एकाग्रतेची पारमिता: ध्यानपारमिता

आपलं मन सतत भरकटलेलं असतं. अगदी आपण एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं म्हंटलं तरी सतत वाजणारी मोबाइल फोनची नोटिफिकेशन्स किंवा भविष्याबाबतच्या परिकल्पनांमुळे आपलं चित्त सतत भरकटतं. आपल्या भावना सतत वरखाली होत राहतात. आपल्याला मानसिक स्थैर्यासह एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यापासून विचलित करत राहतात, विशेषतः जेव्हा आपले मन चिंताग्रस्त, भयग्रस्त असते तेव्हा. ध्यानपारमितेला मानसिक आणि भावनिक स्थैर्याची जोड देऊन आपण आपल्या क्षमता सकारात्मक कार्यांच्या पूर्तीसाठी पूर्ण क्षमतेने वापरू शकतो.

प्रस्तावना 

सहा पारमितांमधील पाचवी पारमिता म्हणजे एकाग्रता किंवा मानसिक स्थैर्यासंबंधीची पारमिता. तिच्यामुळे आपण आपल्या उद्दिष्टावर आपली इच्छा असेपर्यंत सकारात्मक भावना आणि सखोल आकलनासह पूर्ण एकाग्र होऊ शकतो. आपले मन मानसिक भरकटीच्या अतिशयोक्तीपासून, तणावदायी भावनांच्या(विशेषतः लालसा उत्पन्न करणाऱ्या विषयवस्तुंसदर्भातील आकर्षण) प्रभावातील स्वच्छंदीपणापासून पूर्णतः मुक्त असते. कुशाग्र चित्तामुळे आपल्या ऊर्जा एकाग्र होतात आणि आपल्या नियंत्रणात येतात आणि अनियंत्रित होऊन अंतर्मानात खळबळ माजवत नाहीत. आपण मानसिक आणि भावनिक पातळीवरही हर्षोल्हासित करणारे – तरीही शांततामय – भाव अनुभवतो. आपण अद्वितीय अशी भावनिक स्पष्टता अनुभवतो, जी अशा अवस्थेतून निर्माण होते जेव्हा आपले मन कोणत्याही प्रकारच्या विचलित करणाऱ्या विचारांपासून मुक्त असते. अशा स्पष्ट, शुद्ध आणि आनंददायी मनोवस्थेविषयी आसक्त न होता आपण तिचा इच्छित सकारात्मक उद्दिष्टांसाठी वापर करू शकतो. 

या व्यापक मानसिक स्थैर्याची अनेक प्रकारे विभागणी करता येते – स्वरूपानुसार, प्रकारानुसार आणि कार्यानुसार. 

एकाग्रतेच्या स्वरूपानुसार विभागणी 

व्यापक मानसिक स्थैर्याला विभिन्न अवस्थांमध्ये विभागण्याचा एक प्रकार म्हणजे त्यांची साधकाच्या सिद्धीच्या स्तरानुसार विभागणी करणे. ध्यानपारमितासंबंधीची विभागणी आपण खालीलप्रमाणे करू शकतो 

  • साधारण व्यक्ती  – एखादी अशी व्यक्ती जिने आत्तापर्यंत शुन्यतेच्या निर्वैचारिक बोधाचा स्तर प्राप्त केलेला नाही. 
  • साधारणतेहून उच्चस्तर प्राप्त व्यक्ती  – शुन्यतेचा निर्वैचारिक बोध प्राप्त उच्च सिद्धीप्राप्त व्यक्ती (“आर्य”)

जे काही अंशी जरी शुन्यतेचा निर्वैचारिक बोध प्राप्त करू शकले आहेत, त्यांनी एका सीमेपर्यंत तणावदायी भावनांपासून मुक्ती मिळवलेली आहे. त्यामुळे अशा साधकांना हा धोका कमी असतो की भावनात्मक अशांतीमुळे ते आपल्या दैनंदिन जीवनात एकाग्रता लागू करू शकणार नाहीत. 

एकाग्रतेच्या प्रकारानुसार विभागणी 

ही विभागणी त्या लक्ष्याशी संबंधित असते, जे आपण मानसिक स्थैर्य प्राप्त करून साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आपली एकाग्रता खालील सिद्धी प्राप्त करण्याच्या दिशेने केंद्रित असू शकतेः 

  • शमथ – एक शांत आणि स्थिर मनोवस्था, जी स्वच्छंदीपणा आणि मंदपणापासून पूर्ण मुक्त असते. ज्यात आनंद आणि शरीरमनाची स्वस्थ व उर्जितावस्था अनुभवास येते, जी आपल्याला हवा तेवढा काळ सकारात्मक अवस्थेवर केंद्रित राहू शकते. या अवस्थेत आपण सकारात्मक चित्तवृत्तीच्या जोडीने एखाद्या लक्ष्यावर आपले ध्यान एकाग्र ठेवू शकतो. उदाहरणार्थ, एक वा एकाहून अधिक मर्यादित क्षमतेच्या जीवांवर करुणा किंवा सविवेकी बोधासह ध्यान केंद्रित करू शकतो.    
  • विपश्यना – एक असाधारण आकलनशील मनोवस्था, ही सुद्धा स्वच्छंदीपणा आणि मंदपणापासून मुक्त असते. यातही आनंद आणि शरीरमनाची स्वस्थ व उर्जितावस्था अनुभवास येते आणि ती कोणत्याही लक्ष्याच्या सर्व गुणांचा स्पष्ट बोधासह अनुभव घेऊ शकते. शमथ साधनेप्रमाणेच ही साधनाही एखाद्या सकारात्मक मनोवस्थेने, जसे करुणेने युक्त होऊन एखाद्या लक्ष्यावर ध्यान केंद्रित करू शकते, पण यात लक्ष्याचे समस्त गुणविशेष, जसे जीवांद्वारे भोगल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या दुःखांबाबतचा सुक्ष्म विवेक अंतर्भूत असतो.  
  • शमथ आणि विपश्यना एकत्रितरित्या – एकदा का आपण संपूर्ण शमथ अवस्था प्राप्त केली की आपण ती विपश्यनेच्या अवस्थेसोबत जोडण्यासाठी प्रयत्नशील बनतो. खऱ्या विपश्यनेची अवस्था शमथ अवस्था प्राप्त केल्यानंतरच साध्य करता येते. या दोन्हीच्या संगमाच्या अवस्थेत दोन्ही प्रकारच्या आनंदमयी सुखद अनुभूती अनुभवास येतात – एखाद्या इच्छित ध्येयावर ध्यान केंद्रित करण्यासाठी अपेक्षित असणाऱ्या योग्यतेची अनुभूती आणि त्याच्या समस्त गुणांचा अनुभव घेण्यासोबतच त्या गुणांची स्थूल अनुभूती आणि सूक्ष्म विवेकाच्या योग्यतेची अनुभूतीही त्यात असते.

एकाग्रतेच्या कार्यांवर आधारित विभागणी 

एकदा का व्यापक मानसिक स्थैर्याची पारमिता प्राप्त केली की नंतर आपण त्याचे अनेक प्रकारचे परिणाम अनुभवतो. त्यांना या प्रकारच्या एकाग्रतेची कार्ये संबोधले जाते. एकाग्रता खालील कार्ये करतेः 

  • आपले शरीर आणि चित्त याच जीवनकाळात आनंदावस्थेची अनुभूती घेते – एक अशी अवस्था ज्यात आपण शारीरिक आणि मानसिक स्तरावर आनंद आणि सुख अनुभवतो आणि आपल्या तणावदायी भावना तात्पुरत्या काळासाठी शांत होतात. 
  • सद्गुणांचा विकास होतो –  केवळ स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्नशील साधकांसमान प्राप्त होणाऱ्या सिद्धी, जसे असाधारण दृष्टी आणि अत्युन्नत बोध, पुनर्जीवनकारी शक्ती, भ्रमयुक्त मनोभावातून अस्थायी मुक्तीसहित मानसिक स्थैर्याची (“ध्यान”) उच्चतम अवस्था आणि अशांतकारी भावनांचे क्षपण.  
  • आपल्याला दुःख भोगणाऱ्या जीवांचे कल्याण करण्यासोग्य बनवते – ज्यांची मदत करणे अपेक्षित आहे, असे ११ प्रकारचे लोक, ज्यांच्याविषयी नैतिक स्वयंशिस्त आणि धैर्यसंबंधी पारमितांच्या संबंधातून चर्चा केली गेली आहे. 

सारांश 

कदाचित आपल्याला प्रत्यक्षात असे अनुभवास येणार नाही, पण आपल्याला बुटांची नाडी बांधण्यासारख्या किरकोळ कामातही एकाग्रतेची आवश्यकता असते. आपल्यातील बहुतांश लोकांची याहून कितीतरी अधिक जटील कार्ये करण्यासाठी एकाग्रता बाळगण्याची योग्यता असते आणि आपण आपल्या आध्यात्मिक लक्ष्यांच्या प्राप्तीसाठी आपल्या या कौशल्यांना परिपूर्ण बनवू शकतो. इतर पारमितांसोबत संलग्नपणे आणि बोधिचित्ताच्या लक्ष्याच्या साहाय्याने आपले मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता इतकी व्यापक होते की ती आपल्याला ज्ञानप्राप्तीच्या उद्दिष्टापर्यंत पोहचवू शकते. 

Top