लाम-रिम श्रेणीबद्ध मार्गावर एक दृष्टिक्षेप

अनमोल मानवी जन्माचा सदुपयोग 

आपणा सर्वांना मनुष्य रूपात अनमोल मानवी देहासह अनमोल पुनर्जन्म लाभला आहे. जो आपल्याला उच्चस्तरीय आध्यात्मिक प्रगतीची संधी देतो. मनुष्य रूपात आपल्याला ज्ञानप्राप्तीची जी संधी लाभली आहे, ती आपल्याला देवाधिदेव इंद्राच्या रूपात जन्म लाभला असता, तरी मिळाली नसती. 

आत्ता आपल्याला सत्कर्मासाठीचा जो आधार लाभला आहे, त्याहून चांगली संधी असूच शकत नाही, त्यामुळे त्याचा सदुपयोग करण्याच्या संधीचा अधिकाधिक लाभ उठविणे महत्त्वाचे आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठीचा सर्वात योग्य मार्ग हा असेल की आपण आपल्या हृदयात अधिकाधिक उदारता आणि प्रेमभाव विकसित करावा. या प्रेमळ हृदयाच्या मदतीने आपण बोधिचित्ताचे ध्येय असणारा समर्पित भाव विकसित करू शकते. हीच ज्ञानप्राप्तीची कामना असेल, अर्थात, आपल्यातील सर्व दोष दूर करण्याची आणि आपल्यातील क्षमतांचा परिपूर्ण विकास करण्याची मनोकामना असेल, जेणेकरून आपल्याला शक्य तितके इतरांच्या भल्यासाठी कार्य करता येईल. आपले हृदय इतरांच्या भल्यासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी समर्पित करणेच आपल्या अनमोल मानवी जन्माचा सदुपयोग असेल. 

पूर्वजन्मातील व्यवहारातून उत्पन्न झालेले सकारात्मक सामर्थ्यच या जन्मातील साफल्याचे कारण आहे 

माणसे अनेक प्रकारची असतात, आणि त्यात अशी माणसे विरळ असतात, जी आपला भविष्यातील जन्म सुधारण्यात रूची ठेवतात. तिथे ज्ञानप्राप्तीचा मुद्दा तर सोडूनच द्या. अधिकांश लोकांना केवळ या जन्मात स्वतःसाठी सुख प्राप्त करण्यात रस असतो. तरीही आपल्या सर्वांनाच सुखाची कामना असते आणि दुःख नको असते आणि या दृष्टिकोनातून सर्व जण सारखेच असतात. 

जे लोक या जन्मात सुखी होऊ इच्छितात, त्यांच्यासाठी सुख दोन प्रकारचे असतेः भौतिक सुख आणि मानसिक सुख. बहुतांश लोक त्यांचे लक्ष केवळ भौतिक सुखप्राप्तीपुरते मर्यादित ठेवतात. पण भौतिक सुखाच्या बाबतीतही आपण सर्व जण एका ठरावीक पातळीपर्यंत भौतिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असलो, तरी आपल्यातील बहुतांश लोकांना वास्तवात भौतिक सुख कसे प्राप्त करायचे कळत नसते. उदाहरणार्थ, काही असे लोक असतात, जे अन्न, वस्त्र, निवारा, पत अशा गोष्टी मिळवण्यासाठी खून करतात किंवा निर्दोष प्राण्यांची हत्या करतात. काही लोक असतात, जे चोरी, धोकेबाजी किंवा घरफोडी सारख्या गोष्टी करतात, ते हे सर्व एखाद्या भौतिक सुखाच्या कामनेतून करतात. पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना सुखप्राप्तीचा मार्ग लक्षात येत नाही. सुखी होण्याऐवजी ते स्वतःसाठी आणखी समस्या निर्माण करतात. 

तर दुसरीकडे व्यापार, व्यवसाय, शेती, शिक्षण, कला आणि अशा इतर प्रामाणिक मार्गांनी जीविका करणाऱ्या लोकांना दोन प्रकारात विभागता येऊ शकते. एक प्रकार यशस्वी झालेल्यांचा, जे धनसंपत्ती मिळवण्यात सफल झाले आहेत, तर दुसरा प्रकार अयशस्वी झालेल्यांचा, जे पूर्णतः असफल झाले आहेत. जर आपण विचार केला की- या मागचे कारण काय आहे- काही लोक यशस्वी होतात, तर बाकी अयशस्वी का होतात – हे सर्व त्यांच्या पूर्वजन्मातील कर्मबीजांमुळे आणि संभाव्यतांमुळे होते, जे त्यांचे पूर्वजन्मीचे संचित असते. ज्या लोकांनी गतजन्मी विनाशकारी व्यवहार केला असेल, त्यांनी खूप पाप साठविलेले असते, त्यांना परिणामस्वरूप या जन्मात विफलता मिळते. तर जे गतजन्मात सकारात्मक, विधायक जगले आहेत, आणि त्यांनी पुण्य संचय केला असेल, तर ते या जन्मात सफल आणि सुखी होतात.   

जर तुम्ही काही लोकांच्या यशस्वी होण्याविषयी आणि बाकी लोकांच्या अयशस्वी होण्यासंबंधीचे हे स्पष्टीकरण स्वीकारत नसाल, तर वास्तवात या प्रकारच्या विसंगतीच्या अस्तित्वाचे काही कारणच नाही. जर लोक एकसमान क्षमता आणि प्रयत्नपूर्वक काम करत असतील, तर त्यांना समप्रमाणात यश मिळायला हवे. काही लोकांना वाटते की या जन्मातील हे यश उपजीविकेसाठी केल्या जाणाऱ्या कार्यांच्या स्वरूपावर अवलंबून असते – जसे व्यापार किंवा उद्योग- पण ते ही पूर्णतः कारणीभूत नसते. गतजन्मात केलेल्या सकारात्मक कर्मांमुळे मिळणारी पुण्य सफलता हेच वास्तविक कारण असते, जिथे या जन्मातील कार्ये किंवा कृती ती कारणे फलदायी होण्यासाठी परिस्थिती किंवा स्थितीच्या रूपात कार्य करतात. 

अशा प्रकारे यश हे एकत्रितपणे उत्पन्न होणारी कारणे आणि स्थिती यांच्यावर अवलंबून असते. कारणे गतजन्मातून उत्पन्न होतात – त्या जन्मादरम्यान संचय झालेल्या क्षमतांमधून येतात. तर परिस्थिती या जन्मात घालवलेला वेळ आणि घेतलेले परिश्रम यातून उत्पन्न होते. या दोन्ही गोष्टींचे एकत्र येणे आवश्यक असते.    

भविष्यातील जन्मांची काळजी 

लोक या जन्मात कितीही संपन्न आयुष्य जगोत, ते कितीही वैभवशाली जीवन जगत असोत, तरीही असा कोणीही नसतो, जो त्याला मिळालेल्या गोष्टीत समाधानी असेल. कुणीही असे म्हणत नाही, ‘मला जे काही मिळाले आहे, ते पुरेसे आहे, मला याहून अधिकाची अपेक्षा नाही.’ लोकांजवळ जे काही असते, त्यात ते समाधानी नसतात. त्यांना नेहमी अधिकाची हाव असते. ते आपले पूर्ण जीवन कष्ट करून घालवतात, तरी त्यांचे काम संपत नाही. 

हे एखाद्या शेतकऱ्याच्या परिश्रमाच्या चक्रासारखे असते, जसे शेतकरी वर्षातील प्रत्येक ऋतूत काम करत राहतो, पेरणी, शेतावर लक्ष ठेवणे, कापणी, मळणी अशी कामे करत राहतो. तोपर्यंत पुन्हा वसंत ऋतुत त्याला पेरणी करावी लागते आणि पुन्हा त्याच चक्रातून जावे लागते. हे उदाहरण स्पष्ट करते की आपण कसे सतत कामात गुंतलेले असतो. 

तरीही आपल्याला असे कधीच वाटत नाही की या जन्मातले काम कधीतरी संपेल, पण वस्तुतः एक अशी वेळ येते, जेव्हा हे काम संपून जाते- ती वेळ आपल्या मृत्युची वेळ असते. त्या क्षणी त्याचा अंत आनंदाच्या स्थितीत न होता, दुःख आणि पश्चातापाच्या अवस्थेत होतो. 

त्यामुळे जे लोक फक्त अन्न, वस्त्र, निवारा आणि पत निर्माण करण्यासाठी जीवन खर्च करतात, ते स्वतःला फसवत आहेत. कारण ते भौतिक सुख-सुविधा मिळवण्यात यशस्वी होतीलही, पण ते मानसिक समाधान मिळवू शकणार नाहीत. सुखसमाधानाशिवाय त्यांचे जीवन अपूर्ण राहून जाते आणि ते दुःखी अवस्थेत मरण पावतात. 

त्यामुळे आपण एका चिरंतन मानसिक सुखाच्या प्राप्तीसाठी कार्यरत होण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. या जन्मात आपल्याला मिळणारे भौतिक सुख फार काळ टिकणारे नसते. जर आपल्याला खरोखर चिरंतन सुखाची अपेक्षा असेल, तर आपल्याला भविष्यातील जन्मांचा विचार करावाच लागेल. याचे कारण जेव्हा आपण भविष्यातील जन्मांना विचारात घेऊ, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने दीर्घकालीन सुखप्राप्तीसाठी प्रयत्न करू शकतो. 

जर आपण भविष्यातील जन्मांत सुख प्राप्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले तर, त्यातून आपली आध्यात्मिक व्यक्ती असण्याची परिभाषा सार्थकी लागतो, जी व्यक्ती आध्यात्मिक साधनेत गुंतलेली आहे. आपण जर फक्त या जन्माबाबत काळजी करत असू – केवळ नश्वर गोष्टींचा विचार करत असू- तर आपण केवळ सांसारिक भौतिकतावादी व्यक्ती होऊ. पण आपण भविष्यातील जन्मांबाबत काळजी करण्यास सुरुवात केली, तर आपण आध्यात्मिक व्यक्ती बनू.                                                              

भविष्यातील जन्मांमधील सुखप्राप्तीसाठी विनाशकारी वर्तन टाळण्याचा निश्चय

भविष्यातील जन्मांसाठीची सुखप्राप्ती निश्चित करण्यासाठी धर्माबाबतचे काही ‘प्रतिबंधात्मक उपाय’ करण्याची आवश्यकता असते. स्पष्ट सांगायचे तर आपण स्वतःला विनाशकारी कृत्यांपासून दूर ठेवायला हवे. अशी दहा विनाशकारी कृत्ये आहेत, ज्यात तीन विनाशकारी कृत्ये शरीराशी संबंधित, चार वाणीशी संबंधित आणि तीन मनाशी संबंधित आहेत. जर आपण यातील कोणत्याही कृत्यापासून स्वतःला दूर ठेवले, तर आपणास भविष्यातील जन्मांमध्ये सुखप्राप्ती होते. 

आता आपण हे सिद्ध केले आहे की आपण सकारात्मक वर्तन अंगीकारल्यास आपल्या आध्यात्मिक साधनेची सुरुवात होते, ज्याच्या परिणामस्वरूप या जन्मात आणि भविष्यातील जन्मातही आपले जगणे नेटके होईल. अशा स्वरूपाच्या सकारात्मक वर्तनात, उदाहरणादाखल अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवायला हवे, ज्यात जाणूनबुजून एखाद्या प्राण्याची किंवा कीटकाची हत्या करणे, जाणूनबुजून चोरी करणे आणि अशा प्रकारच्या वर्तनातील सर्व त्रुटी आणि नकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते. यात गोष्टींचे शिस्तबद्ध आकलन करून घेऊन हत्या किंवा चोरी न करण्याबाबत दृढ निर्णय घेण्याची गरज असते. लोक अशा पद्धतीचा निर्णय घेतात, तेव्हा ते त्या निर्णयाप्रमाणे सकारात्मक वागतात की नाही, हे पाहण्यासाठी कुठल्या आर्मी किंवा पोलिसांची गरज नसते. त्यांची स्वतःची नैतिकता आणि आचारनीति त्यांना विनाशकारी कृतींपासून रोखते.  

 कठोर नैतिक आचारनियमन हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे, जो मृत्युसमयी शांत-सुखी चित्ताने मृत्यू स्वीकारण्यास आपल्याला साहाय्यक ठरतो. नाही तर आपला मृत्यू फार दुःखदायी आणि चिंतादायी अवस्थेत होऊ शकतो. पण आपण नैतिक आचरण असलेल्या व्यक्तीच्या रूपात प्रतिबंधात्मक उपाय केलेले असतील, तर मृत्युसमयी आपल्याला कोणतीही चिंता सतावणार नाही. आपण आश्वस्त होऊ शकतो की आपला पुनर्जन्म मनुष्य रूपातच होईल, किंवा असेही होऊ शकते की आपण पुढील जन्मात इंद्र किंवा इतर कोणत्या दैवी रूपात देवगतीला प्राप्त होऊ शकतो. 

सर्व जन्मात अनियंत्रितपणे उद्भवणाऱ्या समस्या 

जरी आपण मनुष्य रूपात जन्मलो – किंवा देवतांच्या राज्याच्या रूपात – तरीही आपल्याला जीवनात समस्यांचा सामना करावा लागणार आहे. आपला पुनर्जन्म कुठेही होवो किंवा कोणत्याही रूपात होवो, काही अशा समस्या असतात, ज्या अनियंत्रितपणे वारंवार उत्पन्न होतात. त्यामुळे विनाशकारी कृत्यांपासून दूर राहण्याचे नैतिक आचरण अवलंबून आपण निम्नस्तरीय पुनर्जन्मांपासून आपला बचाव करू इच्छित असू, तर त्याला काही अर्थ असणार नाही. कारण आपला पुनर्जन्म कोणत्याही ठिकाणी होवो, कोणत्याही रूपात असो, समस्या असणारच आहेत. 

यातून सुचित होते की आपला दृष्टिकोन अधिक व्यापक असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर आप शांत आणि स्थिर मनोवस्था – ज्याला संस्कृतमध्ये ‘शमथ’ आणि तिबेटी भाषेत ‘शिनय’ संबोधले जाते – विकसित करतो, तर त्याच्या परिणामस्वरूप आपला पुनर्जन्म एखाद्या देवतेच्या रूपात होऊ शकतोः गैर अस्तित्वाचे उच्चतम स्तर अर्थात अलौकिक रूपातील रूपहीन सत्वाच्या रूपात होऊ शकतो. त्या अवस्थेत आपण पुनर्जन्माच्या अवस्थेतील सर्व वैभव अनुभवू शकू. पण या उच्चतम स्तरावरील एखाद्या सत्वाच्या रूपात पुनर्जन्म प्राप्त करणेही काही विशेष उपलब्धी नाही. हे फक्त बहुमजली इमारतीतील वरच्या मजल्यावर जाण्यासारखे आहे – एकदा तिथे पोहचलो की तिथून खाली उतरण्याशिवाय करण्यासारखे काहीच शिल्लक राहत नाही. 

बुद्ध वचनांबाबत विश्वास प्राप्त करणे 

त्यामुळे आपला पुनर्जन्म कोणत्याही अवस्थेत झालेला असो, आपल्या समस्या संपवून त्याला अधिक उन्नत स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे करण्यासाठी आपल्याला विवेकशील जागरूकतेच्या साहाय्याने आपल्या समस्यांच्या मूळापर्यंत पोहचण्याची गरज असते, जेणेकरून यथार्थ आणि कल्पनेदरम्यानचा फरक ओळखता येईल. अशा प्रकारे आपण कालांतराने शून्यतेच्या बोधाजवळ पोहचतो, ज्याचा अर्थ असतो की अस्तित्वाच्या असंभाव्य शक्यतांचा पूर्ण अभाव. यथार्थाचे हे आकलन आपल्या मिथ्या कल्पना संपवते. आणि असे करून कोणत्याही जन्मातील आपल्या सर्व समस्या आणि दुःखांचे सर्वस्वी निवारण करते. हा बोध असा आनंद प्रदान असतो, जो चिरंतन असतो आणि त्याला प्राप्त करणे शक्य आहे. 

संग्रहित बुद्ध वचने असणाऱ्या अभिजात ग्रंथांमधून आपण शून्यतेविषयीची शिकवण आत्मसात करू शकतो. पण या ग्रंथांमध्ये बुद्धांद्वारे केवळ शून्यतेविषयीच नाही, तर इतर सर्व विषयांबाबत बुद्धांनी दिलेल्या शिकवणींबाबत आपण विश्वास कसा संपादन करणार? या गोष्टींवर तर्क आणि विश्लेषणांच्या आधारे विश्वास आत्मसात करायला हवा. शून्यतेच्या यथार्थतेची पुष्टी आपण तर्कसिद्ध विवेकाच्या आधारे करू शकतो. शिवाय समाधी आणि मनःशांती व स्थिरतेसंबंधीच्या शिकवणींची पुष्टी आपण त्यांच्या व्यावहारिक अंगीकारातून आणि स्वतः त्या अवस्था प्राप्त करून करू शकतो. आणि आपण स्वतः अनुभव करू शकतो की या साधनांच्या माध्यमातून आपण वास्तवात विभिन्न प्रकारच्या उन्नत अवस्था प्राप्त करू शकतो, ज्यांना एकाग्रता प्राप्तीच्या उपउत्पादनांच्या रूपात पाहता येऊ शकते. बुद्धांद्वारे शिकवल्या गेलेल्या सर्व गोष्टींची सत्यता आपण स्वतः आपल्या अनुभवातून पडताळू शकतो. 

अशा प्रकारे तर्क आणि स्वानुभवाच्या कसोटीवर सिद्ध झाल्यानंतर आपण बुद्धांद्वारे दिल्या गेलेल्या शिकवणीला स्वतःच्या परिश्रम आणि प्रयत्नातून प्रत्यक्ष व्यवहारात लागू करून त्यांच्याबाबत दृढ विश्वास प्राप्त करू शकतो. त्या दृढ विश्वासाच्या आधारे आपण बुद्धांद्वारे सांगितल्या गेलेल्या इतर गूढ विषयातील शिकवणींच्या यथार्थेबाबतही दृढ विश्वास विकसित करू शकतो.  

उदाहरणार्थ, बुद्धांनी सांगितले होते की जर आपण सकारात्मक वर्तन केले तर त्याच्या परिणामस्वरूप आपण एखाद्या चांगल्या रूपात – मनुष्य रूपात किंवा देवगणात – पुनर्जन्म प्राप्त करू शकतो. तर दुसरीकडे आपण विनाशकारी किंवा नकारात्मक वर्तन केले तर त्याच्या परिणामस्वरूप आपण नरकात, ज्याला भूतगण संबोधले जाते किंवा एखाद्या प्राण्याच्या रूपात पुनर्जन्म घेऊ. वर्तनविषयक कारणे आणि परिस्थितीची ही उदाहरणे आहेत, ज्याची पुष्टी स्वतः आपल्या अनुभवातून किंवा तर्काच्या आधारे करता येत नाही. पण आपण केवळ धार्मिक ग्रंथांवरील अंधविश्वासातून त्यांचा स्वीकार करू नये. याचे कारण तर्क आणि अनुभव बुद्धांच्या समाधी आणि शून्यतेचा योग्य बोध प्राप्त करण्यासंबंधीच्या शिकवणींचे समर्थन करू शकतो तर हे पूर्णतः तार्किक वाटते की बुद्धांनी वर्तन आणि त्याच्या परिणामांबद्दल जे काही सांगितले आहे, ते स्वीकार्ह आहे. 

यासाठीच आपल्याला शून्यता, यथार्थता, अस्तित्वाचे असंभव मार्ग यासंबंधी बुद्धांद्वारे सांगितल्या गेलेल्या गोष्टींबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. जेव्हा आपल्याला त्याच्या यथार्थतेची जाणीव होते, तेव्हा आपल्याला बुद्धांद्वारे पुढे सांगितल्या गेलेल्या गोष्टींचा विचार करायला हवाः जसे सकारात्मक कार्याच्या फलस्वरूप आनंदप्राप्ती होते, तर नकारात्मक, विनाशकारी कृत्यांच्या फलस्वरूप वेदना मिळते. त्यानंतर आपल्याला बुद्ध वचने यथार्थ असल्याचा विश्वास प्राप्त होतो, आणि त्या विश्वासाच्या आधारे आपण आपले वर्तन सुधारण्याचा दृढ निश्चय करतो. जर आपल्याला आनंद हवा असेल, तर आपल्याला तसे वर्तन करायला हवे, ज्यातून आनंदप्राप्ती होईल. अर्थात, आपल्याला सकारात्मक आणि विधायक वर्तन करायला हवे. 

संन्यासः सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचा दृढ विश्वासः 

आपण असा विचार करणेही उपयुक्त ठरेल की आत्ता आपल्याला जो उत्कृष्ट मानवी जन्म लाभला आहे – आणि त्या सोबत जोडलेल्या आध्यात्मिक प्रगतीच्या सर्व संधी प्राप्त आहेत – तो पुनर्जन्म उगाचच प्राप्त झालेला नाही. हे गतजन्मात संचय केलेल्या पुण्यकर्माचे फलरूप आहे. आपण फार सकारात्मक आणि विधायक कार्ये केली असतील, आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला हा पुनर्जन्म आणि या संधी लाभल्या आहेत. त्यामुळे ही संधी व्यर्थ घालवता कामा नये. जर आपण पूर्णतः या जन्मातील गोष्टी, जसे अन्न, वस्त्र आणि मानमरातब मिळवण्यात व्यस्त राहिलो, तर आपला जन्म व्यर्थ ठरेल. जर आपल्याला केवळ याच गोष्टींची काळजी असेल तर या गोष्टींवरील आसक्तीमुळे आपले मन केवळ या जन्माप्रतिच्या तल्लीनतेनेच व्यापलेले राहील.

तर दुसरीकडे भविष्यातील जन्मात इंद्रासारख्या एखाद्या देवतेच्या रूपात पुनर्जन्म मिळून सुखप्राप्तीच्या इच्छेने आपण प्रयत्न केले तरी ती ही समस्याच ठरेल. अशा देवतांचे जीवन कसे असते, यावर एक नजर टाकून पाहा. या देवतांजवळ अमर्याद सुख असते आणि त्यांना वरवर पाहता कोणतीही अल्पकालीन समस्या नसते. पण मृत्युसमयी अशा देवतांना फार दुःख आणि पश्चाताप असेल, कारण त्यांचे सुखाने भरलेले सबंध आयुष्य़ स्वप्नवत वाटेल आणि त्यातून मृत्युसमयी त्यांना तीव्र दुःख होईल. त्यामुळे अशा पुनर्जन्म प्राप्तीचे आपले उद्दिष्ट समस्येवरील उपाय नाही. 

या शिवाय आपल्याजवळ अनमोल मानवी शरीराच्या रूपात जो आधार उपलब्ध आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्यायला हवा, कारण ते नश्वर आहे. असा कोणीही नाही, जो जन्माला आला आहे आणि त्याचा मृत्यू झालेला नाही. आपल्या सर्वांचा मृत्यू निश्चित आहे. कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही की त्याचा मृत्यू केव्हा होईल. या सत्यांविषयी विचार करण्याच्या परिणामस्वरूप आपण शांत आणि गंभीरपणे कामना करतो की जोपर्यंत आपण जीवंत आणि स्वस्थ आहोत, तोपर्यंत त्या संधीचा पुरेपूर लाभ उठवावा, ज्या आत्ता उपलब्ध आहेत. 

त्यामुळे आपल्याला केवळ या जन्मातल्या वस्तुसंग्रहाच्या तल्लिनतेपासून विमुख व्हायला हवे. या जीवनकाळातील विभिन्न गोष्टी कशा सारहीन आहेत, या तथ्यावर विचार करून आपण हे साध्य करतो. अशा प्रकारे आपण या जीवनकाळातील भौतिकवस्तुंविषयक आसक्तीपासून विलग होतो आणि त्या आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून मुक्त होण्याचा दृढ निश्चय करतो. मुक्ती प्राप्त करण्याच्या या दृढ निश्चयालाच ‘संन्यास’ संबोधतात.

अशा प्रकारे आपल्याला भविष्यातील जन्मांकडे पाहायला हवे आणि त्या सर्व प्रकारच्या स्थितींविषयी विचार करायला हवा, ज्यात आपला पुनर्जन्म होण्याची शक्यता आहे. जेव्हा आपण मनुष्य रूपातील किंवा देवगणातील पुनर्जन्मात प्राप्त होणाऱ्या सुख-वैभवाचा विचार करतो, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायला हवे की अशा पुनर्जन्मातही समस्या असतात. आपण कितीही संपन्न असू समस्या अनियंत्रितपणे उद्भवतातच. त्यामुळे भविष्यातील जन्मांतील आसक्ती निर्माण करणाऱ्या गोष्टींपासूनही आपल्याला दूर राहायला हवे. हे आपण दुसऱ्या प्रकारातील दृढ निश्चय विकसित करून साध्य करतो. अर्थात हा दृढ निश्चय भविष्यातील जन्मातील आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांपासून मुक्त होण्याचा असतो.

त्यामुळे मुक्ती प्राप्तीसाठी दोन प्रकारचे दृढ निश्चय असतात. पहिला दृढ निश्चय या जन्मातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचा असतो आणि दुसरा भविष्यातील पुनर्जन्मातील समस्यांपासून मुक्ती मिळवण्याचा असतो. 

नश्वरता 

आध्यात्मिक साधक तो असतो, ज्याला जाणीव असते की जीवनातील कोणतीही स्थिती अपरिवर्तनशील किंवा चिरस्थायी नसते, जो मृत्यु आणि नश्वरतेबाबत सचेतन असतो, जो तिच्या किंवा त्याच्या जीवनातील समस्यांबाबत सचेतन असतो. ही सचेतनता साधकाला त्या समस्यांसाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी प्रेरित करते. जर, केवळ नश्वरता, मृत्यू आणि समस्यांना विसरून त्यांना आपल्यापासून दूर करता येणे शक्य असते, तर फारच चांगले झाले असते. पण वास्तव हे आहे की आपण तसे करू शकत नाही. आपण मरणार आहोत, या वास्तवाकडे डोळेझाक करून आणि आपल्या जीवनातील समस्यांकडे डोळेझाक करून ती तथ्ये संपत नाहीत. त्यामुळे आपण आपल्या समस्यांविषयी सचेतन असणे, त्यांचा यथार्थवादी दृष्टिकोनातून सामना करणे आणि त्यांना दूर करण्यासाठी उपाय करणेच चांगले आहे. आध्यात्मिक साधनेत याच गोष्टींचा समावेश आहे. 

बद्धांनी स्वतः या उपयांचे संचरण सुरू केले, तेव्हा त्यांनी स्वतः नश्वरतेबाबत शिकवण दिली, आणि सांगितले की काहीच चिरस्थायी किंवा अपरिवर्तनशील नसते. त्यांच्या आध्यात्मिक शोधाची सुरुवातच नश्वरतेविषयक बोधाने झाली. आणि याच प्रकारे आपले जीवन संपल्यानंतर आपल्या मृत्युच्या माध्यमातून त्यांनी नश्वरतेचे सत्य लोकांपुढे आणले. 

चार आर्य सत्ये 

या शिवाय समस्या स्वतःहूनच निर्माण होत नाहीत. त्या विनाकारण उद्भवत नाहीत. उलट आपल्या सर्व वास्तविक समस्या आणि दुःखे यथार्थ कारणे- अर्थात आपले आवेगपूर्ण वर्तन आणि तणावदायी भावना व दृष्टिकोन – दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपली कर्मे आणि भ्रमांमुळे उत्पन्न होतात. जेव्हा आपण तणावदायी भावना आणि दृष्टिकोनाला वश होऊन बंधनकारक वर्तन करतो, त्यातून आपल्या समस्या निर्माण होतात. 

आता आपण पाहू शकतो की आपल्या समस्यांच्या दोन कारणांपैकी, आपल्या बंधनकारक वर्तनाची मूळे तणावदायी भावना आणि दृष्टिकोनात असतात. आणि जर आपण बौद्ध ग्रंथात वर्णिलेल्या ८४००० प्रकारच्या तणावदायी भावना आणि दृष्टिकोनांकडे पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की त्या सर्व केवळ एका स्रोतातून उत्पन्न होतातः तो आहे अज्ञान आणि अनभिज्ञता, ज्यांच्या मुळे आपण यथार्थ रूपातील सिद्ध अस्तित्व आणि यथार्थ रूपातील सिद्ध अभिज्ञानाप्रति आसक्त असतो. 

पण यथार्थ रूपातील सिद्ध अभिज्ञान किंवा ओळख अशी कोणती गोष्ट अस्तित्वातच नसते- आपल्यासाठीही नाही आणि इतर कुणासाठीही नाही – तरीही, आपण गोष्टींप्रति आसक्त होतो, जसे त्यांचे यथार्थ रूपातील सिद्ध अस्तित्व वा ओळख असावी. त्यामुळे जर आपण असे यथार्थ रूपातील सिद्ध अस्तित्व असंभव असल्याचा बोध प्राप्त करू शकलो, तर ते प्रतिबंधक औषधासारखे कार्य करते आणि गोष्टींच्या अशा स्वरूपाच्या ओळखीवरील आसक्तीपासून दूर ठेवण्यास साहाय्यक ठरते.

जेव्हा आपल्याला हा बोध होतो की यथार्थ रूपातील सिद्ध अस्तित्व अशी कोणती गोष्ट अस्तित्वात नाही – जसे कोणत्याही गोष्टीची यथार्थ ओळख नसते – तेव्हा त्या बोधाला ‘यथार्थ चित्त मार्ग’ किंवा ‘यथार्थ मार्ग’ संबोधले जाते – जो चार आर्य सत्यांपैकी एक आहे. हा असा चित्त मार्ग आहे, ज्याला उच्चसिद्धी प्राप्त सत्व, अर्थात ‘आर्यजन’ सत्य किंवा यथार्थ मानतात आणि तोच मार्ग मुक्ती आणि ज्ञानप्राप्तीचे साधन असल्याचे मानतात.

जेव्हा आपल्याला हा यथार्थ चित्त मार्ग प्राप्त होतो – अर्थात विवेकी जागरूकतेचा बोध होतो की कोणत्याही गोष्टीची यथार्थ रूपातील सिद्ध ओळख नसते- तेव्हा आपण तणावदायी भावना आणि दृष्टिकोनातून मुक्त होतो, कारण असे भ्रम असंभव अस्तित्वाच्या कल्पनेवर आणि त्यावरील विश्वासावर आधारलेले असतात. जेव्हा आपण तणावदायी भावना आणि दृष्टिकोनातून मुक्त होतो, तेव्हा आपण बंधनकारक वर्तन करत नाही. आणि जेव्हा आपण बंधनकारक वर्तन करणे बंद करतो, तेव्हा आपण स्वतःसाठी समस्या निर्माण करणे बंद करतो. ज्या अनुभवावस्थेत समस्या निर्माण होणे कायमस्वरूपी बंद होते, त्या अवस्थेला ‘सत्य निरोध’ किंवा ‘सत्य निवारण’ संबोधतात.

हीच त्या चार तथ्यांची प्रस्तुती आहे, ज्यांना आर्यजन अर्थात उच्चसिद्धी प्राप्त सत्व यथार्थ मानतात. ही चार आर्य सत्ये आहेत. पहिली दोन सत्ये सांगतात की अशांती कोणत्या कारणांमुळे उत्पन्न होते, अर्थात दुःख आणि त्याची कारणेः बंधनकारक वर्तन आणि तणावदायी भावना व दृष्टिकोन. जेव्हा आपण अंतिम दोन सत्यांवर नजर टाकतो, जी मुक्ती प्राप्त करण्याशी संबंधित असतात, तेव्हा आपण दुःखांची कारणे संपवून दुःखांपासून यथार्थ मुक्तीची कामना करतो. आणि हे साध्य करण्याचा मार्ग म्हणजे यथार्थ चित्त मार्ग विकसित करणे. अशा रीतीने आपण चार तथ्यांचे ज्ञान आणि बोध प्राप्त करतो, ज्यांना सिद्धीप्राप्त लोक यथार्थ मानतात.

मनुष्य रूपात आपल्या गतजन्मात तयार केलेला पाया अधिक विकसित करत आता आपल्याला चार आर्य सत्यांची सिद्धी प्राप्त करण्याची आवश्यकता असते. एकदा हे साध्य झाले की आपल्याला या पुनर्जन्मात लाभलेल्या संधीचा आपण योग्य वापर करू शकू. जेव्हा आपण लाभकारी मनोवस्था असणारी सतत आणि स्थिर बोधावस्था प्राप्त करतो की यथार्थ रूपातील सिद्ध अस्तित्व अशी कोणती गोष्ट अस्तित्वातच नाही, तेव्हा आपण आपल्या सर्व समस्या कायमस्वरूपी दूर करू शकू.           

करुणा विकसित करणे 

आता स्वतःच स्वतःच्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवणे फारच चांगली गोष्ट आहे – पण फक्त तेवढेच पुरेसे नाही. कारण आपण फक्त एक व्यक्ती आहोत, आणि इतरही अगणित लोक आहेत. आपण कधीच मोजू शकत नाही की पृथ्वीवर आणखी किती जिवमात्र असतील आणि त्यातील प्रत्येकाला समस्या असतील – ते सर्व कोणत्या ना कोणत्या मार्गाने दुःख भोगत आहेत. तेव्हा फक्त आपल्या मुक्तीसाठी प्रयत्न करणे योग्य नाहीः आपल्याला सर्वांच्या दुःखावर उपाय शोधायला हवा. 

विचार केल्यानंतर हे स्पष्ट होते की सीमित चित्त असणारे जिवमात्र आपल्याबाबतीत कायमच अत्यंत दयाशील राहिले आहेत – वस्तुतः इतर जिवांहून दयाळू आणखी कोणी नाही. जेव्हा आपण बुद्धजनांमधील दयाभाव आणि सीमित क्षमतेच्या जिवांच्या दयाभावाविषयी विचार करतो, तेव्हा आपल्याला जाणीव होते की दोघांचा दयाभाव एकसमान आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला मध आवडत असेल, तर आपण विचार करू शकतो की तो मध कोठून येतो. तो खूप साऱ्या मधमाश्यांपासून मिळतो आणि मधमाशांना त्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतातः भोवतालच्या फुलांवर उडत राहून परागकण एकत्र करावे लागतात आणि त्यातून आपल्या जाळ्यात मध जमा करावा लागतो. जर आपण मधाचा आनंद लुटू इच्छित असू तर आपल्याला या छोट्या कीटकाच्या दयाभावावर आणि परिश्रमावर अवलंबून राहावे लागेल. तसेच आपण मांसाचा विचार करू शकतो, जे आपल्यापैकी काहीजण खात असतील, जसे आजारपणात आपल्याला अधिक ताकद हवी असेल, तर आपल्याला अशा अन्नाची गरज असते, ते कोठून येते? तर ते मांस अर्थातच प्राण्यांपासून मिळते, ज्यांना आपल्याला पोषणमूल्ये आणि ताकद पुरविण्यासाठी स्वतःच्या जिवाचे बलीदान द्यावे लागते. 

त्यामुळे जेव्हा आपण आपल्या समस्यातून मुक्ती मिळवण्याचा दृढ संकल्प विकसित करतो, तेव्हा आपल्याला हा दृष्टिकोन इतरांबाबतही बाळगायला हवा. ज्या प्रकारे आपण स्वतःच्या समस्यांपासून मुक्त होण्याच्या संकल्प करतो, त्याच प्रकारे आपल्याला इतर सर्वांसाठीही कामना करायला हवी की ते ही आपल्या समस्यांपासून मुक्त होवोत. या दृष्टिकोनास ‘करुणा’ म्हणतात. 

जर आपण स्वतः स्वतःच्या समस्यांचा आणि त्यांच्यापासून मुक्त होण्याचा गांभीर्याने विचार केला नसता – आणि जर आपण त्यांच्यापासून मुक्त होण्याचा दृढ निश्चय विकसित करू शकलो नसतो – तर आपल्याला इतरांच्या समस्यांबाबत गांभीर्याने विचार करणे कठीण झाले असते. आपण इतरांनी आपल्या समस्यांपासून मुक्त व्हावे, अशी कामना करण्यासाठी आवश्यक करुणा विकसित करू शकलो नसतो. उदाहरणार्थ, असा एखादा अधिकारी असेल, ज्याला फार उतारचढाव अनुभवल्यानंतर करिअरमध्ये उच्च पद लाभले असेल, त्या व्यक्तीला इतरांच्या समस्यांबद्दल करुणा आणि सहानुभूती असेल. अशी व्यक्ती अशा इतर व्यक्तींपेक्षा अधिक मदत करण्याच्या मनोवस्थेत असेल, जे आरामदायी जीवन जगत, फार दुःख न झेलता अधिकारी पदावर पोहचले आहेत. 

बोधिचित्त 

इतरांनी त्यांच्या वेदनेतून मुक्त व्हावे, असा दृष्टिकोन म्हणजे ‘करुणा’होय. अशी मनोकामना ज्यात आपण इतरांच्या सुखाची कामना करतो, तीच ‘प्रेमा’ची परिभाषा आहे. जर आपण इतर सर्वांच्या सुख आणि समस्यांपासून मुक्तीच्या कामनेचा विचार केला आणि आपण निश्चय केला की प्रत्येकाने आपल्याबाबत दयाभाव दाखवला आहे आणि आपल्याला त्याची परतफेड करायला हवी, तीही पृष्ठस्तरीय पातळीवर नाही, तर त्यांना त्यांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मदत करायला हवी – तर हे उत्तरदायित्व घेण्याचा भाव म्हणजे ‘असाधारण निश्चय’ होय. 

जर आपण आपल्या स्वार्थी वृत्तीने स्वतःच्याच चिंतामध्ये गुरफटून राहिलो, तर आपल्यासाठी सिद्धी प्राप्त करून बुद्धत्वाचे गुण विकसित करण्याचा कोणताही मार्ग नसेल. उलट जर आपण स्वार्थीपणा त्यागून दुसऱ्यांच्या कठीण परिस्थितीविषयी काळजी करायला लागू, तर ही भावना स्वतः ज्ञानप्राप्त बुद्ध बनण्याचा आधार आहे. आपण स्वार्थीपणातून हत्या, चोरी अशी कर्मे करतो, जेणेकरून आपण आपल्यासाठी जीवन सामग्री जमवू शकू. अशा अकुशल पद्धतीच जीवनात अधिक समस्या निर्माण करतात आणि या सर्वाचे मूळ स्वार्थीपणात असते. 

केवळ इतरांच्या कल्याणाची काळजी असल्यानेच शाक्यमुनि बुद्ध ज्ञानप्राप्तीची अवस्था प्राप्त करू शकले होते, संपूर्ण निर्मल चित्त आणि पूर्ण विकसित होऊ शकले होते. खरेतर सर्व काळातील सर्व बुद्धजन इतरांप्रति काळजीची भावना बाळगण्याच्या आधारावरच बोध प्राप्त करण्याच्या आपल्या पूर्ण क्षमतांची सिद्धी प्राप्त करू शकले होते. त्यामुळे आपण व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहिले, तर आपण समजू शकतो की भलेही आपण ‘इतरांना सुख प्रदान करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांपासून मुक्त करण्याच्या’ या असाधारण निश्चयाने युक्त असलो, तरी कितीही तीव्र कामना असली तरी आपण तसे करण्यास सक्षम असणार नाही. फक्त एखाद्या बुद्धाकडे ती क्षमता असते की तो दुसऱ्यांची मदत करू शकेल आणि त्यांच्या दुःखांवर विजय मिळवून सुखप्राप्ती करू शकेल. 

त्यामुळे इतरांच्या कल्याणासाठी आणि त्या उद्देशाला शक्य तितक्या चांगल्या रीतीने साध्य करून बुद्धत्वाची ज्ञानप्राप्त अवस्था प्राप्त करण्यासाठी आपले हृदय समर्पित असणे आवश्यक असते. त्यालाच ‘बोधिचित्त उद्दिष्ट’ संबोधले जाते. 

असे समर्पित हृदय आणि बोधिचित्त उद्दिष्ट बाळगून जणू आपण फुल अर्पण करण्यासारखी छोटी भेट अर्पण करीत आहोत. अशा भावनेमागे सर्वांच्या भल्याची भावना असेल आणि इतरांच्या अधिकाधिक कल्याणासाठी ज्ञानप्राप्ती साध्य करण्याची कामना असेल, तर या छोट्याशा कृतीतूनही खूप पुण्य संचित होते. वस्तुतः जेव्हा सर्वांच्या भल्यासाठी कार्य करण्यायोग्य बनण्याचे आपले लक्ष्य असेल तर त्यातून मिळणारा लाभ आपल्या लक्ष्याच्या प्रमाणातच असतो. लाभ तेवढाच व्यापक असतो, जितकी जिवमात्रांची संख्या आहे. अशा प्रकारच्या निर्मल आणि प्रामाणिक लक्ष्याप्रति आपले हृदय समर्पित करण्याचे लाभ बुद्धांना जगभरचे सुवर्णालंकार आणि रत्ने भेट देण्याच्या तुलनेत कित्येक पटीने अधिक असतात. जरी आपण या ब्रह्मांडावरील सर्व जिवांना अन्नदान केले तरी बोधिचित्त लक्ष्यासोबतच एका क्षणासाठीच्या या समर्पित भावनेचे लाभ कित्येक पटीने अधिक असतील.   

या गोष्टीमागील तर्क अशा प्रकारे समजला जाऊ शकतो की अगदी मान्य केले की आपण ब्रह्मांडावरील प्रत्येक जिवाला अन्न दिले, तरी त्याने त्या जिवांची भूक केवळ त्या क्षणापुरती संपेल. काही वेळानंतर त्यांना पुन्हा भूक लागेल आणि त्यांची भुकेची समस्या तशीच राहील. पण जर आपण बोधिचित्त लक्ष्यासोबत सर्व लोकांच्या समस्यांना कायमस्वरूपी संपवण्याची कामना केली – आणि आपण स्वतःसाठी ज्ञानप्राप्ती साध्य केली, जेणेकरून आपण दुसऱ्यांची अधिकाधिक मदत करू, तर त्यातून केवळ सर्वांच्या भुकेची समस्याच फक्त संपणार नाही, तर त्यांच्या समस्यांना पूर्णतः संपवण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होईल. 

समापन टिपण्णी 

यासाठी बोधिचित्त लक्ष्य विकसित करण्याच्या दिशेने उठवलेल्या पावलांच्या रूपात आपल्याला दृढ प्रतिज्ञा करायला हवी की आपण कोणत्याही जिवाला नुकसान पोहचवणार नाही. जेव्हा आपण दुसऱ्यांना नुकसान पोहचवल्याने होणारे नुकसान समजून घेतो आणि तसे न करण्याची प्रतिज्ञा करतो, तेव्हा त्याचे फार लाभ होतात. स्पष्टच आहे की असे आचरण प्रशंसनीय आहे. कोणालाही नुकसान न पोहचवण्याची प्रतिज्ञा एक असे आध्यात्मिक पाऊल आहे की जे आपण आत्ता या क्षणी उचलू शकतो. आपण आध्यात्मिक साधनेकडे या दृष्टीने पाहू नये की ती फार दूरची आणि आपल्या आवाक्याबाहेरची साधना आहे. 

थोडक्यात सांगायचे तर आध्यात्मिक साधक होण्याचा अर्थ असामान्य जीवन व्यतीत करण्याशी नाही. इतिहासात अशा अनेक गृहस्थ लोकांची उदाहरणे आहेत, जे महान आध्यात्मिक साधक होते. जेव्हा आपण प्राचीन भारतातील सिद्धीप्राप्त ८४ महासिद्धांचे जीवनचरित्र पाहतो तेव्हा लक्षात येते की त्यातील अनेक जण संसारी गृहस्थ होते. 

जर आपले वय झाले असेल आणि आपल्याला वाटत असेल की वृद्ध लोक आध्यात्मिक साधना करू शकत नाहीत, तरीही आपल्याला निराश होण्याची गरज नाही. जेव्हा आपण प्राचीन ग्रंथ पाहतो, त्यात आपल्याला श्रीजातीचे उदाहरण मिळते, जे वयाच्या ८०व्या वर्षी आध्यात्मिक साधक बनले होते. ते आपल्या जीवनकाळात मुक्त सत्व, अर्हत अवस्था प्राप्त करण्यात यशस्वी झाले होते. त्यामुळे या कामासाठी आपण कधीच म्हातारे नसतो. 

तर दुसरीकडे जर आपण तरुण असू तर आपण उधळपणा करता कामा नये, उलट आपल्यातील ऊर्जेचा उपयोग करून निश्चयपूर्वक आपली आध्यात्मिक साधना करायला हवी. आणि आपण असा विचार करून ही साधना टाळू नये की वय वाढल्यावर आपण आध्यात्मिक साधना करू कारण आपला मृत्यू केव्हा होईल, हे सांगणे कठीण आहे. शिवाय वृद्धत्व आपल्याला अचानक येऊन घेरते. आणि जेव्हा वृद्धत्व येते तेव्हा असे वाटते की आपले जीवन आपल्या हातातून निसटून गेले आहे. 

खूप सारी छोटी छोटी सकारात्मक पावले आपण उचलू शकतो. मी इतर देशातील अशा अनेक लोकांना ओळखतो, जे पक्ष्यांना दाणे देण्यासाठी खूप परिश्रम घेतात आणि पैसाही खर्च करतात. ते घराबाहेर फिडर बसवतात आणि दररोज पक्ष्यांना दाणे भरवण्यासाठी पैसे खर्च करतात. खरेतर पक्ष्यांच्या दाण्यापाण्याचे हाल होऊ नयेत म्हणून ते आपल्या सुट्ट्याही तशाच सोडून देतात. मला ही खूप छान साधना वाटते. ते पाहताना मला आनंद मिळतो, जणू ते खरंच बोधिसत्वाच्या अभ्यासासारखे आहे. अशा अनेक तिबेटी लोकांची उदाहरणे आहेत, जे तीर्थयात्रेसाठी भारतात जातात आणि जे कबुतर आणि इतर विभिन्न प्रकारच्या पक्ष्यांसाठी दाणे टाकतात. दीर्घायु होण्यासाठी हा एक उत्तम अभ्यास आहे. 

सारांश 

जर आपल्या चर्चेचे सार रूप सांगायचे झाले, तर मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आहेतः

  • सर्वांच्या भल्यासाठी सतत कार्यरत राहण्यासाठी हृदयातील दयाभाव आणि सौहार्दता अधिक विकसित करा. 
  • कधीही कोणालाही दुःख देऊ नकाः इजा पोहचवू नका किंवा समस्या निर्माण करू नका. 

उत्कृष्ट आध्यात्मिक साधनेसाठी या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. मनुष्य रूपातील पुनर्जन्माचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी आपल्याला बोधिचित्ताचे उद्दिष्ट ठेवून शुद्धभावाने इतरांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी हृदय समर्पित करायला हवे. अशा प्रकारे आपण वास्तविक एक पूर्णतः निर्मल चित्त आणि पूर्ण विकसित ज्ञानप्राप्त बुद्धावस्था प्राप्त करू शकू. 

Top