मानवी जीवनाचा आस्वाद कायमच अपूर्ण राहील. ही माझी द्विधा आहे. यातून मी कशी वाट काढू?

तुमचं निरीक्षण अतिशय चांगलं आहे. आपण साक्षात्कार साध्य करत नाही तोवर कशाहीबद्दलच्या आपल्या आकलनाबद्दल समाधानी नसणं, ही तंत्रपद्धतीमधील एक प्रतिज्ञा आहे. याचा अर्थ असा की, आपण या वाटेवर जितके पुढे जाऊ तितकं आपलं सगळ्या गोष्टींबद्दलचं, यात बहुमोल मानवी जीवन आलंच, आकलन अधिकाधिक सखोल होत जाईल. त्यामुळे आत्ता आपल्याला पुनर्जन्माचं आकलन झालं, तरी बहुमोल मानवी जीवनाच्या आकलनासंदर्भात त्यात अजून बरंच खोलवर जाता येतं. याचा अर्थ आधीचा आकलनाचा टप्पा उपकारक नसतो, असं नाही. या वाटेतील प्रत्येक टप्पा उपकारक असतो, विशेषतः आत्ता ची आपली आकलनाची पातळी अधिक सखोल आकलनाकडे जाण्याची दिशा दाखवणारी आहे, असं आपल्या मनात असेल, तर ही न्रमता सर्वांत योग्य ठरते.

शिकवणुकींमध्ये हे सुस्पष्ट केलेलं आहे: आपल्याला काहीही पुरेसं खोलवर समजलंय असं कधीही मानू नका. “अरे, आता मला हे जमलं. आता मला बहुमोल मानवी जीवनाविषयी विचार करायला नको.” असं मानणं ही खूप मोठी चूक असते. अधिकाधिक खोलवर जायला कायमच वाव असतो.

माणूस म्हणून आपल्याला सूक्ष्मदर्शी आकलनाची क्षमता असते, असं तुम्ही म्हणालात.  आपण न भुंकण्याची निवड करू शकतो किंवा तुम्ही इतरही गोष्टी सांगितल्यात त्या करू शकतो. पण आपल्यामध्ये ही सूक्ष्मदर्शी क्षमता असेल, तर आपल्यात काही सामर्थ्य आहे असाही त्याचा अर्थ निघेल. मग आपला पशू म्हणून पुनर्जन्म झाल्यावर हे सामर्थ्य कुठे जातं? म्हणजे, आपण सामर्थ्य गमावतो हे मला अतार्किक आणि विसंगत वाटतंय. आपल्यामध्ये आत्ता सूक्ष्मदर्शी आकलनाचं सामर्थ्य आहे आणि आपला पशू म्हणून पुनर्जन्म झाला, तर मग काय होणार आहे?

तुम्ही सामर्थ्य व प्रत्यक्षातील आविष्कारक्षमता यांच्यात भेद करायला हवा. एखाद्या बालकामध्ये बरंच सामर्थ्य असतं. कार चालवण्याची क्षमता प्राप्त करण्यासाठीचं सामर्थ्यही त्याच्यात असतं, पण त्यासाठीची प्रत्यक्ष क्षमता त्याच्या ठायी नसते. आणि आपण आजारी असतो, तेव्हाही आपल्याकडे स्पष्ट विचार करण्याचं, काम करण्याचं सामर्थ्य असतं, पण अखेरच्या क्षणी अडचण येते, कारण आपल्याकडे आविष्कारक्षमता नसते. त्याचप्रमाणे पशू झाल्यावरही सामर्थ्य असतातच- बुद्ध-स्वरूपाची सामर्थ्य तिथेही असतातच- पण त्यांच्या प्रत्यक्ष आविष्कारक्षमता असत नाहीत (किंवा त्या असतील, तरी मानवाच्या तुलनेत त्यांची पातळी अतिशय कमी असते).

समर्पण

समर्पणाने ही चर्चा संपवू. इथे ऐकण्याच्या व ध्यानधारणेच्या कृतींद्वारे आपण निर्माण केलेली सकारात्मक शक्ती महत्त्वाच्या आहेत, त्या आपण साक्षात्काराच्या दिशेने समर्पित केल्या नाहीत, ते न केल्याने आपोआप जे घडायचं ते घडेल, म्हणजे ही शक्ती संसाराच्या सुधारणेचं कारण ठरेल. उदाहरणार्थ, आपण खूप पैसा कमावण्यासाठी आपल्या मानवी जीवनाची सार्थकता मानू. त्यामुळे ही शक्ती आपल्या साक्षात्काराचं कारण ठरण्याकरिता आपण ती या दिशेने समर्पित करायला हवी. हे आपण अतिशय जाणीवपूर्वक करायला हवं. आपण म्हणतो, “प्रत्येकाला उपकारक ठरण्यासाठी मला बुद्धाचं मन, शरीर, वाचा, इत्यादी प्राप्त होऊ दे, त्याकरिता ही कृती कारण ठरू दे.” असं झाल्यास ती कृती खरोखरच या प्रक्रियेचं कारण ठरेल. आणि “हे आकलन व आस्वाद अधिकाधिक सखोल होत जाऊ देत, जेणेकरून प्रत्येकाला उपकारक ठरण्यासाठी माझ्या वर्तनामध्ये बदल घडवण्याचं आणि साक्षात्काराच्या दिशेने जाण्याचं काम त्यातून होईल.”

Top