मृत्यू आणि नश्वरताविषयक चिंतनाची चार स्वयंसिद्ध तत्त्वे

आपण यापूर्वी पाहिले आहे की ध्यानधारणा ही त्रिस्तरीय प्रक्रिया आहे, ज्यात शिकवणींचे श्रवण केले जाते, त्याबाबत चिंतन केले जाते आणि तद्नंतर प्रत्यक्ष ध्यानधारणा केली जाते. या तृतीय पातळीवरील ध्यानधारणेचा संदर्भ बौद्ध शिकवणींचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात अंगीकार कसा करावा, याच्याशी आहे, जे अभ्यासाच्या पुनरावृत्तीतून साध्य होते. आपण मूलतः एखाद्या सकारात्मक मनोवस्थेच्या पुनरावृत्तीतून ती अधिक विकसित करतो, जेणेकरून ती आपल्यासाठी सवयीची होईल. 

आपण शिकवणींचे श्रवण करतो आणि त्यातून आपल्याला विवेकी जागरूकता प्राप्त होते, ज्याच्या साहाय्याने आपण हे ओळखू शकतो की ‘हो, हीच बौद्ध शिकवण आहे.’ आणि त्याबाबत आपण आश्वस्त होतो. आपण हे ही पाहिले आहे की शिकवणींच्या आकलनासाठी पूर्वधारणांचा आधार घेतो; इथे सर्व शिकवणींचे आकलन असणे आवश्यक नसते, पण आपल्या प्रेरणा आणि रूचीमुळे त्यांना आपण किमान तोपर्यंत तरी यथार्थ मानतो, जोपर्यंत आपण त्या योग्य नसल्याचे सिद्ध करू शकत नाही. जर एखादी गोष्ट यथार्थ नसल्याचे आपल्या निदर्शनास आले, तर आपण ते सोडून देऊ शकतो. पण किमान काही तरी यथार्थ असेल आणि आपण त्याचे परीक्षण करून त्याची पडताळणी करू शकतो, हे ग्राह्य धरण्यासाठी आपले मन स्वागतशील असायला हवे. आणि आपल्यासाठी व्हिटॅमिन उपयुक्त असतात, तसेच हे ही उपयुक्त असेल, असेही ग्राह्य धरावे लागेल. आपण असा विचार करून विष पिऊ शकत नाही की ‘चला, यामुळे खरोखरच माझा मृत्यू होतो का ते पाहू ’, पण तुम्ही व्हिटॅमिनच्या बाबतीत तसे करू शकता. त्यामुळे आपण हे ग्राह्य धरतो की ते उपयुक्त असेल कारण अनेक लोकांनी त्याबाबत खात्री दिलेली असते आणि आपण स्वतः ते आजमावून पाहू शकतो. 

जेव्हा आपण शिकवणींबाबत चिंतन करतो, तेव्हा आपण ‘चिंतनातून उत्पन्न होणाऱ्या विवेकी जागरूकते’च्या प्रक्रियेच्या अंतापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने शिकवणींची पारख करत असतो. याच पातळीवर आपण आश्वस्त होतो की आपल्याला शिकवणींचे योग्य आकलन झाले आहे की बुद्धाची ही शिकवण यथार्थ आहे, लाभकारी आहे आणि आपल्याला जी सिद्धी प्राप्त करायची आहे, ती साध्य करणे शक्य आहे. जेव्हा लोक हा टप्पा गाळून पुढे जाऊ पाहतात, जसे अनेक लोकांच्या बाबतीत आढळून येते, तेव्हा कालांतराने ते ‘अनिश्चिततेच्या द्विधावस्थे’त अर्थात भ्रमितावस्थेत अडकतात, जिथे त्यांना आपले लक्ष्य प्राप्त करण्याबाबत संभ्रमित अवस्था निर्माण होते. आणि ते प्रयत्न करणे अर्ध्यावरच सोडून देतात. 

मुक्ती म्हणजे काय?

जेव्हा आपण मुक्ती वा ज्ञानप्राप्तीविषयी किंवा ते प्राप्त करण्याच्या पद्धतींविषयी वाचतो, तेव्हा आपल्याला मुक्ती म्हणजे नेमके काय, हे समजणे फार आवश्यक असते. ज्ञानप्राप्ती मिळविणे म्हणजे नेमके काय असते? आणि ज्ञानप्राप्तीनंतर नक्की काय होते? शिकवण सांगते की बुद्ध हा सर्वज्ञ असतो, ज्याला एकाच वेळी प्रत्येक गोष्टीचे परिपूर्ण आणि योग्य ज्ञान प्राप्त असते. असे बुद्धजन प्रत्येक जीवमात्राविषयी समभाव आणि काळजीची भावना बाळगतात आणि प्रत्येकासोबत योग्य संवाद साधू शकतात. अशा प्रकारे बुद्ध योग्य मार्गांनी सर्वांच्या कल्याणासाठी मदतगार ठरतात. 

हे खरंच शक्य आहे का की ही एखादी परीकथा आहे? आपण याला हास्यास्पद समजत असू, तर आपण ते साध्य करण्यासाठी प्रयत्न तरी का करत आहोत? आपण याला परीकथा समजत असू, तर अर्थातच ते साध्य करणे शक्य असल्याचा आपल्याला विश्वास वाटणार नाही. बौद्ध धर्मात सांगितलेल्या उद्दिष्टांची समीक्षा करायला हवी आणि आपण स्वतःच्या प्रेरणाही तपासायला हव्यात. 

आपले उद्दिष्ट काय आहे?

बौद्ध धर्मात ‘प्रेरणा’ शब्दाला फार विशिष्ट अर्थ आहे. आपण अनेकदा म्हणतो की ‘तुमच्या प्रेरणांची पुष्टी करा किंवा तुमच्या प्रेरणा विकसित करा’, तेव्हा त्या प्रक्रियेचे दोन भाग असतात. पहिला असतो, आपला उद्देश- आपले ध्येय – आणि दुसरा असतो मनोभाव किंवा भावना, ज्या उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रेरित करतात. सामान्यतः इंग्रजीतील ‘मोटिव्हेशन’ शब्दातून दुसरा भाग, अर्थात उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रेरित करणाऱ्या भावनाच प्रतिबिंबित होतात.

मी बौद्ध शिकवणींचे अर्थात ‘धर्मा’चे पालन करणाऱ्या अनेक लोकांविषयी विचार करतो, जर आपण गांभीर्याने धर्मपालन करत असू, तर आपल्याला आढळेल की आपले उद्दिष्ट हे केवळ हा वर्तमान जन्म सहज व सुखी करण्याचे असते. यात काहीच वाईट नाही – यालाच मी ‘ रिअल थिंग धर्मा’ ऐवजी ‘धर्म-लाइट’ संबोधतो. ही पहिली पायरी असते. वस्तुस्थिती ही आहे की आपण चांगल्या पुनर्जन्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावा, जेणेकरून प्रत्येक जन्मी आपल्याला मनुष्यरुपात जन्म मिळावा. पण तुमचा पुनर्जन्मावर विश्वासच नसेल तर तुम्ही चांगला पुनर्जन्म लाभण्याचे उद्दिष्ट तरी कसे बाळगाल? पुनर्जन्म समजून घेण्यासाठी आधी आपल्याला नक्की कोणाचा पुनर्जन्म होतो, चित्तप्रकृतीचे सातत्य आणि स्वस्वरूप समजून घ्यायला हवे. अर्थात चांगल्या पुनर्जन्माच्या प्राप्तीचे उद्दिष्ट हे केवळ बौद्ध विचारधारेत नाही. ख्रिश्चन आणि इतर धर्मातही हे उद्दिष्ट असते, ख्रिश्चन धर्मात स्वर्गातील पुनर्जन्माची संकल्पना आहे.       

दुसरे उद्दिष्ट पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवण्याविषयीचे असते. हिंदू धर्मातही ही संकल्पना आहे. त्यामुळे बौद्ध धर्माच्या परिपेक्ष्यातून मुक्तीची संकल्पना आणि मुक्ती प्राप्तीसाठीच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात. त्यानंतर अर्थात अंतिम उद्दिष्ट हे, ज्ञानप्राप्त बुद्धस्वरूप होण्याविषयी असते – जे बौद्ध धर्माचे वैशिष्ट्य आहे. 

क्रमबद्ध प्रगती

आपण बौद्ध शिकवणींकडे पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की त्या क्रमबद्ध पद्धतीने सादर करण्यात आल्या आहेत. एक अंतर्दृष्टी प्राप्त झाल्यानंतरच दुसरी येते आणि या क्रमव्यवस्थेचा आदर राखणे महत्त्वाचे असते, कारण आपण नुसते असे जरी म्हटले की ‘मला बुद्धस्वरूप यासाठी प्राप्त करायचे आहे की, जेणेकरून मला समस्त जीवमात्रांचे कल्याण करता येईल’ आणि अशा संबोधनांना कोणता आधारच नसेल तर ते केवळ पोकळ शब्द ठरतील. आपण खरोखरच या विश्वातील प्रत्येक किटकाला मुक्ती देण्याचे आणि ज्ञानप्राप्ती देण्याचे उद्दिष्ट ठेवतो का? कदाचित नाही. इतके विशाल उद्दिष्ट ठेवण्यासाठी आणि त्याच्या प्राप्तीसाठी खरोखरच गांभीर्याने काम करण्यासाठी कल्पनेपलीकडचे विशाल मन लागेल आणि ते विकसित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करायला हवेत. ते साध्य करण्यासाठी आपण प्रत्येक शिकवणीला, ज्याला मी ‘चार स्वयंसिद्ध तत्त्वे’ संबोधतो, त्या तत्त्वांच्या कसोटीवर तपासून पाहतो, ज्यात एखाद्या गोष्टीसाठी परीक्षणासाठीचे चार दृष्टिकोन अंतर्भूत असतात, आणि त्याची सुरुवात आपण धर्माच्या मूलभूत सिद्धांतांपासून करतो. 

चार स्वयंसिद्ध तत्त्वांच्या वापराचे उदाहरण म्हणून आपण मृत्यू आणि नश्वरतेविषयी मनन आणि ध्यानधारणा करू शकतो. मी या उदाहरणाचा प्रयोग कदाचित थोड्या स्वार्थी हेतूने करत आहे कारण मागील आठवड्यातच माझ्या मित्राचे निधन झाले आहे. असो. तर चार स्वयंसिद्ध तत्त्वे खालीलप्रमाणे आहेतः 

  • अवलंबनाचे तत्त्व – आपण कोणती चित्तावस्था विकसित करू इच्छितो, मृत्यूची जाणीव/बोध, ती कोणत्या घटकांवर अवलंबून असते?  
  • व्यावहारिकतेचे तत्त्व – आपण ती चित्तावस्था प्राप्त केल्यास, तिची कार्यपद्धती काय आहे आणि फायदे-तोटे काय आहेत?
  • तर्काचे तत्त्व – एखादी शिकवण आपण सत्यतेच्या पातळीवर तपासल्यास, ती उर्वरित बौद्ध शिकवणींना अनुसरून आहे का? ती तर्कसंगत आहे का? आणि आपण ती आपल्या जीवनात लागू केल्यास त्याचे अपेक्षित परिणाम लाभतात का?  
  • नैसर्गिक प्रकृतीचे तत्त्व – मृत्यू सर्व जिवांच्या नैसर्गिकतेचे लक्षण आहे का? प्रत्येक जीव मृत्यू पावतो का? 

आपण मृत्युसंबंधीच्या शिकवणीसारखी एखादी शिकवण घेतो आणि चिंतनासाठी जितका वेळ देणे आवश्यक आहे, तितका वेळ देत तिचे चार स्वयंसिद्ध तत्त्वांच्या आधारावर परीक्षण करतो. असे कोणतेही निश्चित सूत्र नाही की तुम्ही यावर दहा मिनिटे खर्च करावीत किंवा वीस मिनिटे खर्च करावी. पण घाई अर्थातच योग्य नाही, कारण त्यामुळे तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहात, त्याला अर्थच उरणार नाही. त्यामुळे त्याला पुरेसा वेळ देऊन वास्तवात ते विकसित करण्याचा प्रयत्न करायला हवा. 

परिपूर्ण बोध प्राप्ती

मुख्यतः आपल्याला या गोष्टीबाबत आश्वस्त व्हायला हवे की आपल्याला विषयाची परिपूर्ण जाणीव/ बोध झाला आहे आणि आपल्याला त्याबद्दल कोणतीही संदिग्धता नाही. याच कारणासाठी तिबेटमध्ये वादविवादाच्या माध्यमातील शैक्षणिक प्रक्रिया वापरली जाते, ज्या द्वारे आपण स्वतःच्या बोधाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यास बांधिल ठरतो. प्रत्येकाने असेच वागणे अपेक्षित आहे – तुम्ही मागच्या बाकावरच्या विद्यार्थ्यांसारखे बसून राहू शकत नाही. एखादी व्यक्ती आपली भूमिका मांडेल, तेव्हा त्याला विरोधी पक्षाने संमती किंवा विरोध दर्शवायला हवा. यात योग्य उत्तर मिळवण्याचे उद्दिष्ट नसते, तर एखाद्या विषयातील समज तपासून पाहिली जाते आणि त्याबाबत आश्वस्त होता येते. ही फारच दर्जेदार पद्धत आहे कारण आपण जितकी स्वतःची चिकित्सा करू शकलो नसतो, त्याहून अधिक इतर लोक आपल्या वैचारिक मांडणीला आव्हान देतील. वादविवादा दरम्यान मोठा ऊर्जा प्रवाह प्रवाहित होतो कारण लोकांना ती गोष्ट मजेशीर वाटत असते. आणि ते एखाद्या व्यक्तीकडून आपल्या मुद्द्यांचे खंडन करून घेतात, तेव्हा त्यांना हास्यविनोदाचे काही क्षणही प्राप्त होतात. पण हे सर्व खेळकर वातावरणात केले जाते आणि प्रत्येक जण त्याचा आनंद घेऊ शकतो. 

या शैक्षणिक पद्धतीचा एक फायदा असाही असतो की तुम्ही कुणीही असा, एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वतःच्याच मताचे खंडन कराल आणि काही तरी मूर्खासारखे बोलून जाल, जे तुमचा अहंकार आणि घमेंड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे बुजरेपणाही कमी होतो- तुम्ही बुजरेपणाने एखाद्या सभेत वादविवादासाठी अर्थातच उभे राहू शकत नाही. 

आपण असे म्हणून वादविवाद नाकारू शकत नाही की, ‘हे फारच बुद्धिवादी काम आहे; मला फक्त अंतर्ज्ञान प्राप्त करून ध्यानधारणा करायची आहे.’ वादविवाद ध्यानधारणेला साहाय्यक असतो, आणि तेच वादविवादाचं प्रयोजन असतं. वादविवादामुळे तुमच्यात गोंधळाची स्थिती राहत नाही आणि तुम्ही तुमच्या जाणिवांप्रति आश्वस्त होता. आणि नंतर तुम्ही ही अंतर्दृष्टी स्वतःत सामावून घेण्यासाठी संपूर्ण विश्वासाने ध्यानधारणा करू लागता. नाहीतर तुमच्या ध्यानधारणेत तो दृढनिश्चय आढळत नाही. अर्थात तुम्ही एकमेकांशी प्रत्यक्ष थेट वादविवाद कराल असेही नाही, पण अहंकार व घमेंडविरहित आणि समोरची व्यक्ती व्यक्तिगत हल्ला करत असल्याचा विचार करून बचावात्मक पवित्रा न घेता केलेली शिकवणींबाबतची चर्चा फलदायी असते. 

आणखी दोन तांत्रिक बौद्ध संज्ञा आहेत, त्या म्हणजे ‘एखाद्या तथ्याला सत्य समजणे’ आणि ‘दृढ विश्वास’. आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीला यथार्थ समजू शकतो, त्यामुळे आपल्याला ज्या शिकवणींचे योग्य आकलन झाल्याचा विश्वास वाटत नाही, त्या शिकवणींचे परीक्षण करतेवेळी दक्षता घ्यायला हवी. दृढ विश्वास तो असतो, ज्यात आपण इतके आश्वस्त असतो की कोणतीही गोष्ट आपल्या विश्वासाला तडा देऊ शकत नाही, आणि आपल्याला असा दृढ विश्वास विकसित करण्याची आवश्यकता असते. 

पुढेच चालत राहा

अशा प्रकारचा विरोधाभास हट्टी आणि संकुचित मानसिकतेचे विकृत रूप धारण करू शकतो. आपले आकलनच अयोग्य असल्याने आणि आपण हट्टी बनल्याने कुणीही आपल्यात सुधारणा करू शकणार नाही – याचा अनुवाद काही वेळा ‘अयोग्य दृष्टिकोन’ असाही केला जातो. आपण काहीतरी अयोग्य गोष्ट ग्राह्य धरून बसतो आणि त्यावर इतकी हटवादी भूमिका घेतो की, एखादी व्यक्ती त्याहून वेगळी मांडणी करत असेल तर त्याविषयी शत्रुत्वाची भावना बाळगतो किंवा आक्रमक होतो.  

जोपर्यंत आपण बुद्ध होत नाही, तोपर्यंत अधिकाधिक सखोल ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्नशील असायला हवे. म्हणूनच आपल्याला वारंवार सांगितले जाते की, ‘तुमच्या आकलन क्षमतेबाबत, उद्दिष्ट प्राप्तीच्या क्षमतेबाबत कधीच समाधानी राहू नका कारण तुम्ही नेहमीच अधिक सखोल पातळीवर पोहचू शकता, आणि बुद्धत्व प्राप्त करण्याच्या टप्प्यापर्यंत अत्युच्च उद्दिष्टे साध्य करू शकता.’ त्यामुळे आपले आकलन योग्य असले तरी ते सखोल ज्ञान असेलच असे नाही. दलाई लामांच्या गुरुंपैकी एक त्रिजांग रिंपोछे म्हणत असत, ‘मी लाम-रिम चेन-मो (त्सोंग्खापा यांनी रचलेले एक आधारभूत बृहत ग्रंथ मार्गाच्या क्रमिक स्तराचे भव्य व्याख्यान ) शंभर वेळा वाचले आहे पण मी प्रत्येकवेळी ते वाचतो, तेव्हा मला काहीतरी नवीन आणि सखोल बोध होतो.’ आपल्याला योग्य आकलन झालेले असतानाही त्या विषयातील अधिकाधिक सखोल ज्ञानासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहणे कसे आवश्यक आहे, हे दर्शविणारे हे खूप चांगले उदाहरण आहे. 

मृत्युसंबंधी ध्यानधारणा

आता आपण चार तत्त्वांना मृत्युविषयक ध्यानधारणेच्या संदर्भातून पाहू शकतो, जेणेकरून त्यांचा अर्थ आणि त्यांच्या अंगीकाराच्या पद्धती समजून घेता येतील. अर्थात मृत्यू आणि मृत्युविषयक ध्यानधारणा याबाबत शिकवण प्राप्त केल्यानंतरच आपण ते अंगीकारू शकतो. मृत्युबाबत विचार करताना आपण तीन मूलभूत तथ्यांकडे लक्ष पुरवितोः 

  • मृत्यू अपरिहार्य, अटळ आहे. 
  • मृत्युची वेळ अनिश्चित आहे.
  • मृत्युसमयी आपल्याला धर्म सोडून कोणतीच गोष्ट साहाय्यक असणार नाही.  

आपल्या सर्वांचाच मृत्यू होणार आहे. ते अपरिहार्य आहे – मी, तुम्ही, आपण व्यक्तिशः ओळखत असलेला प्रत्येक जण आणि इतरही सर्व जण. आपल्याला हे ही माहीत नाही की मृत्यू कधी आपल्यावर पकड घट्ट करेल आणि आपण मृत होऊ, अशा वेळी आपण विकसित केलेल्या आणि आपल्या मानसिक सातत्याचा भाग बनलेल्या सकारात्मक सवयींशिवाय कोणतीच गोष्ट उपयोगी ठरणार नाही. 

मृत्यू अपरिहार्य आहे, पण तो कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे (अवलंबत्वाचे तत्त्व)? आपण याचे अनेक पातळ्यांवर विश्लेषण करू शकतो. सर्वप्रथम, मृत्यू जीवनावर अवलंबून असतो. तुम्ही जिवंत असल्याशिवाय मरू शकत नाही. आणि प्रत्येक दिवशी आपले वय होत चालले आहे, आपले शरीर पूर्वीसारखे सशक्त राहिलेले नाही, आपण अशक्त होत चाललो आहोत. त्यामुळे मृत्यू अशा शरीरावर अवलंबून असतो, जे शरीर आजारी पडू शकते किंवा एखाद्या अपघातात कारने उडवले जाऊ शकते.  

मृत्युचा विचार का करायचा

मृत्युबाबत ध्यानधारणा करण्यापूर्वी आपण अवलंबनाच्या तत्त्वानुसार सखोल पातळीवर आपले अनमोल मानवी जीवन समजून घेणे आवश्यक आहे. मृत्युची जाणीव करून देण्यामागे वर्तमानातल्या अनमोल जीवनाचा लाभ उठविण्यासाठी प्रेरित करण्याचा उद्देश असतो. जर आपण जीवनाचे महत्त्व ओळखले नाही आणि स्वतःत सुधारणा घडविण्यासाठी लाभलेली संधी ओळखली नाही, तर आपण आपल्या जीवनाच्या अंताविषयीही खरेच फार विचार करणार नाही. कारण बहुतांशी लोक याही गोष्टीचे महत्त्व समजू शकत नाहीत की, ‘मी जिवंत आहे आणि मी माझ्या मन व बुद्धीचा वापर एखाद्या विधायक उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी करू शकतो’, त्यामुळे ते स्वतःचे जीवन निरर्थक घालवतात. त्यामुळे मृत्युची जाणीव ही खरेतर जीवनाच्या जाणिवेवर अवलंबून आहे. 

आपल्याला ही जाणीव होते की आपल्याला हा अनमोल मानवी जन्म लाभला आहे आणि आपण अशा प्रतिकूल परिस्थितीपासून मुक्त आहोत, ज्यामुळे आपण जिवंतपणाचा लाभ घेऊ शकणार नाही. आपण एखाद्या झुरळासारखे जन्मलेलो नाही की एखाद्याने पाहता क्षणी आपल्याला पावलाखाली चिरडावे. आपण एखादा छोटा मासा म्हणून जन्मलो नाही की एखाद्या मोठ्या माशाने गिळून टाकावे. किंवा आपण एखादी छोटी माशी म्हणूनही जन्मलो नाही. याविषयी विचार करा, आपण माशी म्हणून जन्मलो असतो तर आपण काय साध्य केले असते? फक्त जीवनभर घाण आणि कचऱ्यावर भिरभिरत बसलो असतो. 

अशा प्रकारे मृत्युच्या जाणिवेचा उद्देश (व्यावहारिकतेचे तत्त्व) फक्त हा विचार करून निराश होणे नाही की, ‘हे किती भयंकर आहे. माझा मृत्यू अटळ आहे.’ मुद्दा हा नाही. या तत्त्वाचा उद्देश हा आहे की आपण सध्या उपलब्ध असलेल्या अनमोल वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तत्पर असावे, कारण आपल्याला खरेच माहीत नसते की ही वेळ केव्हा निघून जाईल. जसे मागील आठवड्यात माझ्या मित्राच्या बाबतीत घडले, त्याची तब्येत एकदम ठणठणीत होती आणि तो अगदी वयस्करही नव्हता. तो धूम्रपान किंवा मद्यपानही करत नव्हता, त्याला उच्च रक्तदाबाचा त्रासही नव्हता, तो नियमित भरपूर व्यायाम करत होता आणि तो गहन ध्यानधारणा करणारा साधक होता. आणि मागील आठवड्यात एका सकाळी, त्याने शावरखाली आंघोळ केली, तिथेच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तिथेच तो मृत होऊन कोसळला. बस. 

आपण ठोसपणे सांगू शकत नाही की आपले अनमोल जीवन कोणत्या क्षणी हरवून जाईल आणि मृत्यू बहुतांश वेळा अकस्मात पुढ्यात उभा ठाकतो. मृत्यू ओढवण्यासाठी तुमचं वय होण्याची किंवा तुम्ही आजारी असण्याचीही आवश्यकता नसते. त्यामुळे मृत्युच्या जाणिवेच्या बोधामागचा प्रमुख उद्देश आपला आळस आणि चालढकल करण्याच्या प्रवृत्तीपासून सुटका मिळवण्याचा असतो. माझा मित्र एलन, ज्याचा मृत्यू झाला, याचे उदाहरण फार बोलके आहे. त्याची आई फार वयस्कर आणि आजारी होती आणि त्याला तिची शारीरिक आणि आर्थिक मदत करायची होती. त्यामुळे तो दर आठवड्याच्या अखेरीस तिची काळजी घेण्यासाठी जात असे – तिच्यासाठी वानसामान खरेदी करी. तो नेहमी म्हणत असे की, त्याची आई वारल्यानंतर तो लगेच निवृत्ती घेईल आणि सर्वात आधी आत्मशुद्धीसाठी एक वर्ष वज्रसत्व एकांतसाधना करेल. हे त्याचे उद्दिष्ट होते. 

जसे मी पूर्वी सांगितले, तो फार गहन साधक होता, पण त्याने कधीच एकांतवासातील ध्यानसाधना केली नाही कारण त्याला त्याच्या आईच्या मदतीसाठी उपलब्ध राहायचे होते, त्यामुळे त्याला काम करणे भाग होते. तर त्याला त्याच्या आईची मदत करण्यासाठी काम करत राहायला हवे होते की संधी मिळताच एकांतवासातील ध्यानसाधना करायला हवी होती आणि आईच्या देखभालीची इतरांवर जबाबदारी सोपवायला हवी होती? आपल्याला धर्म कोणते निर्देश देतो? मृत्युसंबंधीची शिकवण आपल्याला काय करायला प्रेरित करते? हा विचार उपयुक्त ठरेल, आपण अशा परिस्थितीत काय केले असते? 

एक शक्यता अशीही असू शकली असती की एकाचवेळी अल्पकालीन एकांतसाधना करता आली असती आणि आईला मदतही करता आली असती. जरूरी नाही की एकांतवास पूर्णकालीन असावा – आपण सकाळचे आणि संध्याकाळचे सत्र करू शकतो आणि दिवसभर आपले नित्यक्रम पार पाडू शकतो. एकांतवास चांगली गोष्ट आहे, पण बौद्ध शिकवण नेहमी सांगते की सर्व जीवमात्रांच्या उपकारांची परतफेडही महत्त्वाची आहे, विशेषतः आपल्याला जीवन बहाल करणाऱ्या आईच्या उपकाराची. जेव्हा तुम्ही आपल्या पालकांची देखभाल करता, विशेषतः जिथे अशा प्रकारची अनिच्छा नसेल की, ‘मला वाटते त्यांचा मृत्यू झाला तर बरे होईल कारण मला माझी नोकरी आवडत नाही आणि मला निवृत्ती घ्यायची आहे ’, अशावेळी तुम्ही मोठ्या प्रमाणात सकारात्मक सामर्थ्य विकसित करता. जर आपल्यावर पालकांची काळजी घेण्याची जबाबदारी नसेल, तर अर्थातच आपण जीवनातील संधीचा शक्य तितका लाभ उठवू शकतो. 

तिबेटी लामा अनेकदा पश्चिमी जगतातील धर्म अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गांभीर्याने घेत नाहीत, कारण आमच्या पैकी अनेकांमध्ये धर्माप्रति समर्पणाची भावना, प्रतिबद्धता आणि धर्ममान्यतेची ती भावना आढळत नाही, जी तिबेटींमध्ये असते. पाश्चिमात्त्य लोकांचा दृष्टिकोन अनेकदा आरामदायी असतो आणि ते विचार करतात की, ‘मी आज कंटाळलो आहे. मी शिकवण प्राप्त करण्यासाठी पुढच्या वेळी जाईन.’ पण आपण खरोखरच गंभीर असू आणि आपल्याला मृत्युची व आपल्या अनमोल जीवनाची जाणीव असेल, तर आपल्याला कसेही वाटत असले तरी आपल्याला नियमित शिकवणीसाठी जावे वाटेल. 

मृत्यू येत आहेः तणावमुक्त राहा!

आपल्या अनमोल जीवनाचा अंत निश्चित आहे. आपल्याला माहीत नाही की कधी होईल. आपण शावर घेता घेता हृदयविकाराचा झटका येऊन मरू शकतो, आपल्याला बस उडवू शकते. आणि आपल्याला आपले जीवन व्यर्थ घालवायचे नाही. मृत्युची जाणीव आपल्याला आळशीपणातून मुक्त करते आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संधींचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी उद्युक्त करते. पण हे करत असताना, आपण तणावग्रस्त आणि अस्वस्थ असता कामा नये. अनेकदा आपण अनेक क्षुल्लक गोष्टींसाठी इतके तणावग्रस्त आणि अस्वस्थ होतो की आपल्या धर्मसाधनेतही रूक्षता येते. आपण गांभीर्याने साधना करायला हवी, पण तणावमुक्त मार्गाने – याचा अर्थ आळशी वागण्याशी अर्थातच नाही. जेव्हा तुम्ही सकारात्मक सवयी विकसित करता, तेव्हा मृत्युसमयी समस्या जाणवणार नाहीत कारण तुम्हाला खात्री असेल की तुमच्या सकारात्मक सवयी तुम्हाला साहाय्य करतील. 

मृत्यू म्हणजे जीवनाचा तार्किक अंत 

यानंतर आपण तर्काच्या आधारे हे ठरवतो की आपण घेत असलेली शिकवण बुद्धाद्वारे दिल्या गेलेल्या शिकवणीशी सुसंगत आहे की नाही (तर्काचे तत्त्व). हे तपासण्यासाठी आपण अनेक शिकवणी ग्रहन केलेल्या असणे किंवा बौद्ध पुस्तकांचे अध्ययन केलेले असणे आवश्यक आहे. अनेक बौद्ध शिकवणी नश्वरतेविषयी विवेचन करतात आणि म्हणून ही गोष्ट त्या बौद्ध शिकवणींशी सुसंगत आहे.  

हे तर्कसंगत आहे का? हो, आहे. प्रत्येक दिवशी आपण मृत्युच्या नजीक जात असतो. एक क्षण असा येईल जेव्हा खेळ संपलेला असेल. मृत्यू निश्चितच येणार आहे कारण अशी कोणतीही परिस्थितीच अस्तित्वात नाही, जी मृत्युची वेळ आल्यावर त्याला टाळू शकेल. आपला जीवनाकाळ वाढविणे शक्य नाही, उलट आपला जीवनकाळ दिवसागणिक, मिनिटागणिक, सेकंदागणिक कमी कमी होत चालला आहे. या गोष्टीला भावनिक स्तरावर स्वीकार करणे मोठी प्रगल्भ गोष्ट आहे, जेव्हा आपण हे पुरेशा गांभीर्याने घेत जराही न घाबरता आणि तणावमुक्त मार्गाने करू शकू. जर जिवंतपणी आपल्याला धर्मसाधनेला वेळ देता आला नाही, तरी आपला मृत्यू अटळ आहे. जो जन्माला आला आहे, त्याचा मृत्यू झालाच आहे. 

लाभकारी परिणाम

याचा परिणाम काय असेल? जर आपण खरोखरच आपला मृत्यू जवळ येत आहे आणि आपल्याकडे हे अनमोल जीवन आहे याबाबत आश्वस्त झालो तर परिणामी आपण आळस झटकून टाकू. आणि आपल्या हाती असलेल्या संधीचा लाभ उठवू. आपण आपल्या अनुभवातून समजू शकू की हे किती लाभकारक आहे. 

वस्तू किंवा जीवमात्रांच्या नैसर्गिकतेविषयीचे चौथे निसर्ग तत्त्व हे आहे की, जो जन्माला येतो, तो मृत्यू पावतो. गोष्टींचे हेच स्वरूप आहे, हेच वास्तव आहे आणि हे तथ्य स्वीकारण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. 

या उदाहरणातून आपण हे पाहू शकतो की शिकवणींचे विश्लेषण करण्यासाठी आपण आपल्या अनुभवांना या चार स्वयंसिद्ध तत्त्वांच्या आधारे पारखू शकतो. ही एक निरंतर प्रक्रिया आहे कारण याबाबत शंभर टक्के आश्वस्त होण्यासाठी आणि त्यांना आपल्या जीवनात लागू करण्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असते. बौद्धिक पातळीवर आश्वस्त होणे सोपे आहे, पण भावनिक पातळीवर आश्वस्त होणे खूप कठीण असते. मन आणि शरीर या भिन्न गोष्टी आहेत – उदाहरणार्थ माझ्या मित्राच्या मृत्यू संदर्भात मानसिक आणि भावनिक पातळीवर मी शांतता अनुभवतो, पण शारीरिक पातळीवर माझी सर्व ऊर्जा हरवल्यासारखी वाटते. 

त्यामुळे भौतिक वा शारीरिक पातळीवर एक दुःखदायक भावना आहे कारण शारीर पातळीवर ‘प्रत्येक जण मरण पावतो’ या भावनेचा अनुभव घेणे कठीण असते. मानसिक पातळीवर पुन्हा पुन्हा दुःख उत्पन्न होते कारण ते स्वाभाविक आहे. आपण काही बुद्ध नाही; आपण मुक्तीप्राप्त झालेले जीव नाही. आपण आपल्या वेदना आणि तणावदायी भावनांपासून मुक्त झालेले नाही, पण तिथपर्यंत पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट आहे.


सारांश

एकदा आपल्याला मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती म्हणजे नक्की काय आहे, याविषयी बोध झाला की आपण आपले ध्येय ठरवू शकतो. आपल्याला नक्की काय हवे आहे, याविषयी आपल्याला जाणीव झाली की तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आपण जे काही करू त्याविषयी विश्वास जागृत करण्यासाठी चार स्वयंसिद्ध तत्त्वे साहाय्यक ठरतात. 

आपण मृत्युसंबंधी ध्यानधारणा करतो आणि आपला मृत्यू केव्हा होईल याची कल्पना नसली तरी सर्वांचाच मृत्यू अटळ आहे, या विशिष्ट जाणिवेपर्यंत पोहोचतो, तेव्हा आपण अधिक महत्त्वपूर्ण गोष्टींवरच ध्यान केंद्रित करतो. मृत्युची जाणीव आपल्यात अभूतपूर्व बदल घडवते, ज्यामुळे आळशीपणा आणि निराशेला बळी पडण्याची शक्यताच संपून जाते. 

Top