आनंदाकडे जाण्याचा मार्ग म्हणून समस्यांपासून मुक्त होण्याचा निश्चय करणं

माहिती युगातील तणाव हाताळण्यासाठी आपण इंटरनेट, त्यातील समाजमाध्यमं, संदेशसेवा, इत्यादींचा वापर कसा करतो, हे तपासण्याची गरज आहे. आपल्याला अधिक तणाव देणाऱ्या आपल्या आत्मघातकी सवयी एकदा का ओळखल्या की, आपल्या दुःखाचा स्रोत आपल्या मनातच आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. तणाव घ्यायचा नाही या निश्चयासह आणि स्वयंशिस्त, एकाग्रता, सजगता व भेदक्षम जागरूकता यांच्यासह आपण आधुनिक जीवनातील आव्हानं अधिक स्पष्टतेने व शांततेने हाताळण्यासाठी सक्षम होऊ.

आपण मोठ्या शहरात राहत असलो, लहान शहरात राहत असलो किंवा ग्रामीण भागात राहत असलो, तरी आपल्या सर्वांनाच आधुनिक जगातील समस्यांना सामोरं जावं लागतं. बहुतांश लोक याचं वर्णन “तणाव” असं करतील. माहिती, चित्रपट, टीव्ही चॅनल, संगीत, समाजमाध्यमांवरील आशय, तत्काळ संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या सेवा, ऑनलाइन उत्पादनं, इत्यादी अधिकाधिक प्रमाणात तत्काळ उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ते अधिकाधिक हवं असतं. वरकरणी यातून आपलं जीवन सुधारत असल्याचं भासत असलं, तरी या गोष्टी- विशेषतः निवडीला अनेक पर्याय असतील तेव्हा- आपलं जीवन अधिक गुंतागुंतीचं व तणावदायक करतात. आपल्याला काहीच हातून सुटायला नको असतं, एखादी बातमी, किंवा एखादी ई-मेल किंवा एखादा संदेश, काहीच नजरेतून सुटायला नको. आपण या सगळ्यापासून दूर राहिलो तर एकटे पडू, अशी भीती आपल्याला वाटते. टीव्हीवरच्या एखाद्या कार्यक्रमासारख्या एखाद्या गोष्टीची निवड आपण केली, तरी याहून चांगलं काहीतरी असेल आणि ते आपल्याला पाहता येत नसेल, अशी हुरहूर आपल्या मनाला लागू राहण्याची शक्यता असते.

आपल्या समाजाचा, मित्रांच्या गटाचा भाग व्हायचं असतं; आपण समाजमाध्यमांवर काहीही प्रसिद्ध केलं, तरी त्यासाठी आपल्याला “लाइक” केलेलं हवं असतं, मगच आपण स्वीकारले गेलो आहोत असं आपल्याला वाटतं. आपण शांत नसतो, आणि आपल्याला मिळणाऱ्या “लाइक”च्या संख्येने किंवा इंटरनेटवर आपण वाजतो त्या माहितीने कधीच आपलं समाधान होत नाही. आपल्याला संदेश मिळाला आहे, असं आपल्या फोनवर सूचित होतं तेव्हा अंदाज बांधून आपण उत्तेजित होतो, आणि आपल्याला अधिक ‘लाइक’ मिळाले आहेत का हे फेसबुकवर तपासतानाही आपण उत्तेजित होतो, आणि काही नवीन घडलं असेल तर बातम्या परतपरत पाहताना आपण बातम्यांसाठी वखवखलेल्या व्यक्तीप्रमाणे उत्तेजित होतो. आपल्याला काहीच सुटू द्यायचं नसतं, पण यातून आपल्याला कधीच समाधान लाभत नाही आणि आपल्याला सतत अधिकाधिक हवंसं वाटतं.

दुसऱ्या बाजूला, आपल्या भोवतीच्या परिस्थितीचा भारही आपल्यावर येत असतो, त्यामुळे आपण मोबाइल उपकरणांकडे पाहत या परिस्थितीपासून पळायचा प्रयत्न करतो आणि सब-वेमध्ये असताना किंवा चालत असताना संगीत ऐकतो. आपल्याभोवती काय आहे या वास्तवापासून आपण दूर जाऊ पाहतो आणि आपल्या खाजगी आभासी जगामध्ये आश्रय शोधतो. सतत करमणूक व्हायला हवी, अशी अनिवार्य गरज आपल्याला भासते. एका बाजूला आपल्याला शांतता व निश्चलता हवीहवीशी वाटते आणि दुसऱ्या बाजूला माहिती, संगीत, इत्यादींच्या अनुपस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या पोकळीचं आपल्याला भय वाटत असतं. बाह्य जगाच्या तणावापासून मुक्त होण्याचा निश्चय आपण केलेला असतो, त्यामुळे आपण ते जग सोडून इंटरनेटच्या आभासी विश्वात आश्रय शोधतो. पण तिथेही आपल्याला सोबत हवीशी वाटते आणि समाजमाध्यमांवरील आपल्या तथाकथित “मित्रां”च्या संमतीचीही गरज भासते, आपल्याला कधीच आश्वस्त वाटत नाही. पण आपल्या मोबाइल उपकरणांमध्ये आश्रय घेणं, हा उपाय आहे का?

या सवयींमुळे निर्माण झालेल्या नित्यक्रमामध्ये अडकलेलं असताना अनुभवाला येणारं दुःख आणि त्याचे स्रोत आपण ओळखायला हवेत. आपण या दुःखापासून मुक्त होण्याचा निश्चय करणं गरजेचं आहे. मग या दुःखापासून मुक्त होण्यासाठीचा निश्चय करायला हवा. दुःखाच्या स्त्रोतांपासून आपल्याला मुक्त करणाऱ्या पद्धती माहीत करून घेणं आणि त्या परिणामकारक ठरतील यावर विश्वास ठेवणं, या आधारे हा निश्चय अंमलात आणावा. पण आपल्याला झोम्बीसारखं काहीच न जाणवणाऱ्या स्थितीत जायचं नसून सुखी व्हायचं आहे. सुख म्हणजे केवळ दुःखाचा अभाव नव्हेत; दुःखापासून मुक्त होऊन तटस्थ, भावनाहीन अवस्थेहून सुख वेगळं असतं.

आपलं मन हाच दुःखाचा स्रोत

बाह्य वस्तू व परिस्थिती हा दुःखाचा व आपल्या अनुभवाला येणाऱ्या तणावाचा स्रोत नसतो; अन्यथा या वस्तू व परिस्थितींना सामोरं जाणाऱ्या प्रत्येकालाच तसाच अनुभव यायला हवा. 

आपलं मन हाच आपल्या दुःखाचा स्रोत असतो, त्यातील मनोवृत्ती व भावना आणि आधुनिक जीवनातील वास्तव हाताळण्यामधील आपलं गोंधळलेपण हाच याचा स्रोत आहे.

आत्मघातकी वर्तनाच्या कठोर सवयी आपल्याला असतात. असुरक्षितता, आसक्ती, तिटकारा, भय, इत्यादींसारख्या अस्वस्थकारक भावनांमधून या सवयी उद्भवलेल्या असतात. अधिकाधिक तणाव व समस्या निर्माण होतील अशा रितीने या सवयी आपल्याला वागायला लावतात- उदाहरणार्थ, प्रतिसाद देण्याची मालिका. त्यातून आपल्या अस्वस्थकारक भावना व मनोवृत्ती आणखी बळकट होतात.

अस्वस्थकारक भावना व मनोवृत्ती अजाणपणावर आधारलेल्या असतात. एकतर आपल्या वर्तनाचा आपल्यावर काय परिणाम होतो हे आपल्याला माहीत नसतं आणि आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्याबद्दल वास्तववादी नसतो, किंवा या सगळ्याबाबत आपली चुकीची समजूत झालेली असते. उदाहरणार्थ, अधिकाधिक “लाइक” मिळाल्याने आपल्याला अधिक आश्वस्त वाटणार नाही हे आपल्याला कळत नाही; उलट यातूनच आपल्याला आश्वस्त वाटेल असा विचार आपण करतो. यातून अधिकाधिक “लाइक” मिळवण्याची अभिलाषा निर्माण होते, किती “लाइक” मिळालेत हे सतत तपासण्याची अस्वस्थता निर्माण होते, आणि कधीच समाधान व मनःशांती लाभू न देणारं दुःख निर्माण होतं. संगणकीय खेळांच्या आभासी जगामध्ये पळ काढल्यामुळे आपल्याला वास्तव जीवनातील समस्यांपासून दूर जाता येईल, असा भाबडा विचार केला जातो. हा सर्व अजाणपणा व भाबडेपणा आणि त्यासोबत येणाऱ्या आसक्तीसारख्या अस्वस्थकारक भावना आपल्या आत्मघातकी वर्तनाच्या नकारात्मक सवयींना आणि अस्वस्थकारक मनस्थितींना बळकटी आणतात.

या लक्षणांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला परिस्थितींमध्ये भेदक्षम जागरूकता वापरता यायला हवी. उदाहरणार्थ, आपली नोकरी कष्टाची असेल. तर, हे वास्तव आहे हे समजून घेऊन त्याला आपण सामोरं जायला हवं आणि आपल्याला जमेल तितकी सर्वोत्तम कामगिरी करावी. आपल्या परिस्थितीचं वास्तव आणि आपल्या मर्यादांचं वास्तव आपण स्वीकारायला हवं, संबंधित परिस्थिती म्हणजे कोणीतरी भयंकर महाकाय प्राणी आहे असं दाखवणं थांबवायला हवं, आणि आपल्याला परिपूर्ण व्हायचं असतं त्यामुळे आपण पुरेशी चांगली कामगिरी करू शकत नाही असंही मानता कामा नये. आपल्या समोरच्या वास्तवाबद्दल सजग राहण्यासाठी एकाग्रता गरजेची आहे, त्यासाठी परिस्थितीला अवाजवी मोठं मानू नये किंवा कमी लेखू नये, आणि तथ्यांवरील आपलं लक्ष विचलित होईल तेव्हा ते ओळखण्यासाठी सतर्क राहायला हवं. शिवाय, आपल्याकडे स्वयंशिस्त असणं गरजेचं आहे, जेणेकरून आत्मघातकी सवयींपासून आपण दूर राहू.

आपण स्वयंशिस्तीपासून आणि छोट्या गोष्टींपासून सुरुवात करू. आपल्याला तणावग्रस्त वाटतं, आपल्या कॉर्टिसॉलची (तणावाचं हार्मोन) पातळी वाढते, तेव्हा आपण- उदाहरणार्थ सिगरेटमध्ये किंवा समाजमाध्यमांमध्ये किंवा इंटरनेटवर काहीतरी रोचक शोधण्यात आश्रय घेतो. अपेक्षेमधील उत्साह व सुख जाणवून आपल्याला बरं वाटेल, त्यामुळे आपली डोपामाइनची (चांगलं काही घडेल या अपेक्षेचं हार्मोन) पातळी वाढेल, असं आपल्याला वाटत असतं. पण सिगरेट प्यायल्यानंतर किंवा इंटरनेटवर फेरफटका मारून झाल्यावरही आपल्याला समाधानी वाटत नाही, त्यामुळे आपला तणाव परत येतो.

सिगरेट प्यायल्याने आपल्या समस्या सुटतील, किंवा “लाइक” मिळाल्याने समस्या सुटतील, किंवा ताज्या बातम्या वाचल्याने समस्या सुटतील, या गैरसमजुतीवर विश्वास ठेवल्याने होणारे तोटे ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण यापासून मुक्त होण्याचा निश्चय करायला हवा. त्यासाठी आपण सिगरेट सोडतो, किंवा ई-मेल व संदेश तपासण्यावर नियमन आणतो, किंवा बातम्या अथवा समाजमाध्यमं किती वेळा जाऊन पाहायची याचं नियमन करतो. सिगरेट पिण्याची किंवा इंटरनेट वापरण्याची अनिवार्य ओढ निर्माण झाली, तरी त्यानुसार कृती करण्यापासून आपण दूर राहू पाहतो.

शारीरिक लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी आपण आहाराची पथ्यं पाळतो, त्याचप्रमाणे मानसिक लठ्ठपणापासून मुक्त होण्यासाठी आपण माहितीच्या आहाराची पथ्यं पाळायला हवीत.

अन्न किती खातो यावर आपण जसे निर्बंध ठेवतो, त्याचप्रमाणे माहिती, संदेश, संगीत, इत्यादींचं किती प्रमाणात ग्रहण आपण करायचं यावर निर्बंध असणं गरजेचं आहे.

जुन्या आत्मघातकी सवयींपासून दूर होऊ पाहताना सुरुवातीला आपल्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढेल आणि तणावग्रस्तही वाटेल, कारण जुन्या नकारात्मक सवयी एकदम बळकट असतात. सिगरेट किंवा इटरनेट किंवा मोबाइल किंवा संगीत यांच्यापासून दूर जाताना हे घडतं. पण दूर जाण्यातून निर्माण होणारा तणाव अखेरीस निवळेल आणि आपल्याला मनःशांती अनुभवता येईल. नकारात्मक सवयींच्या जागी आपण सकारात्मक सवयी लावून घेतल्या- उदाहरणार्थ, आपण सर्व मानवतेचा भाग आहोत आणि आपण सगळे परस्परसंबंधित आहोत, त्यामुळे आपलं कल्याण एकमेकांवर अवलंबून आहे हे समजून घेतलं- तर त्यातून आपली संपर्कात राहण्याची गरज पूर्ण होईल आणि आपण इतरांशी जोडले जाऊ. इंटरनेवरच्या समाजमाध्यमी जाळ्यांमध्ये सहभागी झाल्याने खरं म्हणजे असं घडत नाही. तर, याने आपली ऑक्सिटॉसिनची (सहसंबंधांचं हार्मोन) पातळी वाढेल आणि आपल्याला अधिक सुख व सुरक्षिततेची भावना अनुभवायला मिळेल.

आत्मघातकी सवयींपासून स्वतःला मुक्त करणं

थोडक्यात, आपण मुक्त होण्याचा निश्चय केला, की जुन्या नकारात्मक सवयींपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी आपण स्वयंशिस्त, एकाग्रता व भेदक्षम जागरूकता या तथाकथित “तिहेरी प्रशिक्षणां”मध्ये आपण स्वतःचं प्रशिक्षण करवून घेणं गरजेचं ठरतं. हे तीनही एकत्रितरित्या कार्यरत असणं गरजेचं आहे, पण ते योग्यरित्या विकसित होण्यासाठी आपण यातील अडथळ्यांवर मात करायला हवी:

  • खेद वाटल्याने स्वयंशिस्तीमध्ये अडथळा येतो: उदाहरणार्थ, आपण इंटरनेट वापरलं नाही किंवा एखाद्या संदेशाला अथवा ई-मेलला तत्काळ उत्तर दिलं नाही, याचा आपल्याला खेद वाटतो. अशा वेळी नवीन संदेश आल्याची सूचना देणारा ध्वनी किंवा संगणकावरची सूचनेची खूण बंद करून ठेवावी आणि ठराविक वेळीच मोबाइल किंवा संगणकावरील संदेश तपासावेत आणि महत्त्वाच्या संदेशांना तत्काळ उत्तरं द्यावीत. आपण कमी व्यग्र असू त्या वेळी किंवा दिवसातील एखाद्या निश्चित वेळी आपण इतर संदेशांना उत्तरं द्यावीत.
  • झोपाळूपणा, कंटाळा व चंचलता यांमुळे आपल्या एकाग्रतेमध्ये अडथळा येतो: यातील कोणत्याही एका घटकामुळे आपण सजगता गमावतो, नवीन संदेश आलाय का ते सातत्याने पाहणं टाळलं तर आपलं जीवन कमी गुंतागुंतीचं होईल या वस्तुस्थितीपासून आपण विचलित होतो.
  • अनिश्चित डगमगलेपणामुळे आपल्या भेदक्षम जागरूकतेमध्ये अडतळे येतात: केवळ विशिष्ट वेळेतच नवीन संदेश आलेत का हे तपासण्याचा निर्णय योग्य आहे का, याबद्दल आपण डगमगत राहतो. संदेश पाहण्यापासून दूर राहणं अवघड व तणावग्रस्त असल्यामुळे अशा साशंकता निर्माण होतात. या साशंकता हाताळण्यासाठी आपण आपल्या बदलत्या सवयींच्या लाभांची आठवण स्वतःला करून द्यायला हवी.

आपलं जीवन सुखी करण्यासाठी आपण इतरही काही व्यूहरचना अंमलात आणू शकतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्या गर्दी असणाऱ्या सब-वेमध्ये असू, आणि आपण स्वतःवरच लक्ष केंद्रित केलं, स्वतःच्या बचावासाठी मोबाइल-फोनमध्येच पलायन केलं, तर आपल्याला अधिक बंदिस्त वाटतं. आपली ऊर्जा पिळून काढली जाते आणि आपल्याला अधिक तणावग्रस्त वाटतं. आपण निवांत नसतो, कारण आपल्याला काहीतरी धोका समोर येईल असं वाटत असतं. आपण मोबाइलमधला खेळ खेळण्यात गुंतून गेलो असलो किंवा आय-पॉडवरचं संगीत मोठ्या आवाजात ऐकण्यामध्ये गुंतलो असलो, तरी आपण स्वतःभोवती या भिंती उभारलेल्या असतात आणि त्यात आपल्याला कोणी त्रस्त करू नये म्हणून आपण बचावात्मक पवित्रा घेतो. दुसऱ्या बाजूला, आपण स्वतःला सब-वेमधल्या संपूर्ण लोकांच्या गर्दीचा भाग मानलं आणि आपल्यासारख्याच परिस्थिती असलेल्या इतर सर्वांबद्दल आस्था व करुणा विकसित केली, तर आपली हृदयं व मनं खुली होतात. आपण धोक्याबाबतीत सतर्क राहू शकतो, पण स्वतःवरच लक्ष केंद्रित करणाऱ्या भयग्रस्ततेपेक्षा आपण प्रत्येकाच्या सुरक्षिततेची इच्छा राखावी. इतर सर्वांना संगीतामध्ये व व्हिडिओ गेममध्ये बुडवून टाकून स्वतःला त्यांच्यापासून तोडून घेण्याचा प्रयत्न आपण करू नये. अशा डावपेचांनी आपला एकाकीपणा वाढतोच. त्यापेक्षा आपण आपल्या भोवतीच्या प्रत्येकासह एका मोठ्या गटाचा भाग आहोत असं आपल्याला वाटलं, तर आपण कळपातील प्राण्याप्रमाणे अधिक आश्वस्त होतो. पण ही व्यूहरचना परिणामकारकतेने अंमलात आणण्यासाठी आपल्याला स्वयंशिस्त, एकाग्रता व भेदभावक्षम जागरूकता असं तिहेरी प्रशिक्षण आवश्यक असतं.

आणखी एक व्यूहरचना अशी: आपल्याला कामामधून विश्रांती हवी असेल, तेव्हा इंटरनेटवर फेरफटका मारण्याऐवजी किंवा मोबाइलमध्ये पाहण्याऐवजी आपण शक्य असल्यास खोलीत फेरफटका मारावा. इंटरनेट किंवा फोन वापरण्याऐवजी कमी उत्तेजनेला सामोरं जावं.

सारांश

मुक्त होण्याच्या निश्चयाद्वारे आपण या तिहेरी प्रशिक्षणाच्या पद्धती वापरल्या आणि आत्मघातकी सवयींमधून निर्माण होणारा ताण कमी केला, तर आपल्याला कार्यालयातील, कुटुंबातील, आर्थिक परिस्थितीमधील तणाव हाताळण्यासाठी आवश्यक शांत मनस्थिती प्राप्त होते. माहितीच्या व्यसनामुळे आणि इंटरनेट, समाजमाध्यमं इत्यादींद्वारे पलायन करण्याच्या सवयीमुळे आधुनिक जीवनात निर्माण झालेली गुंतागुंत परिणामकारकतेने हाताळण्यासाठी हे विशेष परिणामकारक ठरतं. आपण इंटरनेट सोडून द्यावं किंवा आपली मोबाइलची उपकरणं फेकून द्यावीत, असा याचा अर्थ नाही; पण ही उपकरणं लाभदायक व सुदृढ पद्धतीने कशी वापरायची यासंबंधीच्या चंगल्या सवयी आपण लावून घेणं गरजेचं आहे.

Top