बौद्ध विचारधारेला आपल्या जीवनात समाविष्ट करणे

17:51
धर्म शब्दाचा अर्थ आहे निवारणाचा उपाय. आपल्या समस्यांतून मुक्ती मिळवण्यासाठी आपण हा उपाय अंगीकारतो.

जीवनातील समस्या सोडवण्यासाठी धर्माची उपयुक्तता

धार्मिक आचरणासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या जीवनातील विविध समस्या समजून घेणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धर्माचे पालन आपल्याला समस्यातून मुक्त करू शकते. 

धर्माचे आचरण हे केवळ छान वाटावं म्हणून, छंद म्हणून, फॅशन म्हणून करत नाहीत. तर आपल्याला समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी साहाय्य करण्याचे धार्मिक आचरणाचे उद्दिष्ट असते. याचा अर्थ वास्तवात धार्मिक आचरण स्वीकारण्यासाठी आपल्याला ही जाणीव होणे आवश्यक असते की धर्म अनुसरण ही काही सहजसाध्य प्रक्रिया नाही.  आपल्याला जीवनातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायला हवा - आपण अनुभवत असलेल्या समस्या - त्यांच्यापासून पळ काढता कामा नये. उलट त्यांचा सामना करण्याचा दृष्टिकोन बाळगून त्यांच्याशी लढण्याचा प्रयत्न करायला हवा.    

आपल्या समस्या अनेक स्वरूपाच्या असू शकतात. आपण त्यातील बहुतांशी समस्यांशी परिचित असतो - आपल्यात असणारी असुरक्षिततेची भावना, इतरांसोबतच्या नात्यांमधील अडचणी, परकेपण जाणवणं; भावनिक तणाव अनुभवणं - अशा स्वरूपाच्या सर्वसाधारण समस्या असतात. आपले कौटुंबिक व्यवहार आणि पालकांसोबतची वागणूक, यातही अडचणी असू शकतात; पालकांचे वृद्धत्व, त्यांची आजारपणे अशाही समस्या असतात. आपले आजारपण आणि वृद्धत्व अशा गोष्टींचा सामना करतानाही अडचणी जाणवू  शकतात. आणि आपण तरुण असू तर आपल्याला जीवनात नक्की काय करायचे आहे, स्वतःची गुजराण कशी करायची, कोणत्या दिशेने जायचे, अशा स्वरूपाचे प्रश्न आणि चिंता असतात. आपल्याला या सर्व गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे. 

भ्रमाची अवस्था

बौद्ध विचारधारेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण अनुभवत असलेल्या समस्यांच्या कारणांची जाणीव असणे. असे नाही की या समस्या अकारण उत्पन्न होतात. या समस्यांचा स्रोत आपल्या आतच असतो. ही मोठी अंतर्दुष्टी आहे, पण अनेक लोकांसाठी स्वीकार्ह नसते. कारण आपल्यातील बहुतांश लोकांना आपल्या समस्यांचा दोष इतरांवर किंवा बाह्य परिस्थितीवर टाकायची सवय असते. आपल्याला वाटते की ‘तुझ्या वागण्यामुळे मी दुःखी आहे- तू मला फोन केला नाहीस, तू मला फसवलंस, तुझं माझ्यावर प्रेम नाही. सगळी तुझी चूक आहे.’ किंवा आपण आपल्या पालकांना दोषी ठरवतो - आपण लहान असताना त्यांनी आपल्यासाठी काय केले किंवा काय नाही. किंवा आपण आर्थिक परिस्थितीला, राजकीय परिस्थितीला किंवा सामाजिक परिस्थितीला दोष देतो. अर्थात हे घटक आपल्या जीवनानुभवावर परिणाम करत असतात. बौद्ध विचारधारा ते नाकारत नाही. पण समस्यांचे मूळ कारण आपल्या आत दडले आहे - ते कारण म्हणजे आपला दृष्टिकोन, विशेषतः आपला भ्रम.  

दैनंदिन जीवनातील बौद्ध धर्माचे पालन म्हणजे नेमके काय, या संबंधीच्या बौद्ध दृष्टिकोनाचे नेमके विवेचन करणारा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला हवा असेल तर मी म्हणेन तो हाच आहे. आपल्याला समस्या असतात तेव्हा आपण स्वतःच्या अंतर्मनात त्याचा स्रोत शोधतो आणि एकदा तो स्रोत सापडला की आपण  अंतर्गत पातळीवर परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण जेव्हा अंतर्मनात पाहण्याविषयी आणि समस्यांचा स्रोत शोधण्याविषयी बोलतो, तेव्हा त्याला ‘मी वाईट व्यक्ती आहे आणि मला स्वतःला बदलायला हवे. चांगली व्यक्ती बनायला हवे’ अशा नैतिक न्यायतर्काचा आधार नसतो. बौद्ध धर्म नैतिक न्यायतर्क करत नाही. आपण दुःखाचा स्रोत आपल्या आत शोधतो त्यामागे प्रमुख कारण हे आपल्याला वेदना होतात आणि आपल्याला दुःख आणि असमाधानाच्या स्थितीतून मुक्ती मिळवायची असते, हे आहे. या सगळ्याचा मुख्य स्रोत आपला दृष्टिकोन असतो. मुख्यतः बुद्धांनी सांगितले आहे की आपल्या समस्या आणि दुःखाचे मुख्य कारण आपल्या भ्रमाच्या स्थितीत आहे. त्यामुळे आपले नेमके काय चुकते आहे आणि योग्य आकलनातून आपण त्यात कशी सुधारणा घडवू शकतो, याबाबतची आपली भ्रमाची स्थिती समजून घ्यायला हवी.  

आपल्याला नक्की कोणत्या गोष्टींचा भ्रम असतो? तो अनेक गोष्टींबाबत असतो. एक म्हणजे वर्तनविषयक कारणे आणि परिणाम. आपल्याला वाटत असते की आपण विशिष्ट पद्धतीने वागलो की त्याचा काहीही परिणाम होणार नाही. उदाहरणार्थ, आपण विचार करतो, ‘मी उशीर करू शकतो, तुला टाळू शकतो आणि असेच वागत राहिलो, तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही.’ हे चुकीचे आहे; हाच भ्रम आहे. किंवा आपण विचार करतो की आपण विशिष्ट पद्धतीने वागलो तर त्याचा काहीतरी विचित्र परिणाम होईल आणि तसे व्हायला नको पाहिजे. जसे, ‘मी तुझ्याशी छान वागतो आणि प्रत्युत्तरादाखल तू माझ्यावर प्रेम करायला हवे. मी तुझ्यासाठी छान भेटवस्तू आणली आहे, मग तू आता माझ्यावर प्रेम का करत नाहीस?’ अशा पद्धतीच्या विचारांमुळे आपण कल्पना करतो की आपल्या कृती आणि वर्तनामुळे अशक्य परिणाम होतो किंवा आपण त्यांच्यामुळे शक्यतेपेक्षा अधिक परिणाम होत असल्याचा विचार करून त्यांना फुगवून ठेवतो. शिवाय आपण असाही विचार करू शकतो की विशिष्ट गोष्टींचा विशिष्ट परिणाम होतो; वास्तविक त्यांचा अगदी विरुद्ध परिणाम होतो. उदाहरणार्थ, आपल्याला आनंदी व्हायचे असते आणि मद्यपानाने आनंद लाभेल म्हणून आपण पूर्णवेळ दारू पित घालवतो. पण त्यातून आनंद निर्माण होण्याऐवजी आणखी समस्या निर्माण होतात.  

आपल्या भ्रमाच्या स्थितीचे आणखी एक स्वरूप म्हणजे आपले अस्तित्व, इतरांचे अस्तित्व आणि जगाचे अस्तित्व, याबाबतचे आपले भ्रम. उदाहरणार्थ, आपण वृद्ध झालो, आजारी पडलो की दुःखी होतो. पण मानवी जीव म्हणून आपण आणखी काय अपेक्षा ठेवू शकतो? मानवी जीव आजारी पडतो आणि मानवी जीव म्हातारा होतो, नाहीतर आपण तरुणपणीच मरून जाऊ - या गोष्टी काही फार आश्चर्यजनक नाहीत. जेव्हा आपल्याला आरशात आपल्या केसातल्या रुपेरी बटा दिसू लागतात, आपण दुःखी होतो आणि आपल्याला त्याचा धक्का बसतो, हीच अवास्तव दृष्टिकोनाची किंवा जगाच्या आणि स्वतःच्या अस्तित्वाबाबतच्या भ्रमाच्या अवस्थेची स्थिती आहे. 

मान्य करू की आपल्याला म्हातारपण आवडत नाही. आपल्या त्याबाबतच्या भ्रमामुळे - आपण वस्तुस्थिती स्वीकारत नाही - आपण तणावदायी भावना आणि दृष्टिकोनाच्या प्रभावाखाली येऊन विनाशकारी मार्गाने वागतो. उदाहरणार्थ, तरुण आणि सुंदर दिसण्याच्या बंधनकारक मानसिकतेतून आपण आपल्याला ज्या गोष्टींमुळे सुरक्षित वाटेल असे वाटते, त्या गोष्टी करायला सुरुवात करतो - जसे इतरांना आकर्षित करणे, इतरांचे प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करणे, विशेषतः ज्यांना आपण आकर्षक वाटतो अशा तरुणांचे. अशा विकृत मानसिकतेमागे मुख्यतः हा भ्रम असतो की मी जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे; मी विश्वाचे केंद्रस्थान आहे. त्यामुळे प्रत्येकाने माझ्याकडे लक्ष द्यायला हवे. भलेही मी कसाही दिसत असेन, प्रत्येकाला मी छानच वाटायला हवा आणि प्रत्येकाला मी आवडायला हवा. एखाद्याला आपण आकर्षक वाटत नसू आणि त्यांना आपण आवडत नसू, तर आपण वेडावून जातो. जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो की आपण एखाद्याला शारीरिकदृष्ट्या आकर्षक नाही वाटलो तर किमान अन्य स्वरूपात तरी आकर्षक वाटावे आणि तरी त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केले तर आपण आणखी वेडे होतो. पण शाक्यमुनी बुद्धही जर सर्व लोकांना आवडत नव्हते, तर आपण ही अपेक्षा कशी करू शकतो की आपण सर्वांना आवडायला हवे. 

आपण सर्वांना आवडायला हवे, ही अपेक्षाच अवास्तव आहे. ही अपेक्षा वास्तवावर आधारलेली नाही. तर ती आपण सर्वांना आवडायला हवे आणि प्रत्येकाने आपल्याकडे आकर्षित व्हायला हवे, अशा भ्रम, वासना आणि आसक्तीच्या भावनेवर आधारलेली आहे. यामागे आपला अस्वस्थ करणारा भोळाभाबडा दृष्टिकोन असतो. आपण विचार करतो की आपण इतके महत्त्वाचे आणि प्रेमळ आहोत की प्रत्येकाला आपण आवडायला हवे, त्यामुळे ज्याला आपण आवडत नाही, त्या व्यक्तीमध्येच काहीतरी त्रुटी आहे. आणखी वाईट म्हणजे, आपण स्वतःवरच शंका घ्यायला लागतो: ‘नक्की माझ्यातच काहीतरी कमतरता आहे म्हणून मी त्यांना आवडत नाही’ आणि या भावनेतून आपल्याला अपराधी वाटू लागते. हे सर्व भाबडेपण आहे.     

त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःत सुधारणा करणे. धर्मापालनाचा संबंध याच गोष्टीशी आहे. परिस्थिती कोणतीही असो - जर आपल्याला समस्या असतील, असुरक्षित वाटत असेल किंवा काहीही असो, आपल्याला नक्की काय होते आहे हे जाणून घेण्यासाठी स्वतःच्या आत डोकावायला हवे. मी अनुभवत असलेल्या या तणावदायी भावनांमागची भ्रमाची भावना नक्की कुठे आहे? पण जेव्हा आपण समस्या निर्माण करणाऱ्या एखाद्या विशिष्ट नात्याकडे पाहतो, आपल्याला हे ही समजायला हवे की तिथे फक्त आपल्यातच भ्रमितावस्था नाही, तर अर्थातच समोरच्या व्यक्तीलाही भ्रमाची समस्या आहे. मुद्दा हा आहे की आपण असे म्हणत नाही की, ‘तू बदलायला हवे; माझे सगळे बरोबर आहे; तुला बदलण्याची गरज आहे.’ दुसरीकडे आपण असेही म्हणत नाही की केवळ मलाच बदलण्याची गरज आहे, कारण त्यातून आपण शहीद होतोय, अशी भावना विकसित होऊ शकते. आपण समोरच्या व्यक्तीसोबत मोकळेपणाने चर्चा करण्याचा प्रयत्न करतो - अर्थात त्यासाठी समोरची व्यक्ती स्वागतशील असायला हवी. आपल्याला समज असायला हवी की आपण दोघेही भ्रमाची अवस्था अनुभवत आहोत. आपले नाते कोणत्या दिशेने चालले आहे, हे समजताना आपल्या दोघांचाही गोंधळ उडला आहे, त्यामुळे दोघांमधील ही भ्रमितावस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करू. समस्या सोडवण्यासाठी हा सर्वात व्यावहारिक आणि धार्मिक मार्ग असेल.

व्यावहारिक आचरणापूर्वी धर्माची संकल्पना समजून घेणे

बौद्ध साधनेच्या अनेक पद्धती आहेत. एखादी हातचलाखी शिकल्याप्रमाणे या पद्धती शिकण्यासाठीचे केवळ उपदेश घेणे पुरेसे नाही. कोणत्याही पद्धतीच्या शिकवणीमध्ये ती आपल्या समस्या सोडवण्यासाठी कशी उपयुक्त आहे, हे समजून घेणे आवश्यक असते. आपल्याला फक्त त्या पद्धतींचा केंव्हा आणि कसा उपयोग करायचा आहे, इतकेच शिकायचे नसते, तर त्या मागील धारणाही समजून घ्यायच्या असतात. याचा अर्थ आपण अद्ययावत अभ्यासाने सुरुवात करतो असा होत नाही. आपण अगदी प्राथमिक टप्प्यापासून सुरुवात करतो आणि एक पाया निर्माण करतो, ज्यामुळे धार्मिक शिकवणींची क्रमबद्धता समजून घेऊन कोणती साधना कोणत्या पद्धतीने करावी हे समजू शकते.  

हे गोष्ट खरी आहे की आपल्याला काही वेळा अशा शिकवण वाचायला मिळतात ज्यात सांगितलं जातं, ‘जेव्हा तुम्हाला औषध दिलं जातं तेव्हा ते त्याचा कसा परिणाम होतो या विषयी प्रश्न विचारत बसू नका, फक्त औषध घ्या.’ जरी हा चांगला सल्ला असला तरी आपल्याला हे समजून घ्यायला हवे की ही टोकाचे वर्तन टाळण्यासाठी दिली गेलेली चेतावणी आहे. इथे टोकाच्या वर्तनाचा संबंध फक्त शिकवणीचा अभ्यास आणि आकलन करायचे, पण प्रत्यक्षात त्याचा अंगीकार न करण्याच्या प्रवृत्तीशी आहे. आपल्याला असे टोकाचे वर्तन टाळायचे आहे. याचे बरोबर उलटे टोकही असते, ते ही आपल्याला टाळणे आवश्यक असते. ते म्हणजे एखाद्या साधनेविषयीच्या धार्मिक सूचना ऐकल्यानंतर आपण काय करत आहोत, याच्या जाणिवेशिवायच आंधळपणाने त्यांचे पालन करणे. यातून उद्भवणारी मुख्य समस्या म्हणजे या साधनांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा अंगीकार करायचा हेच आपल्याला समजत नाही.  जेव्हा कोणत्याही साधनेचा मुख्य हेतू आपल्याला समजतो - ती कशी काम करते आणि त्याचा उद्देश काय याची जाणीव - तेव्हा ती साधना आपल्या दैनंदिन जीवनात कशी अंगीकारायची हे सांगण्यासाठी इतर कुणाची गरज राहत नाही. तेव्हा आपण स्वतः ती अंगीकारू शकतो. 

जेव्हा आपण आपल्या समस्यांच्या निर्मुलनाविषयी बोलतो, तेव्हा आपण फक्त आपल्या वैयक्तिक समस्यांच्या निर्मुलनाविषयी बोलत नाही. आपल्याला इतरांशी मदत करताना उद्भवणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्याविषयीही आपण बोलत आहोत. ‘मला इतरांना मदत करताना समस्या येत आहे कारण मी फार आळशी आहे किंवा स्वार्थी आहे किंवा मी फार व्यग्र आहे.’ किंवा ‘मला खरच कळत नाही की तुला काय समस्या आहे आणि तुला मदत करण्यासाठी काय करायला हवे, याचीही मला कल्पना नाही.’ ही आपल्यापुढची मोठी समस्या असते, हो ना? इतरांना मदत करताना येणाऱ्या या सर्व अडथळ्यांचे कारण आपला भ्रम आहे. उदाहरणार्थ, आपल्याला असा भ्रम होणं की आपण एखाद्या परमेश्वराप्रमाणे आहोत आणि  एखादी अशी गोष्ट करू शकतो की तुझ्या सगळ्या समस्या संपवू शकतो; आणि त्यामुळे जर तुझ्या समस्या संपल्या नाहीत, तर तुझ्यातच काहीतरी दोष आहे. तू ते नीट केलं नाहीस, त्यामुळे तू दोषी आहेस. किंवा मी समस्या सोडवण्यासाठी सक्षम असायला हवे होते, पण मी तसा नाही, त्यामुळे मीच दोषी आहे. शेवटी हे पुन्हा कारण आणि परिणामांसंबंधी भ्रमाच्या अवस्थेशी संबंधित आहे.  


धर्माप्रति दृढ विश्वास

आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात परिणामकारतरीत्या धार्मिक आचरण करण्यासाठी आपल्याजवळ समस्यांपासून मुक्ती मिळवणे शक्य असल्याचा दृढ विश्वास असायला हवा. एखाद्या गोष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याच्या पुनरावृत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या कारणांचे निर्मुलन करायला हवे, हा मूलभूत बौद्ध दृष्टिकोन अंगीकारून आपल्या भ्रमांपासून मुक्ती मिळवणे शक्य असल्याचा आपल्याजवळ विश्वास असायला हवा. पण अर्थात हा खोल, दृढ विश्वास मिळवणे कठीण असते की आपले भ्रम पुन्हा निर्माण होणार नाहीत, अशा रीतीने त्या भ्रमांपासून मुक्ती मिळवणे शक्य आहे. शिवाय मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीही शक्य असल्याचा दृढ विश्वास बाळगणेही कठीण असते. हे विशेषतः तेव्हा कठीण असते, जेव्हा आपल्याला मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीविषयक आकलनच नसते. त्यामुळे ते शक्य आहे की नाही, हे आपल्याला कसे उमजणार? जर आपल्यात ते शक्य असल्याचा विश्वासच नसेल तर आपल्याला जे अस्तित्वातच नाही असे वाटते ते मिळवण्याचे उद्दिष्ट बाळगणेच पाखंडीपणाचे ठरणार नाही का? तेव्हा तो एखादा मूर्खपणाचा खेळ ठरेलः तेव्हा आपले धार्मिक आचरण खरे नसेल. 

आपण खरोखरच दृढ विश्वास बाळगायला हवा, आणि त्यासाठी प्रचंड अभ्यास आणि आकलनाची, शिवाय सखोल विचार आणि ध्यानधारणेची गरज असते. आपल्यात विश्वास असायला हवा की मुक्ती आणि ज्ञानप्राप्ती निव्वळ शक्यच नाही, तर मलाही ती साध्य करणे पूर्ण शक्य आहे. असे नाही की ते फक्त शाक्यमुनींना शक्य झाले आणि मला शक्य होणार नाही. उलट मलाही ते साध्य करणे शक्य आहे आणि सर्वांनाच ते साध्य करणे शक्य आहे. आपल्याला याची जाणीव असायला हवी की आपले भ्रम दूर करण्यासाठी काय करायला हवे. आपल्याला नक्की कशापासून मुक्ती हवी आहे?आपल्याला भ्रमाच्या स्थितीपासून मुक्ती मिळवून देणारी गोष्ट म्हणजे आकलन किंवा जाणीव; आणि म्हणून आपल्याला जाणीव असायला हवी की योग्य आकलन कशा रीतीने भ्रमावर मात करेल आणि ते पुन्हा उत्पन्न होणार नाही, अशा रीतीने त्याचे निर्मुलन करेल. परिणामी, आपण पाहू शकू की धर्मपालनाचे कार्यक्षेत्र हे आपले दैनंदिन जीवनच आहे; असे दैनंदिन जीवन जे अनेक समस्या, भ्रम आणि प्रतिकूल परिस्थितीने क्षणन् क्षण व्यापलेले आहे. 

धर्मपालनासाठी आत्म-विश्लेषण आवश्यक आहे

धार्मिक आचरण म्हणजे काही दैनंदिन जीवनापासून काही काळ सुटका करून घेऊन ध्यानधारणेसाठी एखाद्या शांत, छान गुहेत जाऊन किंवा आपल्या खोलीत जाऊन आसनावर शांत बसून जीवनातील वास्तविकतेपासून पळ काढणे नव्हे. पलायन हा काही धर्मपालनाचा केंद्रबिंदू नाही. आपण ध्यानधारणेसाठी शांत ठिकाणी जातो, तेव्हा आपला उद्देश आपल्या जीवनातील समस्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्याचा असतो. आपल्या ध्यानसाधनेचा मुख्य केंद्रबिंदु आपले जीवन असते. एका जागी बसून ध्यानधारणेतील आॅलम्पिक पदक मिळवण्याचे उद्दिष्ट नसते. धार्मिक आचरणाचा संबंध दैनंदिन जीवनातील धर्म अनुसरणाशी आहे.   

आणि धार्मिक आचरण हे आत्मविश्लेषणात्मक असते. त्याच्या साहाय्याने आपण आपली मनोवस्था, आपल्या प्रेरणा, आपला दृष्टिकोन आणि आपली बंधनकारक वर्तन प्रवृत्ती यांच्या बाबतीत सचेतन होतो. आपल्याला विशेषतः आपल्या तणावदायी भावनांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते. या तणावदायी भावनांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या जेव्हा उत्पन्न होतात, तेव्हा आपण किंवा इतर लोक अस्वस्थता अनुभवतात. आपण आपली मनःशांती आणि आत्मसंतुलन गमावून बसतो. तणावदायी भावनांची ही फार उपयुक्त व्याख्या आहे, कारण त्या ज्ञानाच्या आधारे आपण जेव्हा तणावदायी भावनांच्या प्रभावाखाली वागू लागतो,  तेव्हा त्याची तात्काळ जाणीव होते.  आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर आपल्याला लगेच लक्षात येते की आपल्या मनात काही तणावदायी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या आत काय खळबळ सुरू आहे ते तपासण्याची आणि ते सुधारण्यासाठी  उपाययोजना करण्याची गरज असते. 

यासाठी आपल्या अंतर्मनात काय चालले आहे, याबाबत आपण फार संवेदनशील असणे आवश्यक असते. आणि आपली मनोवस्था बदलण्यासाठी काहीही करण्याची आपली तयारी असायला हवी, जर आपल्याला ते अस्वस्थ करणारे वाटत असेल, तर स्वतःला ही जाणीव करून द्यायला हवी की आपण असे अस्वस्थ करणारे वागत राहिले तर त्यातून आपल्यासाठी आणि इतरांसाठीही खूप दुःख निर्माण करू. आपल्याला ते नको आहे; आपले पुरेसे दुःख सहन करून झालेले आहे. आणि आपण निराश असू तर आपण कुणाची कशी काय मदत करू शकू?  

लवचिकता

धार्मिक आचरणासाठी आपल्याला एक-दोन नव्हे तर अनेक विरोधी शक्तींशी परिचित व्हावे लागते. आपले जीवन गुंतागुंतीचे असते आणि एकाच विशिष्ट प्रकारची प्रक्रियाच प्रत्येक वेळी परिणामकारक नसते. भिन्न परिस्थितींमध्ये एकच पद्धती प्रभावशाली ठरू शकत नाही. दैनंदिन जीवनात या गोष्टींचा अंगीकार करण्यासाठी अंगी फार लवचिकता बाळगणे आवश्यक असते आणि विविध पद्धतींचा अंगीकारही गरजेचा असतो. हे काम करत नसेल, तर आपण ते करून बघतो; ते काम करत नसेल तर आपण हे करून बघतो. 

माझे गुरू त्सेनझाब सरकाॅंग रिंपोछे सांगत असत की जेव्हा तुम्ही जीवनात काही करायचे ठरवता तेव्हा किमान दोन-तीन पर्यायी योजना तयार ठेवा. मग अ योजना यशस्वी झाली नाही, तर तुम्ही लगेच हार मान्य करून प्रयत्न सोडून देणार नाही. कारण तेव्हा तुमच्याकडे ब किंवा क ही पर्यायी योजना असेल. आणि त्यातील एखादी कालांतराने यशस्वी ठरेल. हा मला फारच उपयुक्त सल्ला वाटला. धर्माच्या बाबतीतही ही गोष्ट लागू होतेः जर अ पद्धत एखाद्या विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त नाही ठरली, तर आपल्याकडे कायम पर्यायी योजना असेल. आणि आपल्याला इतर गोष्टींकडे वळण्यासाठी पर्याय उपलब्ध असतील. हे सर्व अर्थातच व्यापक अभ्यासावर अवलंबून आहे, विविध ध्यानधारणा पद्धती आत्मसात करण्यावर अवलंबून आहे, ज्या आपण शारीरिक प्रशिक्षणाप्रमाणे नंतर अमलात आणू शकतो. आपण या पद्धती आत्मसात करण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करतो, जेणेकरून दैनंदिन जीवनात जेव्हा जेव्हा त्यांची गरज पडेल, तेव्हा तेव्हा त्या लागू करता येतील. यासाठी धार्मिक आचरणाला एखाद्या छंदाप्रमाणे न पाहता संपूर्ण प्रतिबद्धतेच्या दृष्टिकोनातून पाहायला हवे.   

टोकाचे वागणे टाळणे

आपण आपल्या कुटुंबात धार्मिक आचरण अमलात आणतो. आपण ते आपल्या पालकांसोबत, मुलांसोबत आणि कामकाजाच्या ठिकाणी वागताना लागू करतो. हे करताना आपल्याला टोकाचे वागणे टाळायला हवे. आपण याचा याआधी थोडासा उल्लेख केला आहे. आपण आपल्या समस्यांसाठी दुसऱ्यांना दोषी धरताना किंवा अगदी सगळा दोष स्वतःवरच घेताना टोकाचे वागणे टाळायला हवे. दोन्ही पक्षांचा त्यात सहभाग असतो. आपण इतर लोकांना बदलण्यासाठी प्रयत्न करू शकतो, पण स्वतःला बदलणे सर्वात सोपे असते.

त्यामुळे आत्म-सुधारणा हा केंद्रबिंदू आहे. पण हे करताना आपल्याला टोकाची आत्मप्रौढी आणि अहंगंड टाळायला हवा. स्वतःबाबतच्या अवास्तव भ्रमामुळे, आपण फक्त स्वतःकडे पाहायला लागतो आणि इतरांकडे लक्ष देत नाही. यामुळे आपणच विश्वाचा केंद्रबिंदू आहोत, ही भावना बळावू शकते आणि आपण आपल्या समस्याच जगात सर्वात महत्त्वाचा मानू लागतो. तेव्हा दुसऱ्यांच्या समस्या महत्त्वाच्या राहत नाहीत किंवा त्यांचे मन कधी दुखावलेच जात नाही, अशा भ्रमात आपण राहतो. 

टोकाच्या व्यवहारातला दुसरा पैलू म्हणजे आपण फारच वाईट आहोत किंवा आपण फारच चांगले आहोत, असा विचार. हे खरे आहे की आपल्या स्वभावातल्या ज्या घटकांना सुधारण्याची गरज आहे, अशा जटील बाजुंचे आपल्याला ज्ञान असायला हवे. पण आपल्यातल्या सकारात्मक घटकांचीही जाणीव महत्त्वाची असते, जेणेकरून आपल्याला त्या अधिकाधिक विकसित करता येऊ शकतात. आपल्यापैकी अनेक पाश्चिमात्त्य लोकांमध्ये आत्मसन्मानाची भावना कमी असते. जर आपण आपल्या समस्या आणि भ्रमावर जास्त लक्ष केंद्रित केले, तर अर्थात आपल्या आत्मसन्मानावर त्याचा परिणाम होईल. आणि असे वागण्याचा आपला उद्देश नाही.   

आपल्या तणावदायी भावनांवर लक्ष केंद्रित करत असतानाच आपल्या चांगल्या गुणांचे स्मरण ठेवून आपले मन संतुलित ठेवणे आवश्यक आहे. अगदी क्रूर माणसांमध्येही काही चांगले गुण असतात. निसंशय त्यांनीही कधीतरी एखाद्या कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या पिल्लाला उचलून घेतले असेल, स्वतःच्या मांडीवर बसवून थोपटले असेल आणि त्यामुळे त्यांनाही उबदार वाटले असेल. प्रत्येकाने किमान असा एखादा अनुभव तरी घेतलेला असतो. त्यामुळे आपल्याला ही जाणीव होते की आपल्यात एखाद्याला प्रेम देण्याच्या क्षमता आहेत आणि अशा रीतीने आपण आपल्यातील सकारात्मक बाजू पाहू शकतो. धार्मिक आचरण हे फक्त नकारात्मक बाजुंवर काम करण्याशी संबंधित नाही, तर ते संतुलित आहे. आपण आपल्या सकारात्मक बाजुंच्या सक्षमीकरणासाठीही प्रयत्न करायला हवेत. 

आपल्या कमतरता आणि आपले चांगले गुण यातील संतुलन सांभाळतानाच आपण टोकाची वर्तणूकही टाळायला हवी. पहिली टोकाची भावना म्हणजे दोषी वाटून घेणं, ‘मी फारच वाईट आहे. मी अभ्यास करायला हवा आणि मी तो करत नसल्याने मी फारच वाईट आहे.’ आपल्या धर्माभ्यासाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून करायला हवे  हा शब्द दूर करायला हवा. हे कधीच नुसते करायला हवेशी संबंधित नसते. जर आपल्याला आपल्या समस्यांमधून खरोखरच मुक्ती हवी असेल आणि भविष्यातील समस्या टाळायच्या असतील तर ‘मला माझ्या समस्यातून मुक्ती मिळवायची असेल तर या धर्मआचारणातून ते शक्य होईल’ असा साधा विचार करणे आरोग्यदायी दृष्टिकोन ठरेल. आता आपण धार्मिक आचरण करू किंवा करणार नाही, हे आपल्यावर अवलंबून असेल. इथे कोणीही असे सांगत नाही की, ‘तू हे करायलाच हवे आणि तू हे केले नाहीस तर तू वाईट आहेस.’

शिवाय आपल्याला आणखी एका टोकाच्या अतिरेकी विचारापासून दूर राहायला हवे, ती म्हणजे, ‘आपण सर्व परिपूर्ण आहोत; फक्त आपली बुद्ध प्रकृती पाहा आणि सर्व काही ठीक होईल.’ हा फारच धोकादायक विचार आहे कारण त्यातून असा दृष्टिकोन बळावू शकतो की आपल्यात सुधारणा करण्याची गरज नाही; आपल्याला कोणतीही मर्यादा नसून आपल्या नकारात्मक पद्धती बदलण्याचीही गरज नाही कारण आपण परिपूर्ण आहोत. आपल्याला अशा दोन्ही टोकाच्या विचारांपासून - आपण फार वाईट आहोत किंवा आपण परिपूर्ण आहोत-  दूर राहायला हवे. मुख्यतः आपल्याला स्वतःची जबाबदारी घ्यायला हवी. हीच दैनंदिन जीवनात धार्मिक आचरणाचा अंतर्भाव करण्याची गुरुकिल्ली आहे. आपले जीवनमान सुधारण्यासाठी, आपण स्वतःची जबाबदारी घेतो. 

प्रेरणा

स्वतःत सुधारणा घडवत असताना आपण आध्यात्मिक गुरूंकडून प्रेरणा मिळवू शकतो, शिवाय आपल्यासोबत साधना करणाऱ्या इतर लोकांकडूनही प्रेरणा मिळू शकते. पण बहुतांश लोकांसाठी हवेत उडण्याचे कारनामे करणाऱ्या अनेक शतकांपूर्वीच्या महान गुरूंच्या गोष्टी स्थिर प्रेरणादायी स्रोत असू शकत नाहीत. कारण अशा गोष्टींशी स्वतःला जोडून पाहणे कठीण असते आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला एखादी जादुई सफर घडवत असतात. वर्तमानातील जिवंत उदाहरणे सर्वोत्तम असतात कारण भलेही अत्यल्प का असेना, पण आपण त्यांच्याशी संपर्क करू शकतो.   

बुद्धत्व प्राप्त झालेले किंवा खरे प्रशिक्षित गुरूजन आपल्यावर प्रभाव पाडण्याचा किंवा आपल्याला प्रेरित करण्याचाही प्रयत्न करत नाहीत. ते एखाद्या सूर्यासारखे असते. सूर्य लोकांना उब देण्याचा प्रयत्न करत नाही; सूर्याची प्रकृतीचं अशी असते की त्याच्याकडून नैसर्गिकतः इतरांना उब मिळते. महान आध्यात्मिक गुरूंच्या बाबतीतही हेच लागू होते. त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, जीवनपद्धत आणि इतरांशी वागण्याची पद्धत या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला उत्स्फूर्तपणे प्रेरणा मिळत असते. त्या काही जादुच्या करामती नसतात. खरी वास्तविक आणि व्यावहारिक गोष्टच अधिक प्रेरणादायी असते.

मला दुडजोम रिंपोछेंचे स्मरण होते. त्यांचं निधन होऊन अनेक वर्षे झाली. ते निंग्मा परंपरेचे प्रमुख होते आणि माझ्या शिक्षकांपैकी एक होते. त्यांना गंभीर स्वरूपाचा अस्थमा होता. मलाही अस्थमा आहे आणि त्यामुळे श्वास घेतानाच्या अडचणी काय असू शकतात, याची मला जाणीव आहे. तुम्हाला श्वास घेता येत नसल्यानं शिकवणं किती कठीण होऊ शकतं, याचीही मला जाणीव आहे कारण त्यावेळी तुमची सर्व ऊर्जा श्वास आत घेण्यावर केंद्रित झालेली असते. अशा स्थितीत तुमची ऊर्जा बाहेर पडणं फारच कठीण असतं. तरीही मी पाहायचो की दुडजोम रिंपोछे गंभीर स्वरूपाचा अस्थमा असतानाही स्टेजवर जाऊन शिकवण देत असत. त्यांच्यावर अस्थमाचा जराही परिणाम दिसत नसे आणि ते अद्भुत रीत्या शिकवण देत असत. ते फारच प्रेरणादायी होते, अगदी विनम्र आणि कोणतीही जादुई करामत नसलेले. हे वास्तविक आयुष्यातील परिस्थितीशी योग्य रीतीने सामना करणं आहे आणि प्रेरणादायी आहे. 

जसजसे आपण आध्यात्मिक मार्गावर मार्गस्थ होतो, त्या मार्गावर प्रगती करतो, आपल्याला स्वतःकडूनही प्रेरणा मिळू शकते. हा सुद्धा प्रेरणेचा फार महत्त्वाचा स्रोत आहे. आपल्याला स्वतःच्या प्रगतीतून प्रेरणा मिळते. पण हे करताना फार काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक लोक भावनिक दृष्ट्या ही परिस्थिती योग्य रीतीने हाताळू शकत नाहीत, कारण आपल्या प्रगतीमुळे आपण अहंभावी होण्याची प्रवृत्ती बळावू शकते. त्यामुळे आपल्याला प्रगतीची व्याख्या फार काळजीपूर्वक ठरवायला हवी.

प्रगती पथावर

सर्वप्रथम आपल्याला ही जाणीव असायला हवी की प्रगती कधीच एकरेषीय नसते; त्यात चढउतार होत असतात. हेच संसाराच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे, आणि याचा संबंध फक्त उच्च किंवा नीच पुनर्जन्माशी नसतो. चढउतारांचा संबंध दैनंदिन जीवनाशीही असतो. मला या क्षणी साधनेची इच्छा असू शकते, तर दुसऱ्या क्षणी नसू शकते. ते कायम वरखाली होत राहू शकते. त्यामुळे आश्चर्य करण्याचे कारण नाही. खरेतर आपण जोपर्यंत संसारिकतेपासून मुक्त अर्हत जीव होत नाही, तोपर्यंत हे चक्र कायम राहते. त्या उच्चतम अविश्वसनीय स्तरावर पोहचेपर्यंत संसारातील चढउतार कायम राहतात. त्यामुळे दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतरही आपल्याला एखाद्या सुंदर व्यक्तिगत संबंधांमध्ये समस्या अनुभवास येतात तेव्हा लगेच निराश होता कामा नये. आपण अचानक भावनिकदृष्ट्या निराशा अनुभवायला लागतो - असे होते. याचा अर्थ असा नाही की आपण फारच वाईट साधक आहोत. आपल्या सांसारिक स्थितीचे वास्तव पाहता हे फारच नैसर्गिक आहे. 

धार्मिक आचरणात सहसा चमत्कार होत नसतात. जर दैनंदिन जीवनात धार्मिक आचरण लागू करायचे असेल, तर प्रगती पथावरच चमत्कारांची अपेक्षा करू नका. प्रगती वास्तविक मार्गांनी कशी मोजायची? परमपूज्य दलाई लामा सांगतात, फक्त एक-दोन वर्षांच्या संदर्भातून याकडे पाहू नका. पाच ते दहा वर्षांच्या सरावानंतर तपासा की ‘मी दहा किंवा पाच वर्षांपूर्वी होतो, त्याहून आता शांत झालो आहे का? मी हाताश न होता माझ्या आयुष्यातील कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम आहे का?’ जर आपल्यात असा बदल झाला असेल, तर आपण नक्कीच प्रगतीपथावर आहोत आणि ते प्रेरणादायी आहे. आपल्याला अजूनही समस्या असतील, पण त्यातून आपल्याला पुढे जाण्याचे बळच मिळेल. कठीण काळात परिस्थिती आणखी बिघडली तरी आपण निराश होत नाही. आपण स्वतःला लगेच सावरतो. 

जेव्हा आपण स्वतःकडेच प्रेरणेचा स्रोत म्हणून पाहतो, तेव्हा मुख्य मुद्दा हा असतो की ती प्रेरणा आपल्याला त्या मार्गावर मार्गस्थ होण्यासाठी बळ देते. हे शक्य होते कारण आपण योग्य दिशेने जात आहोत, याबद्दल आपल्याला विश्वास असतो. आणि आपल्याला योग्य दिशेने जात असल्याचा विश्वास तेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा आपल्याला त्या दिशेने जाण्याचा अर्थ काय आहे, याची विवेकी जाणीव असते - ती म्हणजे त्या दिशेने जाताना आपल्याला चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. 

दैनंदिन जीवनात धार्मिक आचरणाचा अंगीकार कसा करावा, यासाठीच्या या काही सर्वसाधारण कल्पना आहेत, आशा आहे की त्या तुम्हाला उपयुक्त ठरतील. धन्यवाद. 

Top