इतरांना मदत करण्याचे ११ मार्ग

11 ways to help others

कित्येक माणसे आणि प्राणी दररोज दुःख भोगत असतात. त्यांना मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण त्यांना मदत करणे, त्यांची परिस्थिती समजून घेणे आणि योग्य मार्गाचा शोध घेण्यावर अवलंबून असते. फक्त करुणामय आणि कौशल्यपूर्ण असणे पुरेसे नसते – आपण उदारपणे आपला वेळ द्यायला हवा आणि मदत करताना स्वयंशिस्त, संयम, चिकाटी, एकाग्रता आणि शहाणपण हे गुण अंगी बाळगायला हवेत. इथे इतरांना मदत करण्याचे ११ मार्ग दिले आहेत. ते केवळ मदतीची गरज असणाऱ्यांना मदत पुरवण्यापुरते मर्यादित नाहीत, तर आपल्याभोवतीचे एकाकीपणाचे कवचही तोडतात आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण करतात.

१. वेदनाग्रस्त लोकांची काळजी घेणे

आपण आजारी, विकलांग आणि वेदनेत असणाऱ्या लोकांची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपल्याला कुणी फार बोजड गोष्ट पेलताना दिसत असेल किंवा एखाद्या कठीण कामात गुंतलेला दिसत असेल, तर आपण पुढे होऊन त्याचे ओझे कमी करण्याची प्रयत्न करायला हवा.

२. समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सुचत नसलेल्या लोकांना मार्गदर्शन करणे

कठीण परिस्थितीमुळे गोंधळात पडलेल्यांना सल्ला हवा असल्यास द्यायला हवा किंवा किमान सहानुभूतीपूर्वक त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. जसे आपला कुत्रा किंवा मांजर खोलीत अडकून पडले असेल, तर आपण दरवाजा उघडायला हवा. हे सूत्र आपण माशीसाठीही वापरू शकतो, जेव्हा एखादी माशी खिडकीत गोंधळलेल्या अवस्थेत भटकत असेल. ती माशी खोलीत थांबू इच्छित नसेल, तिला बाहेर पडायचे असेल, तर आपण खिडकी उघडून तिला जाऊ द्यायला हवे.

३. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे त्यांची परतफेड करा

जग सुरळीत चालण्यासाठी जे लोक योगदान देत आहेत, त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना मदत करायला हवी – जसे आपल्या पालकांनी आपल्यासाठी खूप काही केलेले असते. हे सर्व कृतज्ञतेच्या भावनेतून करायला हवे, कोणत्याही अपराधी किंवा बंधनकारक भावनेतून नको.

४. भीतीने ग्रस्त असलेल्यांना आधार देऊन त्यांचे संरक्षण करा

भयग्रस्त माणसे आणि प्राण्यांना शक्य तितका आधार देण्याचा प्रयत्न करायला हवा. जर एखाद्याला एखाद्या विशिष्ट धोकादायक ठिकाणी जावे लागणार असेल, जिथे त्याला इजा पोहोचू शकते, तिथे त्यांना सोबत करण्याचा प्रयत्न करायला हवा. भयंकर भूतकाळ अनुभवलेल्या निर्वासितांना संरक्षण देत त्यांना स्थैर्य लाभावे, यासाठी मदत करायला हवी.  युद्धजन्य परिस्थितीतील शोषित किंवा इतर प्रकारच्या शोषणातील पीडितांच्या समस्या समजून घेत त्यांच्या मानसिक जखमा बऱ्या करण्यासाठी मदत करायला हवी.

५. दुःखी लोकांना दिलासा देणे

जेव्हा लोक घटस्फोट किंवा प्रियजनांच्या मृत्यूमुळे दुःखी असतील, आपण करुणामयरित्या त्यांना दिलासा द्यायला हवा. ‘गरीब, बिचारा’ म्हणून त्याच्यावर दया दाखवल्याची भावना बाळगू नये, पण त्यांच्या जागी स्वतःला ठेवून त्यांचे दुःख वाटून घ्यायला हवे.

६. गरिबांना आर्थिक मदत करणे

धर्मादायसंस्थांना देणगी देणे चांगलेच आहे, पण रस्त्यावरील भिकाऱ्यांनाही मदत करायला हवी. मळक्या, घाणेरड्या कपड्यातील भिकाऱ्यांशी बोलताना येणारे अवघडलेपण दूर करून त्यांना सन्मानाने वागवायला हवे. कल्पना करून पाहाः ती व्यक्ती आपली आई किंवा मुलगा असता तरः ते एखादा दुर्गंधी पसरलेल्या कचऱ्याचा भाग असल्यासारखे आपण थंड मनाने तसेच निघून गेलो असतो का?

७. आपल्याशी जोडल्या गेलेल्या लोकांना धर्माची जाणीव करून द्या.

सतत आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या मदतीसाठीही आपण प्रयत्न करायला हवेत. आपण त्यांना आपल्यावर अवलंबून राहू देऊ इच्छिणार नाही, पण त्यांना आपल्याप्रति प्रामाणिक आस्था असेल, तर आपण त्यांना सुखप्राप्तीच्या आणि इतरांना मदतीसाठीच्या बौद्ध पद्धतींचे ज्ञान देऊ शकतो. पण केवळ त्यांनी त्यात रस दाखवला तरच. हे धर्मांतराशी संबंधित नसून लोकांना सर्वसाधारण मदत किंवा सल्ला देण्याशी संबंधित आहे. अशा प्रकारे आपण नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण बनवू शकतो.

८. इतरांना त्यांच्या अपेक्षेनुसार मदत करा

इतरांना त्यांच्या सोयीच्या मार्गाने मदत करायला हवी. एखाद्याने आपल्याला एखादी गोष्ट शिकवायला सांगितली आणि ती आपल्याला आवडणारी नसली, पण त्यांच्यासाठी उपयुक्त असेल, तर आपण ते करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत. उदाहरणार्थ आपण एखाद्या उपाहारगृहात गेलो तर नेहमी आपल्याला आवडणारेच पदार्थ मागविण्यासाठी आग्रह धरणे स्वार्थीपणाचे आणि अयोग्य आहे. काही वेळा इतरांच्या आवडीनुसारही आपण वागायला हवे. उदाहरणार्थ आपल्या नातेसंबंधात आपली आवड आणि समोरच्या व्यक्तीची आवड यात आपण तडजोड करायला हवी. नेहमी आपल्याला काय हवे आहे आणि आपल्याला काय आवडते हेच महत्त्वाचे नसते.

९. प्रामाणिकपणे जगणाऱ्यांना प्रोत्साहन द्या

प्रामाणिकपणे जगणाऱ्यांना – सकारात्मक मार्गाने चालणाऱ्यांना आणि चांगले काम करणाऱ्यांना – अहंभावी न होऊ देता, त्यांना प्रोत्साहन देऊन आपण त्यांची मदत करू शकतो. विशेषतः ज्यांचा आत्मविश्वास दुबळा असेल अशा लोकांशी व्यवहार करताना हे लागू होते. चांगले गुण असणारे, पण अहंभावी असणाऱ्यांचे आपण त्यांच्या तोंडावर कौतुक करण्यापेक्षा इतरांकडे कौतुक करू शकतो. इतरांच्या भल्यासाठी कार्य करत राहण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करत राहू शकतो, पण त्यांच्याकडून कोणत्या चुका होऊ शकतात, याची जाणीव करून देऊन त्यांचा अहंभावही कमी करू शकतो.  

१०. विनाशकारी प्रवृत्तीच्या लोकांना विधायक वागणुकीची शिकवण द्या

विनाशकारी, नकारात्मक प्रवृत्तीच्या लोकांशी सामना झाल्यास त्यांना आपण टाळू नये किंवा त्यांच्यावर टीकाही करू नये. अशा लोकांची आलोचना करण्यापेक्षा ते चर्चेला तयार असतील तर त्यांना नकारात्मक स्वभावातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवायचा प्रयत्न करायला हवा.

११. जेव्हा सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात, तेव्हा काही विशिष्ट क्षमतांचा वापर करा

आपल्यापैकी काही जणांकडे असामान्य क्षमता असतात. आपण मार्शल आर्ट तज्ज्ञ असू शकतो, पण आपण ते इतरांना दाखवत नाही. तरीही आपल्याला एखाद्यावर हल्ला होताना दिसत असेल, आणि ते थांबवण्यासाठी इतर कोणता मार्ग नसेल तर आपण आपल्या त्या कौशल्याचा वापर करून हल्ला करणाऱ्याला रोखायला हवे.

इतरांना मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत. फक्त कुणाला आणि कशी मदत करायची हे समजण्यातच कौशल्य सामावलेले नाही, तर केव्हा मदत करायची आणि केव्हा मागे राहायचे, जेणेकरून समोरचा माणूस आत्मनिर्भर होऊन स्वतःची मदत स्वतः करू शकेल, हे समजण्यातही आहे. जे शारीरिक आणि मानसिक अडचणीत आहेत, त्यांना आपल्या तात्काळ मदतीची गरज असते. पण मदत योग्य प्रमाणात – ना कमी ना जास्त – असायला हवी. दुर्दैवी लोकांना आत्मनिर्भर होईपर्यंत मदत करायला हवी, पण खरी दीर्घकालीन मदत ती असेल, जेव्हा आपण त्यांना स्वतःची मदत स्वतः करण्यासाठीची साधने आणि परिस्थिती प्रदान करू.   

Top