ध्यानधारणेची प्रमुख वैशिष्ट्ये

ध्यानधारणा फक्त बौद्ध धर्मातच नव्हे तर अनेक परंपरांमध्ये आढळून येते;  सर्व भारतीय परंपरेत ध्यानधारणेसंबंधीचे अनेक घटक सापडले आहेत, पण इथे आपण बौद्ध धर्मातील ध्यानधारणेच्या सादरीकरणापर्यंतच आपली चर्चा सीमित ठेवणार आहोत. 


ध्यानधारणा म्हणजे काय?

‘ध्यानधारणा’ शब्दाचा अर्थ स्वतःत विशिष्ट सवय विकसित करणे. यासाठी तिबेटी भाषेत वापरल्या जाणाऱ्या ‘गोम’ शब्दाचा अर्थ आहे, लाभकारी सवयी विकसित करणे. संस्कृतमधील ‘भावना’ शब्दातून एखादी गोष्ट वास्तवात साकार करण्याचा अर्थ अधिक प्रतिबिंबित होतो. एखादी निश्चित स्वरूपाची लाभकारक मनोवस्था असते, जी आपल्याला साध्य करायची असते, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर आपली इच्छा असते की आपल्या चिंतनप्रक्रिया किंवा जगणे, त्या मनोवस्थेतून कार्यान्वित व्हावे. ज्या परंपरेत ध्यानधारणेचा प्रयोग केला जातो, त्या आधारे निर्देश स्पष्ट करतील की कोणत्या सवयी लाभकारक आहेत आणि त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठीची कारणे आणि उद्दिष्टे कोणती आहेत. सर्व भारतीय परंपरांमध्ये यासाठीची त्रिसुत्री प्रक्रिया आहेः प्रथम श्रवण, नंतर चिंतन आणि त्या नंतर प्रत्यक्ष ध्यानधारणा. 

शिकवणींचे श्रवण 

समजा आपल्याला करुणामय बनण्याची लाभकारी सवय विकसित करायची आहे. करुणा विकसित करण्यासाठी किंवा आपल्यातील अंगभूत करुणा वृद्धिंगत करण्यासाठी, प्रथम आपल्याला करुणेसंबंधीच्या शिकवणींचे श्रवण करायला हवे. प्राचीन भारतात, एकही शिकवण लिहून ठेवली गेलेली नाही. त्या मौखिक परंपरेतून पुढच्या पिढीला सुपूर्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्याला ध्यानधारणा करायची आहे, त्याला प्रथम शिकवणींचे श्रवण करणे आवश्यक आहे. याच कारणांनी पहिल्या टप्प्याला ‘श्रवण’ संबोधले जाते. 

हल्ली, अर्थातच आपण अनेक शिकवणींबाबत वाचन करू शकतो – कुणीतरी आपल्याला त्या समोर बसून प्रत्यक्षात सांगण्याची गरज नसते – पण त्यामागील सिद्धांत एकदम प्रासंगिक आहे. प्राचीन काळी सर्व ज्ञान कंठस्थ करावे लागत असे आणि ऐकणारा याबाबत आश्वस्त असणे आवश्यक असायचे की वर्णन करणारी व्यक्ती बरोबर सादर करत आहे. स्मृतीच्या आधारे व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीला शिकवण नीट आठवत नसल्याची शक्यताही होती. त्यामुळे त्यात काही त्रुटी राहिल्या असण्याची शक्यता असू शकते आणि ती खरी समस्या आहे.   

विवेकी जागरूकता 

जेव्हा आपण शिकवण ऐकत असतो तेव्हा आपल्याला ज्याला ‘श्रवणातून साध्य होणारी विवेकी जागरूकता’ म्हणतात, ती स्थिती विकसित करणे आवश्यक असते. यासाठीची तिबेटी संज्ञा ‘शेराब’ (शेस-राब. संस्कृत-प्रज्ञा) अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ अशी भाषांतरित केली जाते, पण इथे बुद्धिमत्ता शब्दाचा अर्थ फार अस्पष्ट आहे, त्याला नेमका अर्थ नाही. जर एखाद्या गटाने बुद्धिमत्ता शब्द ऐकला तर त्या गटातील प्रत्येक व्यक्ती त्याची वेगवेगळी कल्पना करेल आणि म्हणूनच ‘बुद्धिमत्ता’ हा शब्द ‘शेराब’ ही संकल्पना समजून घेण्यासाठी उपयुक्त नाही. त्यासाठीच मी ‘शेराब’च्या भाषांतरासाठी ‘विवेकी जागरूकता’ असा शब्दप्रयोग वापरतो. 

विवेकी जागरूकता ही प्राथमिक मानसिक घटकावर अवलंबून असते, ज्याचे भाषांतर मी ‘फरक ओळखणे’ असे करतो. बहुतांश लोक याला ‘अभिज्ञान’ म्हणतात, पण अभिज्ञान शब्दही नेमका नाही. ‘ओळखणे’चा अर्थ म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट पूर्वीपासून माहीत आहे आणि तुम्ही ती पुन्हा ओळखता; हे काही फार योग्य नाही. ‘फरक ओळखणे’ चा अर्थ एखादी विशिष्ट ‘ही’ गोष्ट ‘ही नसलेल्या’ इतर गोष्टींपासून वेगळी करणे. यात आपल्याकडे ‘ही’ गोष्ट ‘ही नसलेल्या’ गोष्टीपासून किंवा ‘ही’ गोष्ट ‘त्या’ गोष्टीपासून वेगळी असल्याचे ओळखण्याची क्षमता असते, कारण प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र वैशिष्ट्ये असतात किंवा ओळख चिन्हे असतात, जी आपल्याला विशिष्ट जाणीव असेल तर ओळखता येतात. याचे साधे उदाहरण म्हणजे, बाळं ‘भूक असणे’ आणि ‘भूक नसणे’ यात फरक करू शकतात. बाळांना या शारीर संवेदनांमध्ये फरक करण्यासाठी शब्दांची गरज नसते आणि त्यांना ‘भूक असणे’ आणि ‘भूक नसणे’ या संकल्पनाही समजण्याची गरज नसते. तरीही ते या दोन्हीतील फरक ओळखू शकतात कारण या दोन्ही संवेदनांची स्वतंत्र वेगळी वैशिष्ट्ये असतात, आणि त्यांना स्पष्ट करणारी भौतिक अनुभूती असते. 

विवेकी जागरूकता त्या फरक करण्याच्या प्रक्रियेला निश्चिततेचे परिमाण जोडते, जसे ‘हे खात्रीशीरपणे हेच आहे आणि ते नाहीये.’ आपण शिकवण ऐकत असतो किंवा वाचत असतो, तेव्हा ही निश्चितता आवश्यक असते. आपल्याला पूर्ण विश्वासाने हे माहीत करून घेण्याची गरज असते कीः ‘हीच खरी शिकवण आहे, ती चुकीची शिकवण नाही.’ ही जाणीव होणे फार कठीण असते की ‘हीच खरी शिकवण आहे.’ कारण धर्मग्रंथांचे ज्ञान ही स्वतःमध्येच एक सहजसाध्य गोष्ट नाही. सामान्यतः आपल्याला ते समजून देणाऱ्या एखाद्या शिक्षकावर किंवा ग्रंथांवर अवलंबून राहावे लागते. पण तुम्ही एखादा विशिष्ट शिक्षकच विश्वासार्ह आहे, हे कसे ओळखाल? एखादा शिक्षक बौद्ध धर्माविषयी किंवा प्रेम व करुणेविषयी शिकवण देत असेल आणि कदाचित त्याने दिलेली माहिती बौद्ध धर्मातील मूळ शिकवणींशी मेळ साधणारी नसेल, तर अशा परिस्थितीत आपण विवेकी जागरूकतेच्या आधारे निश्चित करून घ्यायला हवे की आपण ज्या शिकवणींचे श्रवण वा पठण करत आहोत, ती जशी असायला हवी तशीच आहे. आपल्याला खात्री करून घ्यायला हवी की ती अधिकृत शिकवण आहे. 

एखादी शिकवण बौद्ध शिकवण म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी त्यात काही विशिष्ट गोष्टी असणे आवश्यक असते. त्याचा शिक्षक किंवा शिकवण देणारी व्यक्ती अशी असायला हवी, ज्याची आपण पडताळणी करू शकू की हा प्रशिक्षित शिक्षक आहे. ही गोष्ट पडताळण्यासाठी आपण इतरांकडे चौकशीही करू शकतो की, ‘या व्यक्तीचा स्वतःचा एखादा शिक्षक आहे का आणि त्यांच्या शिक्षकासोबत त्याचे संबंध कसे आहेत? या व्यक्तीचा शिक्षक प्रमाण गुरू परंपरेतील आहे का?’ परीक्षणासाठी हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आपण एखादे पुस्तक निव्वळ एक ठोबळ विचार करून घेऊ नये की ते एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेले आहे. तो विश्वासार्ह स्रोत आहे का याचा विचार करावा. हेच तत्त्व व्याख्यान ऐकण्यालाही लागू होते. 

शिकवणींचे संदर्भ निश्चित करण्यासाठी विवेकी जागरूकतेचा उपयोग

पुढे जाऊन प्रत्येक बौद्ध शिकवणीचा एक संदर्भ असतो, एखाद्या तात्त्विक विचारप्रवाहाशी संबंध असतो, ज्यातून शिकवण निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या विशिष्ट शिकवणीचा संदर्भ माहीत असणे गरजेचे असते. कारण ‘कर्म’ सारख्या तांत्रिक संज्ञेविषयी विविध बौद्ध प्रणालींमध्ये वेगवेगळी स्पष्टीकरणे पाहायला मिळतात. या शिवाय एखाद्या विशिष्ट प्रणालीमध्ये कर्मासंबंधी शिकवण ही त्या प्रणालीमधील इतर आकलनसंबंधी सिद्धांतांप्रमाणे धर्मसंबंधित विषयांना अनुरूप असते. आपल्याला ठामपणे हे माहीत करून घेणे आवश्यक असते की ती शिकवण कोणत्या प्रणालीमधून घेतली आहे. जेणेकरून त्या शिकवणींचा संबंध आपण ऐकलेल्या इतर शिकवणींशी लावू शकतो.  

ज्या संदर्भातून शब्दांचा वापर झाला आहे, अनौपचारिक संभाषणातही तो संदर्भ समजून घेणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, जसे तुम्ही बॉन शब्द ऐकता. ही तिबेटमधील बौद्धपूर्व परंपरा आहे. पण फ्रेंचमध्ये  बॉन म्हणजे ‘चांगला’ असा अर्थ होतो. त्यामुळे तुम्हाला भाषिक संदर्भ माहीत नसेल तर तुम्ही बॉन शब्द ऐकल्यावर गोंधळात पडाल. समोरची व्यक्ती फ्रेंचमधील बॉन शब्दाच्या संदर्भातून बोलत आहे की तिबेटी? फक्त शब्दाचा आवाज ऐकून आणि तो कोणत्या भाषेतील शब्दाचा संदर्भ आहे जे समजून घेतल्याशिवाय तुमची दिशाभूल होऊ शकते.

तांत्रिक बौद्ध संज्ञांच्या संदर्भात तर आशयाचा संदर्भ समजणे फार महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही शून्यताविषयक अभ्यास करत असाल, तर ती एका भारतीय बौद्ध विचारधारेत एका प्रकारे स्पष्ट केलेली असेल, तर दुसऱ्या विचारधारेत दुसऱ्या प्रकारे सांगितली गेली असेल. अगदी एका भारतीय बौद्ध विचारधारेतही विभिन्न तिबेटी बौद्ध विचारधारांच्या संदर्भातून शून्यतेचं वेगवेगळ्या प्रकारांनी आकलन केलं गेलेलं आहे.

वास्तवतः इथे एकाच विषयावरील वेगवेगळी स्पष्टीकरणे उपलब्ध आहेत, ही बौद्ध धर्माचा अभ्यास करणाऱ्या पाश्चिमात्त्यांसाठी गोंधळात टाकणारी बाब आहे. आधुनिक युगात, विशेषतः इंटरनेटच्या काळात वेगवेगळ्या आशियाई बौद्ध परंपरांची माहिती उपलब्ध असल्याने आणखी गोंधळाची स्थिती निर्माण होते. पण अगदी एका देशातील बौद्ध परंपरेतही, उदाहरणार्थ तिबेटच्याच बौद्ध परंपरेत अनेक प्रकारचे वैविध्य आणि अन्वयार्थ पाहायला मिळतात. 

मी हे उदाहरणासहित स्पष्ट करू इच्छितो. कल्पना करा आपण एखाद्या शिक्षकाकडून कर्मासंदर्भातली विस्तृत विवेचन अभ्यासत आहोत. आपण जी गोष्ट शिकत आहोत, त्या बाबतीत गोंधळ उडू नये यासाठी आपण आपल्या शिक्षकांकडून ऐकलेल्या व्याख्येला इतर प्रणालींमधील व्याख्येपासून अलग ठेवणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, आपल्याला ही जाणीव असायला हवी की आपण बौद्ध अन्वयार्थ शिकत आहोत, हिंदू नव्हे. आणि बौद्ध स्पष्टीकरणामधीलही भारतीय संस्कृत परंपरेचा अभ्यास करत असून पालीतील थारवेदाचा नव्हे. भारतीय संस्कृत परंपरेतही आपण वैभाषिक दृष्टिकोनातील परंपरेचा अभ्यास करत आहोत, चित्तमात्र दृष्टिकोनातील नव्हे. त्याही पुढे जाऊन आपण वैभाषिक सादरीकरणातील गेलुग व्याख्या शिकत आहोत, काग्यू व्याख्या नव्हे. आपण नेमका संदर्भ समजून घेणे आवश्यक असते कारण दार्शनिक संदर्भांच्या दृष्टिकोनातून कर्माच्या निरनिराळ्या व्याख्या आहेत. जर आपण गेलुग व्याख्येला काग्यू प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केला तर आपण गोंधळून जाऊ. आणि आपण जर सर्वच व्याख्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करू तर आपण अधिकच गोंधळून जाऊ. 

माझे एक गुरू गेशे न्गवांग धारग्ये यांनी पाश्चिमात्त्य लोकांविषयी सांगितलेली एक गोष्ट त्यांची अंतर्दृष्टी स्पष्ट करते. ते म्हणाले होते, ‘तुम्ही पाश्चिमात्त्य लोक नेहमी अशा दोन गोष्टींची तुलना करण्याचा प्रयत्न करता, ज्या दोन्ही गोष्टी तुम्हाला नीट समजलेल्या नसतात. आणि शेवटी तुमच्या हाती फक्त गोंधळाची स्थिती असते.’ यातून घेण्याजोगा धडा म्हणजे दोन पद्धतींची तुलना करण्यास काही हरकत नाही, पण ही तुलना किमान एका पद्धतीच्या नेमक्या आकलनावर आधारित असावी. एकदा तुम्हाला ती पद्धती नेमकी समजली, तर तुम्ही इतर पद्धतींकडे लक्ष पुरवू शकता आणि दोन पद्धतींमधील फरक ओळखू शकता, पण तत्पूर्वी अशी तुलना करणे योग्य नाही. 

त्यामुळे तुम्हाला कर्म, शून्यता किंवा बौद्ध धर्मातील कोणत्याही विषयासंदर्भात ध्यानधारणा करायची असेल, तर त्यासाठी श्रवणातून येणारी विवेकी जागरूकता आवश्यक आहे. याचा अर्थ खालील गोष्टींचे नेमके आणि निश्चित आकलन हवेः  

  • हेच शब्द बोलले गेले आहेत, इतर कोणते शब्द बोलले गेले नाहीत. 
  • ज्या व्यक्तीद्वारे हे बोलले गेले आहे, ती त्या विषयातील विश्वसनीय स्रोत आहे आणि गैरविश्वास बाळगावा अशी व्यक्ती नाही. 
  • ही व्याख्या याच निश्चित दार्शनिक पद्धतींमधून घेतली गेली आहे, अन्य पद्धतींमधून नाही.

एकदा आपण श्रवणावर आधारित विवेकी जागरूकता प्राप्त केली की आपण पुढच्या टप्प्याकडे वळण्यासाठी सज्ज होतो. 

आपण श्रवण केलेल्या गोष्टींबाबत चिंतन करणे

पुढचा टप्पा चिंतनातून साध्य होणाऱ्या विवेकी जागरूकतेचा असतो. ‘चिंतन’ म्हणजे काय? इथे चिंतनाचा अर्थ एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून घेण्याशी संबंधित आहे. पण मग एखादी गोष्ट समजून घेणे म्हणजे काय? ‘समजून घेणे’ किंवा ‘बोध होणे’साठी वापरात येणाऱ्या तिबेटी संज्ञेची व्याख्या आहेः एखाद्या गोष्टीविषयी नेमके आणि निश्चित ज्ञान प्राप्त करणे. 

संयोगाने संस्कृत आणि तिबेटी भाषेत मानसिक कृती आणि मनाच्या वर्णनासाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतांशी शब्दांचे अर्थ पाश्चिमात्त्य भाषेत वापरल्या जाणाऱ्या शब्दांच्या तुलनेत फार भिन्न आहेत. याच कारणासाठी मूळ आशियाई भाषा आणि संबंधित आशियाई भाषेच्या संदर्भातील शब्दांचे अर्थ अभ्यासणे उपयुक्त असते. याचा अर्थ असा नाही की केवळ शब्दकोशातील अनुवाद वाचले की झाले, तर त्या भाषेत प्रत्यक्षात व्यवहार करायला हवा आणि त्यातील परिभाषा समजून घ्यायला हव्यात. जर तुम्ही हे साध्य केले तर बौद्ध शिकवण समजण्यासाठी तुमच्याजवळ प्रभावशाली विश्लेषणात्मक साधन उपलब्ध असेल. 

उच्चारले गेलेले शब्द समजून घेणे

‘समजून घेणे’ हा शब्द शिकवणींच्या श्रवणाच्या संदर्भातूनही वापरला जाऊ शकतो. या संदर्भातून या शब्दाचा वापर अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये पाहायला मिळतोः ‘मी समजू शकतो की तुम्ही ते शब्द उच्चारले आहेत.’ या वाक्यात जर ‘तुम्ही’ शब्दावर भर दिला जात असेल तर याचा अर्थ आहे की आपल्याला काहीही शंका नाही की ते शब्द खरोखरच तुम्ही उच्चारलेले आहेत. तेव्हा आपण असा विचार करत नाही की ते शब्द तुम्ही उच्चारलेले नाहीत किंवा दुसऱ्या कुणी उच्चारलेले आहेत. आपण त्यांना ते उच्चारताना ऐकलेले असते आणि आपल्याला पूर्ण विश्वास असतो की आपल्या ऐकण्यात काहीही गफलत झालेली नाही. 

जर ‘ते शब्द’ वर अधिक भर असेल तर ‘मी समजू शकतो की तुम्ही ते शब्द उच्चारले आहेत.’ या वाक्याचा वेगळा अर्थ होऊ शकतोः ‘तुम्ही जे शब्द उच्चारलेले आहेत, मी त्यातील प्रत्येक शब्द स्वतंत्रपणे समजू शकतो. शक्यता आहे की मी त्या शब्द आणि वाक्यातील अधोरेखित अर्थ पूर्णतः समजू शकलेलो नाही – ती एक स्वतंत्र प्रक्रिया आहे, पण मी नेमकेपणाने समजू शकतो की तुम्ही हा शब्द उच्चारला होता, ही संज्ञा आणि हे वाक्य उच्चारले होते.’ 

आपल्याला पक्के ठाऊक असायला हवे की आपण नेमके तेच शब्द ऐकले आहेत, जे उच्चारले गेले आहेत. आपण ते इतर लोकांकडून तपासून घेऊ शकतो की त्यांनीही नेमके तेच शब्द ऐकले आहेत का जे आपण ऐकले आहेत. जर एखादे रेकॉर्डिंग उपलब्ध असेल तर आपण ते ऐकू शकतो. जर वक्त्याचा आवाज आणि रेकॉर्डिंग सुस्पष्ट असेल तर आपल्याला विश्वास असतो की आपण योग्य ऐकले आहे. जर आवाज आणि रेकॉर्डिंग तितकेसे स्पष्ट नसेल तर आपण दुसऱ्यांना विचारून त्यांची मदत घेऊ शकतो आणि जाणून घेऊ शकतो की त्यांनी काय ऐकले आहे आणि आपण जे ऐकले आहे, त्याच्याशी आपण त्याची तुलना करू शकतो. जेव्हा आपण शिकवणींच्या रेकॉर्डिंगवर अवलंबून असतो, तेव्हा असे करणे फार आवश्यक असते. त्यामुळे श्रवणातून लाभलेल्या विवेकी जागरूकतेच्या वापरातून आपण हे निश्चित करतो की उच्चारले गेलेले शब्द आपण योग्य आणि निश्चितपणे समजलेले आहोत. 

शब्दांचा अर्थ समजून घेणे

आता चिंतन – जो बोधप्राप्तीच्या त्रिसुत्रीमधील दुसरा टप्पा आहे – त्याचा अर्थ आहे शब्दांच्या अर्थांना समजणे, जे अर्थातच फार आवश्यक असते. जर आपण एखादी लाभकारी सवय विकसित करत असू, तेव्हा आपल्याला केवळ शब्द माहीत असणे आवश्यक नसते, तर शब्दांचे अर्थ समजणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, तिबेटी भाषेत काही लोक श्लोकांचे पाठांतर करतात आणि त्याचा त्यांना अर्थच माहीत नसतो. जर तुम्हाला शब्दांचा अर्थही माहीत नसेल तर तुम्ही एखादी लाभकारी सवय कशी विकसित कराल? 

तुम्ही पाहू शकाल की अनेक तिबेटी बौद्ध गुरू सल्ला देतात की प्रार्थना आणि विविध साधनांचे पाठ तिबेटी भाषेत घ्यावेत. अर्थात पुरातन अनुष्ठानांमध्ये भाग घेण्याचे काही फायदे असतातः तुम्ही स्वतःला त्या परंपरेचे पाईक समजता आणि हे बघुनही समाधान वाटत असते की विविध देशीय आणि भाषिक लोक एकाच गोष्टीचे पठण करीत आहेत. पण तिबेटी भाषेतील पठणाचा तोवर फायदा होत नाही, जोवर आपल्याला तिबेटी भाषेतील त्या शब्दांचा अर्थ माहीत नसतो. त्यामुळे आपल्याला अर्थ समजून घेणे गरजेचे असते आणि अर्थ योग्य आणि निर्णायक असायला हवा. याचा अर्थ असा आहे की जो अर्थ आहे, त्याला जो अर्थ नाही त्याहून वेगळं करणं असतं. शब्दांच्या अर्थाचा निर्णायक बोध होण्यासाठी हे आपण एका विश्लेषणात्मक आणि तर्कसंगत प्रक्रियेतून करतो. 

एखाद्या शिकवणींमधील शब्दांच्या अर्थांबाबत दृढ विश्वास प्राप्त करणे

निर्णायक बोध प्राप्त करण्याविषयीचा मुद्दा एक कठीण विषय समोर घेऊन येतोः एखाद्या गोष्टीविषयी आपण दृढ विश्वास कसा प्राप्त करू शकू? जी गोष्ट प्रत्यक्षात नाही किंवा जी इंद्रियांना जाणवत नाही, अशा गोष्टीबाबत दृढ विश्वास प्राप्त करण्यासाठी आपल्याला तर्काचा आधार घ्यावा लागतो. पण काही असे लोकही असतात, जे तर्कसंगत मांडणीद्वारे सिद्ध झालेली गोष्टही मान्य करत नाहीत. काही वेळा असे लोक तर्कसंगत मांडणीतील निष्कर्षावर विश्वास ठेवायला तयार नसतात. आपली प्रवृत्ती तशी असेल तर आपल्या धर्म अभ्यासात अनेक अडथळे येऊ शकतात.  

पण आपण असे मानू की आपल्याला तर्कावर आधारित निष्कर्ष मान्य आहेत. तर आपण नश्वरतेला विश्लेषण आणि तर्कवितर्काच्या प्रक्रियेचे उदाहरण म्हणून घेऊ. आपण हे सिद्ध करून त्याद्वारे बोध प्राप्त करू पाहत आहोत की एखाद्या गोष्टीची निर्मिती किंवा उत्पत्ती कारण आणि परिस्थितीवर अवलंबून आहे, तर त्याचा अंत अटळ आहे. आणि त्या कारण व परिस्थितीचे प्रत्येक क्षणी नुतनीकरण होत नाही, त्यामुळे त्या कारण व परिस्थितीच्या आधारावर निर्माण झालेले उत्पादन अंततः संपत जाणार आहे. 

तुम्ही एखाद्या अशा गोष्टीचं उदाहरण घेऊ शकता, जी तुम्ही विकत घेतली असेल आणि ती कालांतराने तुटली किंवा खराब झाली असेलः उदाहरणार्थ, तुम्ही नवी कार खरेदी करता आणि ती कालांतराने खराब होते, फुले-फळे सडून जातात. इथे नियमाला अपवाद नाही. असं एखादंही उदाहरण पाहायला मिळत नाही की उत्पादित केलेली एखादी गोष्ट कधीच खराब झालेली नाही. एखादी गोष्ट निर्माण केली आहे - याचा अर्थ ती आधी अस्तित्वात नव्हती - तर ती नष्ट होणारच. असं का होतं? कारण कोणतीही गोष्ट कारणे आणि परिस्थितीवर अवलंबून राहूनच निर्माण केली जाते. पण एखाद्या गोष्टीच्या उद्याने आधीच्या गोष्टीच्या निर्मितीसाठी कारणीभूत असलेली कारणे आणि परिस्थिती बदलते. ही कारणे आणि परिस्थिती बदलते कारण ती ही काही अन्य कारणांमुळे अस्तित्वात आलेली असते. त्यामुळेच ती कारणे आणि परिस्थिती आता उपलब्ध असत नाही, जी त्या विशिष्ट गोष्टीच्या अस्तित्वासाठी पोषक असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वासाठी कारणीभूत असलेली कारणे आणि परिस्थिती संपून जाते, तेव्हा त्या समर्थनकारी घटकांवर अवलंबून निर्माण झालेल्या कोणत्याच गोष्टीचे अस्तित्व राहत नाही. ती गोष्ट यामुळे नष्ट होईल की तिच्या अस्तित्वाचे सातत्य राखण्यासाठी आवश्यक कारणेच अस्तित्वात राहत नाहीत, जी तिच्या निर्मितीच्या वेळी उपलब्ध होती. त्यांची अवस्था बदलेल कारण ती अवस्थाही इतर कारणे आणि परिस्थितीने प्रभावित असतील. 

आपण व्यक्तिगत संबंधांनाही एक उदाहरण म्हणून पाहू शकतो. एखाद्यासोबतच्या नात्याचा उगम अनेक कारणे आणि परिस्थितीवर निर्भर असते. उदाहरणार्थ, मी एका विशिष्ट वयात होतो, समोरची व्यक्ती एका विशिष्ट वयात होती, माझ्या जीवनात असे घडत होते, त्या व्यक्तीच्या जीवनातही तसेच घडत होते, समाजात अशा घटना घडत होत्या. या सर्व घटकांनी आपल्याला एकत्र आणले आणि आपल्यातील नाते विकसित झाले. पण ती परिस्थिती कायम तशीच राहत नाही, ती कायम बदलत राहते. आपलं वय वाढत जातं, आपल्या जीवनात अनेक गोष्टी घडत राहतात. जरी आपण प्रदीर्घ काळ एकत्र राहिलो तरी दोघांपैकी एक जण आधी मृत्यू पावेल. परिस्थिती आणि कारणांवरील अवलंबनामुळे आपल्यातील नाते कायम बदलत राहील, ते कायम तसेच राहणार नाही. तर्काच्या आधारे या निष्कर्षावर पोहोचलो तरी आपण हे तथ्य स्वीकारण्याची आपली इच्छा नसते.  

दुसरे एखादे उदाहरण पाहायचे झाल्यास, आपण संगणक खरेदी करतो आणि आपली अपेक्षा असते की तो कायम चालू राहावा, कधीच खराब होऊ नये, पण तरी तो खराब होतो, तो का खराब होतो? तो खराब होण्यामागचे कारण तो तयार करण्यात आला होता हे आहे. हे असे म्हणण्यासारखे आहे की ‘त्या माणसाच्या मृत्यूमागचे कारण काय आहे? त्या माणसाचा मृत्यू झाला कारण त्याचा जन्म झाला होता.’ एक विनोद आहे, तो असा आहेः ‘तुला जीवनाची व्याख्या माहीत आहे का? जीवन खरेतर १०० टक्के मृत्यू दर असणारा यौन संक्रमित रोग आहे.’ दुर्दैवाने ते खरे आहे! जरी आपण नश्वरतेसारख्या विषयाच्या आकलनासाठी तर्काचा वापर करत असलो, तरीही ते स्वीकारताना खूप विरोध होतो. काही वेळा सादर केलेल्या माहितीवर आपण विश्वास ठेवायला तयार नसतो. नश्वरता आपल्या जीवनाचा भाग आहे, हे स्वीकारायची आपली तयारी नसते. त्यासाठी त्या विषयाच्या सखोल आकलनासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा तर्काचा आधार घ्यावा लागतो. 

चिंतनाच्या प्रक्रियेतून आपण ‘बोधा’पर्यंत पोहोचतो - ज्याला  ‘चिंतनातून आलेली विवेकी जागरूकता’ म्हणतात. आपण शब्दांचे अर्थ नेमकेपणाने समजू शकतो आणि त्याबाबत आपण ठाम होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, आपण तर्कसंगत विचार करून अभिप्रेत नसलेल्या गोष्टी टाळतो. ‘नश्वरतेचा अर्थ असा नाही की माझा संगणक खराब होईल. तर त्याचा अर्थ आहे की तो एखाद्या टप्प्यावर खराब होईल.’ त्यामुळे आपण ‘निर्माण केलेली गोष्ट संपणारच’ या सत्याबाबत आश्वस्त होऊ किंवा नाही, पण किमान आपल्याला नश्वरतेचा अर्थ तरी नेमका समजेल. 

आपण श्रवण केलेली शिकवण यथार्थ आणि उपयुक्त असल्याबद्दल आश्वस्त होणे

पुढे जाऊन आपल्याला आपण ऐकलेल्या शब्दाबद्दल फक्त आश्वस्त व्हायचे नसते, तर त्यांचा नेमका अर्थ काय आहे, याबाबतही आश्वस्त होण्याची आवश्यकता असते. आपल्या नश्वरतेविषयीच्या उदाहरणाकडे पाहूः आपल्याला संज्ञेचा अर्थ समजेल, पण  आपल्याला विश्वास आहे का की ते सत्य आहे की नाही? आपण खरोखर आश्वस्त आहोत का? जर आपण नश्वरतेविषयक निरंतर चिंतन करत असू आणि आपण निश्चितपणे नश्वरतेच्या नियमाला अपवाद शोधू शकत नाही, तेव्हा आपल्याला विश्वास बसतो की नश्वरता हा मूलभूत नियम आहे. अशा स्थितीत आपली विचारप्रक्रिया काहीशी अशी असू शकतेः ‘माझा मृत्यू अटळ आहे. जो कुणी जन्माला आला आहे, तो मरण पावला आहे. जो जन्माला आहे, पण मरण पावला नाही,असे एकही उदाहरण नाही. त्यामुळे मी मरणार नाही, असा विचार करण्याचे काही कारण आहे का? नाही, तसे कोणतेही कारण नाही. ’   

जर आपण आश्वस्त झालो की एखाद्या टप्प्यावर आपण मरणार आहे, तर आपण हे जीवन शक्य तितके अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करू. बहुतांशी वेळा अशीच स्थिती असते की एखाद्याला मृत्यू नजीक आला असल्याचा अनुभव येतो, तेव्हा त्याला जाणीव होते की, ‘अरे, मी तर अजून जिवंत आहे आणि शक्य होईल तेवढे माझे उर्वरित जीवन अर्थपूर्ण करण्याची माझी इच्छा आहे.’ पण आपल्या नश्वरतेविषयक ठाम निर्णयाप्रत येण्यासाठी आणि जीवन अर्थपूर्ण करण्याच्या निश्चयासाठी आपल्याला मृत्युच्या नजीक पोहचल्याची अनुभूती येईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. 

अशा प्रकारे, आपण चिंतनातून निश्चित आणि योग्य बोध प्राप्त करतो. पुढे जाऊन त्याच्या यथार्थतेबाबत आश्वस्त होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते लाभकारक असल्याबद्दल आश्वस्त होऊन त्याला आपल्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी आश्वस्त होण्याची आवश्यकता असते. 

अर्थबोध होणे, त्याच्या यथार्थतेबाबत आश्वस्त होणे आणि त्याच्या लाभकारकतेबद्दल आश्वस्त होणे हे सर्व चिंतनातून येणारी विवेकी जागरूकता विकसित करण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे. ही फार महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे आणि त्यासाठी फार वेळही खर्च होतो. आपण शांतपणे बसून आपण ऐकलेल्या किंवा वाचलेल्या शिकवणींवर सखोल चिंतन करण्याची आवश्यकता असते. तसे न करताच, आपण नश्वरतेविषयक ध्यानधारणा करण्याचा प्रयत्न करू, जसे आपण नुसतेच बसलो आहोत आणि काय करायचे आहे, याची आपल्याला कल्पनाच नाही, तर आपण स्तब्धतेच्या अवस्थेत पोहचू - ज्याला आपण ‘स्तंभित होणे’ म्हणतो आणि त्यालाच आपण ध्यानधारणा समजायला लागू. ती ध्यानधारणा अजिबातच नाही. तर ध्यानधारणा म्हणजे काय? 


ध्यानधारणेचे तीन प्रकार

ज्या प्रकारे आपण श्रवण आणि चिंतनाच्या माध्यमातून या दोन्हीशी संबंधित विवेकी जागरूकता विकसित करू शकतो, तसेच ध्यानधारणेमुळे ज्याला ‘ध्यानधारणेतून उत्पन्न होणारी विवेकी जागरूकता’ म्हणतात, ती विकसित करता येते. या बोधासह आपण पूर्ण एकाग्रतेने इच्छित चित्तवृत्ती विकसित करू शकतो आणि इतर चित्तावृत्तीच्या तुलनेतील त्यांच्यातील निश्चित आणि योग्य फरक ओळखू शकतो. ही विवेकी जागरूकता प्राप्त करण्यासाठी आपण या चित्तवृत्तीचा वारंवार सराव करत राहतो. या साधनेच्या अभ्यासासाठी ध्यानधारणेचे अनेक प्रकार आहेत, पण आपण तीन सर्वसामान्य प्रकारांचा इथे विचार करू. 

एखाद्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करणे

पहिल्या प्रकारातील ध्यानधारणा एखाद्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करण्याशी संबंधित आहे. आपण कोणत्याही घटकावर ध्यान केंद्रित करू शकतो आणि त्यातून त्या घटकावरील एकाग्रता विकसित करण्याचा प्रयत्न करतो. भलेही आपण आपल्या आत-बाहेर जाणाऱ्या श्वासोच्छवासावर ध्यान केंद्रित करू शकतो, किंवा बुद्धाच्या मानसदर्शनावर ध्यान केंद्रित करू शकतो किंवा चित्तावृत्तीवर ध्यान केंद्रित करू शकतो. ते ध्यान केंद्रित करणेच असेल. पण इथे नमूद केलेले तीन घटक तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वसामान्य घटक आहेत. 

अशा प्रकारच्या ध्यानधारणेचा एक महत्त्वपूर्ण प्रकार हा आहे की एखाद्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करायचे आणि तसे ध्यान केंद्रित करत असतानाच त्याला विशिष्ट दृष्टीतून ओळखण्याचा, जसे त्याची नश्वरता, ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून एखाद्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित केल्यानंतर खरोखरच त्याच्या नश्वरतेची जाणीव होते. एखादी गोष्ट चिरंतन समजून त्याबद्दल आसक्ती बाळगण्याच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवण्यासाठी हा अभ्यास फारच उपयुक्त आहे. 

याचे आणखी एक उपयुक्त उदाहरण पुढील प्रमाणे आहेः तुमचे एखाद्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत किंवा नाते आहे, पण तो तुम्हाला भेटत नाही किंवा फोनही करत नाही, त्यामुळे तुम्ही निराश होता. या उदाहरणात काही तथ्यांची जाणीव होऊन त्याबाबत तु्म्ही आश्वस्त होणे गरजेचे असते, जसे, ‘माझ्या मित्राच्या आयुष्यातील मी एकमेव व्यक्ती नाही, त्याच्या आयुष्यात मी सोडून इतरही लोक आहेत. त्यामुळे त्याने त्याचा पूर्ण वेळ मलाच द्यावा आणि इतरांना बिलकूल वेळ देऊ नये, असा विचार करणे तर्कसंगत नाही.’ इथे तुम्ही एका असंभाव्य कल्पनेच्या प्रक्षेपणाला आव्हान करता, जसेः ‘मी माझ्या मित्राच्या आयुष्यातील एकमेव व्यक्ती आहे.’ त्यामुळे जेव्हा तुमचा मित्र तुमच्यासोबत पुरेसा वेळ घालवत नाही, म्हणून तुम्ही निराश होऊ लागता तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राबाबत या दृष्टिकोनातून लक्ष्य केंद्रित करू लागता की, ‘त्याच्या जीवनात माझ्याशिवाय इतर लोक आणि इतर गोष्टीही आहेत.’

तर जेव्हा आपण ध्यानधारणेविषयी बोलतो, तेव्हा आपण एखाद्या चमत्कारिक गूढ प्रक्रियेविषयी बोलत नाही, आपण एखाद्या काल्पनिक जगात जात नाही. उलट ध्यानधारणेचा संबंध आपल्या जीवनातील वेदना, दुःख, आणि समस्यांचा सामना करण्याच्या व्यावहारिक पद्धतीशी आहे. 

अशा प्रकारे पहिल्या प्रकारची ध्यानधारणा एखाद्या लक्ष्यावर निश्चित दृष्टिकोनातून ध्यान केंद्रित करण्याशी संबंधित आहे, त्या लक्ष्यावर एक तर केवळ ध्यान केंद्रित केले जाऊ शकते किंवा एखाद्या विशिष्ट बोध किंवा दृष्टीसह ध्यान केंद्रित केले जाऊ शकते, जसे आपण आपल्या मित्रावर ध्यान केंद्रित करण्याच्या उदाहरणात पाहिले आहे. 

चित्तावस्था विकसित करणे

ध्यानधारणेचा दुसरा प्रकार एखादी विशिष्ट चित्तावस्था विकसित करण्याशी संबंधित आहे, उदाहरणार्थ प्रेम किंवा करुणाभाव विकसित करणे आणि त्या भावनेवर केंद्रित राहणे. यात एकाग्रतेचा भर आपल्या लक्ष्याप्रति असलेल्या प्रेम किंवा करुणेवर नसतो, तर इथे एखादी भावना किंवा चित्तावस्था विकसित करण्यावर भर असतो. 

आकांक्षा विकसित करणे

ध्यानधारणेचा तिसरा प्रकार एखाद्या विशिष्ट ध्येयाप्रत पोहचण्याच्या अपेक्षेने लक्ष्यावर ध्यान केंद्रित करण्याशी संबंधित आहे. उदाहरणार्थ, ‘मी ज्ञानप्राप्ती मिळवेनच’ या अपेक्षेसह आपल्या व्यक्तिगत ज्ञानप्राप्तीपर ध्यान केंद्रित करणे. यालाच ‘बोधिचित्त ध्यानधारणा’ असेही संबोधतात. जेव्हा आपण बोधिचित्त ध्यानधारणा, ज्याचा अनुवाद ‘जागृत चित्तावृत्ती’ असाही केला जातो, ती ध्यानधारणा करत असतो, तेव्हा आपले ध्यान सर्वसाधारण ज्ञानप्राप्तीवर केंद्रित नसते, ते बुद्ध्याच्या ज्ञानप्राप्तीवरही केंद्रित नसते, तर त्यात व्यक्तिगत ज्ञानप्राप्तीवर आपले ध्यान केंद्रित असते. 

आपल्याला अद्याप ज्ञानप्राप्ती झालेली नसते, पण ती होऊ शकते- आपला दृढ विश्वास असतो की ती साध्य होईल. त्यामुळे तिसऱ्या ध्यानधारणेत आपण भविष्यातील ज्ञानप्राप्तीच्या दृढ ध्येयावर ध्यान केंद्रित करतो. 

दैनंदिन जीवनातील तीन प्रकारच्या ध्यानधारणा

अशा प्रकारे या तीन ध्यानधारणा त्या लाभकारक सवयी विकसित करतात, ज्या आपल्याला दैनंदिन जीवनात अंगीकारण्याची इच्छा असते. ध्यानधारणा आपल्या जीवनाशी कसलाच संबंध नसलेली एखादी गौण क्रिया ठरू नये, याकडे लक्ष पुरविणे फार महत्त्वाचे आहे. ध्यानधारणा ही काही पळवाट नाही, तो काही खेळही नाही, तो छंदही नाही. ती अशा गुणांना विकसित करणारी साहाय्यक पद्धती आहे, जे गुण आपण आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारू इच्छितो. 

आपण वर उल्लेखिलेल्या उदाहरणांच्या साहाय्याने या तीन ध्यानधारणा पद्धती कशा लागू करू शकतो, ते पाहू. जेव्हा आपण पहिल्या प्रकारातील ध्यानधारणा करतो, ज्यात आपण एखाद्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करतो, तेव्हा आपण आपले चित्त शांत करून आपली एकाग्रता वाढवण्यास शिकतो. आपण फक्त काम करतेवेळीच एकाग्रता बाळगायला शिकत नाही, तर संवादावेळीही एकाग्र राहण्यास शिकतो. आपण त्या व्यक्तिवर आणि त्याच्या बोलण्यावर ध्यान केंद्रित करू इच्छितो आणि वेगवेगळ्या गोष्टींनी आपले चित्त भरकटू नये, यासाठी सावध होतो. आपण कोणत्याही मानसिक प्रतिक्रियांशिवाय  श्रवणावर ध्यान केंद्रित करू इच्छितो आणि  समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यासंबंधी न्यायचिकित्सक विचारही बाळगत नाही, जसे ‘हे फारच मूर्खासारखे आहे.’ किंवा ‘मला वाटते त्यांनी आपले तोंड बंद ठेवावे’ आपण अशा प्रकारची मानसिक बडबड शांत करू इच्छितो. आपण त्या व्यक्तिवरील आणि त्याच्या बोलण्यावरील आपले ध्यान अशा दृष्टिकोनातून अधिक सुधारू शकतो, जसे ‘तू मानवी जीव आहेस आणि तुलाही माझ्यासारख्याच भावना आहेत, तू बोलत असताना त्याकडे लक्ष पुरविणे जाणे तुला महत्त्वाचे वाटते, जसे मी बोलत असताना मलाही वाटते.’ एकाग्रतेसंबंधी ध्यानधारणा करतेवेळी आपण अशी क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो. 

एखादी विशिष्ट चित्तावस्था विकसित करण्यासंबंधीच्या दुसऱ्या प्रकारच्या ध्यानधारणेचा वापर आपण दैनंदिन जीवनातील प्रेम आणि करुणाभाव वृद्धिंगत करण्यासाठी करू शकतो. आपण प्रेमभाव विकसित करण्यासाठी प्रयत्न करतो- सर्व जण सुखी असावेत अशी इच्छा बाळगणे - मग आपण भलेही कोठेही आणि कुणासोबतही असू. इथे प्रेम शब्दाचा संबंध प्रत्येकाप्रति प्रेमभाव बाळगण्याशी आहेः बसमधील सहप्रवासी, रेल्वेतील सहप्रवासी, रहदारीत अडकलेले सर्व जण, दुकानात असलेले सर्व जण, सर्व प्राणिमात्र आणि कीटकही- अगदी प्रत्येक जण. याचा अर्थ प्रत्येकाप्रति आदरभाव विकसित करणे. प्रत्येक जण समान असतो, प्रत्येकाला सुख हवे असते आणि दुःख नको असते. आणि अगदी माशीपासून प्रत्येकाला सुखाचा समान हक्क आहे. 

आणि शेवटी आपण अशी आकांक्षा विकसित करण्यासाठी ध्यानधारणेचा उपयोग करतो, जी आपण जीवनभर अमलात आणूः ‘मी एका उद्दिष्टप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे. मी माझ्या कमतरतांवर मात करण्याच्या प्रयत्नात आहे. मी चांगले गुण विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी ज्ञानप्राप्ती आणि मुक्तीसाठी प्रयत्न करत आहे.’ ही आकांक्षा आपण आपल्या आसनावर बसून ध्यानधारणा करतो तेवढ्याच काळापुरती मर्यादित नसते, तर ती आपले संपूर्ण जीवन व्यापते. 

लाभकारक चित्तवृत्ती विकसित करण्यासाठी त्सोंगखापा यांचा सल्ला 

महान तिबेटी गुरू त्सोंगखापा यांनी या तीन ध्यानधारणा समजून घेण्यायोग्य माहिती नेमक्या स्वरूपात स्पष्ट केली आहे, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्यांनी ध्यानधारणेच्या आधारस्वरूप असलेल्या लाभकारक चित्तवृत्ती विकसित करण्याविषयी सांगितले आहे.

तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहात ती समजून घ्या 

सर्वप्रथम आपल्याला हे माहीत असणे आवश्यक आहे की आपण नेमके कशावर लक्ष केंद्रित करत आहोत. उदाहरण म्हणून करुणाविषयक ध्यान घेऊ. करुणेवर लक्ष केंद्रित करत असताना, आपण इतरांच्या वेदनेवर लक्ष केंद्रित करत आहोत. ते बोधिचित्तहून थोडेसे निराळे आहे, ज्यात आपण आपल्या व्यक्तिगत ज्ञानप्राप्तीवर लक्ष केंद्रित करतो, जी अद्याप साध्य झालेली नसते. काही लोकांचा आपण बोधिचित्त ध्यानधारणा करत असल्याचा समज असतो, पण ते वास्तविक केवळ करुणाविषयक ध्यान करत असतात, करुणा बोधिचित्ताचा पाया आहे, पण करुणा आणि बोधिचित्त एक नाही. 

त्याचे सर्व पैलू समजून घ्या

ध्यान केंद्रित करण्याचे लक्ष्य निश्चित केले की - या प्रकरणात इतरांचे दुःख हेच करुणाविषयक ध्यानाचे मुख्य केंद्र असते - पुढे जाऊन आपल्याला त्या लक्ष्यासंबंधी सर्व पैलू समजून घेणे आवश्यक असते. त्यामुळे आपण सर्व जिवांमार्फत भोगल्या जाणाऱ्या दुःखांच्या विभिन्न पैलुंचा आणि प्रकारांचा शोध घेतोः ज्यात दुःख, सर्वसामान्य सुख, कर्माच्या प्रभावाखालील बंधनकारक व्यवहार आणि पुनर्जन्माच्या अनियंत्रित फेऱ्याचा समावेश असतो. आपण केवळ काही जिवांच्या सीमित दुःखावर, जसे रोजगार गमावल्यानंतरचे दुःख आणि समस्या, यावर लक्ष केंद्रित करत नाही. महाकरुणेच्या ध्यानधारणेत आपण प्राण्यांसहित सर्व जिवांच्या अनुभवाला येणाऱ्या सार्वभौम दुःखाच्या सर्व पैलूंवर ध्यान केंद्रित करतो. 

 लक्ष्याकडे पाहण्याचा आपल्या मनाचा दृष्टिकोन समजून घ्या

त्यानंतर आपल्याला हे माहीत करून घ्यायचे असते की आपल्या मनाचा त्या लक्ष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. करुणाभावासह आपले चित्त इतरांच्या दुःखावर या इच्छेसह केंद्रित होते की हे दुःख दूर व्हावे आणि परत येऊ नये. यात असा दृष्टिकोन नसतो की ‘बाप रे, हे किती भयानक आहे.’ त्यामुळे पुन्हा हा विचारही बोधिचित्तापासून भिन्न आहे. बोधिचित्तामध्ये आपण आपल्या अद्याप साध्य न झालेल्या ज्ञानप्राप्तीवर ध्यान केंद्रित करतो आणि त्याला आपण या उद्देशाच्या दृष्टीने पाहतो कीः ‘मी ज्ञानप्राप्ती मिळवणार आहे आणि त्या सिद्धीद्वारे इतरांचे कल्याण करणार आहे. ’ ज्या दृष्टिकोनातून आपण करुणामय भावनेने इतरांच्या दुःखाचा विचार करतो, त्याहून हा दृष्टिकोन वेगळा आहे. 

उद्दिष्टप्राप्तीसाठी साहाय्यक गोष्टी समजून घ्या

त्यानंतर आपल्याला हे समजून घेणे आवश्यक असते की ती चित्तावस्था विकसित करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. आपण आपलेच उदाहरण पाहिले तर स्वतःच्या दुःखांबाबत समान उद्दिष्ट किंवा भावना ठेवल्यास करुणाभाव विकसित करण्यासाठी साहाय्य मिळते. यालाच ‘मुक्तीचा संकल्प’ संबोधले जाते, ज्याचा अनुवाद ‘सर्वसंगपरित्याग’ असा केला जातो. ही चित्तावस्था आपले दुःख आणि त्या दुःखापासून व दुःख निर्माण करणाऱ्या कारणांपासून मुक्ती मिळवण्याच्या दृढ संकल्पावर केंद्रित असते. दुःख निर्माण करणाऱ्या कारणांपासून मुक्त होण्याचा संबंध दुःखास कारणीभूत होणारा व्यवहार, जसे क्रोधित होणे, सोडून देण्याशी आहे. जर आपण स्वतःला दुःखातून मुक्त करण्याचा दृढ निश्चय विकसित केला, तर तो संकल्प आपल्याला तो दृष्टिकोन आणि ती इच्छा तितक्याच तीव्रतेने इतरांच्या कल्याणाबाबत बाळगण्यासाठी प्रवृत्त करेल, जसे आपण स्वतः ते साध्य केले. 

ती चित्तावस्था विकसित करण्यातले अडथळे समजून घ्या

ती चित्तावस्था विकसित करण्यास बाधक ठरणारे अडथळे समजून घेणेही आवश्यक आहे. करुणाभाव विकसित करण्यातले अडथळे काय आहेत, तर इतरांना किंवा त्यांच्या दुःखाला गांभीर्याने न घेणे. हा अडथळा दूर करण्यासाठी असा विचार करणे आवश्यक आहे, ‘प्रत्येकाला सुख हवे असते, कोणालाच दुःख नको असते. कुणीच त्याच्या किंवा तिच्या दुःखपासून मुक्ती मिळवण्याच्या इच्छेपासून वेगळा नाही. आपण सर्व जण समान आहोत. प्रत्येकाला भावना आहेत, अगदी तशाच जशा मला भावना आहेत. प्रत्येकाचे दुःख मला माझ्या दुःखासारखेच वेदनादायी आहे. मला जशी माझ्या दुःखापासून मुक्ती हवी आहे, तशीच त्यांनाही हवी आहे. ’ अशा प्रकारे आपण त्यांच्याविषयी सहानुभूती आणि आदर विकसित करतो. जर आपल्याकडे ती संवेदनशीलता आणि आदर नसेल तर आपल्याला प्रामाणिक करुणभाव विकसित करताना अडथळा येईल. 

त्या चित्तवस्थेच्या उपयोगाची पद्धत समजून घ्या

त्सोंगखापा पुढे सांगतात की एकदा आपण ती चित्तावस्था विकसित केली की तिचा उपयोग कसा करायचा हे माहीत करून घ्यायला हवे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, त्या चित्तावस्थेचा प्रयोग कसा करायचा. मी करुणाभाव विकसित केला, मग पुढे काय? तर ते मला इतरांशी वागताना उपयुक्त ठरेल, त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यासाठी मला साहाय्यक ठरेल, आणि ही चित्तावस्था मला ज्ञानप्राप्तीच्या सर्वोच्च ध्येयासाठी प्रेरित करेल, जेणेकरून मी इतरांच्या कल्याणासाठी भरीव काम करू शकेन. मला जाणीव असेल की मला इतरांच्या कल्याणासाठी सक्षम होण्यात कोणत्या मर्यादा आड येत आहेत आणि  त्या मर्यादांपासून मुक्त होण्याची माझी इच्छा असेल. 

ती चित्तावस्था कोणते दोष दूर करेल ते समजून घेणे

पुढे जाऊन आपल्याला हे समजून घ्यायला हवे कीः ही चित्तावस्था कोणते दोष दूर करेल किंवा त्यांच्यापासून मुक्ती मिळवून देईल? करुणाभाव इतरांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती असलेली निष्ठुरता संपवेल. ती चित्तावस्था इतरांची मदत करताना आड येणारा आळशीपणा संपवण्यास मदत करेल. आणि स्वतःवर काम करण्यास आड येणारा आळशीपणाही ती चित्तावस्था संपवेल. निष्ठुरता संपल्याने मी इतरांना अधिकाधिक मदत करू शकेन. जर आपण करुणा विकसित करण्यासाठी आणि तिच्या ध्यानधारणेसाठी आवश्यक सर्व गोष्टी समजून घेतल्या तर आपण ध्यानधारणा योग्य रीतीने करत आहोत, आपण नेमके काय करत आहोत आणि का करत आहोत,याबाबत आश्वस्त होऊ शकू. ध्यानधारणेसाठी आपण खऱ्या अर्थाने तयार झालेले असू. नाहीतर, ते पोहायला येत नसताना पाण्यात उडी घेतल्यासारखे होईल. जर आपण निव्वळ असा विचार केला की, ‘आपण सरळ बसू आणि ध्यानधारणा करू’ आणि आपल्याला आपण नक्की काय करत आहोत, याचीच कल्पना नसेल, तर आपल्याला अपेक्षित लाभ न मिळण्याची शक्यता अधिक असते.

Top